অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोमन संस्कृति

रोमन संस्कृति

रोमन संस्कृति

यूरोप खंडात वृद्धिंगत पावलेली एक विकसित व  वैभवशाली संस्कृती. आधुनिक यूरोपीय संस्कृतींचा मूळ स्त्रोत असण्याचा ज्या विविध संस्कृतींना मान मिळतो, त्यांत ग्रीक व रोमन संस्कृती प्रधान आहेत. यात रोमची खास अशी देणगी म्हणजे सर्वगामी शासनसंघटना, तिला आधारभूत अशी विस्तृत विधिसंहिता आणि अर्थव्यवस्था होय. रोमन संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड कल्पिण्यात येतात : एक, राजेशाहीचा काळ (इ. स. पू. ७५३-५०९), दोन, पजासत्ताकाचा काळ (इ. स. पू. ५०९ - इ. स. पू. ३१) आणि तीन, सम्राटांचा काळ (इ. स. पू. ३१ ते इ. स. ४७६).

रोमन या नावाने ओळ्खल्या जाणाऱ्या या सत्तेचे आणि संस्कृतीचे नेतृत्व रोम नगराकडेच होते; परंतु हा विस्तार रोमला सबंध इटली देशाच्या बळावरच करता आला. हा देश (द्वीपकल्प) बुटाच्या आकाराचा असून त्याचे क्षेत्रफळ ३,०१,१९५ चौ. किमी. आहे. उत्तरेकडे आल्प्स, त्याच्या दक्षिणेस पो नदीचे खोरे आणि त्याच्याही दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पाठीच्या कण्यासारखी पसरलेली ॲपेनाइन ही पर्वतश्रेणी आणि त्याच्या दोन्ही बाजूंस किनारपट्ट्या असे भौगोलिक दृष्ट्या इटलीचे तीन स्वाभाविक विभाग पडतात.

पेनाइन पर्वतामुळे उत्तर इटली आणि दक्षिण इटली असे विभाजन झाले आहे. इटलीचा पश्चिम किनारा वसाहतींना व नाविक व्यापाराला अनुकूल ठरला. पश्चिम किनाऱ्याला लागून ॲपेनाइनच्या पश्चिमेला असलेल्या सलग प्रदेशाचे प्राचीन काळापासून तीन भाग पडले आहेत. पहिला सगळ्यात उत्तरेचाइट्रुरिया, मध्य भागी लेशियम (यातच रोम वसले आहे) आणि सर्वांत दक्षिणेला कँपेन्या. टायबर नदीच्या मुखापासून सु. ३० किमी. वर रोम हे शहर वसले आहे. जलमार्गाने अथवा भूमार्गाने व्यापार करण्यास सुलभ आणि सागरी व सैनिकी आक्रमणापासून त्यातल्यात्यात सुरक्षित असे रोमचे भौगोलिक स्थान आहे.

पुरातात्विक संशोधनामुळे रोमच्या प्राचीन समाजाच्या राहणीमानाची माहिती अभ्यासकांना उपलब्ध झालेली आहे. भूमध्य सागरीवंश या नावाने ज्ञात असलेल्या वंशाचे लोक उत्तर आफ्रिकेच्या बाजूने इ. स. पू. १०,००० च्या सुमारास इटलीत येऊन स्थायिक झाले. त्यांच्या येथील वसाहतींना इ. स. पू. तीन ते दोन हजारपर्यंत कसलाही धक्का लागला नाही. या सुमारास व येथून पुढे जवळजवळ हजार वर्षांपर्यंत मध्य यूरोपातून येणाऱ्या निरनिराळ्या जमाती येथे स्थिरावल्या. त्याचवेळी पूर्वेकडून येथे वेगवेगळ्या जमाती येऊ लागल्या. सांस्कृतिक दृष्ट्या या सर्व जमाती तद्देशीय लोकांपेक्षा पुढारलेल्या होत्या आणि त्यामुळे इटलीचे मोठमोठे भाग त्यांच्या आधिपत्याखाली गेले.

इ. स. पू. अकराव्या किंवा दहाव्या शतकात इट्रुस्कन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या इटलीत आल्या. टायर नदीच्या खोऱ्यात पेनाइन पर्वताच्या पायथ्यापर्यंतच्या प्रदेशात त्या स्थानिक झाल्या. त्यावरुनच या मुलखाला इट्रुरिया किंवा तस्कनी ही नावे मिळाली. यांच्याच आगेमागे फिनिशियन व्यापारी आणि वसाहतवाले यांची भूमध्य समुद्रात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु झाली. इटली व रोम यांच्या इतिहासाला अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या त्यांच्या वस्त्या याच काळात झाल्या. त्यांनी सार्डिनिया, कॉर्सिका आणि सिसिली ही बेटे व्यापली.

फिनिशियन लोकांच्या नंतर ग्रीकांच्या वसाहती दक्षिण इटलीत, विशेषतः पश्चिम किनाऱ्यावर व सिसिलीत झाल्या. सिसिलीतील पश्चिम भागावर कार्थेजमधल्या फिनिशियन लोकांची आणि पूर्व भागावर ग्रीकांची सत्ता प्रस्थापित झाली. यातील इट्रुस्कन हे स्थानिक आणि फिनिशियन व ग्रीक हे परस्थ ठरले. या तिनही जमातींवर रोमने मात केली; पण इट्रुस्कन हे इटलीचेच रहिवासी मानून फिनिशियन व ग्रीक यांना रोमनांनी उपरे मानले. या दोघांचीही स्फूर्तिस्थाने कार्थेज व ग्रीस होती. ती पादाक्रांत केल्यानंतर रोमला स्वतःचे स्थिर राज्य उभे करता आले. पुढे त्याचेच साम्राज्यात रुपांतर झाले. [⟶ इट्रुस्कन संस्कृति].

रोम शहराची स्थापना केव्हा झाली, याविषयी तज्ञांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी ऐतिहासिक माहितीही उपलब्ध नाही. इ. स. पू. ३९० मध्ये फ्रान्समधून आलेल्या गॉल टोळ्यांनी रोममध्ये प्रथम जाळपोळ केली. त्यावेळी रोमविषयी माहिती असलेल्या सर्व बखरी नष्ट झाल्या, अशी वदंता प्रसृत झाली आहे किंवा नंतरच्या इतिहासकारांनी तशी सोयीस्कर समजूत करुन घेतलेली असावी.

रोमच्या स्थापनेविषयी काही दंतकथा प्रचलित आहेत. त्यांतील एक कथा अत्यंत लोकप्रिय व सर्वमान्य झाली आहे. इ. स. पू. २२ एप्रिल ७५३ या दिवशी रोम नगरीची स्थापना झाली. ती रोम्यूलस व रेमुस नावाच्या जुळ्या भावंडांनी केली.ॲल्ब लॉग्ग या लेशियममधील प्राचीन नगरीत अँकायसीझपासून फ्रोडाइटी देवीस झालेला पुत्र अनिअस याच्या आठ वंशजांनी राज्य केले. यानंतर इमिलिअस याने

अनिअसचा नववा वंशज न्यूमिटार याला ठार मारुन त्याच्या पुत्रांचेही निर्दालन केले. या शिरकाणातून न्यूमिटारची मुलगी रिआ सिल्विइया ही बचावली. तिला मार्स देवतेपासून रोम्यूलस व रेमुस हे दोन मुलगे झाले. त्यांनी इमिलिअसचा निःपात केला व रोमची स्थापना केली. तेथूनच अनिअसच्या वंशजांचे राज्य पुन्हा सुरु झाले.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate