অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोव्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा

रोव्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा

रोव्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा

(६ मे १७५८-२८ जुलै १७९४). फ्रान्समधील एक जहाल क्रांथिकारक आणि तत्कालीन जॅकबिन्झ गटाचा एक पुढारी. त्याचा जन्म अ‍ॅरास येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील वकील होते. आईच्या मृत्यूनंतर वडील घर सोडून गेले; म्हणून आजोबांनी त्याचा सांभाळ केला. त्याचे प्रारंभीचे शिक्षण जन्मगावीच झाले. पुढे त्याने पॅरिसच्या लूई ले-ग्रां या जेझुइट कॉलेजमधून वकिलीची पदवी घेतली. या काळात त्याच्या मनावर रूसो  व व्हॉल्तेअर यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्याने अ‍ॅरास येथे  वकिली व्यवसायास प्रारंभ केला(१७८१); तथापि त्याची साहित्यविषयक उर्मी  जाज्ज्वल्य होती. रोझाती या वाङ्‌मय मंडलाचा तो सभासद झाला. रूसोच्या आदर्श समाजाविषयी त्याला आकर्षण होते.

क्रांतीनंतर तो लोकसत्ताक गणराज्याच्या पुरस्कर्ता आणि प्रभावी वक्ता म्हणून  पुढे आला. तो गरिबांचा कैवारी होता. राष्ट्रीय सभेत (स्टेट्स जनरल) त्याने त्या काळात लेस-लेटर्स असेस कॉमेंट्‌स हे नियतकालिक मत प्रचारार्थ काढले. राष्ट्रीय सभेत तो  अ‍ॅरासचा उदारमतवादी प्रतिनिधी म्हणून निवडून गेला. त्याने  राष्टीय सभेत एका याचिकेद्वारे सोळाव्या लूईला पदच्युत करण्याची मागणी केली (१७९१).

पुढे नॅशनल कन्व्हेन्शन निवडणुकीत पॅरिसमधून तो सर्वांत जास्त मते मिळवून निवडून आला. जानेवारी १७९३ मध्ये सोळाव्या लूईचा शिरच्छेद करण्यात आला व जहालांचे वर्चस्व वाढू लागले. ३१ मे १७९३ रोजी मवाळ जिरॉंडिस्टांचा पराभव झाला व राजसत्तेवर जहाल जॅकबिन्झांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. ४ जून १७९३ रोजी तो सुरक्षासमितीचा सभासद झाला. सत्ता हातात आल्यानंतर रोब्झपिअरने आपल्या विरोधकांचा अतिशय क्रूरपणे निःपात करावयास सुरवात केली. त्यात अनेक क्रांतिकारकांचा बळी गेला. तत्कालीन राजकारणात  त्याने गरीबी निवारण यांसारखे प्रयोग केले कायद्यात बदल घडवून आणले. त्याने प्रज्ञादेवीची  उपासना रद्द करून स्वतःच्या अशा धर्मपंथाचे प्रर्वतन केले.

परमेश्वराचे अस्तित्व व आत्म्याचे अमरत्व हे मानवजातीचे स्वप्‍न आहे, असे त्याचे मत होते. त्याने मानवी अधिकारांचा व स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्याला फ्रान्समध्ये सद्‍गुणांचे स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वत्रयींवर आधारीत  राज्य स्थापन करावयाचे होते कारण विश्वात्मक मानवी बंधुभावावर त्याचा विश्वास होता तथापि त्याच्या दहशतवादामुळे राष्टीय समितीतील सदस्य त्याच्या विरोधात जाऊ लागले. देशसंरक्षक समितीत रोब्झापिअरविरूध्द बहुमत सिध्द झाले. त्याच्यावर अनेक आरोप लादण्यात आले. त्यामुळे त्याच्याविरूध्द उठाव झाला व त्याला पकडण्यात आले.

२६ जुलै १७९४ रोजी त्याच्यावर  खटला भरून फाशीची शिक्षा फर्माविण्यात आली व त्याला ठार मारण्यात आले.  रोब्झापिअर हा यूरोपातील सतराव्या व अठराव्या शतकांतील वैचारिक चळवळींनी प्रभावित झालेला एक मानवतावादी विचारवंत होता. अविवाहित राहून त्याने  विवेकनिष्ठ नागरी सद्‍गुणांची जोपासना केली. प्रजासत्ताक  लोकशाही, मानवी अधिकार व स्वातंत्र्य या तत्त्वांवर त्याचा विश्वास होता. गरिबांविषयी त्यास कणव होती पण या उच्च मूल्यांना प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात त्याने दहशतवादी हुकूमशाही शासनाचा अवलंब केला.


पहा : फ्रान्स (इतिहास); फ्रेंच राज्यक्रांति.

संदर्भ : 1. Thompson, J. M. Robespierre and the French Revolution, New York, 1962.

2. दिघे, वि.गो.फ्रेंच राज्यक्रांती,नागपूर, १९८१

चौसाळकर, अशोक.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate