অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिडियन संस्कृति

लिडियन संस्कृति

लिडियन संस्कृति

आशिया मायनरमधील नवाश्मयुगीन काळातील एक संस्कृती. प्राचीन प. अ‍ॅनातोलिया प्रदेशात हा भूप्रदेश असून त्याच्या उत्तरेस मिशीया, पुर्वेस फ्रिजिया आणि दक्षिणेस केरीया हे भूप्रदेश होते. लिडिया प्रदेश नामावरून तिला लिडियन संस्कृती म्हणतात.

तुर्कस्तानच्या पश्चिम भागात सु. इ. स. पू. एक हजार ते इ. स. पू. पाचशे या काळात ती भरभराटीस आली. हिच्या आरंभीच्या इतिहासाची निश्चित माहिती उपलब्ध नाही.

ग्रीक वाङ्‍मयात आणि ज्यू व ख्रिस्ती पुराणांत लिडियाचा उल्लेख ‘मिओनिया ’असा येतो. मिओनिअस या दैवी पुरुषापासून उत्पन्न झालेल्या तीन राजघराण्यांचा उल्लेख त्यात असला, तरी त्यांतील फक्त तिसरे म्हणजे शेवटचे घराणे इतिहासास ठाऊक आहे. मुख्यतः हीरॉडोटसच्या लेखनातून व अ‍ॅसिरियन लेखांतून त्यांची माहिती मिळते. यांचा पहिला मोठा ज्ञात राजा गायजीझ (सु. कार. इ. स. पू. ६८५-६५२) याने फ्रिजियन सत्तेचा नाश करून मर्मनाडी वंशाची स्थापना केली, सुमेरियन टोळीवाल्यांचाही पराभव केला; परंतु इ. स. पू. ६५२ मध्ये गायजीझचाच पराभव करून या टोळीवाल्यांनी त्यास ठार मारले.

आर्डिस याने हे संकट निवारले व त्यापुढच्या तीन राजांनी सबंध पश्चिम तुर्कस्तानावर अंमल बसविला. हेलस नदी ही त्यांची पूर्वसीमा. शेवटचा राजा क्रिसस याच्या काळात व्यापार-उदिमाची मोठीच भरभराट झाली. ग्रीस व त्याभोगतालचे प्रदेश आणि पश्चिम आशिया यांतील व्यापार लिडियामधूनच होत असे. या व्यापारातून लिडियन समाज व राजा क्रिसस यांना इतकी संपत्ती प्राप्त झाली की, क्रिसस याला ‘भूलोकावरील कुबेर’ हे बिरुद मिळाले.

इ. स. पू. ५४६ मध्ये इराणचा दुसरा सायरस (इ. स. पू.५८५-५२९) याच्याशी संघर्ष उद्‍‌भवून लिडियन राज्याचा विनाश झाला. चांदीची व सोन्याची नाणी लिडियातच प्रथम वापरात आली. किंबहुना चलनाचा सर्वप्रथम उपयोग येथेच झाला. याचे मुख्य कारण म्हणजे सोने-चांदी या धातूंची विपुल प्रमाणात उपलब्धता होय.चांदीच्या नाण्यांवर वजन, राजाचे नाव, मूर्ती इत्यादी गोष्टी कोरल्या जात. ही नाणी सर्वत्र स्वीकारली जात, म्हणून व्यापार सुलभ झाला.

लिडियाचा धर्म व संस्कृती ही आरंभी काहीशी स्वतंत्र दिसली आणि त्यांवर आशियाई प्रभाव आढळला, तरी पुढे ग्रीक संस्कृतीचा प्रभावच तीवर प्रबळ झालेला दिसतो. सार्डीझ या राजधानीच्या उत्खननातील अवशेषांत शिल्पांवर आरंभी फ्रिजियन व नंतर ग्रीक कलांची छाप दिसते. लिडियन धर्मात निसर्गपूजेस प्राधान्य होते. मिडिअस हा मुख्य देव. याच्याइतकाच मान सूर्यास मिळत असे. सिबली ही धरित्री देवता, सूर्य हा तिचा पुत्र व तिचा पतीही तोच मानला गेला आहे.

या तिघांशिवाय ते ग्रीक देवदेवतांची पूजाअर्चा करीत असत. डेल्फायला मोठा मान असे. येथील ज्योतिषाकडून सर्व राजांनी भविष्य ऐकल्याची नोंद आहे. लिंगपूजाही प्रचलित होती. सार्डीझनजीक अनेक थडगी आहेत. त्यापैकी स्तूपासारख्या एका ढिगाऱ्याचा व्यास २१० मीटर असून त्यावर सु. तीन मीटर उंचीचे अश्मलिंग आहे. धर्मकृत्यांत पुरूष व स्त्री दोघेही पौरोहित्य करीत.


संदर्भ : 1. Bean, George E. Aegean Turkey : An Archaeological Guide, New York, 1966.

2. Swan, J. W. The Ancient World, Vol. I, New York, 1950.

माटे, म. श्री.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate