অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लीकी, विल्यम एडवर्ड हार्टपोल

लीकी, विल्यम एडवर्ड हार्टपोल

लीकी, विल्यम एडवर्ड हार्टपोल

(२६ मार्च १८३८-२२ ऑक्टोबर १९०३). सुप्रसिद्ध आयरिश इतिहासकार आणि निबंधलेखक. त्याचा जन्म डब्लिनजवळ न्यूटन पार्क येथे सधन कुटुंबात झाला. त्याने महाविद्यालयीन शिक्षण चेल्टनहॅम ट्रिनिटी कॉलेज (डब्लिन) यांत घेऊन पदवी मिळविली (१८५९). औपचारिक शिक्षणाविषयी तो बेफिकीर होता, म्हणून त्याने वाचन-मनन करून व्यासंग वाढविला. नंतर तो एम्. ए. झाला (१८६३).

आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे त्याने वयाच्या बाविसाव्या वर्षीच आपले सर्व लक्ष वाचन-लेखनात केंद्रित केले आणि द रिलिजस टेन्डन्सीज ऑफ द एज (१८६०) आणि लिडर्स ऑफ पब्लिक ओपिनियन इन आयर्लंड (१८६१) ही दोन पुस्तके लिहिली.

हिस्टरी ऑफ द राइज अँड इन्फ्ल्यूअन्स ऑफ द स्पिरिट ऑफ रॅशॅनॅलिझम इन यूरोप(१८६५)आणि हिस्टरी ऑफ यूरोपियन मॉरल्स फ्रॉम ऑगस्टस टू शार्लमेन (१८६९) या दोन ग्रंथांनी त्याची इतिहासकार म्हणून प्रसिद्धी झाली. हिस्टरी ऑफ यूरोपियन मॉरल्स ... या ग्रंथात त्याने नीतिमत्तेचा घेतलेला साक्षेपी आढावा आणि तद्अनुषंगाने काढलेली अनुमाने तत्कालीन सामाजिक स्थितीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची ठरली.

हिस्टरी ऑफ इंग्लंड इन द एटीन्थ सेंचरी या अष्टखंडात्मक बृहद्ग्रंथाने तत्कालीन इतिहासकारांत त्याला एक परखड इतिहासकार म्हणून मान्यता मिळाली. यात राजकीय इतिहासाव्यतिरिक्त सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची त्याने ऊहापोह केलेला आहे. लेखन-वाचन या व्यासंगास आणि राजकीय चिंतनास मोकळीक मिळावी, म्हणून त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने देऊ केलेली प्राध्यापकाची जागाही नाकारली.

अखेरच्या दिवसांत वैवाहिक सुख आणि यशस्वी लेखक म्हणून मान्यता मिळाल्यानंतर तो संसदेवर निवडून गेला. तेथे त्याने आयरिश होमरूल चळवळीला विरोध दर्शविला. त्याला प्रिव्ही कौन्सिलर करण्यात आले (१८९७). ब्रिटिश ॲकॅडेमीचे सन्मान्य सदस्यत्त्वही त्यास देण्यात आले. त्याचे इतरही अनेक ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. डिमॉक्रसी अँड लिबर्टी (१८९६) या द्विखंडात्मक निबंधात्मक ग्रंथात त्याने इतर व्हिक्टोरियन काळातील विचारवंतांप्रमाणे लोकशाही या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचे स्पष्ट करून लोकशाहीविषयीच्या अनेक शंका मांडल्या आहेत. तो लंडन येथे मरण पावला.

 

संदर्भ : 1. Auchmuty, James J. Lecky : A Biographical and Critical Essay, London, 1945.

2. Lecky, W. E. H. A. Memoir of the Rikght Honourable William Edward Hartpole Lecky, London, 1909.

देव, शां. भा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate