অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लुई चौदावा

लुई चौदावा

लुई चौदावा

(५ सप्टेंबर १६३८-१ सप्टेंबर १७१५). फ्रान्सचा मध्ययुगातील श्रेष्ठ व लोकहितैषी राजा. बूर्बाँ घराण्यातील तेरावा लूई व राणी ॲन (ऑस्ट्रियाची राजकन्या) या दांपत्यापोटी सेंट-जर्मेन या गावी त्याचा जन्म झाला. तेराव्या लूईच्या मृत्यूनंतर (१६४३) वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तो फ्रान्सच्या गादीवर बसला. तो सज्ञान होईपर्यंत राजमाता ॲन आणि पंतप्रधान

चौदावा लुईझ्यूल माझारँ हे राज्यकारभार पाहात होते. माझारँ याने त्यास लष्करी शिक्षणाबरोबर राजपुत्रास योग्य असे विद्याविषयक शिक्षण दिले. यावेळी फ्रान्समधील असंतुष्ट सरदारांनी राजाचे अधिकार सीमित करण्यासाठी विशेषतः आर्मांझां रीशल्य व माझारँ यांनी लादलेल्या आर्थिक भारांविरूद्ध अनेक सशस्त्र उठाव केले (१६४८-५३). ते ‘फ्राँद’ या नावाने प्रसिद्ध आहेत. सुरुवातीस उठाववाल्यांनी राणी ॲनवर दडपण आणले; परंतु दरम्यान तीस वर्षांच्या युद्धातून वेस्टफेलियाच्या शांतता तहाने (१६४८) फ्रान्सचे सैन्य मुक्त केले. तेव्हा उ

ठावाविरूद्ध शासनाने कडक धोरण अवलंबिले. स्पेनने फ्राँद-सरदारांना मदत केली;परिणामत: फ्रान्स-स्पेन यांत संघर्ष उद्भवला आणि तो पुढे दहा वर्षांनी पिरेनीजच्या तहाने (१६५९) संपुष्टात आला. माझारँने सरदार,धर्मगुरू आणि सधन व्यापारी वर्ग यांचा विरोध अशा प्रकारे मोडून काढला; फ्रान्सचे लष्करी वर्चस्व प्रस्थापित केले आणि सरदारांचा पाणउतारा होऊन राजाचा अधिकार सर्वमान्य झाला. या तहानुसार स्पेनची राजकन्या माराया टेरिसा हिचा विवाह लूईबरोबर करावा आणि हुंड्याची रक्कम न मिळाल्यास तिचे स्पेनसंबंधीचे सर्व वारसा-हक्क लूईला प्राप्त व्हावेत असे ठरले.

या अटीप्रमाणे लूईने माराया टेरिसाशी विवाह केला (जून १६६०). त्याचे माझारँच्या मारी मांचिनी या भाचीवर प्रेम होते, पण फ्रान्सची राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी त्याने मांचिनीला नकार दिला. टेरिसापासून त्याला सहा मुले झाली. त्यांपैकी फक्त ज्येष्ठ मुलगा जगला, तोही १७१२ मध्ये मरण पावला. लूईच्या रंगेल जीवनाविषयी अनेक कथा-वदंता प्रस्तृत झाल्या आहेत. त्याच्या रक्षांपैकी व्हेलर, मार्किस दमाँतेस्पॉन, मँतनॉन या प्रसिद्ध असून कोर्टदरबारी त्यांना प्रतिष्ठा होती. त्यांना लूईपासून मुले झाली आणि या मुलांना त्याने वैध वारस ठरवून पुढे मानसन्मान दिले. माराया टेरिसच्या मृत्यूनंतर कवी पॉल स्कॉरोन याची विधवा पत्नी फ्रान्स्वा (नंतरची मादाम द मँतनॉन) या मैत्रिणीशी त्याने गुप्तपणे अनुलोम विवाह केला (१६८३ वा १६८४). ती अखेरपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. लूईवर तिचा मोठा प्रभाव होता आणि राणी टेरिसाची तिच्यावर प्रथम मर्जी होती.

माझारँच्या मुत्यूनंतर (९ मार्च १६६१) लूईने शासकीय सूत्रे हाती घेतली. राज्यमंडळास याविषयी निवेदन करताना ‘आपण स्वतःच राज्यसंस्था आहोत’ (आय ॲम द स्टेट) असे त्याने प्रतिपादन केले आणि राजपद ही ईश्‍वरदत्त देणगी आहे, असे तो मानू लागला. आईच्या मुत्यूनंतर (१६६२) तो प्रत्यक्ष कारभारात लक्ष घालू लागला. त्याला फ्रान्स्वा लूव्हा, ह्यूजीस लिआँ, झां कॉलबेअर यांसारखे कर्तुत्ववान व कार्यक्षम मंत्री लाभले. कॉलबेअरच्या आर्थिक धोरणांमुळे फ्रान्सची प्रगती वेगाने झाली. त्याने व्यापारवादी तत्त्वावर उद्योग आणि वाणिज्य यांची वाढ केली; आरमारात सुधारणा केल्या व वसाहतीत व्यापार वाढविला; लष्कराची पुनर्रचना लूव्हा या संरक्षण मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामुळे राजसत्ता मजबूत झाली. त्याने पॅरिसमध्ये परिणामकारक पोलीसव्यवस्था कार्यवाहीत आणली.

बूर्बाँ घराण्याची प्रतिष्ठा वाढविणे, फ्रान्सच्या सीमा विस्तृत करणे, फ्रान्सचा यूरोपात दरारा निर्माण करणे हे त्याच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. त्याकरिता त्याने राज्यविस्ताराचे धोरण अंमलात आणले. तो १६६७ पासून पूर्णतः युद्धात गुंतला आणि ही युद्धे त्याच्या अखेरपर्यंत अखंड चालू होती. स्पेन (१६६७), हॉलंड (१६७२) आणि अखेरच्या काळातील इंग्लंड, हॉलंड, ऑस्ट्रिया आणि पवित्र रोमन साम्राज्य यांविरूद्धची ही युद्धे फ्रान्सला तशी महाग पडली आणि आर्थिक हानीही झाली; तथापि रिझविकच्या शांतता तहाने (१६९७) या युद्धांना पायबंद बसला. स्पेनच्या वारसा हक्काचे युद्ध (१७०१-१४) हे लूईच्या जीवनातील अखेरचे महत्त्वाचे युद्ध. याने लूईच्या नातवास स्पेनची गादी मिळाली; परंतु फ्रान्स आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या कमकुवत झाला. फ्रान्सच्या आधिपत्याखाली ॲल्सेस-लॉरेन, स्पेन, इंडीज बेटे व काही इटालियन वसाहती आल्या.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate