অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लूई फिलिप

लूई फिलिप

लूई फिलिप

(६ ऑक्टोबर १७७३-२६ ऑगस्ट १८५०). फ्रान्सचा राजा. त्याचा जन्म आर्लेआं या सरदार घराण्यात पॅरिस येथे झाला. बूर्बाँ आणि आर्लेआं या दोन राजघराण्यांत परंपरागत वितुष्ट होते. त्यामुळे त्याचे वडील लूई फिलिप जोसेफ राजेशाहीविरूद्धच्या चळवळीत असत. त्यांनी मॅदम द जेनलिस या खाजगी शिक्षिकेकडून घरातच लूई फिलिपला उदार शिक्षण दिले. त्याच्या ऐन तारुण्यात फ्रान्समध्ये राज्यक्रांतीचा उद्रेक झाला. तेव्हा तो क्रांतिकारकांच्या शासनाला पाठिंबा दर्शविणाऱ्या प्रागतिक सरदारांच्या गटात सामील झाला आणि नंतर जॅकबिन्झ क्लबचा १७९० मध्ये सभासद झाला. फ्रान्स-ऑस्ट्रिया युद्धात क्रांतिकारकांच्या सैन्याचा एक सेनापती म्हणून तो युध्दात सहभागी झाला.

व्हाल्मी व झामापच्या लढायांत त्याने विजय मिळविले;परंतु सोळाव्या लूईच्या निर्घृण फाशीनंतर त्याला प्रजासत्ताकाबद्दल घृणा आली. याचवेळी हद्दपारीतील प्रतिक्रांतिवादी सरदारांनी त्याचे साहाय्य मागितले, तेव्हा तो हद्दपारीत गेला. जॅकबिन्झ शासनाने त्याच्या वडिलांना फाशी दिले (१७९३), तेव्हा त्याच्याकडे वडिलार्जित आर्लेआंची सरदारकी आली. काही वर्षे स्वित्झर्लंड, अमेरिका, इ. देशांत राहून तो अखेर इंग्लंडमध्ये ट्विकनहॅम या गावी स्थायिक झाला (१८००).

नेपोलियन बोनापार्टच्या कारकीर्दीत तो इंग्लंडमध्ये राहिला. त्याने नेपल्सच्या चौथ्या फेर्दिनानदोची मुलगी मारी-आमेली हिच्याशी विवाह केला (१८०९). त्यांना पाच मुलगे व तीन मुली झाल्या. नेपोलियनच्या पाडावानंतर बूर्बाँ घराण्याची पुनःस्थापना होऊन अठरावा लूई गादीवर आला. त्याने संसदीय राजेशाही राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लूई फिलिप अठराव्या लूईच्या विरोधातील उदारमतवादी विरोधकांत सामील झाला. त्याने ल कॉन्स्ट्युट्यूशनल आणि ल नॅशनल या उदारमतवादी नियतकालिकांना उघड पाठिंबा दर्शविला आणि आर्थिक सहकार्य दिले. अठराव्या लूईच्या मृत्यूनंतर (१६ सप्टेंबर १८२४) त्याचा भाऊ दहावा चार्ल्स (कार. १८२४-३०) फ्रान्सच्या गादीवर आला. त्याने क्रांतिकाळात लूई फिलिपचे झालेले सर्व नुकसान भरून दिले.

चार्ल्सने लोकशाहीविरूद्ध (प्रजासत्ताकाविरूद्ध) काही कायदे करून लोकमत प्रक्षुब्ध केले. त्यातून जुलै क्रांतीचा उद्रेक झाला आणि लूई फिलिपला राज्याची अधिकारसूत्रे धारण करण्याची संधी मिळाली (२७-३० जुलै १८३०). संसदेने प्रथम त्याच्याकडे सैन्याचे नेतृत्व दिले. त्यानंतर विधिमंडळाने ७ ऑगस्ट १८३० रोजी दहाव्या चार्ल्सला पदच्युत करून फिलिप यास फ्रेंच जनतेच्या संमतीने राजा झाल्याची घोषणा केली. या कामी त्याला लाफाएत याने बहुमोल सहकार्य दिले.

नवीन कारखानदार, भांडवलदार, वर्गाने त्यास विशेष पाठिंबा दिला तथापि प्रतिगामी बूर्झ्वा व जहाल समाजवादी नाराज झाले. लूई फिलिप हा कल्पक हुशार सहिष्णू आणि पराक्रमी असा राजा होता. सुरुवातीस त्याने अत्यंत साध्या राहणीने जनसामान्यांची मने जिंकली. लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी सेंट हेलिना येथून नेपोलियन बोनापार्टच्या अस्थी मोठ्या दिमाखाने पॅरिस येथे आणून स्मारक बांधले.

राज्याला शांतता लाभल्यामुळे व्यापार-उद्योगधंद्यांत भरभराट झाली परंतु शासनात व्यापारी आणि कारखानदार यांचे वर्चस्व वाढल्यामुळे भ्रष्टाचार माजला. परिणानतः सामान्य जनतेस या परिस्थितीचा उबग आला. शिवाय त्याचे परराष्ट्रीय धोरणही फसले. स्पेनच्या गादीशी वैवाहिक संबंध जुळविल्यामुळे त्याचे इंग्लंडशी वैर आले आणि बेल्जियमच्या गादीवर आपल्या मुलास बसवून ते राज्य बळकविण्याचा त्याचा प्रयत्न अंगाशी आला. साहजिकच फ्रान्स एकाकी पडला. तेव्हा पॅरिसच्या जनतेने २१ फेब्रुवारी १८४८ रोजी त्याच्याविरूद्ध क्रांती केली. वेषांतर करून तो राणीसह पुन्हा इंग्लंडला पळाला. तेथेच क्लेअरमांट (सरे) येथे दोन वर्षांनी मृत्यू पावला.


संदर्भ :1.Howarth, T. E. B. Citizen King : The Life of Louis Philippe, London, 1962.

2. Beik, P. H. Louis Philippe and the July Monarchy, New York, 1965.

पोतनीस, चं. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate