অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लेनिन, न्यिकलाय

लेनिन, न्यिकलाय

लेनिन न्यिकलाय

(२२ एप्रिल १८७०-२१ जानेवारी १९२४). थोर मार्क्सवादी विचारवंत आणि रशियातील १९१७ च्या ऑक्टोबर (बोल्शेव्हिक) क्रांतीचा प्रमुख सूत्रधार. त्याचे मूळ नाव व्ह्लाद्यीमिर इल्यिच उल्यानफ्‌स्क. सायबीरियात हद्दपारीत असताना तो गुप्तपणे पक्षकार्य करीत असे तेव्हा त्याने १९०१ मध्ये लेनिन हे टोपण नाव धारण केले पण पुढे तेच नाव रूढ झाले आणि व्ह्लाद्यीमिर इल्यिच लेनिन या नावानेच तो ओळखला जाऊ लागला. इल्या निकोलायीव्हिच आणि मारिया या दांपत्याच्या सहा मुलांपैकी हे तिसरे अपत्य. त्याचा जन्म व्होल्गा नदीकाठी सिम्बिर्स्क (विद्यमान उल्यनफ्‌स्क) येथे उल्यानोव्ह कुटुंबात झाला.

हे मध्यमवर्गीय कुटुंब सुसंस्कृत व सुशिक्षित होते आणि सर्व मुले कमी-अधिक प्रमाणात झारशाही विरूद्धच्या लढ्यात सहभागी झाली. इल्या निकोलायीव्हिच हे प्रथम शिक्षक होते. पुढे ते शिक्षण खात्यात अधिकारी झाले. त्यांचे १८८६ मध्ये अकाली निधन झाले; तत्पूर्वी त्यांना निवृत्त करण्याची धमकी देण्यात आली होती.

१८८७ मध्ये लेनिनचा मोठा भाऊ अलेक्झांडर याला तिसरा अलेक्झांडर झारला मारण्याचा कट केल्याच्या आरोपावरून अटक करून मृत्यूदंड देण्यात आला. या दोन घटनांचा त्याच्या कोवळ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. यावेळी लेनिनने सर्वोच्च गुण मिळवून शालेय शिक्षण पूर्ण केल्याची पदवी मिळविली आणि कझान विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता (१८८७).

विद्यार्थ्यांच्या निदर्शनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले व त्याची विद्यापीठातून हकालपट्टी झाली आणि कझानमधून हद्दपार करण्यात आले. आईचे निवृत्तिवेतन आणि वारसाहक्काने आलेली थोडी मिळकत, यांवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. पुढे त्यास कझानला परतण्याची परवानगी मिळाली; पण विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला (१८८८).

त्याने १८८८ पासून मार्क्सवादाच्या अभ्यासाला (दास कॅपिटल) आरंभ केला. याशिवाय त्याच्यावर न्यिचायफ, ब्यल्यिन्‌स्क, हेर्टसन,चर्निशेफस्क्यई, प्यिसरयिव प्रभृतींच्या लेखनाचाही परिणाम झाला. १८९० मध्ये त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे रशियन भाषेत भाषांतर केले. ह्या काळापासून त्याच्या क्रांतिकारक राजकीय कार्याची सुरुवात झाली.

गुप्त बैठकांमधून मार्क्सवादाचा प्रसार,प्रतिपक्षीयांचा प्रतिवाद, ठिकठिकाणच्या क्रांतिकारकांशी संपर्क असे प्रारंभीच्या काळात त्याच्या कार्याचे स्वरूप होते. त्या काळात रशियात नारोदनिकी (Populist) या नावाने क्रांतिकारकांचे अराज्यवादी विचारांचे गट अस्तित्वात होते. लेनिनने त्यांचे विचार खोडून काढून मार्क्सवादी विचारांचा प्रसार करण्यावर भर दिला. त्याच्या व्यासंगामुळे, कट्टर विचारांमुळे आणि वादकौशल्यामुळे लेनिन लवकरच विविध क्रांतिकारक गटांमध्ये लोकप्रिय झाला; तत्पूर्वी १८८९ मध्ये उल्यानोव्ह कुटुंब समाराला स्थलांतरित झाले.

तिथे त्याने बाहेरून कायद्याचा अभ्यास केला आणि १८९२ मध्ये सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठाची कायद्याची पदवी प्रथम क्रमांकाने मिळविली. समारामध्ये काही दिवस (१८९२-९३) त्याने वकिली केली आणि शेतमजूर, कामगार यांचे दावे चालविले. या निमित्ताने कृतिशील क्रांतिकारकांशी त्याचा संपर्क वाढला. त्याच्या मित्रांनी त्याला हद्दपारीतील रशियन क्रांतिकारकांना भेटण्यासाठी परदेशात पाठविले. लेनिनने फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी या पश्चिम यूरोपीय देशांचा १८९५ मध्ये दौरा केला. या दौऱ्यातच जिनीव्हा येथे त्याची ग्यिऑर्गी प्ल्येखानॉव्ह या प्रसिद्ध रशियन मार्क्सवादी विचारवंताशी भेट झाली. एल्‌. मार्तोव्हसह हे सर्व प्रमुख मार्क्सवादी रशियाला परतले.

त्यांनी सर्व क्रांतिकारक गटांना एकत्रित करून युनियन फॉर द स्ट्रगल फॉर द लिबरेशन ऑफ द वर्किंग क्लास या संघटनेची स्थापना केली. लेनिनचा यात महत्त्वाचा वाटा होता. तसेच त्याने राबोची डेलो (द वर्कर्स कॉज) हे वृत्तपत्र बेकायदेशीरपणे प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. या संघटनेने पर्णके व जाहीरनामे प्रसिद्ध करून कामगारांच्या संपास मदत केली आणि मार्क्सवादाची तत्त्वे कामगारांत रुजविण्याचे कार्य अवलंबिले.

तेव्हा १८९५ च्या डिसेंबरमध्ये संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाली. लेनिनला पंधरा महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात आले आणि नंतर सायबीरियात शूशिन्स्कय येथे तीन वर्षे हद्दपार करण्यात आले (१८९७). अटकेत असताना व हद्दपारीच्या काळातील लेनिनचे वाचन लेखन सतत चालू होते आणि विविध क्रांतिकारर गटांशी तो संपर्क साधून होता. सायबीरियात हद्दपारीत असताना ⇨ नड्येअझड क्रूपस्कय (१८६९-१९३९) ही संघटनेतील हद्दपार केलेली सहकारी युवती त्यास भेटली. ती एका सरकारी अधिकाऱ्याची सुविद्य कन्या होती. पुढे त्यांच्या सहवासाची परिणती विवाहात झाली (२२ जुलै १८९८).

लेनिनची ती अखेरपर्यंत खासगी सचिव व कॉम्रेड होती. त्यांना मूलबाळ झाले नाही. हद्दपारीत त्यांनी सिडनी व बीआट्रिस वेब यांच्या इंडस्ट्रिअल डेमॉक्रसी या ग्रंथाचे रशियन भाषेत भाषांतर केले. पक्षाचा सर्व गुप्त पत्रव्यवहार ती पाही. पुढे क्रांतीनंतर ती १९२० मध्ये शिक्षण खात्याची उपप्रमुख झाली. रशियातील बदललेल्या शिक्षण पद्धतीवर तिच्या विचारांची छाप होती. तिने तीन-चार पुस्तके लिहिली. त्यांपैकी मेमरीज ऑफ लेनिन (१९३०) व सोव्हिएट वुमन (१९३७) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय इनेसा नावाची त्याची आणखी एक प्रेयसी होती. १८९८ मध्ये लेनिनने त्याच्या डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटॅलिझम इन रशिया या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन लेनिन या टोपण नावाखाली पूर्ण केले (१८९९).

या ग्रंथात त्याने रशियातील कृषिवर्ग (पिझंट कम्यून) भांडवलशाहीच्या दडपणाखाली कसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, याचे चित्र रेखाटले असून रशियातील आर्थिक जीवनाचे त्यात विश्लेषण केले आहे. बूर्झ्वा क्रांती ही श्रमिकवर्गाची हुकूमशाही व समाजवाद यांची पुढील पायरी असेल, असे मत अखेर प्रतिपादन केले. हद्दपारीची मुदत संपल्यानंतर (१९००) लेनिनने रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीच्या (स्थापना १८९८) कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली.

मार्क्सवादी विचारांचाच ह्या पक्षाने पाठपुरावा करावा, यावर त्याचा भर होता. त्याच वर्षी रशिया आणि पश्चिम यूरोपमधील विखुरलेल्या मार्क्सवादी गटांना संघटित करण्यासाठी लेनिने झुरिक येथे प्ल्येखानॉव्ह, मार्तोव्ह आणि इतर नेत्यांची भेट घेऊनइस्क्रा (ठिणगी) हे नियतकालिक सुरू केले. इस्क्रामधून त्याने झारशाहीविरूद्ध जनमत प्रक्षुब्ध करण्यासाठी लेखन केले आणि शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडला; कारण बुद्धिजीवी वर्गाला मार्क्सवाद येथील शेतकऱ्यांना अयोग्य आहे, असे वाटत होते.

१९०२ मध्ये लेनिनची व्हॉट इज टु बी डन? ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. सोशल डेमॉक्रॅटिक पक्षापुढील प्रश्न, पक्ष संघटना आणि पक्षाचा कार्यक्रम यांची त्यामध्ये चर्चा आहे. व्यावसायिक (सराईत) क्रांतिकारकांच्या समूहांनी अल्पशा मोहात अडकून उच्च उद्दिष्टांपासून च्युत होऊ नये, हे मूलभूत तत्त्व त्याने यात सांगितले. पुढे वीस वर्षे लेनिनने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दिनांक ३० जुलै १९०३ रोजी पक्षाची परिषद सुरू झाली. ती प्रथम ब्रूसेल्स व नंतर लंडन येथे भरली. तीमध्ये पक्षाची धोरणे,रचना इ. प्रश्नांबाबत लेनिनचे तीव्र मतभेद झाले. त्यातूनच पक्षात बोल्शेव्हिक व मेन्शेव्हिक असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले.इस्क्रा हे मुखपत्र मेन्शेव्हिकांच्या ताब्यात गेले.

लेनिनचा गट बोल्शेव्हिक म्हणजे बहुमताचा गट म्हणून यापुढील काळात ओळखला जाऊ लागला. पुढे सु. दहा वर्षे लेनिन्चा मेन्शेव्हिकांशी पक्षांतर्गत लढा चालू राहिला. त्यावेळची (१९०३) रशियातील परिस्थिती लक्षात घेता साम्यवादी क्रांतीपूर्वी रशियात भांडवलशाही लोकशाही क्रांती होणे अपरिहार्य असून त्या क्रांतीमध्ये भांडवलदारवर्गाचा पुढाकार असणार, कामगारवर्गाने त्या क्रांतीमध्ये भांडवलदारवर्गाला पाठिंबा द्यावा, अशी मांडणी मेन्शेव्हिक करीत होते. त्याउलट,रशियातील भांडवलदारवर्ग लोकशाही क्रांती घडविण्यास असमर्थ अस्ल्यामुळे कामगारवर्गानेच पुढाकार घेऊन ही क्रांती घडवून आणावी, राज्ययंत्रणेवर वर्चस्व प्रस्थापित करून साम्यवादी क्रांतीसाठी मोर्चेबांधणी करावी, असे लेनिनचे मत होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate