অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वीरगाथा

वीरगाथा

वीरगाथा

( सागा ). मध्ययुगीन आइसलॅंडिक वाङ्‌मयप्रकार. आइसलॅंडिक भाषेत ‘सागा’ म्हणजे पठण किंवा कथन, तसेच जर्मन भाषेत ‘Sage’ म्हणजे छोटी गोष्ट. आइसलॅंड आणि नॉर्वे अशा उत्तर यूरोपीय देशांत कथाकथन हा सामूहिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. वीरगाथा सांगणारे कवी ठिकठिकाणच्या राजदरबारांत जात आणि कथागायनाबरोबरच त्या त्या ठिकाणच्या ऐतिहासिक घटनांची आणि दंतकथांची नोंद घेत असत.

व्यापक अर्थाने कुठल्याही ऐतिहासिक वा सामाजिक घटनांचे वा दंतकथांचे कथन म्हणजे ‘सागा’. पण एक वाङ्‌मयप्रकार या दृष्टीने वीरगाथा म्हणजे वीरपुरूषाची शौर्यकथा. तिच्यात अनेक उपकथा आणि घटना मिळून गतकालाची कलात्मक पुनर्रचना केलेली असते.

वाङ्‌मयीन मूल्य असलेल्या वीरगाथांमध्ये मध्ययुगीन आइसलॅंडिक आणि नॉर्वेजियन समाजाची अस्मिता व्यक्त करणारी जीवनचरित्रे आणि दंतकथा सूत्रबध्द रीतीने, वास्तववादी आणि प्रवाही कथनशैलीत सांगितलेल्या दिसून येतात.

वीरगाथा सांगणारे किंवा लिहिणारे आइसलॅंडिक कवी मूळ कथेमध्ये इतर अनेक प्रसंग, घटना आणि हकीकतींचा समावेश करण्याचे स्वातंत्र घेत. त्यामुळे वरवर पाहता वीरगाथेचा अगदी साधा घाट म्हणजे वीरपुरूषाशी संबंधित सर्व घटना व साहसांची एक साखळीच आणि या साखळीमधून कुठलीही एक घटना वा साहस वेगळे काढून दुसऱ्या वीरगाथेमध्ये जोडता येत असे. यामुळे एका वीरगाथेतील व्यक्ती आणि प्रसंग यांची उजळणी इतर वीरगाथांमध्ये काही प्रमाणात झालेली दिसते.

पण उत्तम वीरगाथेच्या रचनेत त्या त्या व्यक्तींना आणि प्रसंगांना मुख्य कथेला तसेच मुख्य व्यक्तिरेखेला पूरक असेच स्थान दिलेले दिसून येते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गुन्नार आणि न्याल या दोन स्वतंत्र वीरगाथांचा उपयोग करून तीन विभागांची एकाच सूत्रात गुंफलेली न्याल सागा ही वीरगाथा होय.

उत्तम व्यक्तिचित्रण, परिणामकारक कथनशैली, रहस्याचा उपयोग यांबरोबरच प्रेम, द्वेष या भावनांचा प्रभावी आविष्कार असलेल्या या वीरगाथेची एकसंधता सर्व उपकथांचा विस्तार सांभाळूनदेखील अभंग राखलेली दिसून येते. बंदामन्ना सागा आणि गिस्ला सागा या वीरगाथांमध्येदेखील कथेचा घाट छोट्या परिघात सामावलेला आहे आणि त्यांत घटना आणि व्यक्ती यांचा अतूट संबंध दिसून येतो.

कथनातील नेमकेपणा, नाट्यमयता, चित्रदर्शिता, वर्ण्य प्रसंगांची योग्य जुळणी आणि त्यांना दिलेले योग्य तेवढेच वजन, संभाषणाचा प्रभावी वापर ही वीरगाथेची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. वीरगाथेच्या रचनाकर्त्या कवीची अलिप्तता, वास्तववादी जीवनदृष्टी, शोकात्मतेची जाणीव यांमुळे वीरगाथेला वाङ्‌मयीन मूल्य प्राप्त होते. वीरगाथेचा कर्ता कवी व्यक्ती आणि कृती यांचे मूल्यमापन करीत नाही, तसेच मतप्रदर्शन आणि हितोपदेशही त्याने टाळलेला दिसून येतो.

आइसलॅंडिक वीरगाथा-निर्मितीमागची मोठी प्रेरणा म्हणजे त्या कवींना आपल्या इतिहासाचा असलेला अभिमान. त्यामुळे स्थानिक इतिहास, घराण्यांची इतिवृत्ते आणि आठवणी हा आइसलॅंडिक वीरगाथांचा अविभाज्य भाग बनला आहे. आधुनिक वाचकांना ही वाङ्‌मयास्वादातील अडचण वाटेल; पण हा भाग वगळला तर वीरगाथांचे स्वरूप एखाद्या पारंपरिक आणि नीरस रोमान्सकथेसारखे होईल. या ऐतिहासिक व लोकजीवनाच्या पार्श्वभूमीमुळे वीरगाथांना महाकाव्याचे परिमाण लाभलेले आहे. ऐतिहासिक आणि दंतकथात्मक असे वीरगाथांचे दोन प्रमुख प्रकार दिसतात.

वीरगाथांचा प्रमुख स्रोत कोपनहेगन येथील ‘किंग्ज लायब्ररी’त ठेवलेला, सतराव्या शतकात सापडलेला कोडेक्स रेजियस हा हस्तलिखित ग्रंथ असून, त्याला एल्डर एड्डा किंवा द पोएटिक एड्डा असेदेखील म्हणतात. कोडेक्स रेजियसमध्ये प्रसिध्द वोलसुंगा सागा या गद्य वीरगाथेची दंतकथा, तसेच Voluspa (इं. शी. सिबिल्स प्रॉफेसी), थ्रिम्सक्विदा (इं. शी. द विनिंग ऑफ थोरस्‌ हॅमर), द ले ऑफ वेलॅंड, द रेलिंग ऑफ लोकी अशा अनेक पौराणिक व दंतकथांवर आधारित कविता आहेत. जर्मन ⇨ नीबलुङ्‌गनलीड हे राष्ट्रीय महाकाव्यदेखील यांतीलच दंतकथांवर आधारलेले आहे.

जर्मानिक आणि ट्युटॉनिक वंशांतील वीरांच्या पाचव्या व सहाव्या शतकांपासून प्रचलित असलेल्या शौर्यकथादेखील यांत समाविष्ट झाल्या आहेत. तेराव्या शतकातील स्नॉरी स्टर्लसन (११७९-१२४१) या कवी, इतिहासकार व राजकारणी मुत्सद्याने एल्डर एड्डामधील कविता यंगर एड्डामध्ये गद्य माध्यमात आणल्या. स्टर्लसनचा उद्देश इतिहासाचे उदात्तीकरण करणे हा होता. त्यामुळे त्याने आपल्या Heimskringla (इं. शी. सर्कल ऑफ द वर्ल्ड) या सर्वोत्कृष्ट वीरगथासंग्रहात नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत होऊन गेलेल्या नॉर्स राजांचा इतिहास, घराणी आणि साहसे यांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केलेली दिसून येते.

नवव्या शतकापासून उपलब्ध असलेल्या दरबारी काव्यपरंपरेचा त्याने या वीरगाथांमध्ये उपयोग केलेला आहे. ऐतिहासिक आणि दंतकथात्मक वीरगाथांमध्ये युध्दकालीन तसेच सरंजामशाही जीवनातील आशयसूत्रे आणि मूल्ये आढळतात. तेराव्या शतकातील अस्थिर आणि सामाजिक ऱ्हासाच्या काळात ऐतिहासिक घराणी व त्यांतील वीरपुरूषांची कर्तबगारी यांचे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते.

वाङ्‌मयीन आविष्काराच्या दृष्टीने परंपरागत कथांचा साठा संपुष्टात आल्यावर आइसलॅंडिक लेखकांनी समकालीन किंवा नजीकच्या इतिहासातील सामान्य जीवनाला वीरगाथेचे रूप दिले. या नव्या वीरगाथेमधील नायक एखादा उमदा शेतकारी (उदा., न्याल), त्याचा पराक्रमी मुलगा, साहसाच्या शोधात निघालेला कवी किंवा समाजाविरूध्द बंड करून उठलेला कविमनाचा एखादा व्हायकिंग होता, हे दिसून येते.

या नव्या प्रकारात लोकजीवनाचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या एगिल्स सागा. गिस्ला सागा, युरबिग्या सागा, बंदामन्ना सागा, न्याल सागा, ग्रेटिस सागा अशा काही उत्कृष्ट वीरगाथा उल्लेखनीय आहेत.

अठराव्या आणि विशेषतः एकोणिसाव्या शतकात जर्मनी, इंग्लंड आणि नॉर्वे या देशांत अर्वाचीन लेखकांना आपल्या नॉर्स आणि आइसलॅंडिक साहित्यिक वारशाची प्रकर्षाने जाणीव झाली. जर्मनीत संगीतकार ⇨रिखार्ट व्हाग्नर, नॉर्वेत ⇨हेन्रिक इब्सेन व इंग्लंडमध्ये ⇨टॉमस ग्रे, ⇨विल्यम मॉरिस यांनी आइसलॅंडिक वीरगाथांचा उपयोग आपल्या साहित्यात व अन्य कलाकृतींत केलेला आहे.

आधुनिक इंग्रजी वाङ्‌मयातील ⇨ बॅलड या काव्यप्रकाराचे वीरगाथेशी काही प्रमाणात साम्य दिसले, तरी बॅलड हा एक गीतप्रकार आहे; तर वीरगाथेतील उपकथांच्या गुंफणीमुळे वीरगाथा हे समूह-महाकाव्य आहे, असे म्हटले जाते. वीरगाथेतील घटना वीरगाथेच्या श्रोतृवर्गाच्या जीवनाचा भाग होत्या.

मराठीतील ⇨ पोवाडा या लोकगीत-प्रकारातदेखील वीरपुरूषाची शौर्यकथा वर्णिलेली असते; पण पोवाडा स्तुतिपर कथनप्रकार असून तो एखाद्या शहराबद्दल, स्थळाबद्दल किंवा घटनेबद्दलही असू शकतो. वीरगाथेतील शोकात्मतेची जाणीव, कवीची अलिप्तता, उपकथांचा आणि इतिहासाचा उपयोग, वास्तववादी कथनशैली यांचा पोवाड्यात अपवादानेच आढळ होतो.

उत्तर यूरोपमधील मध्ययुगीन लोकजीवन, जीवनानुभूती आणि विशिष्ट जीवनदृष्टी यांचा वैशिष्टपूर्ण आविष्कार आइसलॅंडिक वीरगाथेमध्ये आढळत असल्याने, या वाङ्‌मयप्रकाराचे जागतिक वाङ्‌मयेतिहासात अपूर्व स्थान आहे.


पहा : आइसलॅंडिक साहित्य.

कळमकर, य. शं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate