অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिथियन संस्कृति

सिथियन संस्कृति

सिथियन संस्कृति

प्राचीन काळी इ. स. पू. ८०० –२०० शतकांदरम्यान सिथियानामक भूप्रदेशात राहणाऱ्या रानटी व भटक्या टोळ्यांचा समूह. या भटक्या टोळ्यांची एक स्वतंत्र संस्कृती असून या लोकांच्या मूलस्थानाविषयी आणि वंशाविषयी तज्ज्ञांत मतैक्य नाही. हे लोक यूरोप व आशिया खंडांतील काळ्या समुद्राच्या उत्तरेस आणि ईशान्येस असलेल्या स्टेप (तृणप्रदेश) व अरल समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेश (आधुनिक सोव्हिएट रशिया) यांतून वावरत असत. हा प्रदेश म्हणजेच प्राचीन सिथिया होय.

त्यांच्याविषयीची माहिती प्रामुख्याने ⇨ हीरॉडोटस व हिपॉक्राटीझ यांच्या ग्रंथांत, तसेच पुरातत्त्वीय उत्खननांत सापडलेले काही अवशेष व रशियन मानवशास्त्रज्ञांचे अहवाल यांतून मिळते. शिवाय ग्रीक व रोमन इतिहासकारांनी लिहिलेल्या अभिजात ग्रंथांतूनही ती ज्ञात होते. त्यांच्या मते सिथियन हे इंडो-यूरोपियन लोक असून ते उरल-एशियाटिक भाषा कुटुंबातील प्राचीन इराणी भाषा बोलणारे भटके आदिवासी होते.

प्रथम ते बहुधा यूरेशिअन स्टेप प्रदेशात कदाचित अल्ताई भूभागात इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात रहात असावेत; परंतु त्यांच्या वास्तव्याविषयीची फारशी माहिती इ. स. पू. आठव्या शतकापर्यंत मिळत नाही. या शतकाच्या अखेरीस कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेकडील लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केले, तेव्हा सिथियनांनी व्होल्गा नदी ओलांडून सुमेरियन लोकांवर चढाई केली. त्याचा उल्लेख एसार-हॅडन ( इ. स. पू. ६८० –६६९) या ॲसिरियन राजाच्या दप्तरात मिळतो.

या लोकांपैकी काही टोळ्या या पूर्णतः रानटी व सतत भ्रमंती करणाऱ्या असून त्यांपैकी काही स्थायिक झालेल्या होत्या; मात्र हे लोक काटक, अंगापिंडाने मजबूत व लढवय्ये असल्याचा उल्लेख आढळतो. भटकंती करणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे चराऊ कुरणांचा शोध घेऊन घोडे, शेळ्या, मेंढ्या इ. गुरांचे कळप पाळणे आणि त्यांना चरण्यासाठी जेथे गवत व पाणी मिळेल, त्या प्रदेशांत भटकंती करणे हा होता. या प्राण्यांचे दूध, मांस, रक्त, कातडी इत्यादींचा त्यांच्या उदरनिर्वाहास उपयोग होई. त्यांना घर असे एका जागी नसल्यामुळे चटकन उभारता व मोडता येईल अशा तंबूंतून वा झोपड्यांतून ते वस्ती करीत.

तंबूसाठी ते कातड्याचा सर्रास उपयोग करीत; मात्र स्थायिक झालेल्या टोळ्या गुरे सांभाळून शेती व इतर उद्योगधंदे करीत. ते गहू, मासे, लाकूड व गुलाम यांची निर्यात ग्रीक शहरांना करीत असत. अर्थात या दोन प्रकारच्या सिथियन लोकांच्या चालीरीती, जीवनमान आणि संस्कृती यांमध्ये साहजिकच फरक आढळतो.

स्थिरावलेल्या सिथियनांनी व्होल्गा नदी ओलांडून सुमेरियनांच्या ताब्यातील कॉकेशस व काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील आशिया मायनरपर्यंतचा मैदानी प्रदेश सु. तीस वर्षे संघर्ष करुन पादाक्रांत केला आणि त्या प्रदेशात साम्राज्य स्थापन केले. त्यांच्या साम्राज्याच्या सीमा निश्चित नसल्या, तरी पश्चिम पर्शियातून सिरिया आणि ज्युडिआपासून ईजिप्तपर्यंत त्यांचे अधिराज्य होते.

पर्शियात राज्य करणाऱ्या मीड लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केले व त्यांनी त्यांना ॲनातोलियातून हाकलून लावले. तरीसुद्घा त्यांच्या आधिपत्याखाली पर्शियाच्या उत्तर सीमेपासून कुबान आणि आजचा युक्रेन एवढा भाग राहिला. प्रथम त्यांनी ॲसिरियन लोकांबरोबर युद्घे केली; मात्र नंतर त्यांच्याशी मैत्री करुन मन्नाई, मीड, बॅबिलोनियन व अन्य लोकांशी संघर्ष केला. इ. स. पू. सातव्या शतकाच्या अखेरीस ते एक बलिष्ट साम्राज्य होते.

हीरॉडोटसच्या मते त्यांनी आशियाच्या बहुतेक उत्तरेकडील भागावर २८ वर्षे आधिपत्य प्रस्थापित केले होते; तथापि तत्संबंधी सबळ पुरावा उपलब्ध नाही; मात्र त्यांचे साम्राज्य दृढतर होऊन शेजारच्या प्रदेशात ते लूटालूट करीत असत. त्यांनी दक्षिणेला ईजिप्तपर्यंत धडक मारली होती आणि बे-सान (आधुनिक बेट शिआन) घेऊन त्याचे नामांतरण सिथोपलिस असे केले. जेव्हा बॅबिलोनियन व मीड लोकांनी निनेव्हवर आक्रमण (इ. स. पू. ६१५-६१४) केले, तेव्हा सिथियनांनी ॲसिरियनांना सर्वतोपरी मदत केली; मात्र नंतर दोन वर्षांनी अंतर्गत कलहामुळे त्यांना ॲसिरियातून काढता पाय घ्यावा लागला. तेव्हा त्यांनी ॲसिरियाविरुद्घ मोहीम आखली आणि आक्रमकांना मदत केली (इ. स. पू. ६१२). नंतर त्यांनी कारी (आधुनिक हरान) ही ॲसिरियनांची नवीन राजधानी जिंकली. यावेळी त्यांचे एकेकाळचे मित्र मीड त्यांच्याविरुद्घ उठले आणि त्यांनी अनेक सिथियनांची कत्तल करुन त्यांच्यापैकी अनेकांना कॉकेशसमधून सिथियात घालविले.

तथापि काही सिथियन काळ्या समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर तसेच आर्मेनियाच्या काही भागात कायमची वसाहत करुन राहिले; मात्र त्यांच्या सत्तेस ओहोटी लागली, तरीसुद्घा त्यांनी पर्शियन राजा पहिला डरायस याच्या इ. स. पू. ५१२ मधील आक्रमणास पायबंद घातला. पुढे इ. स. पू. ३२५ मध्ये त्यांनी अलेक्झांडर द ग्रेटचा पराक्रमी सेनापती झोपीरियॉन याचा दारुण पराभव केला. त्याला अलेक्झांडरने थ्रेसमधून सिथियनांची हकालपट्टी करण्यासाठी पाठविले होते.

इ. स. पू. चौथ्या-तिसऱ्या शतकांत पूर्वेकडील सर्मेशियन लोकांनी सिथियनांना त्यांच्या मातृभूमीतून हळुहळू हद्दपार केले. इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या अखेरीस दक्षिणेकडील रशियन स्टेप प्रदेशात (सार्मेशिया) सिथियनांचे एकसंध राज्यमोडकळीस येऊन त्यांच्या काही टोळ्या बाल्कन्स आणि आशियाच्या स्टेप या तृणमय भागांत भ्रमंती करीत होत्या.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate