অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिल्युसिडी वंश

सिल्युसिडी वंश

नैर्ऋत्य आशियात इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस उदयाला आलेला एक राजवंश. पहिला सेल्युकस हा या घराण्याचा पहिला संस्थापक राजा असून त्याच्या नावावरुन या घराण्यास सिल्युसिडी हे नाव पडले. या राजवंशाने इ. स. पू. ३१२— ६४ दरम्यान राज्य केले. एके काळी या घराण्याच्या आधिपत्याखाली यूरोप खंडातील थ्रेसपासून उत्तर हिंदुस्थानातील सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश होता. ⇨अलेक्झांडर द ग्रेट(इ. स. पू. ३५६— ३२३) याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंकित साम्राज्याचे अँटिगोनस, सेल्युकस, टॉलेमी, लायसिमाकस आदी त्याच्या सेनानी व प्रांताधिप (क्षत्रप) यांत विभाजन झाले.

या विभाजनात सेल्युकसच्या वाटणीला बॅबिलोनिया हा प्रदेश आला; परंतु त्यानंतर लगेचच सत्ता संघर्षास सुरुवात झाली आणि प्रत्येक क्षत्रप अलेक्झांडरच्या साम्राज्याचा आपला हक्क सांगू लागला. त्यातून यादवी युद्घाला तोंड फुटले. यांत सेल्युकसच वरचढ ठरला आणि त्याने स्वबळावर साम्राज्याची निर्मिती केली. त्याच्यानंतर या घराण्यात अनेक राजे झाले; पण त्यांपैकी काही राजे वगळता उर्वरित फारसे कर्तृत्ववान व पराक्रमी नव्हते. त्यामुळे राज्याचा हळुहळू संकोच होऊन अखेरीस त्यास एका कमकुवत संस्थानाचा दर्जा प्राप्त झाला व तेही रोमनांच्या आक्रमणापुढे टिकले नाही. इ. स. पू. ६४ मध्ये सिल्युसिडी वंश संपुष्टात आला.

पहिला सेल्युकस निकेटर

(कार. इ. स. पू. ३१२— २८१) हा मॅसिडोनियाचा राजा दुसऱ्या फिलिपच्या अँटायओकस या सेनापतीचा मुलगा असून अलेक्झांडरच्या इराणवरील स्वारीत त्याचा एक अधिकारी व सेनानी म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर त्याने अलेक्झांडरच्या हिंदुस्थानातील स्वारीत पोरसविरुद्घच्या युद्घात मॅसिडोनियन सैन्याचे नेतृत्व केले. या युद्घात पोरसचा पराभव होऊन पुढे तो अलेक्झांडरचा मांडलिक झाला (इ. स. पू. ३२६).

अलेक्झांडरने इराणमधील स्यूसा येथे इराणी व ग्रीक लोकांचे संघटन करण्यासाठी परस्परांत आंतरविवाहाचा मोठा समारंभ केला. त्याप्रसंगी स्पिटॅमीनीझ या बॅक्ट्रियाच्या राजाच्या अपमा या कन्येशी सेल्युकस विवाहबद्घ झाला. अन्य लोकांनी अलेक्झांडरच्या आपल्या मृत्यूनंतर पत्न्यांचा त्याग केला; मात्र सेल्युकस हा एकमेव सेनानी असा होता की, त्याने अपमाबरोबर संसार केला. विभाजित साम्राज्यापैकी बॅबिलोनियाचे क्षत्रपपद त्याच्याकडे आले (इ. स. पू. ३२१); पण अँटिगोनसने त्याच्याकडे क्षत्रपपदाची खंडणी मागितली. ती त्याने नाकारली व कैद टाळण्यासाठी तो ईजिप्तच्या टॉलेमीकडे गेला. तिथे त्याने इ. स. पू.३१६३१२ दरम्यान सेवा केली.

दक्षिण सिरियातील गाझाच्या युद्घात त्याने टॉलेमीच्या सैन्याचे नेतृत्व करुन लायसिमाकस व कॅसेंडर यांच्या मदतीने डीमीट्रिअस या अँटिगोनसच्या मुलाचा पराभव केला आणि बॅबिलोनियावर पुनःश्च वर्चस्व प्रस्थापिले (इ. स. पू. ३१२) आणि सिल्युसिडी साम्राज्याचा पाया घातला. यावेळेपासून सिल्युसिड कालगणना (७ ऑक्टोबर इ. स. पू. ३१२) सुरु झाली. त्यावेळी अँटिगोनसने निकेनॉर या सेनापतीस व डीमीट्रिअस या मुलास बॅबिलोनियावर आक्रमण करण्याची आज्ञा केली; पण ती सफल झाली नाही. त्यानंतर सेल्युकसने राज्याचे संघटन करुन राज्यविस्ताराचे धोरण अंगीकारले.

त्याने राजा हा किताब धारण केला आणि इराणमधून पूर्वेकडे हिंदुस्थानापर्यंत धडक मारली (इ. स. पू. ३०५); परंतु ⇨ चंद्रगुप्त मौर्या ने त्यास प्रतिकार केला व संधी (तह) होऊन ५०० हत्तींच्या बदल्यात त्याने माघार घेतली (इ. स. पू. ३०३). पुढे तो लायसिमाकस, टॉलेमी व कॅसेंडर यांना त्यांच्या अँटिगोनस व डीमीट्रिअस यांविरुद्घच्या संयुक्त फौजेस मिळाला. या संयुक्त सैन्याने इ. स. पू. ३०१ च्या इप्ससच्या युद्घात अँटिगोनसचा दारुण पराभव केला त्यानंतर अँटिगोनसचे निधन झाले.

विजेत्यांनी त्याचे राज्य वाटून घेतले. त्यात सिरिया, आशिया मायनर सेल्युकसला मिळाला; मात्र टॉलेमी यात सहभागी झाला नाही, तेव्हा सेल्युकसने टॉलेमीविरुद्घ मोहीम उघडली. त्याने आपली राजधानी सील्यूशियाहून नवीन वसविलेल्या अँटिऑक नगरीत नेली. या सुमारास इराण व सिरिया यांवर त्याची अधिसत्ता होती; परंतु टॉलेमीने लायसिमाकसशी आपल्या कन्येचा विवाह करुन सेल्युकसवर दडपण आणले. त्यावेळी सेल्युकसने स्ट्रॅटोनीस या डीमीट्रिअसच्या कन्येबरोबर लग्न करुन मैत्री साधली; मात्र सिलिशिया व टायर आणि सिडॉन या नगरांची सेल्युकसने मागणी करताच त्यांच्यातील मैत्री संपुष्टात आली (इ. स. पू. २९८).

यानंतर त्याला अपमापासून झालेला अँटायओकस हा स्ट्रॅटोनीस या सावत्र आईच्या प्रेमात पडला आणि त्याची प्रकृती बिघडू लागली, तेव्हा सेल्युकसने त्यास स्ट्रॅटोनीस ही आपली पत्नी तर दिलीच; पण त्याला उत्तरेकडील क्षत्रपांचा सरसेनापती केले व त्याची सहराज्यव्यवस्थापक (को-रिजंट) म्हणून नियुक्ती केली (इ. स. पू. २९४). त्यानंतर त्याने डीमीट्रिअसला पकडून तुरुंगात टाकले. तसेच लायसिमाकसचा कॉरपिडिमच्या युद्घात (इ. स. पू. २८३) पराभव करुन त्याचे राज्य बळकाविले आणि मॅसिडोनियात जाण्यासाठी त्याने यूरोपात प्रवेश केला; परंतु याच मोहिमेत त्याचा टॉलेमी सेरौनस याने खून करविला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate