অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सीझर, ज्यूलिअस गेयस

सीझर, ज्यूलिअस गेयस

सीझर, ज्यूलिअस गेयस

(१२ किंवा १३ जुलै १००— ४४ इ. स. पू.). ग्रीको-रोमन जगाच्या इतिहासाचा ओघ निर्णायकपणे बदलून टाकणारा थोर रोमन सेनापती, हुकूमशहा आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म रोम शहरी झाला; मात्र नेमक्या कोणत्या साली झाला याबद्दल वाद आहेत. तथापि इ. स. पू. १०० हे परंपरेने स्वीकारलेले साल आहे. सीझरचे कुटुंब ‘पट्रिशन’ वर्गातले होते. पट्रिनशन म्हणजे श्रेष्ठी. पट्रिशन हा विशेषाधिकार असलेला वर्ग होता. तो कसा निर्माण झाला ह्याबाबत वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली जातात. त्यांपैकी एक असे : आरंभी रोममध्ये राजसत्ताक पद्घती होती; तथापि श्रेष्ठ सभा (सीनेट) होती आणि राजा हा श्रेष्ठ सभेने नेमलेला कारभारी असतो, अशी धारणा होती.

टार्क्विनस स्युपर्बस हा इ. स. पू. ५३४ मध्ये गादीवर आला. तो अत्यंत जुलूमी होता. श्रेष्ठ सभेला तो जुमानत नव्हता. इ. स. पू. ५०९ मध्ये श्रेष्ठ सभेने त्याला पदच्युत करुन रोमन प्रजासत्ताकाची स्थापना केली. राजाच्या जागी दर वर्षी निवडणुकीने ‘प्रेटर’ (पुढे कॉन्सल) ह्या पदावर येणाऱ्या दोन व्यक्तींची योजना करण्यात आली. तसेच राजेशाहीत अस्तित्वात असलेल्या श्रेष्ठ सभेचे स्थान कायम राहिले. इ. स. पू. ५०९ च्या ह्या क्रांतीच्या पूर्वी किंवा त्यावेळी प्रत्यक्ष रोममध्ये वा भोवतालच्या प्रदेशात भरपूर जमीनजुमला बाळगून असलेल्या काही सरदार कुटुंबांचामिळून हा श्रेष्ठींचा वर्ग तयार झालेला होता. इ. स. पू. ५०९ नंतर वा त्या वेळी जी घराणी ह्या वर्गात होती, त्यांखेरीज इतरांना ह्या वर्गात थारा मिळेनासा झाला. इतर ‘प्लिबीअन’ कनिष्ठ ठरले.

कनिष्ठांना श्रेष्ठींकडून फार जाच होत असे. कनिष्ठ हे गुलाम वा दास नव्हते; पण दैनंदिन व्यवहारांत त्यांना श्रेष्ठींवर अवलंबून राहावे लागत असे. श्रेष्ठींचे विशेषाधिकारही त्यांना नव्हते. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी एका वर्षासाठी निवड झालेला ‘ट्रिब्यून’ हा अधिकारी असे. श्रेष्ठ आणि कनिष्ठ वा लोकपक्ष ह्यांच्यात सत्तासंघर्ष होता आणि रोमच्या अंतर्गत राजकीय जीवनातील तो एक प्रमुख प्रवाह होता.

सीझरचे घराणे श्रेष्ठींपैकी असले, तरी श्रीमंत, नामांकित वा प्रभावशाली नव्हते. रोमन सरदाराला रोमच्या राजकीय जीवनात पुढे येण्यासाठी निरनिराळ्या सरकारी अधिकारपदांवर निवडून येणे आवश्यक असे आणि कॉन्सलपद प्राप्त करणे हे फार मोठे यश मानले जात असे (कॉन्सलची मुदत एक वर्षासाठी असली, तरी त्याचे अधिकार मोठे असत. न्यायदान आणि लष्कर त्याच्या अधिकारक्षेत्रात येत असे). हे सर्व करण्यासाठी पैसा आणि प्रभाव ह्यांचे पुरेसे पाठबळ जरी सीझरजवळ नसले, तरी त्याने राजकीय जीवनाचा स्वीकार हेतुतःच केला होता, असे दिसते. केवळ स्वतःला मानसन्मान मिळावेत ह्यासाठी नव्हे, तर अव्यवस्थित प्रशासन असलेल्या रोमला आणि ग्रीको-रोमन जगाला स्वतःच्या कल्पनांप्रमाणे अधिक चांगली व्यवस्था प्राप्त करुन द्यावी म्हणून त्याने राजकीय जीवनाच्या धकाधकीत पडायचा निर्णय घेतला असण्याचा संभव आहे.

इ. स. पू. ८४ मध्ये सीझरने ल्यूशस कॉर्नेलिअस सिन्ना ह्याची कन्या कॉर्नेलिआ हिच्याशी विवाह करुन उघड उघड लोकपक्षाच्या बाजूची भूमिका घेतली. सिन्ना हा रोमन सेनानी आणि राजकारणी गेयस मेरिअस (१५७— ८६ इ. स. पू.) ह्याचा पाठीराखा होता. मेरिअसने रोमची मोठी सेवा केली होती. लष्करी पराक्रम गाजविले होते. त्यामुळेच सलग सहा वेळा त्याची कॉन्सलपदी निवड झालेली होती; तथापि तो शिरजोर होऊ नये, म्हणून श्रेष्ठ सभेने त्याला त्याच्या प्रतिस्पर्धी सेनानींचे साहाय्य घेऊन विरोध केला होता. त्यातूनच ल्यूशस कॉर्नेलिअस सला (१३८— ७८ इ. स. पू.) हा सरदारपक्षाचा सेनानी आणि मेरिअस ह्यांच्यात वितुष्ट आले होते

वस्तुतः हा दोन व्यक्तींमधला संघर्ष नसून, श्रेष्ठ सभा आणि लोकपक्ष ह्यांच्यातील संघर्ष होता. ह्या पार्श्वभूमीवर सीझरने सिन्नाच्या मुलीशी केलेला विवाह सलाला रुचणे शक्य नव्हते. कॉर्नेलिआला घटस्फोट देण्याचा आदेश त्याने सीझरला दिला; पण सीझरने तो मानला नाही. ह्या आज्ञाभंगासाठी आपल्याला आपली मालमत्ताच नव्हे, तर आपला जीवही गमवावा लागेल, हे लक्षात घेऊन सीझर इटलीतून बाहेर जाऊन आशिया प्रांतात (रोमन प्रांत आणि आशिया मायनरच्या पश्चिमेकडील भाग) आणि सायलीशियात लष्करी सेवेसाठी गेला.

इ. स. पू. ७८ मध्ये सला मरण पावल्यानंतर सीझर रोमला परतला आणि त्याने आपली राजकीय कारकीर्द ठरावीक पद्घतीने म्हणजे सरकारी अभियोक्ता म्हणून सुरु केली; परंतु त्यात त्याला आरंभीच अपयश आले. त्यानंतर वक्तृत्वशास्त्राचा उत्तम अभ्यास करण्यासाठी तो त्या शास्त्रातील त्यावेळचा ख्यातनाम गुरु मोलोन ह्याच्याकडे गेला. तेथे जात असताना वाटेत त्याला चाच्यांनी पकडले आणि खंडणी मागितली.

सीझरने खंडणीची रक्कम उभी केली; पण स्वतःची सुटका झाल्यानंतर त्याने स्वतःचे एक नाविक दल उभारले आणि त्या चाच्यांना पकडून वधस्तंभावर चढविले. हे त्याने हातात कोणतीही सत्ता वा अधिकारपद नसताना केले. पुढे पॉन्टसचा राजा मिथ्रिडेटीझ, सहावा यूपेटर ह्याने इ. स. पू. ७४ मध्ये बिथिनियावर आक्रमण करुन रोमशी युद्घ सुरु केले, तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी सीझरने खाजगी सैन्य उभारले होते.

इ. स. पू. ६९ वा ६८ मध्ये सीझर ‘क्वेस्टर’ म्हणून निवडला गेला. रोमच्या राजकीय जीवनाचा सोपान चढण्यासाठी असलेली ही पहिली पायरी. क्वेस्टर हा राज्याच्या कोषागारावरचा अधिकारी असे. त्याची निवड एक वर्षासाठी लोकांकडून केली जाई. सीझरने फार्दर स्पेनमध्ये (आजचा अँडालूसीया आणि पोर्तुगाल) क्वेस्टर म्हणून काम केले. त्याला इ. स. पू. ६५ मध्ये ‘कुरुले ईडिल’ (Curule Aedile) ह्या पदावर निवडण्यात आले.

हे पद दंडाधिकाऱ्याचे असून हा अधिकारी सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करी. रोम शहरातील देवळे, इमारती, बाजारपेठा, खेळ आणि धान्यपुरवठा हे विषय त्याच्या अधिकारकक्षेत येत. ह्या पदावर असताना त्याने पैशाची भरपूर उधळपट्टी केली. त्यासाठी त्याने कर्जे काढली. ह्या उधळपट्टीत लोकरंजनासाठी होणारा खर्च बराच असे.

सार्वजनिक जीवनात यशस्वी होण्यासाठी तो हे करीत होता. पुढेइ. स. पू. ६३ मध्ये ‘पाँटिफेक्स माक्सिमस’ ह्या पदावर निवडून गेल्यावरही त्याने हेच धोरण ठेवले होते. रोममधील हे प्रमुख धार्मिक पद होते. ह्या पदाच्या माध्यमातून रोमच्या राजकारणात महत्त्व प्राप्त होण्यास बरीच मोठी संधी होती. रोमच्या सामाजिक राजकीय जीवनात सीझर पुढे येत चालला होता. देखणे, सुसंस्कृत आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेल्या सीझरने रोमन समाजावर आपली छाप पाडली होती; परंतु तो वादग्रस्तही होत चालला होता. पाँटिफेक्स माक्सिमस हे पदही त्याने सरळपणे मिळविलेले नव्हते, असे म्हटले जाते. इ. स. पू. ६३ मध्ये कॅटिलिन प्रकरण उद्‌भवले.

कॅटिलिन हा विपन्नावस्थेला पोहोचलेला एक श्रेष्ठी होता. नैतिक मूल्यांचा फारसा विचार न करणाऱ्या आणि दारिद्र्यामुळे अगतिक झालेल्या कॅटिलिनने बंडाळी करुन रोममध्ये सत्ता प्राप्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता (इ. स. पू. ६५). इ. स. पू. ६३ मध्ये त्याने रोममध्ये पुन्हा एकदा अराजक माजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिसरो (१०६— ४३ इ. स. पू.) कॉन्सल होता. त्याने हा प्रयत्न हाणून पाडला. सीझर आणि त्याचा राजकीय मित्र मार्कस लिसिनिअस क्रॅसस (मृत्यू इ. स. पू. ५३) ह्या दोघांवर कॅटिलिनच्या बंडात काही सहभाग असल्याचे आरोप झाले होते. कॅटिलिनला दया दाखवून मृत्युदंडाऐवजीअन्य कोणती तरी शिक्षा द्यावी, असा प्रस्ताव सीझरने श्रेष्ठ सभेत मांडलेला होता. पण तो फेटाळला गेला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate