অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्पेंग्लर, ओस्व्हाल्ट

स्पेंग्लर, ओस्व्हाल्ट

स्पेंग्लर ओस्व्हाल्ट

( २९ मे १८८०—८ मे १९३६ ). जर्मनीमधील इतिहासक्रमाची नावीन्यपूर्ण संकल्पना मांडणारा एक प्रसिद्ध इतिहासकार व राजकीय तत्त्वज्ञ. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ब्लाँगकनबर्ग ( मध्य जर्मनी ) येथे झाला. त्याच्या बालपणाविषयी व शालेय शिक्षणाबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याने हॉल विद्यापीठाची डॉक्टरेट घेतली (१९०४) आणि त्यानंतर सात वर्षे अध्यापकाची नोकरी केली.

पुढे तो नोकरी सोडून १९११ मध्ये वारसाहक्काने मिळालेला आपला जमीनजुमला पाहण्यासाठी म्यूनिकला गेला. तेथे त्याने इतिहासावर लक्ष केंद्रित केले आणि डेर अन्टरगँग डेस अ‍ॅबेन्ड्लँडिस (१९१८—२२;इं. भा. द डिक्लाइन ऑफ द वेस्ट,१९२६—२८) या बृहद्ग्रंथाचा पहिला खंड लिहून काढला (१९१८). या ग्रंथामुळे त्याचे देशभर नाव झाले आणि त्याची गणना इतिहासकार-तत्त्वज्ञांत होऊ लागली. चार वर्षांनी त्या ग्रंथाचा दुसरा खंड प्रसिद्ध झाला. शिवाय त्याने काही महिन्यांनी या ग्रंथाचीसुधारित आवृत्ती काढली. तत्काळ त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध झाले.

स्पेंग्लरने द डिक्लाइन ऑफ द वेस्ट या बृहद्ग्रंथात इतिहासाचे तत्त्वज्ञान विशद केले असून पाश्चात्त्य संस्कृतीच्या अधोगतीविषयी मीमांसा केली आहे. त्याचा हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचे रहस्य आहे. ऐतिहासिक क्रमाची संकल्पना ही सरळ रेषेप्रमाणे जात नसून ती इष्ट व अनिवार्य प्रगतीचेद्योतक आहे. कार्ल मार्क्सच्या मते,ती विरोधविकास रूपाने होणारी आहे,एवढेच ! मानवी समाज एक आहे.

मानवी जीवन अखंड व गतिमान आहे आणि मानवी जीवनाचे सुवर्णयुग अद्यापि यावयाचे आहे,ही मार्क्सची विचारसरणी अर्थातच स्पेंग्लरला मान्य नाही. त्याने अनेकविध शास्त्रे,तत्त्वज्ञाने आणि कला यांचा अभ्यास केला आणि वरील ग्रंथात आपली मते मांडली. त्याच्या मते,मानवी जीवनाची खरी ओळख त्याचा प्रवाह,प्रकार,गती व संगती समजणे यात आहे. त्यास अनुसरून मानवी जीवनातील भिन्न संस्कृतींचे आयुष्य व जीवन सांगणे हाच खरा इतिहासाचा मुख्य उद्देश आहे.

याकरिता त्याने भूतकालीन संस्कृतींचे प्रकार पाडून त्यांच्या विकासाचे व अवनतीचे एक तुलनात्मक मानचित्र तयार केले आणि त्यावरून त्या प्रत्येकींतील भिन्न अवस्था वा युगे कल्पिली व अखेरीस त्यांचे पर्यवसान कशात झाले,हे सांगितले. त्याच्या मते,इतिहास हा भिन्न व उच्च संस्कृतींमध्ये घडलेल्या वृत्तांताचा अथवा जीवन प्रकारांचा स्थलकालानुसारचा तुलनात्मक अभ्यास होय. इतिहास हा केवळ कार्य-कारणात्मक वृत्तांत नसून तो संस्कृतींचे संपूर्ण जीवन दर्शवितो. जगातएकच संस्कृती नसून अनेक संस्कृतींची प्रगती व अधोगती आहे आणि तिच्या जीवनाला ठराविक कालमर्यादा आहे.

इतिहासातीलघटना अपूर्व असतात. त्यांची तशीच पुनरावृत्ती होत नाही. त्या‘अनुभव’रूपी आहेत. इतिहास ही सतत नव्याने घडणारी कालरूपी क्रिया आहे. जागतिक मानवी जीवनाच्या घडामोडींचे जाळे उकलून त्यांच्यातील भिन्न संस्कृतींचे गट आणि प्रवाह शोधून काढणे व त्यांच्या आध्यात्मिक जीवनांची आंतरिक लक्षणे व बाह्य मर्यादा ओळखणे,हे त्याचे कार्य आहे. इतिहास ही अनेक संस्कृतिक्रमांची माला आहे. तिचे काम विशिष्ट काळात चालू असणार्‍या संस्कृतीच्या उच्च जीवनाची ओळख करून देणे,हे आहे. या संस्कृतींमधील सर्व अवस्थांची विभागणी करणे आवश्यक आहे.

स्पेंग्लरलाऐतिहासिक घडामोडीचे सापेक्षत्व मान्य आहे. त्याला ऐतिहासिक काळात मानवी संस्कृतींची भिन्न रूपे आढळली. त्या प्रत्येकींमध्ये चार अवस्था असून पहिल्या अवस्थेमधून अखेरच्या अवस्थेत जाण्याची तिची गती तुलनात्मक दृष्ट्या सारखेपणाची आहे. या गतीत वा क्रमात स्थलमाहात्म्य व कालमाहात्म्य आहे. प्रत्येक संस्कृतीला विशिष्टभाव असतो. इतिहासात उत्पन्न होणार्‍या सर्व कला,कल्पना व संस्था यांचा समुच्चय म्हणजे संस्कृती असून उत्पत्ती,स्थिती,गती व अवनती या अवस्था तीत दृग्गोचर होतात;म्हणून त्यांना शैशव,यौवन,वार्धक्य वमृत्यू म्हणता येईल. नऊ मुख्य संस्कृतींमध्ये समान घटना व अवस्था आहेत. त्यांचे परिणाम सारखे आहेत;मात्र त्यांचे भाव भिन्न आहेत.

स्पेंग्लरनेद डिक्लाइन ऑफ द वेस्ट या ग्रंथात संस्कृतींचा इतिहास विषयवार दिला असून कालक्रमवार दिला नाही. एका कल्पनेच्या वा क्रमाच्या तत्त्वज्ञानात सर्व मानवी जीवनाची भिन्न रूपे व रूपांतरे बसविण्याचा त्याचा हा अवास्तव प्रयत्न आहे. त्याचे प्रत्येक संस्कृतीचे वेळापत्रक व कालमान कृत्रिम असून ते ओढून-ताणून केलेले दिसते. तो मानवी जीवनात नवे आविष्कार,नवे प्रयत्न व नवी वळणे उत्पन्न होतील असे मानीत नाही. त्यामुळे त्याच्या विचारात मताचा आग्रह डोकावतो. त्याचा प्रमुख उद्देश मानवी जीवनाच्या सांस्कृतिक घटनांचे विश्लेषण करून एक जागतिक इतिहासाचे तत्त्वज्ञान रचण्याचा होता,मुळात त्याला असा इतिहास लिहावयाचा नव्हता.

भिन्न संस्कृतींतील समाजांच्या संपूर्ण जीवनाची निरनिराळ्या अवस्थेतील आविष्काराची व अनुभवाची तुलना करून त्यावरून त्यांची कालमर्यादा ठरवावयाची होती. त्यामुळे त्याचा हा ग्रंथ आत्मगत विचारांनी ओतप्रोत भरला आहे. त्याने केलेल्या तुलना अनेक ठिकाणी योग्य नसून काल्पनिक वाटतात. त्यामध्ये बिनचूक कालबद्धता आढळत नाही.

सर्वसामान्य अनुमाने प्रतिपादण्यासाठी घटनांच्या अपूर्वतेकडे व कालक्रमाकडे त्याचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामध्ये उपमा व साम्य यांना अधिक महत्त्व दिलेले दिसते. आधुनिक संस्कृती शास्त्रीय शोधांनी व सहयोगाने प्रगतिपथावर जाऊ शकते,हे सत्य त्याने दुर्लक्षिले आहे,असे म्हणावे लागते. यामुळेच व्यावसायिक व्यासंगी विद्वानांनी त्याच्या या ग्रंथाकडे फारसे लक्ष दिले नाही. राष्ट्रीय समाजवादी पक्षानेही त्याच्या या ग्रंथावर टीका केली.

त्याने द डिक्लाइन ऑफ द वेस्ट या ग्रंथाव्यतिरिक्त मॅन अँड टेक्निक्स (इं. भा. १९३१) हा आणखी एक ग्रंथ लिहिला. त्याच्या राजकीय विचारात व नाझी पक्षाच्या विचारसरणीत काही अंशी साम्य होते,तरीसुद्धा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या १९३३ च्या सत्ताग्रहणानंतर स्पेंग्लर सार्वजनिक जीवनापासून अखेरपर्यंत अलिप्त राहिला.

म्यूनिकयेथे त्याचे निधन झाले.


संदर्भ:1. Collingwood, R. G.The Idea of History, Oxford, 1961.

2. Hughes, H. Stuart, Oswald Spengler : A Critical Estimate, New York, 1952.

3. Thompson, J. W. History of Historical Writing, Vol. II, New York, 1962.

४. देशपांडे,सु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार,पुणे,२००६.

देशपांडे,सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate