অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हॉलफोर्ड जॉन मॅकिंडर

हॉलफोर्ड जॉन मॅकिंडर

हॉलफोर्ड जॉन मॅकिंडर : (१५ फेब्रुवारी १८६१–६ मार्च १९४७). सुविख्यात ब्रिटिश भूराजनीतिज्ञ व राजकारणपटू. लिंकनशर परगण्यातील गेंझबर येथे जन्म. त्याचे वडील वैद्य होते. १८८० मध्ये ऑक्सफर्डच्या क्राइस्टचर्च महाविद्यालयात निसर्गविज्ञानांचा, विशेषतः जीवशास्त्राचा, अभ्यास करून त्याने पदवी संपादिली. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘ऑक्सफर्ड युनियन’ या वक्तृतत्वसंस्थेचा तो अध्यक्षही होता. इनर टेंपलमधून १८८६ मध्ये तो बार ॲट लॉ झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सुरू केलेल्या प्रौढ शिक्षणविषयक आद्य विस्तार योजनेमध्ये मॅकिंडर अधिव्याख्याता झाला. तो देशभर, विशेषतः उत्तर इंग्लंडमध्ये, ठिकठिकाणी फिरला आणि त्याने १८८५–९३ यांदरम्यान ‘नवभूगोला’ वर अनेक व्याख्याने दिली व त्यांद्वारा भूगोलविषयक संदेश व तत्त्वज्ञान सर्वत्र प्रसृत केले.

त्या काळात ब्रिटिश व अमेरिकन शिक्षणपद्धतींत भूगोल विषयाला विशेष स्थान नव्हते. मॅकिंडरची कीर्ती लंडनच्या ‘रॉयल जिऑग्रफिकल सोसायटी’ या संस्थेत पोहोचली. मॅकिंडरला सोसायटीने भूगोल विषयाची व्याप्ती व पद्धती यांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले. मॅकिंडरने ‘भूगोल हे वितरणाचे शास्त्र असून ते सामान्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूंच्या मांडणीबाबत शोध लावते’ अशी भूगोल विषयाची व्याख्या करून प्राकृतिक भूगोल व राजकीय भूगोल या दोहोंचा मिलाफ केला जावा; निसर्गविज्ञाने व मानव्यविद्या यांच्या अभ्यासात एक मोठी दरी असून तिच्यायोगे मानवी संस्कृतीचा तोल ढासळत असल्याचे अनेकांचे मत असल्याचे सांगून या दरीवर सेतू वा पूल बांधणे हे भूगोलवेत्त्याचे कर्तव्य आहे असे त्याने प्रतिपादिले. याच वर्षी मॅकिंडरची ऑक्सफर्ड येथे भूगोल विषयाचा प्रपाठक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर त्याने १८ वर्षे काम केले. १८९९ मध्ये रॉयल जिऑग्रफिकल सोसायटी व ऑक्सफर्ड विद्यापीठ या दोहोंतर्फे ‘ऑक्सफर्ड भूगोल विद्याशाखा’ (ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जिऑग्रफी) स्थापण्यात येऊन मॅकिंडरला तिचा पहिला अध्यक्ष नेमण्यात आले. अशा प्रकारची विद्याशाखा तत्पावेतो कोठल्याही ब्रिटिश विद्यापीठात स्थापण्यात आलेली नव्हती. त्याच वर्षी मॅकिंडरने पूर्व आफ्रिकेला जाणाऱ्या एका मोहिमेचे नेतृत्व करून केन्या पर्वतावर पहिली चढाई केली.

मॅकिंडर ऑक्सफर्डमध्ये १९०४ पर्यंत अध्यापनकार्य करीत होता, त्याच वेळी रेडिंग व लंडन विद्यापीठांतही त्याचे अध्यापनकार्य चालूच होते. १९०४ मध्ये मॅकिंडरची नुकत्याच स्थापण्यात आलेल्या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स’ या संस्थेच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली, तेथे तो चार वर्षे होता. संचालकपदाचा राजीनामा देऊन मॅकिंडर १९१० साली हुजूर पक्षातर्फे ग्लासगोच्या कॅम्‌लॅची विभागातून संसदेवर निवडून आला. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्याचे ॲमरी, लॉर्ड मिल्नर इत्यादींशी सख्य जमले. १९१८ च्या निवडणुकीत तो विजयी झाला, परंतु १९२२ च्या निवडणुकीत तो पराभूत झाला.

भूगोल हे सुसूत्र शास्त्र आहे, हे प्रतिपादिताना मॅकिंडर प्रदेशाची संकल्पना स्पष्ट करतो. त्याचे ब्रिटन अँड द ब्रिटिश सीज (१९०२) हे पुस्तक म्हणजे आधुनिक भूगोलविषयक लेखनामधील एक अभिजात कृती मानण्यात येते. ऑक्सफर्डमधील वास्तव्यात मॅकिंडर व ए. जे. हर्बर्टसन या दोघांनी भूगोल हा एकसंध विषय असून तो विभागून शिकविला जाऊ नये, असे मत मांडले.

मॅकिंडरने १९०४ मध्ये रॉयल जिऑग्रफिकल सोसायटीच्या सदस्यांपुढे द जिऑग्रफिकल पिव्हट ऑफ हिस्टरी या शीर्षकाचा एक शोधनिबंध सादर केला. मॅकिंडरने यूरेशियाच्या मध्यभागाला ‘केंद्रबिंदू’ (पिव्हट एरिया) से प्रारंभी म्हटले होते, तथापि पुढे ते नाव ‘हृद्‌भूमी’ (हार्टलँड) असे बदलण्यात आले. मॅकिंडरने आपल्या व्याख्यानात दोन महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले :

  1. वाफेवर चालणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीमध्ये सुधारणा झाल्यामुळे संबंध जग एक झाले आहे, त्याचप्रमाणे राजकीय दृष्ट्याही ते एकसंघ बनले आहे.
  2. आधुनिक काळात झालेल्या सोव्हिएट रशियाच्या विस्ताराचे महत्त्व जागाच्या दृष्टीने फार आहे. सबंध जगाच्या राजकारणाचा केंद्रीय विभाग (वा प्रदेश) म्हणजे यूरेशियाचा प्रदेश असून तो जहाजांना दुर्गम आहे व त्यावर रशियाचे नियंत्रण आहे.

संबंध जग हे एकक मानल्यास सत्तासामर्थ्यशाली राष्ट्रे संयुक्तपणे केंद्रस्थित राष्ट्राभोवती फिरत राहणे (केंद्रस्थित राष्ट्राच्या आदेशाखाली राहणे) शक्य आहे; हे केंद्रस्थित राष्ट्र अधिक सामर्थ्यवान परंतु सभोवतालच्या (कडेवरील) राष्ट्रांचा मानाने कमी चलनशील असू शकेल; मँकिंडरच्या मते स्टेप प्रदेशातील मोठ्या प्रमाणावरील स्थिर (अचल) लोकसंख्येचा विकास म्हणजे जगातील एक क्रांतिकारी घटना समजली पहिजे.

मॅकिंडरने १९१९ मध्ये आपला उपर्युक्त शोध-निबंध डेमॉक्रटिक आयडीअल्स अँड रिॲमलिटी : ए स्टडी इन द पॉलिटिक्स ऑफ रिकन्स्ट्रकशन या पुस्तकरूपात प्रसिद्ध केला. जे. रसेल स्मिथ याने मॅकिंडरचे हे पुस्तक म्हणजे ‘व्हर्सायच्या शांतता परिषदेला उद्देशून तयार केलेला लघुप्रबंधच होय’ अशा शब्दांत त्याचे वर्णन केले आहे. त्या पुस्तकात पुढीलप्रमाणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे : ‘जेव्हा आमचे मुत्सद्दी व्हर्साय येथे पराजित शत्रुराष्ट्राशी चर्चा व वाटाघाटी करीत असतील, तेव्हा कोण्या आकाशस्थ देवदूताने त्यांच्या कानात सतत गुंजारव केला पाहिजे की, जो कोणी पूर्व यूरोपवर अंमल करतो, तो हृद्‍भूमीवर (हार्टलँड) स्वामित्व गाजवितो; जो कोणी हृद्‌भूमीवर राज्य करतो तो जगद्वीपावर (वर्ल्ड-आयलंड) आधिपत्य गाजवितो; आणि जो कोणी जगद्वीपावर नियंत्रण ठेवतो, तो सबंध जगाचे प्रभुत्व मिळवितो.’

दोन महायुद्धांदरम्यानच्या  मॅकिंडरच्या हृद्‌भूमिविषयक सिद्धांताला इंग्रजी भाषिक राष्ट्रांत फारसा उत्साहजनक प्रतिसाद मिळाली नाही.परंतु जर्मनीमध्ये त्याते कौतुक झाले. भूराजनीतीच्या अभ्यासकांना हा सिद्धांत पायाभूतच वाटला. जनरल कार्ल हाउशोफर याला तर मॅकिंडरचा १९०४ चा  शोधनिबंध म्हणजे जागतिक भौगोलिक मतप्रणालींमध्ये सर्वश्रेष्ठच वाटला. दुसऱ्या महायुद्धकाळात या संकल्पनेला ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या दोन्ही देशांनी उचलून धरले. १९४३ मध्ये मॅकिंडरने फॉरिन अफेअर्स या नियतकालिकात द राउंड वर्ल्ड अँड द विंनिग ऑफ पीस या लेखावाटे ही संकल्पना काही सुधारणांसहित प्रसिद्ध केली.

भूसेनेच्या सामर्थ्याविषयीचे मॅकिंडरचे लिखाण आणि सागरी सामर्थ्यावरील ॲल्फ्रेड थेअर माहॅन (१८४०–१९१४) यांचे लिखाण या दोहोंची तुलना करण्यात येते. अर्थात विसाव्या शतकातील हवाई सामर्थ्यामुळे मॅकिंडर व माहॅन या दोघांच्या लेखनामघील जोर संपुष्टात आल्याचे काहीजणांचे मत आहे. परंतु मॅकिडरने १९१९ व १९४३ मध्ये आपल्या सिद्धांतांच्या ठामपणाला हवाई सामर्थ्याच्या आगमनाने पुष्टीच मिळते, असा युक्तिवाद केला होता.

मॅकिंडरला १९१९ मध्ये ब्रिटिश उच्चयुक्त म्हणून द. रशियास पाठविण्यात आले. मायदेशी परतल्यावर त्याला सरदारकी देण्यात आली. १९२३ मध्ये ‘इंपीरियल शिपिंग कमिटी’ या नौकानयन समितीच्या अध्यक्षपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. तो या पदावर प्रदीर्घ काळ होता. ‘इंपीरियल इकॉनॉमिक कमिटी’ या अध्यक्ष म्हणूनही त्याने १९२६–३१ या काळात काम केले. १९२६ मध्ये मॅकिंडरला प्रिव्ही कौन्सिलर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याला मिळालेल्या अन्य सन्मानांमध्ये अमेरिकन जिऑग्रफिकल सोसायटीचे चार्ल्‌स पी. डेली मेडल (१९४४), रॉयल जिऑग्रफिकल सोसायटीचे पेट्रन्स मेडल (१९४६) इत्यादींचा समावेश होतो.

मॅकिंडरच्या राजकारणातील कामगिरीपेक्षा अनुप्रयुक्त भूगोलामधील त्याने केलेले आद्य संशोधन हे अधिक मोलाचे मानण्यात येते. भूगोल विषयाला विद्यापीठांत योग्य ते स्थान देण्याचे श्रेय मॅकिंडरला आहे. या विषयाच्या अनेक उपशाखा यांचा, विशेषतः भूराजनीतीचा, पाया घालण्याचे कार्य मॅकिंडरने केले, हे निर्विवाद मानले जाते, त्याचे लंडन येथे निधन झाले.

 

संदर्भ : 1. Gilbert, Edmund W. Sir Halford Mackinder, 1861-1947: An Appreciation of His Life and Work, London, 1961.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate