অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऱ्हाईनलँड

ऱ्हाईनलँड

ऱ्हाईनलँड

जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या डाव्या बाजूचा (मध्य ऱ्हाईन खोरे) सु. २४,६०० चौ. किमी. चा इतिहासप्रसिद्ध प्रदेश. भौगोलिक दृष्ट्या व्यापक अर्थाने ऱ्हाईन नदीने जलवाहन केलेला संपूर्ण प्रदेश म्हणजे 'ऱ्हाईनलँड' असे मानले जाते, तर प्रशियाच्या साम्राज्यकाळात बऱ्याच वेळा ही संज्ञा प्रशियातील ऱ्हाईन प्रांतापुरती वापरली जात असे. इतिहासकाळात पश्चिम यूरोपातील हा एक वादग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जात होता.

सर्वसामान्यपणे सांप्रत पूर्वेस ऱ्हाईन नदीपासून पश्चिमेस फ्रान्स, लक्सेंबर्ग, बेल्जियम व नेदर्लंड्स यांच्या सरहद्दींपर्यंत, तर उत्तरेस ऱ्हाईन नदी नेदर्लंड्समध्ये प्रवेश करते तेथपासून दक्षिणेस प. जर्मनीतील झारलँडपर्यंत याचा विस्तार मानला जातो.

ऱ्हाईनलँडचा इतिहास हा पश्चिम यूरोपातील सत्तासंघर्षाचा इतिहास असून जर्मनीतील बऱ्याचशा महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना या प्रदेशात घडलेल्या दिसून येतात. इ. स. पू. सातव्या किंवा सहाव्या शतकात या प्रदेशात केल्टिक लोकांच्या वसाहती होत्या. ज्यूलिअस सीझरच्या काळात (इ. स. पू. १०२ ? -४४) या प्रदेशाच्या पूर्व भागात जर्मन लोक ऱ्हाईन नदीच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते व त्यांनी हळूहळू ऱ्हाईन नदीच्या डाव्या बाजूच्या प्रदेशातही घुसण्यास सुरूवात केली होती. रोमन काळात हा भाग पश्चिमेस गॉल व पूर्वेकडील जर्मन लोकांमधील अडसर प्रदेश म्हणून ओळखला जात असे. इ. स. तिसऱ्या शतकात या भागात फ्रँक लोकांच्याही वसाहती होत्या.

रोमन साम्राज्याच्या पडत्या काळात हा प्रदेश फ्रँक राज्यात समाविष्ट झाला (पाचवे-सहावे शतक). त्यानंतर लॉरेन, सॅक्सनी, फ्रँग्कोनीया, स्वेबीया येथील ड्यूकांच्या   राज्यांत हा भाग विभागला गेला. मध्ययुगाच्या अखेरीस या भागात लहानलहान स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. जर्मनीतील पुर्नरचना काळात होणाऱ्या त्रासाचा गैरफायदा घेऊन फ्रान्सने सोळाव्या शतकात या प्रदेशातील लॉरेन प्रांतात अतिक्रमण केले.

१६१४ मध्ये ब्रांडेनबुर्कच्या सत्ताधाऱ्यांनी क्लेव्ह व मार्क या प्रदेशांचा ताबा घेतला. पुढे प्रशियन साम्राज्याचा विस्ताराचे ऱ्हाईनलँड हे केंद्रस्थान बनले. तीस वर्षांच्या युद्धामुळे फ्रान्सला या प्रदेशातील ल्सेस प्रांतात पाय रोवण्यास संधी मिळाली. चौदाव्या लूईच्या युद्धांमुळे फ्रेंचांचे ल्सेस प्रदेशावर जरी वर्चस्व प्रस्थापित झाले होते, तरी ड्यूकच्या ताब्यातील लॉरेन हा प्रांत १७६६ पर्यंत फ्रान्सला मिळाला नव्हता. नेपोलियन बोनापार्टने मात्र फ्रान्सची सरहद्द ऱ्हाईनलँड भागात पूर्वेस ऱ्हाईन नदीपर्यंत वाढविली व नदीच्या उजव्या काठावर ऱ्हाईन संघराज्याची स्थापना केली (१८०६).

नेपोलियनच्या पराभवानंतर व्हिएन्ना काँग्रसने (१८१४-१५) फ्रान्सची सरहद्द ऱ्हाईन नदीऐवजी या प्रदेशाच्या पश्चिमेकडील ल्सेस प्रांतापर्यंत मर्यादित केली. त्याच्या उत्तरेस बव्हेरियासाठी नवीन पॅलाटिनेट प्रदेश निर्माण करण्यात आला. त्याच्या वायव्येस इतर काही जर्मन राज्ये होती.

या राज्यांच्या उत्तरेकडील ऱ्हाईनलँडचा बराचसा भाग मात्र प्रशियन साम्राज्यात होता. १८२४ मध्ये हा प्रशियन प्रदेश व ऱ्हाईन नदीच्या पूर्वेकडील प्रशियाच्या अखत्यारीतील भाग यांचा मिळून ऱ्हाईन प्रांत बनविण्यात आला. १८७०-७१ च्या फ्रँको-जर्मन (प्रशियन) युद्धात फ्रान्सचा पराभव होऊन प्रशियाने ल्सेस-लॉरेन प्रांत घेतले व यानंतर प्रशियाच्या विस्तृत साम्राज्याचे ऱ्हाईनलँड हे संपन्न व भरभराटलेले क्षेत्र बनले.

हिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या तहानुसार ऱ्हाईनलँडमधील ल्सेस-लॉरेन प्रांत फ्रान्सच्या ताब्यात गेले व त्याचबरोबर दोस्त राष्ट्रांना जर्मन ऱ्हाईनलँड प्रदेशाचे पूर्व व पश्चिम भाग सु. ५ ते १५ वर्षांसाठी घेण्याविषयी परवानगी मिळाली.

र्मनीच्या पूर्व व पश्चिम सरहद्दींवरील सु. ५० किमी. रुंदीचे प्रदेश निर्लष्करी ठेवण्याविषयी करार करण्यात आला. या सर्व घटनांमुळे ऱ्हाईनलँड हा प्रदेश १९२० मध्ये वादग्रस्त बनला होता. याच सुमारास  'ऱ्हेनिश सेपरेटिस्ट मूव्हमेंट’ सुरू होऊन आखेन येथे २१ ऑक्टोबर १९२३ मध्ये फ्रान्सच्या चिथावणीने 'ऱ्हाईनलँड प्रजासत्ताका'ची घोषणा करण्यात आली; परंतु हा उठाव नागरिकांच्या विरोधामुळे लगेचच १ महिन्याच्या आत कोलमडून पडला. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री गुस्टाव्ह श्ट्रेझमान यांच्या प्रयत्नांमुळे करारानुसार ठरलेल्या मुदतीपेक्षा क्रमाक्रमाने ५ वर्षे आधी या प्रदेशातून फ्रेंच सैन्य काढून घेण्यात आले.

ऱ्हाईनलँड हा प्रदेश जर्मनीला पुन्हा मिळाल्यानंतर या भागात कोणतीही तटबंदी उभारावयाची नाही; ही व्हर्साय व १९२५ च्या लोकार्नो करारांतील अट झुगारून देऊन मार्च १९३६ मध्ये जर्मनीच्या नॅशनल सोशॅलिस्ट (नाझी) सरकारने या भागात पुन्हा लष्करी वर्चस्व वाढविण्यास सुरु वात केली.

हिटलरने लोकोर्नो करार सदोष ठरवून त्यातून अंग काढून घेतले. त्यामुळे राष्ट्रसंघाने करारभंगाबाबत जर्मनीला दोषी ठरविले; परंतु पुढे काहीच कारवाई केली नाही. हिटलरने ऱ्हाईनलँडमधील निर्लष्करी प्रदेश पुन्हा हस्तगत करण्याविषयी हुकूम दिले आणि ऱ्हाईनलँड भागात संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी उभारली. ती 'सीगफ्रीड लाइन’ या नावाने ओळखली जात होती.

या घटनांमुळे 'ऱ्हाईनलँड' साठी करण्यात आलेले सर्व महत्त्वाचे करार संपुष्टात आले. दुसऱ्या महायुद्धात तीव्र संघर्षानंतर दोस्त राष्ट्रांनी ही तटबंदी मोडून काढली.

या युद्धात जर्मनीचा पराभव होऊन १९४६ मध्ये ऱ्हाईनलँड ब्रिटिश व फ्रेंच विभागांमध्ये समाविष्ट झाले. पुढे १९४८ नंतर या प्रदेशाचा प. जर्मनीमध्ये समावेश झाला.

ऱ्हाईनलँड हा देशातील एक महत्त्वाचा औद्योगिक व द्राक्षउत्पादक प्रदेश म्हणून ओळखला जातो. माइन्त्स व बॉन या शहरांदरम्यानचा मध्य डोंगराळ प्रदेश मद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध असून या भागात इतिहासकाळातील अनेक राजवाडे व मठ दिसून येतात. ऱ्हाईनलँडचा दक्षिण भाग उद्योगधंद्याचे केंद्र बनला आहे.

खनिज संपत्तीच्या दृष्टीनेही हा प्रदेश समृद्ध असून कोळसा, लोहधातू, कथिल, शिसे, तांबे इ. खनिजांसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. कोब्लेंटस, कोलोन, माइन्त्स, आखेन, ड्युसेलडॉर्फ, लूटव्हिखसहाफेन इ. ऱ्हाईनलँडमधील महत्त्वाची शहरे आहेत.


पहा :  जर्मनी; फ्रांस; महायुद्ध, दुसरे; महायुद्ध, पहिले.

चौडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate