অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इपेकॅक

इपेकॅक

(इं. ब्राझील इपेकॅक; लॅ.सेफीलिस (सायकोट्रिया) इपेकॅक्युन्हा; कुल रुबिएसी). हे एका उपयुक्त औषधाचे व्यापारी नाव असून ते मूळच्या ब्राझीलमधील लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), ओषधीय वनस्पतीपासून [ ओषधि] काढतात. ही  वनस्पती सु. १०–२० सेंमी. क्वचित थोडी अधिक उंच व काहीशी पसरट असते. हिला दमट व उबदार हवामान, सावली, वाऱ्यापासून संरक्षण व कुजट पदार्थ असलेली निचऱ्याची जमीन ही लागतात. तिची लागवड मलायात रबराच्या मळ्यांत करतात. भारतात दार्जिलिंगजवळ मुंगपू व निलगिरी तसेच सिक्कीम इ. ठिकाणी तिची लागवड करण्यात येते. पाने साधी, समोरा समोर, आयत अंडाकृती, अखंड, टोकदार आणि खालच्या बाजूस लवदार असतात; हिला पांढऱ्या बारीक फुलांचे स्तबकासारखे गेंद येतात; अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे सुकी असतात. इतर सामान्य लक्षणे रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. हिची बारीक, वलयांकित व काहीशी गाठाळ मुळे [पहा : आकृती;  मूळ] त्यातील एमेटीन व सेफेलीन ह्या अल्कलॉइडांमुळे महत्त्वाची असतात. ती अमीबाजन्य आमांश, अग्‍निमांद्य, दंतरोग (पायोरिया), कफ इत्यादींवर गुणकारी असून वांतिकारी, स्वेदक (घाम आणणारे), दीपक (भूक वाढविणारे) व पौष्टिक असतात; अधिक प्रमाणात विषारी. त्यांची ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. भारतात होणारे उत्पादन मागणीपेक्षा फार कमी आहे. मूलक्षोडाचाही [ खोड] मुळासारखा उपयोग करतात.
लेखक : शं. आ. परांडेकर

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate