অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑनेग्रेसी

ऑनेग्रेसी

(शिंगाडा-शृंगाटक-कुल). आवृतबीज वनस्पतींपैकी [ वनस्पति, आवृतबीजी उपविभाग] द्विदलिकित या वर्गातील मिर्टेलीझ (मिर्टिफ्लोरी) गणात या कुलाचा अंतर्भाव केलेला आहे. याचा प्रसार समशीतोष्ण व उष्णकटिबंधातील ओलसर व पाणथळ जमिनीत असतो. यात अंदाजे ३८ वंश व ५०० जातींचा समावेश आहे. बहुतेक वनस्पती ओषधी, लहान क्षुप (झुडूप) किंवा जलवासी आहेत; पाने साधी व फुले एकटी किंवा फुलोरा [मंजरी, कणिश,  पुष्पबंध] असतो. ती द्विलिंगी, नियमित, अवकिंज, चतुर्भागी, क्वचित द्विभागी असतात. संदले ४ (क्वचित २–५), अंशत: किंवा पूर्णतः किंजपुटात वेढून राहणारी; प्रदले ४ (क्वचित ०), सुटी; केसरदले ४ किंवा ८; किंजमंडल अध:स्थ व ४–६ किंजदलांचे असते [ फूल]. शिंगाडा या वनस्पतीत किंजपुट अर्धवट अध:स्थ असते. किंजपुटातील प्रत्येक कप्प्यात एक वा अनेक बीजे बनतात. फळ विविध प्रकारचे असते. या कुलातील फुक्सिया, इनोथेरा रोजिया, क्‍लार्किया वगैरे शोभेच्या वनस्पती बागेतून लावतात. महाराष्ट्रात पानलवंग वगैरे दलदलीत सापडतात. शिंगाडा संपूर्णपणे पाण्यात वाढतो व त्याच्या बिया उकडून अगर पीठ करून खातात.

लेखक : वा. द. वर्तक

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate