অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉरिनिबॅक्टिरिएसी

कॉरिनिबॅक्टिरिएसी

सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टिरिएलीझ या गणातील तेरा कुलांपैकी हे एक कुल आहे. या कुलातील सूक्ष्मजंतूंचे आकार खंडितगदाकृती शलाका (दंडाच्या आकाराच्या)क्वचित लांब तंतुयुक्त, गोलाकार किंवा अनियमित असतात. बहुतेक सूक्ष्मजंतू अचल असून काही चल असतात. कशाभिका (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या दोरीसारख्या संरचना) टोकावर किंवा बाजूस असतात.

बहुतेक सूक्ष्मजंतू ग्रॅम-रंजक व्यक्त (ग्रॅम यांच्या रंजक क्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून राहणारे) असतात, पण काही ग्रॅम-रंजक चलही (ग्रॅम रंजकक्रिया काही वेळा होणारे आणि काही वेळा न होणारे) असतात. कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) कधीकधी समाभिवर्णी (सारख्या रंगाचे) कण आढळतात. त्यांत रंगद्रव्य आढळल्यास ते पिवळसर करडे किंवा नारिंगी असते.

त्यांच्यात जिलेटिनाचे पचन होते, तसेच नायट्रोजनिरासामुळे (नायट्रोजन काढून टाकण्यामुळे) नायट्रेटाचे नायट्राइट होते. हे सूक्ष्मजंतू वायुजीवी (हवेच्या सान्निध्यात वाढणारे), सूक्ष्मवायुजीवी किंवा अवायुजीवी असतात. त्यांच्यामुळे मानव, प्राणी व वनस्पती यांना रोग होतात. काही सूक्ष्मजंतू दुग्धपदार्थ, मृदा, धूलिकण किंवा कुजलेले पदार्थ यांत आढळतात.

या कुलातील सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात.

(१) प्राणी व वनस्पती यांत रोग उत्पन्न करणारे व

(२) कुजलेल्या पदार्थांवर आणि मृत जीवांवर वाढणारे.

पहिल्या प्रकारात कॉरिनिबॅक्टिरियम, लिस्टेरिया व एरिसिपेलोथ्रिक्स हे वंश येतात. यांपैकी पहिल्या दोन वंशांचे सूक्ष्मजंतू वायुजीवी व अवायुजीवी असून त्यांचे विभाजक भाग वक्र असल्याने विविध आकारांच्या शलाकांची निर्मिती होते. तिसऱ्या वंशाचे सूक्ष्मजंतू सूक्ष्मवायुजीवी, शलाकाकार किंवा तंतुयुक्त व अचल असतात. दुसऱ्या प्रकारातमायक्रोबॅक्टिरियम, सेल्युलोमोनस व आर्थ्रोबॅक्टर हे वंश येतात.

कॉरिनिबॅक्टिरियम

या वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे वनस्पती, मानव व प्राणी यांना रोग होतात. हे सूक्ष्मजंतू गदाकार, समाभिवर्णी कण असलेले, ग्रॅम-रंजक व्यक्त किंवा चल,वायुजीवी, सूक्ष्मवायुजीवी किंवा अवायुजीवी असतात. विभाजनाचे कोशिकांचे वलयीभवन होऊन V, K व N या इंग्रजी अक्षरांच्या आकारांचे किंवा अनियमित आकारांचे सूक्ष्मजंतू तयार होतात. ते कार्बोहायड्रेटांपासून अम्लांचे उत्पादन करतात. या वंशातील काही सूक्ष्मजंतू मृदेत, पाण्यात किंवा दुग्धपदार्थांत आढळतात.

कॉरिनिबॅक्टिरियम डिप्थेरी या सूक्ष्मजंतूमुळे मनुष्याला घटसर्प हा रोग होतो. हे सूक्ष्मजंतू वक्र किंवा शलाकाकार, अचल, ग्रॅम-रंजक व्यक्त आहेत. त्यांच्यापासून बाह्यविष (जंतू आपल्या शरीराबाहेर टाकीत असलेले विष) तयार होते. त्यांचे विष रक्तात भिनल्यास मृत्यू येतो. सूक्ष्मजंतू-प्रतिविष (जंतुविरूद्धची लस) मुलांना टोचल्यास त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. [→ घटसर्प].

या वंशातील काही सूक्ष्मजंतूंमुळे मेंढ्यांना लसीका ग्रंथिशोथ [लसीका ग्रंथीची दाहयुक्त सूज, → लसीका तंत्र], शिंगरांना पूयरक्तता (रक्तात सूक्ष्मजंतूचा संसर्ग झाल्यामुळे शरीराला निरनिराळ्या भागांत पूयुक्त गळवे होणे), डुकरांना ग्रैवलसीका गाठी (मानेतील लसीकेच्या गाठी), गाईम्हशींना मूत्रमार्गाचे विकार होतात. वनस्पतींना विशेषत: टोमॅटोवर खैरा रोग; लसूणघासावर, गव्हावर व बटाट्यावर बांगडी रोग इ. रोग होतात.

लिस्टेरिया

या वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे मानवांना व नियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसरापेक्षा जास्त व स्थिर असते अशा) प्राण्यांना रोग होतात. ते वायुजीवी,लघुशलाकाकार असून चल आहेत. कशाभिका शलाकेभोवती असतात. लिस्टेरिया मोनोसायटोजिनीस या सूक्ष्मजंतूंमुळे ‘मोनोसायटोसीस’ (मोठ्या एककेंद्रकी पांढऱ्या कोशिकांचे रक्तातील प्रमाण वाढणे) हा रोग होतो.

एरिसिपेलोथ्रिक्स

या वंशातील सूक्ष्मजंतू सूक्ष्मवायुजीवी असून ते शलाकाकार, लांब, अनियमित तंतुमय असतात. ते अचल आहेत. एरिसिपेलोथ्रिक्स इन्सिडीओसा(ऱ्हुसिओपॅथी) या सूक्ष्मजंतूमुळे डुकरांना व मानवांना धावरे हा रोग होतो.

मायक्रोबॅक्टिरियम

या वंशातील सूक्ष्मजंतू दुग्धपदार्थांत आढळतात. ते अचल असून उच्च तापमान प्रतिकारक आहेत. त्यांच्यामुळे कार्बोहायड्रेटापासून अम्ल निर्मिती कमी प्रमाणात होते.

सेल्यूलोमोनस

या वंशातील सूक्ष्मजंतू मृदेत आढळतात. ते चल किंवा अचल आहेत. त्यांच्यामुळे सेल्युलोजाचे अपघटन (लहान रेणूंत रूपांतर) होते.

आर्थ्रोबॅक्टर

या वंशातील सूक्ष्मजंतू मृदेत आढळतात. ते अचल असून त्यांची वाढ होताना ते ग्रॅम-रंजक अव्यक्त असतात, पण पूर्ण वाढीनंतर ग्रॅम-रंजक व्यक्त होतात. ते लांब, फुगीर, शाखायुक्त व पूर्ण वाढीनंतर आखूड व गोलाकार असतात. त्यांच्यामुळे कार्बोहायड्रेटापासून अल्प प्रमाणात अम्ल निर्मिती होते. ते सेल्युलोजाचे अपघटन करू शकत नाहीत.

 

संदर्भ : 1. Burrows, W. Textbook of Microbiology, London and Philadelphia, 1965.

2. Frobisher M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1961.

3. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, New York, 1961

लेखक: कुलकर्णी, नी. बा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate