অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिनोपोडियम तेल

चिनोपोडियम तेल

चिनोपोडियम तेल


(कृमिबीज तेल). हे एक कृमिनाशक तेल असून ते चिनोपोडियम या लॅटिन नावाच्या वनस्पति वंशातील[चक्रवर्त किंवा चाकवत कुल; → चिनोपोडिएसी] एका जातीपासून (चिनोपोडियम अँब्रोसिऑइडीस, प्रकार अँथेल्मिटिकम; इ. अमेरिकन वर्मसीड; मेक्सीकन टी) काढतात. ही वर्षभर जगणारी वनस्पती मूळची द. अमेरिका व वेस्ट इंडीज येथील आहे. द. भारत, बंगाल, सिल्हेट, काश्मीर व महाराष्ट्र येथे तत्सम भारतीय जाती (चिनोपोडियम अँब्रोसिऑइडीस, मेक्सिकन टी; वर्मसीड) तणासारखी पाणथळ जागी आढळते. दोन्हींच बरेच साम्य असले, तरी ओळखण्यासारखे काही किरकोळ फरकही आहेत. ही सुंगधी, अनेक फांद्यांची उभी, सरळ व सु. एक मीटरपर्यंत उंच वाढणारी ⇨ओषधी ग्रंथियुक्त (प्रपिंडिय) केसाळ असते.

 

पाने लहान, साधी, फार लहान देठाची, दातेरी व काहीशी खंडित व लांबट असतात. त्यांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस लांबट व पाने असलेला कणिश प्रकारचा शाखा युक्त[परिमंजरी; → पुष्पबंध] फुलोरा असतो व त्यावर ऑगस्ट ते एप्रिलमध्ये बारीक फुले येतात. अमेरिकी कृमिबीज जातीच्या प्रकारात (अँथेल्मिंटिकममध्ये) फुलोऱ्याला पाने नसतात, हा दोन्ही वनस्पतींतील मुख्य फरक होय. शुष्क फळ [क्लोम; → फळ] पापुद्र्यासारख्या सालीचे पण फुगीर असून त्यात फार बारीक (सु. ०·८ सेंमी. व्यासाची), वाटोळी, चकचकीत व पिंगट बीजे असतात. फळांना टर्पेंटाइन किंवा यूकॅलिप्टस (निलगिरी तेल) सारखा वास व तिखट आणि तुरट चव असते.

झाडाला काहीसा कापरासारखा वास येतो. त्याच्या व बीजांच्या ऊर्ध्वपातनाने (बंद पात्रात पदार्थ तापवून बनणारी वाफ थंड करून मिळणारा पदार्थ जमविण्याच्या क्रियेने) काढलेले तेल कृमिनाशक असते; यालाच ‘वास्तुक तेल’ [चिनोपोडियम आल्बम = वास्तुक (सं.), चाकवत (म.)] असे कोणी म्हणतात व कृमींचा नाश करणारे म्हणून ‘कृमिबीज तेल’ म्हणतात. (इं. वर्मसीड ऑइल). हे तेल फिकट पिवळे किंवा नारिंगी पिवळे असून त्याला उग्र वास व तिखट कडू चव असते; त्यात अ‍ॅस्कॅरिडॉल हे प्रमुख कृमिनाशक द्रव्य सु. ४०-४५ टक्के असते; शिवाय टर्पेनीन, सॅफ्रोल, सॅलिसिलेट, पी-सायमीन इ. द्रव्ये त्यात असतात; वनस्पतीत (विशेषतः मुळात) सॅपोनीन असते. ते रासायनिक दृष्ट्या सिनीओलसारखे असून आतड्यातील अनेक जीवोपजीवींचा नाश करू शकते. ते जंत व अंकुशकृमी आणि अमीबीय आमांश यांवर देतात; ते काळजीपूर्वकच वापरावे लागते.

पाळीव पशूंच्या (कुत्री, मांजरे, डुकरे, घोडे, गाई, बैल, म्हशी, रेडे इ.) पोटातील जंत व अंकुशकृमीवरही या तेलाचा फार उपयोग होतो. अमेरिकी प्रकाराऐवजी भारतीय जाती वापरात आहे. मुंगपू (बंगाल) येथे अमेरिकी प्रकार (अँथेल्मिंटिकम) लागवडीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण व्यापारी दृष्ट्या तो अयशस्वी झाला. तथापि डेहराडून व इतरत्र अद्याप प्रयत्न सुरू आहेत. चि. बॉट्रिस ही भारतीय जाती वर वर्णिल्याप्रमाणे वापरतात. तेल थंड जागी व प्रकाशापासून सुरक्षित जागी ठेवावे लागते, कारण प्रकाशाचा त्यातील अ‍ॅस्कॅरिडॉलावर अनिष्ट परिणाम होतो. ह्या वनस्पतींची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे चाकवत कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

 

संदर्भ : 1. Chopra, R. N. Badhwar, R. L.; Ghosh, S. Poisonous Plants of India, Vol, 2, New Delhi, 1965.

2. Chopra, R. N.; Nayar, S. L.; Chopra, I. C. A Glossary of Indian Medicinal  Plants, New Delhi, 1969.

3. C. S. I. R. The Wealth of  India, Raw Materials Vol, 2, New Delhi, 1950.

लेखक: पाटील, शा. दा.,परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate