অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्जन्य

पर्जन्य

पर्जन्य

संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्‍या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्‍याच जाडीच्या ढगातून होणाऱ्‍या वर्षणाचा एक प्रकार. कधीकधी हे वर्षण घनरूपात (हिमवर्षावाच्या स्वरूपात) सुद्धा होते. वातावरणात वाढत्या उंचीप्रमाणे वातावरणीय दाब कमी होत जातो व हवा विरल होत जाते. विशिष्ट तापमान ऱ्‍हासाच्या परिस्थितीत आर्द्रतायुक्त अस्थिर हवा वर जाऊ लागली, तर ती प्रसरण पावून तिचे अक्रमी शीतलन (ज्यात बाहेरून उष्णता शिरत नाही किंवा ज्यातून उष्णता बाहेर जात नाही अशा प्रक्रियेने थंड होणे) तिची सापेक्ष आर्द्रता (वातावरणाच्या एकक आकारमानातील ओलावा आणि त्या आकारमानात संतृप्तावस्था येईपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण होईपर्यंत मावेल एवढा ओलावा यांचे गुणोत्तर) वाढते. कालांतराने विशिष्ट उंचीवर ती हवा संतृप्त बिंदू (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते व हवेत पुरेशा संख्येने आर्द्रताग्राही संद्रवण (द्रवीकरण) केंद्रके उपस्थित असल्यास त्यांवर जलबाष्पाचे संद्रवण होऊन मेघकण तयार होतात व मेघनिर्मिती होते. ह्या उंचीनंतर जलबाष्पाचा सारखा पुरवठा होत गेला आणि हवा वर चढतच गेली, तर तिचे तापमान कमी होत जाते, तिची जलबाष्पधारणशक्ती कमी होते; तथापि ती हवा संतृप्तावस्थेतच राहते. ढग उंच वाढतच असतो त्यामुळे अतिरिक्त जलबाष्पाचे भिन्न आकारमानाच्या असंख्य जलबिंदूत किंवा हिमस्फटिकांत रूपांतर होते. ते या उंच वाढणाऱ्‍या ढगात ऊर्ध्व आणि क्षैतिज प्रवाहांबरोबर इतस्ततः भ्रमण करीत असतात. साधारणपणे उष्ण कटिबंधात १,८५० मी. पेक्षा कमी जाडी असलेल्या ढगातून पाऊस पडत नाही. ढगांची जाडी जसजशी वाढते तसतशी त्यांची वर्षणक्षमता वाढते. ३,६५० मी. पेक्षा अधिक जाडी असलेल्या ढगांतून पाऊस नक्की पडतोच. न वर्षणाऱ्‍या ढगात एका घ. सेंमी. मध्ये साधारणपणे ०.०१ मिमी. व्यासाचे शेकडो कण असतात.

शा ह्या ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्‍या क्रियाशील ढगात सूक्ष्म मेघकणांचे किंवा हिमस्फटिकांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या प्रक्रिया सहजगत्या उपलब्ध झालेल्या असतात. त्यांत सर्वांत प्रभावी प्रक्रिया म्हणजे जलबाष्पयुक्त हवेचे ऊर्ध्वगतीवर पाऊस किती पडेल हे अवलंबून असते, असे आधुनिक वातावरणवैज्ञानिक संशोधनान्ती सिद्ध झाले आहे. पाऊस केव्हा आणि कोठे पडेल हे प्रश्न त्या मानाने गौणच ठरतात. प्रारण (तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात उष्णता वाहून नेणे), संवहन (प्रत्यक्ष कणांची हालचाल न होता उष्णता एका कणाकडून दुसऱ्‍याकडे वाहून नेली जाणे) आणि संमिश्रण ह्या प्रक्रियाही ढगात सातत्याने घडतच असतात; पण ऊर्ध्व प्रवाहांना न जुमानता सूक्ष्ममेघकणांपासून भूपृष्ठावर पडणाऱ्‍या मोठ्या पर्जन्य बिंदूंच्या निर्मितीच्या बाबतीत त्यांची कार्यक्षमता कमीच असते. दव, हिमतुषार (तुहिन), धुके, मंद तुषारवृष्टी यांसारखे कमी लक्षवेधी आविष्कारच ते निर्माण करू शकतात.

साधारणपणे मेघकणांचा व्यास २० ते ४० (१=१०–३ मिमी.) असतो. आणि त्यांचा पतनवेग (वातावरणातून खाली येण्याचा वेग) ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो. हे कण पर्जन्यरूपाने खाली पडू शकत नाहीत. मंद तुषारवृष्टीत जलबिंदूचा व्यास साधारणपणे २००μकिंवा  ०.२ मिमी. असतो. मात्र तो ०.५ मिमी. पेक्षा अधिक नसतोच. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असताना दिसतात. पर्जन्यबिंदूचा व्यास १ ते ६ मिमी. या अभिसीमेत पण सरासरीने २ मिमी. असतो. मोठ्या पर्जन्यबिंदूचा व्यास ६०००μ (०.६ सेंमी.) एवढा असू शकतो आणि त्यांचा पतनवेग ७० सेंमी. / सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो. पर्जन्यबिंदू व मेघकण यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर १०:१ असे असते. पावसाच्या एका थेंबात १० लक्ष मेघकण सामाविले जाऊ शकतात. मेघकण वाढून मोठा झाला की, पाऊस पडणे शक्य होते. आर्द्रतम हवा वर जाऊ लागल्यास मेघकणही वर खेचले जातात. ते एकमेकांवर आदळू लागतात. कधीकधी ते फुटतात तर कधीकधी ते फुटतात तर कधीकधी त्यांचे संमीलन होते. अशा ‘आघात व संमीलन’ क्रियेमे परिणामी थेंबाचा आकार वाढतो. त्यांचा पतनवेगही वाढतो. हा पतनवेग ढगातील ऊर्ध्व प्रवाहाच्या वेगापेक्षा अधिक झाला की, ते थेंब पर्जन्यरूपाने खाली पडू लागतात. खाली पडताना ते थेंब लगतची हवाही ओढतात. त्यामुळे अधःप्रवाह निर्माण होतात. कधीकधी त्यांना द्रुतप्रवेगी ⇨ चंडवातांचे स्वरूप येते. काही शीत ढग हिमरेषेपेक्षा (वातावरणात ०° से. तापमान असलेल्या पातळीपेक्षा) उंच वाढतात. त्यांत बर्फकण व अतिशीतित पाण्याचे थेंब निर्माण झालेले असतात. ते समोरासमोर आले की, बर्फकणांवर अतिशीतित जलबिंदूचे आक्रमण होते. बर्फकण आकारमानाने वाढू लागतात. ते फार मोठे झाले की, खाली पडू लागतात. बर्फाच्या स्वरूपात जमिनीकडे येणाऱ्‍या घनीभूत जलबिंदूचे खालील हवेच्या अधिक तापमानामुळे पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडू लागतो. हिमरेषेच्या खाली असलेल्या उष्णतर ढगांतील पर्जन्यबिंदू  ‘आघात व संमीलन’ क्रियेनेच मोठे होतात व पाऊस पडतो. पाऊस पडण्यास ढगांतील ऊर्ध्व प्रवाह विशेषकरून कारणीभूत होतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate