অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्णविन्यास

पर्णविन्यास

पर्णविन्यास

(लॅ. फायलोटॅक्सी फायलोटॅक्सिस). हवेत सरळ व उंच वाढणाऱ्‍या अथवा दुसऱ्‍या आधारावर चढणाऱ्‍या किंवा जमिनीवर सरपटत जाणाऱ्‍या खोडावरची पाने त्यांच्या अन्ननिर्मितीच्या कार्यास पोषक अशा रीतीने आधारलेली असतात. ती फक्त पेऱ्‍यावर उगवतात. प्रत्येक पेऱ्‍यावरची संख्या (एक, दोन किंवा अधिक) व आधार-पद्धती यांवर त्यांच्या आनुवमशिकतेचा (पिढ्यान्पिढ्या परंपरेने चालू राहणाऱ्‍या गुणाचा) व भोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव मुख्यतः कारणीभूत असतो. पानांच्या अशा पद्धतशीर मांडणीस ‘पर्णविन्यास’ म्हणतात. वनस्पतींच्या लक्षणात हे पानांच्या मांडणीचे लक्षण इतक्या सुंसंगतपणे आढळते की, त्यांच्या जाती, वंश आणि कुले (उदा., ॲपोसायनेसी, ॲस्क्लेपीएडेसी, लॅबिएडेसी, लॅबिएटी इ.) यांच्या प्रमुख लक्षणांत पर्णविन्यासाचा अंतर्भाव होतो. पानांची मांडणी यदृच्छया किंवा आकस्मिकपणे होत नसून खोड किंवा फांदीच्या टोकास असलेल्या कोरकावस्थेतील (कळीतील) सूक्ष्म आद्यपर्णापासून ते पूर्ण विकास होईपर्यंत पानांवर होणाऱ्‍या आतील (आनुवंशिकता) व बाहेरील परिस्थिताच्या प्रभावानुसार ती नियमित व नियंत्रित केली जाते. फूल हे प्ररोहस्वरूप (खोड व त्यावरील पाने अशा स्वरूपाचे) इंद्रिय असल्याने त्याच्या संरचनेतही पुष्पाक्षावर पुष्पदलांची मांडणी भिन्न जाती, वंश कुले व गण यांत निश्चित प्रकाराने आढळते आणि वनस्पतींच्या वर्गीकरणात त्यालाही महत्त्व असते.

प्रत्येक पेऱ्‍यावर एकच पान येऊन सर्व खोडावर (किंवा फांदीवर) एकाआड एक पाने रचलेली आढळतात. अशा पद्धतीस सर्पिल (एकांतरित) पर्णविन्यास म्हणतात. याचे कारण एका पानाच्या तळापासून दुसऱ्‍या, तिसऱ्‍या, चौथ्या वगैरे पानांच्या तळांतून जाणारी एक काल्पनिक रेषा काढली, तर ती खोडाभोवती (फिरत्या जिन्याप्रमाणे) फिरकीसारखी जात असल्याचे आढळते. अशा तिरप्या रेषेस ‘जननिक सर्पिल’ म्हणतात. या मांडणीत विविध प्रकार आढळतात. गवतांमध्ये (उदा., ऊस, मका इ.) खोडावर पानांच्या दोन उभ्या रांगा असतात. एका उभ्या रांगेत पहिले, तिसरे, पाचवे इ. विषम क्रमांकांची पाने असतात, तर दुसऱ्‍या उभ्या रांगेत दुसरे, चौथे, सहावे इ. सम क्रमांकांची पाने येतात. म्हणजेच पहिल्याच्या बरोबर वरच्या बाजूस तिसरे (दुसरे नव्हे), त्याच्यावर पाचवे अशी पाने येतात. तसेच दुसऱ्‍या क्रमाकांच्या पानाच्या वरच्या बाजूस चौथे पान (तिसरे नव्हे) व त्यावर सहावे याप्रमाणे मांडणी असते. येथे पर्णविन्यास १/२ या अपूर्णांकाने दर्शविला जातो.

कोणत्याही एका पानापासून काढलेली काल्पनिक रेषा त्या पानाच्या बरोबर वरच्या (त्याच रांगेतल्या) पानास जाऊन पोहोचताना खोडाभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा करते व (पहिले पान सोडून) ती करीत असता वरच्या दोन नवीन पानांच्या तळांतून जाते. येथे खोडाच्या पृष्ठावर सारख्या अतरावर पानांच्या दोन उभ्या रांगा असतात. त्यांना ‘सरल पंक्ती’ व सर्पिल रेषेस ‘सर्पिल पंक्ती’ असे म्हणतात. १/२ या अपूर्णांकातील एक हा अंशाचा आकडा प्रदक्षिणेचा असून दोन हा छेदाचा आकडा पानांच्या रांगांचा (अथवा वरच्या पानांचा) असतो. लव्हाळा, मोथा (सायपेरेसी कुल) इ. वनस्पतींच्या खोडावर पानांच्या तीन रांगा असल्याने त्यांचा पर्णविन्यास १/३ असतो. येथेही वरच्याप्रमाणे एकाच प्रदिक्षणेत पहिल्या पानापासून निघालेली सर्पिल रेषा चौथ्या पानाच्या तळात येते; पहिले पान सोडून दिल्यास वरच्या तिसऱ्‍या नवीन पानाच्या तळात ही प्रदक्षिणा पूर्ण होते व हे पान पहिल्याच्या बरोबर वरच्या बाजूस व त्याच रांगेत असते.

गवतांच्या बाबतीत किंवा तशाच इतर १/२ पर्णविन्यास असणाऱ्‍या वनस्पतींत दोन पानांतील अंतर प्रदक्षिणेच्या किंवा सर्पिल पंक्तीच्या (वर्तुळाच्या) निम्मे असते, हे उघड आहे. त्याचप्रमाणे १/३ पर्णविन्यास असणाऱ्‍या वनस्पतीत दोन क्रमागत (लागोपाठच्या) पानांतील अंतर परिघाच्या १/३ असते. वर्तुळाच्या केंद्राभोवताली काटकोनांची संख्या चार असल्याने एकूण केंद्रवर्ती कोनांचे मूल्य ९०°×४ म्हणजेच ३६० अंश असते. यावरून १/२ पर्णविन्यासात दोन क्रमागत पानांमधील अंतर कोनात मोजले, तर ३६०° × १/२=१८०° होते. याला ‘परामुखताकोन’ म्हणतात. १/३ पर्णविन्यासात ३६०° ×१/३=१२०° परामुखताकोन असतो. पपनस व पारोसा पिंपळ या वनस्पतींत पानांच्या पाच रांगा असून कोणत्याही पानापासून निघणारी सर्पिल रेषा खोडाभोवती दोन प्रदक्षिणा करून मग त्याच रांगेतल्या बरोबर वरच्या पानाच्या तळात येते व हे पान पाचवे असते. येथे परामुखता-कोन ३६०×२/५=१४४° असतो.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate