অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाच

पाच

(हिं. पाचोली; इं. पॅचौली; लॅ. पोगोस्टेमॉन कॅब्लिन, पो. पॅचौली प्रकार स्वाविस; कुल-लॅबिएटी). ह्या नावाचे सुगांची तेल व अत्तर सुप्रसिद्ध असून ते ज्या वनस्पतींपासून काढतात त्यांना सामान्यपणे भिन्न भाषांत सारखीच नावे आहेत. त्या वनस्पतींच्या वंशाचे शास्त्रीय नाव पोगोस्टेमॉन असून त्याचा अंतर्भाव ⇨लॅबिएटी (लॅमिएसी) कुलात (तुलसी कुलात) करतात व त्याच्या सु. ४० जातीपैकी ३० (एच्. सांतापाव यांच्या मते २६) जाती भारतात आढळतात.

एकूण सर्व जातींचा प्रसार निसर्गतः इंडो-मलाया व सिनो-जपान या प्रदेशांत आहे. पो. बेंवालेन्सिस (पांगळा) ही जाती भारतात प. हिमालय, बंगाल, बिहार ते दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात, पानझडी जंगलात असून तिला उग्र व बराच वेळ टिकणारा वास येतो; पो. पेरिलॉइडिस, पो. हेनिअॅनस ही प. घाटात, द. कारवारातील विरळ जंगली भागात आणि अनेक ठिकाणी लागवडीतही आढळते; हिचे सुगंधी तेल विविध उपयोगाचे आहे. पो. कॅब्लिन या जातीपासून भारतात अल्प प्रमाणात सुंगंधी तेल काढतात व त्याकरिता लहान प्रमाणावर तिची लागवडही आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात केली जाते. हे तेल व्यापारी महत्त्वाचे आहे. ही वनस्पती मूळची फिलिपिन्समधील असावी असे मानतात.

भारतातील वर उल्लेखिलेलीपो. हेनिअॅनस (इ. पॅचौली) या जातीशी पो. कॅब्लिनचे बरेच साम्य आहे, तथापि पो. कॅब्लिनची पाने अधिक जाड व अधिक केसाळ असल्याने ती ओळखू येते. पो. पर्विफ्लोरस (फांगळा, पांगळी) या जातीशीही तिचे साम्य आहे.

पो. फॅब्लिन (पो. पॅचौली प्रकार स्वाविस) ही पाचेची जाती व्यापारी प्रमाणावर इंडोनेशिया व मलेशिया येथे लागवडीत असून लहान प्रमाणावर आशिया, आफ्रिका आणि द. अमेरिका इ. देशांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांतही तिची लागवड केली जाते. भारतातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागांत ती जंगली अवस्थेत आढळल्याची नोंद असून भारत व श्रीलंका ही तिची मूलस्थाने असावीत असे मानतात.

भारतात प्रायोगिक प्रमाणावर आणि यशस्वी रीत्या शेवरॉय टेकड्या (येर कौड), निलगिरी, अन्नमलई, कर्नाटक (बंगलोर), उ. प्रदेश (डेहराडून) इ. ठिकाणी तिची (विशेषतः मलेशियातील ‘जोहोर’ वाणाची) लागवड झाली असून द. भारत, उ. प्रदेश, म. प्रदेश, बंगाल व आसाम इ. सोयीस्कर हवामानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जावी, असे तज्ञांचे मत आढळते. ‘इंडोनेशीय’ आणि ‘सिंगापुरी’ वाण हे तेलाचे प्रमाण व पानांची संख्या ह्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे, तर जोहोर वाणाच्या तेलाची गुणवत्ता सरस असल्याचे सिद्ध झाले आहे.

ह्या जातीची झाडे (लहान व ओषधीय) बहुवर्षायू (अनेक वर्षे जागणारी), सु. १-१.२ सी. उंच असून त्यांवर सुगंधी, काहीशी खंडित, दातेरी, केसाळ, अंडाकृती, लांब देठाची, सु. ५-१०सेंमी.X३-९सेंमी. व समोरासमोर पाने असतात; शाखा अनेक असून त्यांच्या आणि प्रमुख खोडाच्या टोकास आणि पानांच्या बगलेत फुलोरे [ पुंज वल्लरी; ⟶ पुष्पबंध] येतात. फुले लहान व पांढरी असून त्यांवर जांभळट रेषां असतात; त्यांची संरचना व वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे ⇨फांगळा (पो. पर्विफ्लोरस) व लॅबिएटी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

लागवड व मशागत : सरासरी वर्षभर सारखे पर्जन्यमान असलेल्या उबदार व दमट हवामानात ह्याची वाढ चांगली होते; तसेच सुपीक, निचऱ्याची व नित्याप्रमाणे खतावलेली जमीन याला आवश्यक असते. लागवडीकरिता छाटकलमे (१०-१५ सेमी.) पर्थम वाफ्यांत तयार करून नंतर प्रत्यक्ष लागणीच्या ठिकाणी लावतात किंवा प्रत्यक्षच प्रथम तयार केलेल्या जमिनीत ९० x ९० सेंमी. अंतरावर पावसाळ्यात लागण करतात. दाबकलमेही करून लावतात.

प्रखर उन्हापासून संरक्षण करण्याकरिता प्रथम नारळाच्या पानाने ती झाकतात. तण काढणे, पाणी देणे व आवश्यक तर पुनरपि खत देणे या प्रक्रिया वाढ होताना चालू ठेवतात. साधारणपणे पाच-सहा महिन्यांत पीक तयार होते व त्याच वेळी पहिली खुडणी करतात; त्यांनंतर वर्षातून दोनदा किंवा तीनदा खुडणी करतात. एकदा लावलेले पीक दोन किंवा तीन वर्षांनी काढून टाकून नवीन लावतात. संकाळी लवकर किंवा संध्याकाळी झांडांचे पिंगट न झालेले, साधारण जून व कोवळे शेंड्याकडील २५-४५ सेंमी. लांब भाग खुडतात व त्यांचाच उपयोग तेल काढण्यास करतात. साधारणतः हेक्टरी सु. १,३४५-१,४०० किग्रॅ. सुकी पाने (सावलीत वाळविलेली) एका वर्षात मिळाल्यास पीक चांगले समजतात. सुकलेल्या मालाला वास चांगला येतो. रशियात दरवर्षी नवीन लागवड करून पीक घेतात आणि जमिनीवरील सर्वच भाग तैलौत्पादनाकरिता वापरतात

तेल ऊर्ध्वपातनाच्या पद्धतीने सुकविलेल्या व थोड्याफार मुरवलेल्या (वितंचित) पानांतून तेल काढतात; सुमात्रा व सिशल्स बेटांत अशोधित (स्थूल) प्रकारच्या ऊर्ध्वपातन-यंत्राचा उपयोग करतात. आधुनिक पद्धतीत स्वतंत्र बाष्पित्रातून (बॉययलरातून) घेतलेल्या वाफेच्या प्रत्यक्ष उपयोगाने तेल मिळवितात. हे बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल सुकलेल्या मालाच्या सु. ३.५% असून त्याला हिरवा रंग व उग्रपणा असतो; परंतु काही काळाने ते सौम्य व आल्हादकारक बनते. जोहोर पिकापासून दर हेक्टरी ६० किग्रॅ.

तेल व सिंगापुरी पिकापासून १४२ किंग्रॅ. तेल मिळते; परंतु सर्वसाधारणपणे हेक्टरी ६०-६४ किग्रॅ. तेल उत्तम परिस्थितीतील पिकापासून मिळणे शक्य असते. हवामान, वनस्पतीचा वाण, जमीन व पानांची स्थिती आणि उर्ध्वपातनाची पद्धती यांवर तेल व त्याचे प्रमाण अवलंबून असते. तेलाचा रंग पुढेपुढे पिवळट किंवा तपकिरी होत जातो व ते अधिक चिकट बनते. या तेलाचा वास ⇨चंदनाच्या तेलाशी तुलना करण्यासारखा असतो. वासाच्या दृष्टीने तेलातील ९७% भाग (संयुगे) निरुपयोगी असतो; तेलाची जीवरासायनिक संघटना फारशी स्पष्ट नाही. भारतात तयार होणारे तेल पुरेसे नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. ही आयात मलेशिया, इंडोनिशिया, सिंगापूर, फ्रान्स इ. देशांतून होते. १९६७-६८ सालात सु. २७,८९३ किग्रॅ. तेल (किंमत रु. १२,०६,५७३) आयात झाले. तेल काढण्यापूर्वी इतर काही पाचेच्या जाती, सब्जा, वनभेंडी इत्यादींच्या पानांची भेसळ करतात.

उपयोग

पाचेच्या सुगंधी तेलाचे महत्त्व फार मोठे आहे. चंदनाच्या तेलात मिसळून त्याचे उत्कृष्ट अत्तर बनवितात. इतर अत्तरे स्थिर करण्यास (त्यांना टिकाउपणा आणण्यास) व त्यांना वासाच्या भिन्न छटा देण्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. अनेक सुगंधी द्रव्ये, तेले, साबण, सौंदर्यप्रसाधने, धूप व तंबाखू यांना सुवासिक करण्यात पाचेचे तेल वापरतात.

लवंग तेल व वाळ्याच्या तेलात पाचेचे तेल मिसळून काही प्रकारच्या साबणांत वापरतात. पाचेच्या सुक्या फांद्या व पाने कपड्यांत सुगंधाकरिता व लोकरीच्या कपड्यांत कसरीपासून संरक्षणाकरिता ठेवतात. काही सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याचे सामर्थ्य पाचेच्या तेलात असते. फिलिपीन्समध्ये आर्तवदोषावर (स्त्रियांच्या मासिक पाळीतील दोषांवर) ताज्या पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला रस) देतात. जळवांना दूर ठेवण्यास पानांचा रस लावतात.

कीड व रोग

पाचेच्या मुळ्यांवर सूत्रकृमी (नेमॅटोड) उपजीविका करीत असल्याने पानांना म्लानता येते व त्यानंतर झाडे मरून जातात. शेल डी. डी. किंवा नेमॅजिन याचे जमिनीच अंतःक्षेपण केल्यास कीड मरते, परंतु हा उपाय महाग पडतो. खोडाच्या पेऱ्यांत टोके (कीटक) भोके पाडून उपद्रव देतात. त्यामुळे तेथे गाठी बनतात व वरचा भाग वाळून जातो; यावर फॉलिडॉल ई ६०५ फवारल्यास कीड आटोक्यात येते. लाल कोळी व नाकतोडे पाने खातात; १०% बीएचसी उडविल्यास नाकतोडे मरतात; अॅरोमाइट किंवा अकार ३३७ ने लाल केळ्यांची पीडा कमी होते.

पो. हेनिअॅनस (पाच, पाचपान, माली; हिं. पाचोली, पेहोली; इं. पॅचौली; लॅ पो. पॅचौली). आरंभी उल्लेख केलेल्या जातींपैकी ही तीव्र सुगंधी जाती मूळची इंडो-मलेशियातील असावी; तथापि भारतात द. द्वीपकल्पाच्या प्रदेशात सर्वत्र आढळते; काही ठिकाणी तिची लागवड केलेली असून सुवासिक पानांफुलांकरिता बागेतही लावलेली आढळते. सु. १,८०० मी. उंच प्रदेशापर्यंत तिचा आढळ आहे. ती सु. १ मी. उंच वाढते; पाने ६.५-११.५ सेंमी., अंडाकृती, दातेरी, काहीशी लवदार, समोरासमोर व पातळ असून फुलोरे बारीक मंजऱ्यासारखे [परिमंजरीय कणिशे; ⟶ पुष्पबंध] असतात; इतर सामान्य शारीरिक लक्षणे लॅबिएटी कुलात दिल्याप्रमाणे असतात. छाटकलामांनी त्याची अभिवृद्धी करतात.

सुकी पाने लोकरीच्या कपड्यांना कसर लागू नये म्हणून व सुवास यावा म्हणून त्यांत ठेवतात; हार व गजरे यांत पाने आणि फुले घालतात. ही वनस्पती मूत्रल (लघवी साफ करणारी) व वायुनाशी आहे.

मलेशियात पानांचे पोटीस डोकेदुखीवर आणि गळवांवर लावतात. खोकला व दमा यांवर पानांचा काढा देतात व जलसंचयावर मुळांचा काढा देतात. मुळांपासून बनविलेला धावनद्रव संधिवातावर वापरतात. गावठी दारूला स्वाद आणण्यास सुक्या फांद्यांचा उपयोग करतात.

पूर्वी जावात लहान प्रमाणात या जातीपासून काढलेल्या सुगंधी तेलाला ‘जावा पॅजोली’ किंवा ‘डिलेम तेल’ म्हणत; पण खऱ्या पाचेच्या तेलापेक्षा कमी प्रतीचे ठरल्याने हल्ली त्याचे उत्पादन बंद झाले आहे. ह्या तेलात पॅचौलीन, पॅचौली अल्कोहॉल व यूजेनॉल ही द्रव्ये मुख्यतः असतात. भारतात या तेलाचा उपयोग साबण व सुगंधी तेलांकरिता करतात.

 

संदर्भ : 1. Badhwar, R. L.; Rao, P.S; Sethi, H. Some Useful Aromatic Plants, Faridabad, 1964.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

लेखक: जमदाडे, ज. वि.;

परांडेकर, शं. आ.;

चौधरी, रा. मो.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate