অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गतीमंदांनी फुलविले नंदनवन

गतीमंदांनी फुलविले नंदनवन


अपंग, गतीमंद अनाथ बालकांच्या संगोपनासाठी सातत्याने धडपडणाऱ्या वझ्झर येथील शंकरबाबा पापडकर यांनी अपंग, गतीमंद बालकांच्या पुनर्वसनासोबतच विविध प्रजातीचे पंधरा हजार वृक्ष लावून जगविण्याचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. शंकरबाबांनी मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या बोडख्या टेकडीला केवळ हिरवेच केले नाही तर आंबा, बोर, फणस, चिकू, आवळा आदी फळझाडांपासून आर्थिक उत्पन्नही मिळू शकेल, अशा पद्धतीने गतिमंदांना आपले हिरवे विश्व निर्माण करून दिले आहे. गतिमंदांनी फुलविलेला हा प्रकल्प बहुधा देशातील पहिलाच उपक्रम असावा.
अपंग, गतीमंद आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापडकर यांनी ‘महात्मा गांधी विकलांग व पुनर्वसन केंद्र’ मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या वझ्झर या गावात सुरू केले. स्व. अंबादास पंत वैद्य विकलांग निराधार बालगृहाच्या माध्यमाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या या संस्थेने राज्यात निराधार बालकांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या बालगृहात 138 अपंग, गतीमंद बालक असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘वझ्झर मॉडेल’ देशात आदर्श ठरला आहे. बेवारस सापडलेल्या अपंग बालकांच्या संगोपनासाठी शासनाने तीन एकर (ई-क्लास) जमीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच संस्थेकडे असलेल्या जागेवर गतीमंद मुलांच्या साह्याने वृक्षारोपणाला सुरूवात केली. वृक्षारोपणासोबतच 80 गतीमंद मुले प्रत्येक वृक्षाचे संगोपन करतात. त्यामुळेच अत्यंत खडकाळ डोंगरावरही विविध प्रजातीचे वृक्ष डौलाने उभी आहेत.
परतवाड्यापासून मेळघाटकडे जाताना वझ्झर या गावापासून दोन कि.मी आत प्रवेश करताच महात्मा गांधी विकलांग पुनर्वसन केंद्राचा परिसर सुरू होतो. मुख्य प्रवेशद्वारापासूनच नीम, बांबू, सागवान, सालई आदी वृक्षांनी बहरलेल्या परिसरातून मुख्य इमारतीकडे जाणारा रस्ता सुरू होतो. या रस्त्यांना महात्मा गांधी मार्ग, भगवान गौतम मार्ग, आचार्य रजनीश मार्ग, तसेच भगवान महावीर, बाबा आमटे, आचार्य अत्रे, येशू ख्रिस्त आदी समाजाला आदर्श असणाऱ्या व्यक्तींची नावे देऊन या मार्गावर वैशिष्ट्यपूर्ण वृक्षारोपण करण्यात आले आहे. चार हेक्टर परिसरात 15 हजार विविध प्रजातींची वृक्ष जगविण्यासाठी शंकरबाबा पापडकर आपल्या 80 अनाथ गतीमंद मुलांसोबत सकाळी सहापासून सुरूवात करतात. वृक्ष संगोपनाच्या या प्रकल्पामुळे गतीमंद मुलांचा उत्साह वाखणण्यासारखा असतो. गतिमंदांनी केलेल्या देशातील या पहिल्या उपक्रमाबद्दल सांगताना शंकरबाबा पापडकर म्हणाले की, ‘‘या मुलांचा शारीरिक श्रमासाठी तसेच बौद्धिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतो केवळ बंदिस्त वातावरणात हा उपक्रम राबविण्यापेक्षा मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करताना व त्याचे संगोपन करताना मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासालाही चालना मिळत आहे.’’
गतीमंद असल्यामुळे समाजाकडून उपेक्षित राहिलेल्या या मुलांच्या संगोपनासाठी सातत्याने धडपडणाऱ्या शंकरबाबा पापडकर यांनी उजाड अशा टेकडीवर वर्ष 1992 पासून वृक्षारोपणाला सुरूवात केली. गतिमंदांच्या संगोपनासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य इमारतीचे सभोवताल वृक्षारोपण केल्यामुळे उन्हाळ्यातील त्रास कमी होईल या अपेक्षेनुसार सुरूवातीला निंब, सागवान, पळस आदी सावली देणारे झाडे लावली आहेत. वृक्षारोपणामध्ये मुलांचा सहभाग वाढत असल्यामुळे तसेच पाण्याची व्यवस्थाही होत असल्यामुळे संपूर्ण परिसरात वृक्षारोपण सुरू करण्यात आले आहे. वृक्षारोपण करताना औषधी वनस्पती तसेच रक्तचंदन व चंदनासारख्या दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण करण्याचा हेतू समोर ठेवून विशाल वृक्षसंपदा उभी झाली आहे. आज संस्थेच्या परिसरात पाच हजार कडुनिंब, एक हजार सागवान, सालई, मोह, रिठा, पळस आदींची प्रत्येकी पाचशे वृक्ष तसेच बिभा, कडई, रक्तचंदन, चंदन, बांबू, बोर आदींची वृक्ष मोठ्याप्रमाणात डौलाने उभी आहेत.
वृक्षारोपण या उपक्रमामध्ये पाच हजार वृक्ष फळझाडे असून यामध्ये चिकू, डाळिंब, आवळा, फणस, आंबा आदी लावण्यात आले असून या फळझाडांपासून मागील दोन वर्षांपासून उत्पन्नही सुरू झाले आहे. आवळा, निंबोळी, चिंच, बोर आदी फळांसाठी सातत्याने मागणी होत आहे. संस्थेच्या या उपक्रमासोबतच स्वावलंबन व स्वयंपूर्णता या तत्त्वानुसार इंधनासाठी लागणारे जळाऊ लाकूडसुद्धा येथेच निर्माण होत असल्यामुळे संस्थेच्या खर्चात मोठी बचत होत आहे.

गुरूत्वाकर्षणाचा प्रकल्प

वृक्षारोपण करताना या वृक्षांची संगोपनासाठी पाण्याची व्यवस्थाही अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली असून गतीमंद मुले प्रत्येक झाडाला पाणी मिळेल यासाठी नेहमीच सतर्क असतात. पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी व विंधन विहीर तयार करण्यात आली आहे. मुलांसाठी गरजेचे असलेले पाणी वापरल्यानंतर टेकडीवर तयार करण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडल्या जाते. 25 हजार लिटर क्षमतेच्या या टाक्यांमधून गुरूत्वाकर्षणाच्या साहाय्याने प्रत्येक झाड्याच्या मुळापर्यंत पाणी पोहचेल, अशा पद्धतीने व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जलसंवर्धनाचा उपक्रमही राबविण्यात आला आहे.
अपंग व गतिमंदांच्या पुनर्वसन केंद्रामार्फत 16 अपंगांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना रोजगार दिलाच त्यासोबतच सामाजिक बांधिलकी स्वीकारताना त्यांचे विवाह करून त्यांच्या जीवनाला आकार दिला आहे. पुनर्वसन केंद्रातील प्रत्येक बालकाला स्वत:चे नाव देऊन त्यांचे आधार कार्ड काढले. त्यामुळे ते विविध योजनांच्या लाभासाठीही पात्र ठरविले आहे. शंकरबाबा पापडकर म्हणतात, भगवान रजनीश यांच्यासोबत प्रदीर्घ सहवासात राहिलो त्यांनी ‘वृक्ष लावले तर देश वाचेल’ या संदेश दिला. त्याप्रमाणे अनाथ, अपंग व अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच वृक्षसंगोपनाचाही उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळेच या मुलांच्या जीवनामध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. याबद्दल शंकरबाबा म्हणतात, ‘जिंदगी खुबरे आलम, फरते गममें भी मुस्कुराती है.... बासुरी के सिने में जख्म है. फिर भी वो गीत गाती है...’ 

-अनिल गडेकर,
जिल्हा माहिती अधिकारी, मो. न. 98901 ५७७८८

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, १५ जून, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate