অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नदी परिसंस्था

नदी परिसंस्था

नदी परिसंस्था (River ecosystem)

गोड्या पाण्याची एक परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या पाण्याची परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे प्रवाही जल परिसंस्था व स्थिर जल परिसंस्था असे प्रकार आहेत. त्यांपैकी प्रवाही जल परिसंस्थेत झरा, ओढा, नदी या जल परिसंस्थांचा समावेश होतो. झरे व ओढे यांच्यापेक्षा नद्यांचे क्षेत्रफळ अधिक असते.

नदीच्या उगमापासून मुखापर्यंत तिचे पात्र, खोली, पाण्याचे प्रमाण व गुणधर्म आणि पाण्याचा वेग बदलत असतो. नदीच्या वरच्या टप्प्यात पाणी अतिशय वेगाने वाहत असते, तर सखल मैदानी प्रदेशात तिचे पाणी संथ गतीने वाहते. नद्या प्रवाही असल्याने ऊर्जाविनिमय अस्थिर असतो. ऊर्जाविनिमय अस्थिर असल्याने सजीवांच्या वाढीस प्रतिकूल स्थिती असते. परिणामी नद्यांमध्ये परिपूर्ण परिसंस्था विकसित होत नाहीत.

नदीच्या शीर्षप्रवाहातील पाणी थंड व स्वच्छ असते. त्यात ऑॅक्सिजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तेथे ट्राउटसारखे मासे व परपोषी सजीव आढळतात. वरच्या टप्प्यातील नदीच्या वेगवान प्रवाहामुळे तिच्या पात्राच्या तळभागाचे तीव्र क्षरण होते. त्यामुळे त्यावरील मृदू खडकाचे क्षरण जास्त होते तर कठीण खडक अवशिष्ट स्वरूपात राहतात. ऊर्जाविनिमय अस्थिर असल्याने कठीण खडकांच्या भागात परिसंस्था पूर्णत: साकार होत नाहीत. डबक्यांत सूक्ष्म वनस्पती व शैवालाची वाढ होते. त्याला अनुसरून तेथे मासे आणि काही जलचर व कीटक वाढतात.

नदीपात्रातील खडकांच्या फटींमध्ये व खडकांखाली गोगलगायी, शिंपले व त्यातील किडे, चपटकृमी, वलयीकृमी यांसारखे प्राणी राहतात. जर अशा नदीपात्रात धबधबा असेल तर जेथे पाणी कोसळते तेथे सतत क्षरण होत राहिल्याने पाणी साठून राहते. अशा खड्ड्यातील स्थिर पाण्यात सूक्ष्म वनस्पती, शैवाल व सूक्ष्मजीवांची वाढ होऊन त्यावर माशांची पैदास होते. कालांतराने तेथे स्थिरस्वरूपी परिसंस्था निर्माण होते.

मधल्या टप्प्यात नदीपात्राची रुंदी व पाण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे तेथे जैविक विविधता आढळते. विविध हरित वनस्पती व शैवालाची वाढ होऊन त्यावर आधारित जीवसृष्टी नदीपात्रात व खो-यात विकसित होते.

सखल मैदानी प्रदेशात नदी संथ वाहत असल्याने क्षरण कमी प्रमाणात होते. प्रवाहाबरोबर वरच्या टप्प्यापासून वाहत आलेल्या गाळाचे सूक्ष्म कण व सेंद्रिय पदार्थ पाण्यात मिसळलेले असतात. नदीच्या मंद प्रवाहामुळे त्यातील पाण्याचे तापमान अधिक असते. त्यामुळे मंद प्रवाहाच्या नदी परिसंस्थेत प्राथमिक उत्पादकता जास्त असते. परिणामी सूक्ष्म वनस्पती प्लवक, गवत, शैवाल इत्यादींची वाढ होते. त्यावर जगणारे मासे, साप, बेडूक, विविध कीटक, पक्षी आणि दलदलीच्या ठिकाणी गांडूळ, खेकडे, झिंगे, अमीबा इत्यादींची वाढ होते. नदीतील मासे हे मगरी व बगळे यांचे भक्ष्य असतात. या परिसंस्थेत जीवाणू व कवक या सूक्ष्मजीवांची अपघटनाची अन्नसाखळी विकसित झालेली असते.

नदीतील वाहत येणारे खतांचे अंश तसेच नदीत सोडली जाणारे वाहितमल, औद्योगिक व इतर द्रव अपशिष्टे यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण ही नदी परिसंस्थेसाठी मोठी समस्या आहे. प्रदूषणामुळे नदीतील सूक्ष्म वनस्पती व सूक्ष्मजीवांच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी त्यांच्यावर आधारित जलचर, इतर प्राणी नाहीसे होतात. अलीकडच्या काळात मानवी कृतींमुळे जगातील काही मोठ्या नद्यांच्या प्रवाहातील परिसंस्थेत बिघाड होत आहेत. उदा., गंगा, -हाईन, मिसिसिपी, डॅन्यूब, थेम्स व सेंट लॉरेन्स या नद्यांचे प्रदूषण होत असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्यातील परिसंस्था विसकळीत होत आहेत.

 

- चौधरी, वसंत

माहिती स्रोत- कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate