অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निसर्ग भ्रमण करताना घ्यावयाची काळजी

निसर्ग भ्रमण करताना घ्यावयाची काळजी

निसर्ग भ्रमण करताना घ्यावयाची काळजी

वन्यजीवांचे निरिक्षण करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

  • कोणत्याही वन्यजीवाला, मग तो कितीही छोटा किंवा कितीही मोहक असला तरी, धरण्याचा प्रयत्न करू नये. छोटे कीटकही विषारी असू शकतात. तर नाकतोड्यासारख्या काही कीटकांच्या पायाला काटे असतात ज्यांच्यामुळे आपणाला इजा पोहोचू शकते

  • साप-विंचू अशा जीवांपासून दूर तर रहावेच पण त्यांना काठीने अथवा दगडाने मारण्याचा प्रयत्न करू नये. या पृथ्वीतलावरचे तेही आपल्यासारखेच एक जीव आहेत. ते जाणून बुजून कुणावरही हल्ला करत नाहीत. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावे. ज्यावेळी एखाद्या सापाला आपण मारतो त्यावेळी त्याच्या शरीराचा गंध त्या ठिकाणी टिकून राहतो ज्याच्या मागावर दुसरा साप तेथे येऊ शकतो. तो डूख धरून नाही तर नर अथवा मादीच्या शोधात तेथे आलेला असतो. म्हणून, त्याला न मारता त्याच्या वाटेने जाऊन देणे हेच बरे.

  • निरीक्षणासाठी फिरताना पक्ष्यांची घरटी अथवा किड्या-मुंग्यांची वारुळे दिसू शकतात. त्याचे लांबूनच निरीक्षण करावे. त्यांना धक्का पोचवू नये. घरट्यात अंडी उबवण्यासाठी बसलेल्या पक्ष्याला जर त्रास झाला तर तो पक्षी घरटे सोडून जाऊ शकतो. आणि कदाचित तो परत कधीही आपल्या शाळेच्या आसपास दिसणार नाही.

  • रंगीबेरंगी फुलपाखरं पकडण्याचा मोह टाळावा. कोणत्याही वन्यजीवाला त्रास न देताच त्याचे निरीक्षण करावे.

  • निरीक्षणासाठी रात्री बाहेर पडू नये. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेतच निरीक्षणे करावीत.

  • शक्यतो निसर्गाशी एकरूप असे कपडे घालावेत- हिरवे, करडे, तपकिरी असे. शुभ्र आणि भडक रंगाच्या कपड्यामुळे वन्यजीव आपल्यापासून दूर पळतील आणि त्यांचे निरीक्षण आपणाला करता येणार नाही.

  • गर्द झाडीतून अथवा उंच गवतातून फिरताना बूट घातलेले असावेत जेणेकरून काहीही चावण्याचा धोका कमी होतो.

  • बऱ्याच झाडांच्या पानांच्या मागे फुलपाखरांची अंडी असतात. त्यामुळे फिरताना झाडाच्या फांद्या तोडणे, फुले तोडणे हे ही टाळावे. निसर्गातील घटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता निरीक्षणे करावयाची आहेत.

  • एखादी पाल किडा खाताना किंवा साप बेडूक खाताना दिसल्यास त्यांना उपद्रव करू नये. या नैसर्गिक घटना असल्याने त्यात मध्ये पडून किड्याला / बेडकाला वाचवणे सर्वथा चुकीचे आहे.

  • एकट्याने अथवा २-३ च्या गटात भ्रमण करावे. मोठ्या संख्येने गोंगाट करत फिरल्यास काहीच दृष्टीस पडणार नाही.

 

स्त्रोत :

शाळेची जैविविधता नोंदवही - मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

 

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate