অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परिसंस्था-सेवा म्हणजे नेमकं काय?

परिसंस्थेकडून, आणि पर्यायाने जैवविविधतेकडून, जे जे फायदे अनेक स्वरुपात आपणाला मिळत असतात त्यांना परिसंस्था-सेवा म्हणतात. या सेवा  मानवासहित सर्वच जीवांना वेगवेगळ्या प्रमाणात मिळत असतात. शेतीसाठी लागणारी कसदार माती, मुबलक पाणी, स्वच्छ हवा ह्या सर्व परिसंस्थेमुळे मिळणाऱ्या सेवा आहेत. अशा सेवा विनामूल्य आपणाला मिळत असतात त्यामुळे त्याची खरी किंमत आपल्या लक्षात येत नाही. खेड्यातील जीवनापासून ते मोठ्या शहरांमधील जीवनापर्यंत वापरल्या जाणाऱ्या कैक वस्तूंचे अस्तित्वच मुळी अशा सेवांद्वारे आहे. अशा परिसंस्था-सेवा मानवी अस्तित्वासाठी गरजेच्या आहेत, इतकंच नाही तर हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये तग धरण्यासाठीही आवश्यक आहेत.

परिसंस्था सेवांचे प्रकार

परिसंस्था-सेवा ज्या स्वरुपात मिळतात  त्यानुसार त्यांचे चार गट पाडले गेले आहेत.

पुरवठा सेवा

अशा सेवा किंवा फायदे जे परिसंस्थेकडून थेट स्वरुपात उपलब्ध होतात.

जसे – ताजे व स्वच्छ पाणी, सकस माती, जंगली भाज्यांसारखे वनोत्पाद, धान्याचे स्थानिक वाण इ.

 

नियमन सेवा

 

अशा सेवा ज्या पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.

जसे- मातीची धूप थांबवणे, तापमान व हवामान नियमित ठेवणे, पक्ष्यांद्वारे होणारे बीज-वहन, कीटकांमार्फत होणारे परागीकरण, तणांचा प्रसार रोखणे इ.

 

आधारभूत सेवा

 

अशा सेवा ज्या एकंदर परिसंस्थेला आणि जैवविविधतेला महत्वपूर्ण आधार देण्याचे कार्य करतात.

जसे – ऑक्सिजनची निर्मिती करणे, पाण्याचे चक्र सुरळीत चालू ठेवणे, परिसंस्थेत राहण्याऱ्या जीवांना (मानवासहित) राहण्यासाठी अधिवास पुरवणे, माती बनण्याची प्रक्रिया, पोषक द्रव्यांचे (कार्बन, नायट्रोजन, फॉस्फोरस इ.) चक्र अखंडपणे चालू असणे इ.

 

सांस्कृतिक सेवा

 

अशा सेवा ज्या परिसंस्थेकडून दृश्य स्वरुपात न मिळता अमूर्त स्वरुपात मिळत असतात.

जसे – धार्मिक आणि अध्यात्मिक शांती मिळणे, परिसंस्थेच्या सौंदर्याचा आनंद घेता येणे, पारंपारिक ज्ञान वाढीस लागणे, प्रेरणा मिळणे इ.

उदा. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये विस्तीर्ण आणि दाट जंगले आहेत. या जंगलांमध्ये ठिकठिकाणी छोट्या छोट्या वाड्या वसलेल्या आहेत. या वाड्यांमधील निवासी समुदायांच्या आयुष्याचा पाया धार्मिक आणि अध्यात्मिक स्वरूपाचा आहे. येथील बव्हंशी लोक वारकरी संप्रदायाचे आहेत ज्यांचे कितीतरी ओव्या-अभंग परिसंस्थेच्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले आहेत.

 

स्त्रोत : शाळेची जैविविधता नोंदवही - मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 4/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate