অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलपाखरं आम्ही ‘ब्ल्यु मॉरमॉन’

फुलपाखरं आम्ही ‘ब्ल्यु मॉरमॉन’


काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाची बैठक होती. माझ्यासाठी विषय एकदमच नवीन होता... पण इतर शासकीय बैठकीप्रमाणे ही ही एक बैठक, त्यात काय एवढं विशेष असं समजून बैठकीला गेले... बैठकीत विषयसुचीप्रमाणे चर्चा सुरु झाली आणि ही बैठक नेहमीपेक्षा किती वेगळी आणि छान आहे हे जाणवायला लागलं...
वन म्हटलं की आपण फक्त पर्यटनाचा विचार करतो... पण वनांच्या गरजा, वनांचे महत्व आणि वनात करावयाची विकास कामं या विविधांगानी या बैठकीतील विषयांकडे दृष्टीक्षेप टाकला तर वनांच्या विकासासाठी शासनस्तरावर किती खोलवर जाऊन विचार केला जातो, वनांसंबंधीचे निर्णय किती काळजीपूर्वक घेतले जातात हे लक्षात येतं...
अभयारण्यांमध्ये किंवा संवर्धन राखीव क्षेत्रात विकास काम करावयाची झाली तरी त्यासाठी द्यावयाची मान्यता किती विचारपूर्वक दिली जाते आणि ती वनांच्या विकासासाठी, हितासाठी किती महत्वाची असते हे दिसून येतं. काल ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, कर्नाळा अभयारण्याचा विस्तार, तोरणमाळ संवर्धन राखीव क्षेत्राची निर्मिती, अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्र निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. शिवाय बोर व्याघ्र प्रकल्प तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनही घोषित झाला.
बैठकीत एका मागून एक विषय येत होते... प्रत्येक विषयावर सखोल आणि साधक-बाधक चर्चा होत होती... कारण विषय राज्याच्या वन विकासाचा होता.. वन... माणसांच्या श्वासांशी जोडला गेलेला विषय.. त्यात एका नव्या आणि छान विषयाची भर पडली...
विषयाचे सादरीकरण होत असतांनाच स्क्रीनवर अचानक काळ्या-निळ्या रंगाचे फुलपाखरू अवतरले.. पडद्यावरच्या फुलपाखराला पाहून मन एकदम प्रसन्न झालं... लहानपणचे दिवस आठवले... झाडांवर बसणाऱ्या फुलपाखरांना पकडण्यासाठी केलेली धडपड आठवली... तेंव्हा फुलपाखरांच्या प्रजातींविषयी काही समजायचं नाही... काळी रानी... सोनेरी फुलपाखरू... असं रंगावरून आम्ही त्यांचं नामकरण केलेलं असायचं... आज पडद्यावर काळ्या निळ्या रंगाचं फुलपाखरू अवतरलं अन् मनात विचार आला ही काळी रानी इथं काय करतेय...
मी जिला काळी रानी समजत होते... प्रत्यक्षात ते ‘ब्ल्यु मॉरमॉन’ नावाचं फुलपाखरू होतं. ते राज्याचं मानचिन्ह म्हणून मान्यता मिळण्यासाठी इथं आलं होतं... महाराष्ट्रात यापूर्वीच राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य वृक्ष आंबा, राज्य फुल जारूळ महाराष्ट्राचं मानचिन्ह म्हणून घोषित झाले आहे.. त्यात राज्य फुलपाखराचा समावेश व्हावा म्हणून ‘ब्ल्यू मॉरमॉन’ ची शिफारस बैठकीत करण्यात आली होती, जी मान्य झाली...
आतापर्यंत देशातील कुठल्याही राज्यानं ‘राज्य फुलपाखरा’ची निवड मानचिन्ह म्हणून केली नाही... ‘ब्ल्यु मॉरमॉन’ या फुलपाखरानं महाराष्ट्राचं मानचिन्ह होण्याचा आणि ‘राज्य फुलपाखरू’ होण्याचा मान पटकवला आणि असं राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं..
खरं तर फुलपाखरू... सगळ्यांच्याच आवडीचा आणि पसंतीचा कीटक... आपल्या चमकदार रंगांनी, पारदर्शक आणि मुलायम पंखांनी फुलपाखरं मनावर भूरळ टाकतात. जैवविविधतेतील हा एक महत्वाचा घटक... समृद्ध वन संपदेचा वारसा सांगणारं हे आणखी एक उदाहरण...
‘ब्ल्यू मॉरमॉन’ ला राज्य फुलपाखरू होण्याचा मान मिळाला.. सगळ्या निसर्ग प्रेमींसाठी ही आनंदाचीच गोष्ट होती... महाराष्ट्राच्या या नव्या मानचिन्हाबरोबर फुलपाखरांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मी वन विभागात गेले आणि फुलपाखरांच्या बाबतीत संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा देखणा वारसा नजरेसमोर आला...
देशात फुलपाखरांच्या जवळपास १५०० प्रजाती सापडतात तर महाराष्ट्रात ही संख्या २२५ च्या आसपास आहे. देशातील १५ टक्के फुलपाखरं महाराष्ट्रात आढळतात.. मुंबई ही तर फुलपाखरांसाठी आघाडीवर असलेली नगरी आहे... मुंबईत देशातील एकूण फुलपाखरांपैकी १० टक्के फुलपाखरं आढळतात तर मुंबईत फुलपाखरांच्या जवळपास १७० प्रजाती आहेत.
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात आले आहे. संपूर्ण युकेत (युनायटेड किंगडम) मध्ये फुलपाखरांच्या फक्त ६४ प्रजाती आढळतात.. आणि एकट्या मुंबईत १७० फुलपाखरांच्या प्रजाती आहेत... मुंबई ही तशीही सगळ्यांसाठी आकर्षणाची जागा... फुलपाखरांसाठीही... हे यावरून दिसून आलं...
ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठं असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू आहे. मखमली काळ्या रंगाच्या या फुलपाखराच्या पंखांवर निळ्या रंगाचे चमकदार ठिपके असतात. विशेष म्हणजे हे फुलपाखरू श्रीलंका आणि महाराष्ट्र (पश्चिम घाट), दक्षिण भारत आणि पुर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे अस्तित्त्व आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणे ठाण्यात घोडबंदर रोडवरही एक फुलपाखरू उद्यान आहे... फुलपाखरू मनानं फुलपाखरांविषयी जाणून घ्यायचं असेल तर एकदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाला आवर्जून भेट द्यायला हवी... कदाचित तिथं ‘फुलपाखरं... आम्ही मॉरमॉन’.... असं म्हणत राज्याचं नवीन मानचिन्ह आपल्या समोरून उडत जाईल आणि आपलं लक्ष वेधून घेईल...

 

-डॉ. सुरेखा म. मुळे वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती स्रोत: महान्यूज, मंगळवार, २३ जून, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate