অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतातील संकटग्रस्त पक्षी - जेर्डनचा धाविक

भारतातील संकटग्रस्त पक्षी - जेर्डनचा धाविक

Jerdon’s Courser (Rhinoptilus bitorquatus)

या पक्ष्याचा नमुना थॅामस सी जेर्डन या ब्रिटीश पक्षी शास्त्रज्ञाने गोदावरी आणि पेन्नार नदीच्या खोर्यातून १८४८ मध्ये जमा केला. या पक्षीशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ या पक्ष्याला जेर्डनस कोर्सर असे म्हंटले जाते. जेर्डन च्या मते हा पक्षी आंध्रप्रदेश मधील नेल्लोर, कडप्पा, भद्राचलम, अनंतपुर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसत असे आणि या जिल्ह्यांच्या मर्यादित भागात दिसत असल्याने तो प्रदेशनिष्ठ असावा असा त्याचा विचार होता. कालांतराने त्याचा विचार बरोबर आहे असे दिसून आले. १८७१ सालापर्यंत याच्या खात्रीलायक नोंदी मिळाल्या त्यानंतर मात्र तो कोणालाही दिसला नाही त्यामुळे १९०० साली याला नामशेष असे समजण्यात आले. या पक्ष्याला जगातील अति संकटग्रस्त पक्षी प्रजातीपैकी एक समजले जाते. भारतीय टपाल खात्याने १९९८ साली या पक्ष्याच्या सन्मानार्थ एक तिकीट प्रकाशित केले आहे.

फोटो सौजन्य : सायमन कूक

धाविक पक्षी वर्णन

धाविक पक्षी हे फक्त आशिया आणि आफ्रिका खंडात सापडतात. जगात धाविक पक्षी आणि त्याच्या भाईबंदांच्या सुमारे १७ जाती सापडतात. हे सर्व पक्षी ग्लरिओलिडी कुटुंबातील असून भारतात यांच्या ६ जाती सापडतात. त्यांची विभागणी धाविक (Courser) आणि पाणभिंगरी (Pratincole) अशा दोन गटात केली गेली आहे. धाविक पक्षी मध्यम आकाराचे, उंच पायांचे, कीटकभक्षी आहेत आणि माळरानावर राहतात; तर पाणभिंगऱ्या छोट्या पायांच्या, कीटकभक्षी आहेत आणि पाण्याजवळ राहतात. धाविक पक्ष्यांना त्यांचे हे मजेशीर नाव त्यांच्या धावण्याच्या सवयीमुळे मिळाले असावे. जवळ धोका दिसल्यास हा पक्षी उडून जाण्यापेक्षा धावणेच जास्त पसंत करतो. पण गरज पडल्यास हा अतिशय चांगले उड्डाण हि करू शकतो.

जेर्डनचा धाविक इतर दोन धाविक पक्ष्यांपेक्षा सवयीच्या आणि राहणीमानाच्या बाबतीत थोडा वेगळा आहे. तो इतारांप्रमाणे दिवसा फिरणारा नसून रात्री भटकतो. बाकीचे धाविक पक्षी ओसाड माळरानात राहतात तर हा झुडपी जंगले पसंत करतो. याचे साधर्म्य भारतातील धाविक पक्ष्यांपेक्षा आफ्रिकेत सापडणाऱ्या धाविक पक्ष्यांशी जास्त वाटते. याचा एक अर्थ असा होतो कि हा पक्षी अतिप्राचीन असावा. जेंव्हा भारत आफ्रिकेशी जोडलेला होता त्यावेळी यांची एकाच जात असावी पण जेंव्हा भारतीय उपखंड आफ्रिकेशी वेगळा झाला तेंव्हा ह्या नव्या जातीचा उदय झाला असावा. पण याचा भक्कम पुरावा आपल्याकडे अस्तित्वात नाही.

असा हा वेगळा पक्षी आंध्र प्रदेशातील, कडप्पा जिल्ह्यातील रेड्डीपल्ली या गावात १९८६ साली पुनश्चः सापडला.  या पक्ष्यावर त्यानंतर Bombay Natural History Society या संस्थेने काही वर्ष अभ्यास करून माहिती मिळवली. या माहितीत असे दिसून आले कि हा पक्षी फक्त आंध्रप्रदेशातील झुडपी जंगलातच सापडतो. त्यामुळे हा प्रदेशनिष्ठ असावा हा समाज खरा ठरला. हा ज्या प्रकारच्या परिसरात वावरतो तिथे विरळ झुडपे व झाडोरा  असतो; ज्यामध्ये अंजन, करवंद आणि बोराची झुडपे आणि खुरटे गवत उगवते. याचे मुख्य अन्न हे वाळवी आणि इतर छोटे किडे आहेत. याच्या अभ्यासात असेही दिसून आले आहे कि जिथे वाळवीची वारुळे जास्त प्रमाणात आहेत तिथेच हा पक्षी जास्त दिसून येतो. या पक्ष्याच्या विणीच्या हंगामा बाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. याचे एक अंडे अर्नेस्ट मिटन नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने १९१७ मध्ये आंध्रप्रदेशातून जमा केले होते. तसेच

जेर्डनचा धाविक पूर्वी दोन राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये सापडायचा तो आता फक्त कडप्पा जिल्ह्यातील श्री लंकमल्लेश्वर अभयारण्य आणि नेल्लोर येथील श्री पेनूनसुला नरसिंहास्वामी अभयारण्य, पलकोंडा आणि वेलकोंडा डोंगररांगामध्ये अस्तीतावासाठी झगडत आहे. असे समजले जाते कि आता यांची संख्या ५० पेक्षा कमी राहिली आहे. याचे मुख्य कारण आहे ते झुडपी जंगलाचा ऱ्हास. मोसंबीच्या बागांसाठी आणि शेतीसाठी झुडपी जंगले मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत. अनिर्बंध गुरेचराई, वणवे आणि इतर विकासकामे यामुळे या दुर्मिळ पक्ष्याचा अधिवास संपत चालला आहे. जिथे २००४ साली शेवटचा कोर्सर पहिला गेला तिथे आता तेलगु-गंगा कॅनाल बनवण्यात आला आहे. हा कालवा या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला पण धाविक पक्ष्यासाठी मात्र तो एक शाप ठरला आहे. त्यामुळे आपणास ज्ञात असलेल्या काही जागांपैकी अगदी मोक्याची जागा नष्ट झाली आहे. इथले पक्षी आता दुसरीकडे गेले असावेत किंवा नष्ट झाले असावेत. या पक्ष्याचे मुख्य कार्य हे झुडपी जंगलांचे वाळवी पासून संरक्षण करणे असावे. हा धाविक जर नष्ट झाला तर वाळवीच्या प्रकोपाने या परीसरातील नैसर्गिक संतुलन बिघडून जाऊ शकते आणि ते जर बिघडले तर त्याचा फटका आजूबाजूच्या शेतांवर व शेतकऱ्यांवर निश्चितच होईल.

हे सर्व पाहता माणसाच्या विकासापुढे धाविक पक्ष्याची धाव मात्र कमी पडली असेच म्हणावे लागेल.

 

लेखक: डॉ. गिरीश जठार

सौजन्य: हा लेख २३ मार्च २०१४ रोजी दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate