অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्मृती गोपीनाथ मुंडेंची … जागृती शाश्वत पर्यावरणाची !

स्मृती गोपीनाथ मुंडेंची … जागृती शाश्वत पर्यावरणाची !

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 3 जून ते 9 जून या कालावधीत या दिनाचे औचित्य साधून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा केला जातोय. शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड व संवर्धन सप्ताहाचे काम सुरु आहे. राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. वृक्ष व फळबाग लागवड व त्याचे संगोपन व संरक्षण या कार्यक्रमावर भर देण्यात आलेला आहे. आज पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याविषयीची माहिती.... दरवर्षी 5 जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून इ. स. 1960 मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.
मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे. आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करत आहोत : पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.

पर्यावरण विज्ञान

यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक-अजैविक घटकांमधील आंतरक्रियांचा अभ्यास आपण करत आहोत. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती-मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा ऊहापोह आपण या अभ्यासात करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांतासोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या 'मॅन अँड नेचर' या पुस्तकात (1907) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. 1899 मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी 'द आऊटलूक टॉक' या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य 'पर्यावरण शिक्षण सुधारणा' असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी 1965 मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर 1970 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून 1972 मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑंक्टोंबर 1975 मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.

पर्यावरण शिक्षण

यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेयस्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची उर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे हे पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येय ठरविण्यात आले.

पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप

बिलिसी (Tbilisi) येथे भरलेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली.
1) पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.
2) पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.
3) अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.
4) पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणविषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.
5) वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.
6) पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.
7) प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.
आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (18 डिसेंबर 2003) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठ्यक्रम ठरविण्यात आले आहेत.

पर्यावरण सप्ताह

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्र सरकारमध्ये ग्राम विकासमंत्री या नात्याने व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने देशासाठी व राज्यासाठी प्रभावी कामगिरी केलेली आहे. त्यांचे हे योगदान विचारात घेता त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक 3 जून ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह घोषित करण्यात आला आहे. या पर्यावरण सप्ताहामध्ये संपुर्ण राज्य व जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आला आहे त्याची सुरुवात राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ठाणेपाडा या आदिवासी बहुल गावात वृक्षलागवडीने केली आहे. या पर्यावरण सप्ताहामध्ये जलयुक्त शिवार अभियानातील निवडण्यात आलेल्या गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा प्राथमिक व माध्यमिक शाळेची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, समाजमंदीर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन शासकीय, निमशासकीय कार्यालये व रस्ता दुतर्फा इत्यादी ठिकाणी प्राधान्याने घेण्यात येणार आहे. यात सक्रिय लोकसहभाग घेण्यात येणार असून वृक्ष लागवड करावयाच्या कार्यक्रमाचे गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. -रणजितसिंह राजपूत जिल्हा माहिती अधिकारी,  जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार

 

माहिती स्रोत: महान्युज, गुरुवार, ०४ जून, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate