অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अथेन्स

भौगोलिक माहिती

ग्रीसची राजधानी. ‘अथेन्स’ हे नाव अथीना ह्या देवतेवरून मिळाले. अथीना ही विद्येची अधिष्ठात्री तशी अथेन्सची क्षेत्रदेवताही आहे. हे शहर अटिका प्रांताच्या दक्षिण भागात पठारावर वसले आहे. त्याच्या आसपासचा भाग डोंगराळ असून शहराच्या मध्यावर अक्रॉपलिस, उत्तरेस दूरवर पार्नेसस, ईशान्येस लायकाबेटस, पूर्वेस हाइमेटस व पश्चिमेस इगॅलॉस ह्या टेकड्या आहेत. अक्रॉपलिसच्या पश्चिमेस आणि नैऋत्येस एरिओपेगस, निक्स, म्युझियमहिल इ. टेकड्या येतात. ईशान्येस बऱ्याच अंतरावर पेंटेलिकॉन पर्वत येतो. येथील खाणींतून काढलेल्या संगमरवरी पाषाणांनीच अथेन्समधील बहुतेक इमारतींची बांधणी करण्यात आली आहे. पूर्वेकडील इलिसस व पश्चिमेला सीफिसस या नद्या वाहतात. दक्षिणेस फालिरॉन व पायरीअस ही बंदरे आहेत.

पाणी पुरवठा

अथेन्स शहराचे हवामान समशीतोष्ण असून हा प्रदेश हिवाळी पावसाच्या पट्ट्यात येतो. त्यामुळे पाऊस कमी व तोही अनियमित असतो. शहराला बाहेरून पाणीपुरवठा करावा लागतो. इ.स.पू. सहाव्या शतकात पायसिस्ट्राटस याने पूर्वेकडील टेकड्यांतून अथेन्सला पाणीपुरवठ्याची सोय केली होती. दुसऱ्या शतकात हेड्रिएनस, अँटोनायनस पायस यांनी लायकाबेटस टेकडीवरून भूमिगत नळांनी पाणी आणले. त्यांपैकी काही नळांचा आजही वापर करण्यात येतो. आता याच बाजूला ‘मॅराथॉन’ नावाचा प्रचंड तलाव बांधण्यात आलेला असून त्यातून सर्व शहराला पाणीपुरवठा होतो.

लोकसंख्या

अथेन्स शहराची लोकसंख्या १८३४ साली फक्त ५,००० होती. पुढे ती झपाट्याने वाढू लागली आणि १९४० साली ११,००,००० च्या वर गेली. त्यात आशिया-मायनरमधून आलेल्या निर्वासितांचा भरणा बराच होता. सर्व उपनगरांसह अथेन्सची लोकसंख्या १९६१ साली १८,५२,७०९ होती.

इतिहास

अक्रॉपलिसच्या टेकडीवर नवाश्मयुगीन वस्तीचे अवशेष मिळाले आहेत. निक्स टेकडीवर काही थडगी व वस्तीची स्थानेही आहेत; पण त्यांचा काळ निश्चित सांगता येत नाही. विविध अवस्थांतून गेलेल्या अथेन्सच्या पुरातन वैभवाचे स्वरूप उत्खननद्वारा जाणून घेण्याचा प्रयत्न पुरातत्त्वज्ञ करीत आहेत. मात्र काही किरकोळ अपवाद सोडले, तर इराणी हल्ल्यापूर्वीचे कोणतेही उल्लेखनीय अवशेष अथेन्समध्ये मिळत नाहीत. प्राचीन मायसीनी संस्कृतीचे फारच थोडे अवशेष खुद्द अथेन्समध्ये मिळाले आहेत. इ.स.पू. सतराव्या शतकात ग्रीस हे मायसीनी संस्कृतीचे मोठे केंद्र होते, तथापि अथेन्सच्या उत्खननांत त्याचा पुरावा मिळत नाही. इ.स.पू. आठव्या शतकात ॲटिकाच्या दक्षिण भागातील अनेक लहान खेडी एकत्र येऊन अथेन्स अस्तित्वात आले. प्रारंभी येथे राजसत्ता होती. राजास सल्ला देणारे वडीलधाऱ्या नागरिकांचे एक मंडळही असे. कालांतराने सरंजामदारवर्गाचे वर्चस्व वाढत जाऊन इ.स.पू. सातव्या शतकाच्या मध्याला राजाच्या वार्षिक निवडणुकीची पद्धत पडली. इ.स.पू. ६३२ ते ५१० ह्या काळात ड्रॅको, सोलोन, पायसिस्ट्राटस आदी अनेक कर्तबगार सत्ताधारी येथे होऊन गेले. त्यांतील बहुतेकांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपला कायमचा ठसा उमटविला. विशेषतः ड्रॅकोची (इ.स.पू. ६२१) विधिसंहिता व सोलोनचे (इ.स.पू. ५९४) संविधान ह्या ग्रीक समाजाच्या घडणीत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. ह्यानंतरचा एक शतकाचा काळ सैनिकी बळावर सत्ता गाजविणाऱ्या हुकूमशहांचा होता. त्यानंतर इ.स.पू. सु. ५८०–५१० ह्या काळात सर्वसत्ताधीश असणाऱ्या पण लोकशाही मार्गांनी ती सत्ता काबीज करणाऱ्या व टिकविणाऱ्या राज्यकर्त्या व्यक्ती अथेन्समध्ये होऊन गेल्या. हा काळ अथेन्स आणि ग्रीस येथील गणतंत्रपद्धतीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणावा लागेल. क्लीस्थीनीझ (५०८–५०७ इ.स.पू.) याने अथेनियन समाजाची राजकीय पुनर्घटना केली. त्यामुळे पूर्वी फक्त मोठ्या धनिकांपुरताच मर्यादित असलेला मतदानाचा हक्क अधिक व्यापक करण्यात आला. मतदारसंघाची फेररचना झाली. सध्याच्या लोकशाहीच्या कल्पनेशी जास्तीत जास्त जवळ येणारी, असे क्लीस्थीनीझच्या संविधानाचे वर्णन करता येईल. इ.स.पू. ४९३ मध्ये ग्रीस आणि इराण ह्यांमध्ये युद्ध उद्भवले. ग्रीकांचे नेतृत्व अथेन्सकडेच होते. इराणी सैन्याचा रोखही अथेन्सवरच होता. इ.स.पू. ४८० च्या सुमारास इराणी सैन्याने अथेन्सचा विध्वंस केला, तेव्हा अक्रॉपलिसजवळची प्रत्येक महत्त्वाची इमारत धुळीला मिळाली. परंतु अथेन्सचे नाविक बळ आणि थीमिस्टोक्लीझसारख्या नेत्यांचे कर्तृत्व यांमुळे पुढे फक्त वीस वर्षांतच अथेन्सची सत्ता एवढी वाढली, की त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. ग्रीक नगरांच्या डेलियन राज्यसंघाचे नेतृत्व अथेन्सकडे आले इ.स.पू. ४६१ ते ४२९ या कालखंडात येथील सत्ता ⇨पेरिक्लीझच्या हातात होती. पेरिक्लीझने व्यापार वाढवून अथेन्स शहराची पुनर्रचना केली आणि पायरीअस हे नवीन बंदर बांधले. या काळात अथेन्सने कला, संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आदी क्षेत्रांत झपाट्याने प्रगती केली. म्हणून या कालखंडाला ‘अथेन्सचे सुवर्णयुग’ म्हणतात. तथापि ग्रीक नगरराज्यांतील यादवीमध्ये या सर्व वैभवाचा लवकरच अस्त झाला (इ.स.पू. ४२४–३५७). पुढे मॅसेडॉनियम राजवटीत (इ.स.पू. ३५७–२२९) अथेन्सचे स्वातंत्र्य जवळजवळ नष्टच झाले होते. तथापि रोमन अंमलात (२२९–८७ इ.स.पू.) ही स्थिती सुधारली. हेड्रिएनस, अँटोनायनस आदींच्या अमदानीत (इ.स.पू. ८७ –इ.स. २००) अथेन्सचे पुनरुज्जीवन झाले. अथेन्स ज्ञानपीठ बनले. प्राचीन कला व विद्या यांची जोपासना रोमन सम्राटांच्या आश्रयाने व उत्तेजनाने होत राहिली. परंतु पुढे बायझंटिन साम्राज्याखाली (५२९–१२०४) काहीच उरले नाही. नंतर लॅटिन साम्राज्याच्या काळातही (१२०४–१४५८) ही स्थिती फारशी सुधारली नाही आणि तुर्की अंमलात (१४५८–१८३१) तर अथेन्स एक दरिद्री खेडेगाव बनले. ग्रीसला स्वातंत्र्य मिळाल्यावर (१८३०) आटो राजाने अथेन्स हे आपल्या राजधानीचे ठिकाण केले आणि त्यास गतवैभवाची पुन्हा प्राप्ती झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत अथेन्सची खूप हानी झाली. ती भरून काढून अथेन्स पुन्हा उभे राहिले आहे.

अथेन्सचे बाह्यरूप आज त्रिविध दिसते : त्यात प्राचीन वैभवाची साक्ष देणारे अवशेष, आधुनिक स्वरूपाच्या वास्तू आणि प्राचीन वास्तुशैलीचा साज ल्यालेल्या अभिनव इमारती यांचा समावेश होतो. राजधानीचे ठिकाण असल्यामुळे येथे अनेक सरकारी संस्था आणि बँका, विविध कंपन्या आदींची मध्यवर्ती कार्यालये आहेत. जलमार्ग, हवाईमार्ग, लोहमार्ग इत्यादींनी हे परदेशांशी जोडण्यात आलेले आहे. व्यापारासाठीही अथेन्स प्राचीन काळापासून आजतागायत प्रसिद्ध आहे. कातडी कमविण्याचे कारखाने, रासायनिक आणि जहाज-बांधणीचे उद्योग येथे आहेत. राष्ट्राच्या एकूण उद्योगधंद्यापैकी ६० टक्के उद्योगधंदे येथे चालतात. अथेन्स येथे २ विद्यापीठे, अनेक महाविद्यालये, शाळा व इतर शैक्षणिक संस्था आहेत. येथील राष्ट्रीय ग्रंथालय हस्तलिखित संग्रहासाठी प्रसिद्ध असून त्यात सु. २,५०० हस्तलिखिते आहेत. आधुनिक काळातील पहिल्या ऑलिंपिक क्रीडासामन्यांसाठी येथील प्राचीन क्रीडागृहच वापरण्यात आले. येथून १८ वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. इंग्रजी व फ्रेंच भाषांतूनही प्रत्येकी दोन वृत्तपत्रे निघतात.

गेल्या शंभर वर्षांत अथेन्समधील अनेक पुरातन वास्तूंची पुनर्रचना करण्यात आली. त्यांत पार्थनान, इरेक्थीयम ही व नायक देवतेचे मंदिर, ओडीऑन हे प्रेक्षागृह, डायोनिसचे श्रोतृगृह, ऑलिंपियन मंदिर, हेफेस्टोजचे मंदिर इत्यादींचा अंतर्भाव होतो. अथेन्स व पायरीअस यांच्या भोवतीच्या लाँग वॉल्स या तटबंदीचे अवशेषही जतन करण्यात आले आहेत.

ग्रीसची राजधानी अथेन्सग्रीसची राजधानी अथेन्स

संदर्भ : 1. Campbell, John; Sherrard, Philip, Modern Greece, London, 1968.

2. Procopiou, Angelo, Athens, London, 1964.

लेखक : म. श्री. माटे

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate