অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उज्‍जैन (उज्‍जयिनी)

उज्‍जैन (उज्‍जयिनी)

मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक शहर. लोकसंख्या २,०८,५६१ (१९७१). हे इंदूरपासून ५६ किमी. उत्तरेस क्षिप्रा नदीच्या पूर्व तीरावर बसले आहे. भोपाळ–नागदा आणि रतलाम–कोटा या लोहमार्गावरील हे प्रस्थानक असून भोपाळच्या पश्चिमेस १८२ किमी. वर आहे. धान्य, कापूस, कापड, अफू यांची ही बाजारपेठ. येथे कापडाच्या गिरण्या असून हातमाग, होजिअरी, तेल, बर्फ, रंगकाम, मिठाई इत्यादींचे कारखाने आहेत. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून इ. स. सहाव्या शतकापर्यंत ही नगरी अत्यंत भरभराटलेली होती. सम्राट अशोक प्रथम येथे काही दिवस राज्यपाल होता. विक्रम संवत सुरू करणाऱ्या विक्रमादित्याची ही राजधानी असावी. त्याच्या पदरी असलेल्या कालिदास आदी नवरत्‍नांनी उज्‍जैनची ख्याती सर्वत्र पसरवली. ब्राह्मण, बौद्ध व जैन ह्यांचे हे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र होते; त्यांच्या प्राचीन वाङ्‌‌मयात हिचा वारंवार उल्लेख आढळतो. संस्कृत नाट्य, काव्य इत्यादींचा येथेच उत्कर्ष झाला.स्वप्नवासवदत्ता  या नाटकाचे संविधानक येथेच घडले. भारतातील मध्यवर्ती आणि मोक्याची जागा म्हणून भारतीय भूगोलवेत्त्यांनी येथूनच रेखांश मोजण्याची प्रथा सुरू केली. टॉलेमी व इतर ग्रीक लेखक तसेच ह्युएनत्संग व इतर प्रवासी उज्‍जैनचा वैभवशाली नगरी म्हणून उल्लेख करतात. नवव्या-दहाव्या शतकांत ही परमारांची राजधानी होती, भोज राजाने ती धारला नेली. १२३५ मध्ये अल्तमशने या शहराचा नाश केला. तेव्हापासून १७३२ पर्यंत ती मुसलमानांच्या ताब्यात होती. त्यानंतर ती मराठ्यांकडे आली. १८१० पर्यंत ती शिंद्यांची राजधानी होती.

आर्यावर्तातील पवित्र सप्तपुरींपैकी ही एक असून अवंती या नावाने प्रसिद्ध होती. श्रीकृष्ण व बलराम यांचे गुरू सांदीपनी यांचा आश्रम येथेच होता. देवदानवांच्या समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकलशातील काही थेंब उज्‍जैन, हरिद्वार, प्रयाग व नासिक येथे पडले असे पुराणांतरी वर्णन आहे; म्हणून या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. शिवाय बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्रीमहाकालेश्वराचे हे ठिकाण आहे. क्षिप्रा नदीवर अनेक उत्तम घाट व मंदिरे बांधलेली असून भाविकांची येथे नित्य गर्दी असते.

येथे १९५७ मध्ये विक्रम विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. १७३३ मध्ये राजा जयसिंहाने येथे बांधलेली वेधशाळा (जंतर मंतर), कालियादे राजवाडा आणि उज्‍जैनच्या परिसरात झालेल्या उत्खननांत निघालेले ऐतिहासिक अवशेष ही प्रवाशांची आकर्षणे आहेत.

भारतीय पुराणवस्तुसंशोधन खात्याने १९५५ ते ५८ या काळात येथे विस्तृत उत्खनने केली. यांतून इ. स. पू. सातवे शतक ते मुसलमान-काळापर्यंत लोकवस्तीचा पुरावा उपलब्ध झाला. सर्वप्रथम काळात वस्तीभोवती, पायाशी ७४ मी. रुंद असलेला व ७·३७ मी. उंचीचा प्राकार व त्याच्याबाहेर ४६·३२ मी. रुंदीचा खंदक आढळला. प्राकार नदीच्या बाजूने लाकडी तुळ्या टाकून पक्का केलेला होता. नगरीतील घरे मातीच्या बांधणीची होती. लोखंडी हत्यारे, मणी, चाकावर बनवलेली विविध मृत्पात्रे व कच्चे लोखंड मोठ्या प्रमाणावर सापडले. नंतरच्या इ. स. पू. ५०० ते २०० या काळात खंदक विटांनी बांधून मजबूत करण्यात आला;रस्ते चिखल व दगडगोट्यांचे बनवले गेले. या काळातील जीवन समृद्ध होते, हे येथील उत्कृष्ट मातीची घरे, अलंकार, मणी बनविण्याची भट्टी, लोहाराची भट्टी, विहिरी व पुष्करिणी इत्यादींच्या अवशेषांवरून दिसते. तिसऱ्या कालखंडात (इ. स. पू. २०० ते इ. स. आठवे-नववे शतक) भरभराट कायम राहिली. हरतर्‍हेचे अलंकार, खेळणी, वस्तू या काळात प्रचलित होत्या. मुसलमानी अमदानीत उज्‍जयिनीस अवकळा आली.

संदर्भ: Archaeological Survey of India, Indian Archaeology – A Review, New Delhi, 1955–58.

लेखक : र. रू शाह. ; शां. भा. देव

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate