অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोनारक

प्रस्तावना

ओरिसा राज्यातील सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले स्थळ. भुवनेश्वरच्या आग्नेयीस सु. ६६ किमी.वर व जगन्नाथपुरीच्या ईशान्येला सु. ३२ किमी.वर ते वसले आहे. ओरिसामधील चार प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये याची गणना होते. प्राचीन साहित्यात व कोरीव लेखांत कोनाकोण, कोन-अर्क, कोणादित्य, अर्कक्षेत्र, पद्मक्षेत्र अशा विविध नावांनी कोनारकचे उल्लेख आढळतात. कोणार्क हे त्याचे संस्कृत मूळ नाव व कोनारक हे प्राकृत रूप होय. मुसलमानी साहित्यात त्यास ‘कृष्णदेऊळ’ म्हटले गेले, तर पुरी येथील ‘श्वेत पॅगोडा’हून वेगळे लेखण्यासाठी त्यास ‘कृष्ण पॅगोडा’ (ब्लॅक पॅगोडा) हे नाव पडले.

कोनारक विषयी प्रचलित दंतकथा

कोनारकविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. सूर्योपासनेने कुष्ठरोग बरा होतो, अशी कल्पना पौराणिक साहित्यात सर्वत्र आढळते. कपिलसंहिता, ब्रह्मपुराण, भविष्यपुराण, सांबपुराण, वराहपुराण  इत्यादींमध्ये श्रीकृष्ण आणि शापित कुष्ठरोगी सांब ह्यांची कथा आलेली असून, कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने चंद्रभागेतील सूर्यमूर्तीची उपासना केली. म्हणून प्राचीन चंद्रभागेकाठी हे मंदिर उभारण्यात आले असावे, अशी कल्पना आहे. चंद्रभागा आता पूर्णपणे सुकून गेलेली आहे. पुराणात वर्णिलेले मैत्रेयवन याच जागी होते, असेही म्हणतात.

कोनारकचे सूर्यमंदिर

कोनारक येथे प्राचीन काळी एखादे नगर अथवा राजप्रासाद असल्यास, त्यांचे अवशेष आजवर सापडलेले नाहीत.बंगालच्या रेतीमध्ये बुडालेले हे मंदिर प्रथम १८९३ मध्ये उकरून काढण्यात आले. पुढे भारतीय पुरातत्वविभागाने ह्या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम १९०१ पासून हाती घेतले. ह्या भव्य सूर्यमंदिराचे भग्न अवशेष आज उपलब्ध असून मंदिराचा गाभारा आणि आतील सूर्यमूर्ती, तसेच इतर लहानमोठे भाग उद्ध्वस्त झालेले आहेत. शिवाय अवशिष्ट भागांवर येथील हवामानाचा परिणाम झालेला दिसून येतो. तंज्ञांच्या मते या वास्तूचे बांधकाम पुरे झालेच नसावे. कळसावर बसवावयाचे अनेक दगड अद्यापि तसेच आवारात असून इतर काही मूर्तीही आढळतात. ह्या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले, ह्याविषयी तंज्ञांत मतैक्य नाही. काही तज्ञ १२७८ हे वर्ष गृहीत धरतात, तर अबुल फज्ल व फर्ग्युसन ह्यांच्या मते ते आठव्या शतकात पूर्ण झाले असावे. तथापि अलिकडे बहुतेक तज्ञांनी १२३८ ते १२६४च्या दरम्यान ओरिसावर राज्य करणारा गंगवंशीय पहिला नरसिंहदेव राजा आणि त्याची पत्नी सीतादेवी ह्यांनी हे सूर्यमंदिर उभारले, याबद्दल मतैक्य व्यक्त केले आहे. ह्या राजाने अनेक शत्रूंवर विजय मिळवून ओरिसाचे राज्य संघटित केले आणि आपला कीर्तिस्तंभ ह्या सूर्यमंदिराच्या रूपाने उभा केला. ह्या वास्तूच्या निर्मितीसाठी १२,००० कारागीर सु. सोळा वर्षे खपत होते आणि नरसिंहदेवाने आपले बारा वर्षांचे उत्पन्न (३६ कोटी रु.) या मंदिराच्या बांधणीसाठी खर्च केले, असेआईन-इ-अकबरीत म्हटले आहे.

कोनारकचे सूर्यमंदिर

बांधणी आणि रचना

भव्य अशा सु. २५९ मी. लांब व १६७ मी. रुंद प्राकारयुक्त आवारात हे मंदिर उभारण्यात आले आहे. त्याची रचना सूर्यरथासारखी असून गर्भगृह, जगमोहन, नटमंडप व भोगमंडप यांची बांधणी आणि रचना वास्तुशास्त्रदृष्ट्या तंत्रशुद्ध व लक्षणीय आहे. हे सूर्यमंदिर नागर-शिल्पशैलीच्या कलिंगनामक उपशैलीचे निदर्शक आहे. संपूर्ण मंदिर हा सूर्याचा रथच आहे, असे कल्पून मंदिराच्या जोत्यावर चोवीस रथचक्रे बसविली आहेत. हा प्रचंड रथ खेचण्यासाठी भव्य आकाराचे एकसंध  अश्मातील सात घोडे त्याला जुंपण्यात आलेले आहेत. पुढचे पाय छातीखाली मुडपून पुढे झेपावणारे हे घोडे रथाचा भार खेचत आहेत, असे भासते. पायऱ्यांशेजारच्या दक्षिणेकडील भिंतीशेजारी चार आणि उत्तरेकडील भिंतीपाशी तीन अशी ह्यांची योजना केली आहे. सु. ३ मी. उंचीच्या चौथऱ्यांवर गाभारा, जगमोहन इत्यादींची रचना होती. गाभारा आतील बाजूने २·५ चौ.मी. होता. तीन बाजूंना त्याच चौथऱ्यांवर उपमंदिरे असून त्यांतही सूर्यमूर्तीच होत्या. गाभाऱ्या- समोरचा मंडप-जगमोहन -९ चौ.मी. व आतील दालन ६ चौ. मी. होते. त्यास तिन्ही बाजूंनी दारे होती व खाली उतरण्यास पायऱ्या होत्या. पूर्वेकडील पायऱ्यांत तीन स्तबके व दुतर्फा घोडे बसविलेले होते. गाभारा व जगमोहन ह्यांची एकत्र मिळून लांबी ९० मी. आणि रुंदी ६० मी. आहे. पायऱ्यांसमोर सु. ९ मी. वर नटमंदिराची इमारत होती. हिचा चौथरा ६·५ चौ.मी. असून मंडप ४·५ चौ.मी. होता. जगमोहनाची उंची ३० मी. आहे. बांधकाम पूर्ण झाले असते, तर (किंवा झाले असल्यास) शिखराची कळसाच्या टोकापर्यंतची उंची ६९ मी. झाली असती. मंदिराच्या आवारात आग्नेयीला धर्मशाळा वा मंत्रशाळा अशी वास्तू होती. प्रकारातून आत येण्यास दक्षिण, पूर्व व उत्तर या बाजूंनी सुबक आकाराची गोपुरे होती. वास्तुरचनेत प्रमाणबद्धता व लयबद्धता असून तिचा कोणताही लहान घटक गैरवाजवी, कृत्रिम किंवा ठोकळेवजा वाटत नाही. मंदिराचे विधान चौकोनी असले, तरी भिंतीची विशिष्ट उभी मांडणी केलेली असल्याने अनेक कोनप्रतिकोन उत्पन्न होतात व ते छायाप्रकाशाचा खेळ निर्माण करतात. सर्वसाधारणतः भिंतींची उंची सु. १२ मी. आणि त्यांवर छपराचा भाग आहे. त्या तीन टप्प्यांच्या किंवा मजल्यांच्या असून वर निमुळत्या होत गेल्या आहेत. खड्या भिंतींच्या या तीन मजल्यांवर विरोधलय निर्माण करणारे आडवे नक्षीकाम केलेले अनेक पट्टे दिसतात. सर्वांत वरचा मजला गोल विधानाचा असून त्यावर आमलक आहे. जगमोहनापेक्षा शिखराची उंची दुप्पट असल्याने तेथेही संगती साधली आहे. अनेक ठिकाणी अशा भागंची वा आकारांची पुनरावृत्ती असूनही वास्तुरचनेतील लयबध्दता बिघडलेली नाही. नटमंडपाची इमारत आकाराने जगमोहनाच्या निम्मी;पण तळमजला, छप्पर व घाट या बाबतींत त्यासारखीच आहे. ही जगमोहनाची छोटी प्रतिकृतीच भासते.

सूर्यमंदिराचे शिल्पांकित रथचक्र

नैसर्गिक व भौमितिक रचनाबंध

मंदिराची सर्व अंगोपांगे मूर्तिकामाने नटविलेली होती. भिंतीची उभी मोडणी आणि तीवरील आडवे पट्टे हे स्वाभाविकच मूर्तिकामास विशेष उपकारक ठरले आहेत. गजथर, नरथर ही पारंपरिक प्रतिमाने तर सर्वत्र आढळतातच, पण यांशिवाय अत्यंत मनोवेधक आकारांचे व घाटांचे भित्तिस्तंभ, नैसर्गिक व भौमितिक रचनाबंध, गज, सिंह, व्याल अशांसारखे अजस्त्र प्राणी, तसेच विविध हावभावांतील व असंख्य मुद्रा धारण करणारे स्त्रीपुरुष या सर्वांचे येथे विलक्षण साक्षेपाने शिल्पांकन केलेले दृष्टोत्पत्तीस येते. मानवी मूर्तींत जगमोहनाच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आलेल्या वादकांच्या मूर्ती– मृदंग व झांज वाजविणाऱ्या स्त्रीमूर्ती– त्यांच्या शरीराचा डौलदार घाट, हालचालीतील लय आणि चेहऱ्यावरील भिन्न भाव लक्षणीय असून हे भारतीय मूर्तिकलेचे उत्कृष्ट नमुने मानण्यात येतात. प्रारंभीच्या अभ्यासकांना– विशेषतः परकीय तंज्ञांना– बुचकळ्यात पाडणारे आणि त्यांचा टीकाविषय झालेले येथील मूर्तिकलेचे एक विशेष अंग म्हणजे येथील कामशिल्प होय. संभ्रम-विभ्रमादी आविर्भावांतील आणि मीलनचुंबनादी सर्व लैंगिक अवस्थातील ही शिल्पांकने बहुतेक मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर खोदली आहेत. जगमोहनाच्या पृष्ठभागावर दोन चित्रपट्ट्या असून त्यांवर स्त्रीपुरुषमीलन कोरलेले कित्येक मूर्तिसमूह आहेत. कलादृष्ट्या हे शिल्पकाम खजुराहो येथील मूर्तिकामाच्या तुलनेने निकृष्ट दर्जाचे आहे. अशा प्रकारचे कामशिल्प खोदण्यामागे शिल्पकाराचा वा असे शिल्प खोदण्यास उत्तजेन देणाऱ्या राजाचा काय हेतू असावा, ह्याविषयी तंज्ञांत एकमत नाही. तत्संबंधी अनेक तर्कवितर्क करण्यात येतात. काहींच्या मते तंत्रमार्गाचा हा प्रभाव असून या पंथाचा उपासनात्मक भोगवाद येथील मिथुन शिल्पांत प्रकट झाला आहे; तर काहींच्या मते, भक्ताने ही ऐहिक सुखाची चित्रे पाहून त्यापासून विरक्त व्हावे आणि शुद्ध मनाने मोक्षाची याचना करावी, ह्यासाठी ती खोदली गेली असावीत. नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण व्हावे, असाही हेतू सांगण्यात येतो. काहींचे म्हणणे असे आहे, की ती तत्कालीन समाजाची द्योतक असून ‘जग कसे चालले आहे’, हे दर्शविण्याव्यतिरिक्त अन्य दुसरा कोणताही हेतू त्यामागे नसावा. कामशिल्पांशिवाय समरांगणावरील अजस्त्र  हत्ती, हत्तींची रांग, विजयी योद्ध्यांचे स्वागत, राजास व सैनिकांस निरोप वगैरे विषय स्पष्ट करणारी विविध शिल्पे अप्रतिम आहेत. येथील मूर्तिकलेचे सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणता येतील, अशा सूर्यमूर्ती काळ्याहिरव्या रंगाच्या एकसंध पोताच्या पाषाणापासून घडविलेल्या आहेत. दगड एकसंध असल्याने अगदी बारीक सारीक कोरीव काम करता आले आहे. सरळ उभ्या ठाकलेल्या, दोन्ही हातांत कमलपुष्पे धारण करणाऱ्या भग्नावस्थेतील या मूर्ती कोनारकच्या शिल्पकारांची श्रध्दा व कला यांच्या निदर्शक आहेत.

झाजवादक सुरसुंदरीचे शिल्प, कोनारक

कोनारकच्या मंदिरास पांढरा वालुकाश्म व क्लोराइट दगड वापरला आहे. त्यांस अनुक्रमे ‘फूल खाडिया’ आणि ‘मुग्नी’ अशी स्थानिक नावे आहेत. हा दगड खडबडीत पण टणक आहे, त्यामुळे मूर्तिकारास बारीकसारीक शिल्पांकन करण्यास सुलभ झाले आहे. मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व मूर्तिकला ह्यांचा समन्वय अशा प्रकारे साधलेला आहे, की त्यामधून वास्तुकला व मूर्तिकला एकमेकींपासून अलग करता येत नाही. दोन्ही एकरूप झालेल्या असून वास्तूचे विविध भाग, त्यांचे परस्परसंबंध आणि त्यांचे आकारमान यांत कोठेही कसलीही प्रायोगिकता नाही. प्रत्येक भाग आपापल्या ठिकाणी चपखल बसलेला आहे. तो तेथून काढला वा त्याच्या आकारमानात फेरफार केला, तर वास्तूकडे पाहताना काहीतरी हरविल्यासारखे, चुकल्यासारखे निश्चितच वाटेल. म्हणून ह्या वास्तुशिल्पशैलीस भारतीय कलेतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Pub. Konarak, Bombay,1968.

2. Gangooly, O.C. Orissan Sculpture and Architecture, New Delhi, 1956.

3. Lal, Kanwar, Miracle of Konark, Delhi, 1967.

लेखक : म. श्री. माटे ; सु. र. देशपांडे

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate