অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्ष्माभिका

पक्ष्माभिका

पक्ष्माभिका

काही सजीव कोशिकांच्या (पेशींच्या) मोकळ्या पृष्ठापासून पुढे आलेल्या सूक्ष्म, नाजूक व कंपनशील प्रवर्धांना (वाढींना) पक्ष्माभिका म्हणतात. पाण्याला फटकारे मारून ज्या कोशिकेला त्या चिकटलेल्या असतात तिला पाण्यातून पुढे नेण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते; पण कोशिका अचल असेल, तर या फटकाऱ्यांनी कोशिकेच्या आजूबाजूला पाण्याचे प्रवाह उत्पन्न होतात. प्राणिसृष्टीतील प्राण्यांच्या सर्व संघांत पक्ष्माभिका आढळतात; पण आर्थ्रोपोडा आणि नोमॅटोडा हे दोन संघ याला अपवाद आहेत.

या संघांतील प्राण्यांच्या शरीरावर पक्ष्माभिका नसतात.

बाकीच्या सगळ्या संघांतील प्राणी कित्येक जीवनावश्यक कार्ये पार पाडण्याकरिता पक्ष्माभिकांच्या हालचालींवर अवलंबून असतात. या कोशिकांगांची चलिष्णुता (हालचाल करण्याची क्षमता) पुष्कळ एककोशिक (एका कोशिकेचे शरीर असलेली) शैवले, प्रोटोझोआ (आदिजीव), पुष्कळ बहुकोशिक प्राणी (उदा., रोटिफर) आणि कित्येक जलीय डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यत: क्रियाशील पूर्व अवस्था) यांना संचलनाची (चलनवलनाची) शक्ती देते. स्थानबद्ध प्राण्यांना अनेक वेळा पक्ष्माभिकायुक्त पृष्ठांवरच अन्नाकरिता अवलंबून रहावे लागते, कारण ही पृष्ठे पाण्यात प्रवाह उत्पन्न करतात आणि त्यांतून या प्राण्यांना अन्न मिळते; याखेरीज त्यांना या प्रवाहांचा श्वसनाकरिताही उपयोग होतो [ उदा., क्लॅमचे पक्ष्माभिकायुक्त क्लोम (कल्ले) आणि शरीर आकुंचित करून पाण्याच्या धारा बाहेर सोडणारा समुद्रोग्दारी]. काही प्राण्यांमध्ये आंतरिक द्रवांच्या आणि कणांच्या हालचालींकरिता पक्ष्माभिकायुक्त पृष्ठे अतिशय महत्त्वाची असतात; उदा., मेंदूच्या विवरांत आणि मेरुरज्जूत मस्तिष्क-मेरूद्रवाचे [मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी पडणाऱ्या द्रवाचे; ⟶ तंत्रिका तंत्र] अभिसरण पक्ष्माभिकांमुळे होते आणि वायु-मार्गात (फुफ्फुसे, श्वासनलिका, नासागुहा) शिरून त्यांच्या आतल्या पृष्ठावरील (अस्तरावर) ओलाव्याच्या पातळ थरात जाऊन बसलेले धुळीचे कण, सूक्ष्मजंतू इ. पक्ष्माभिकांच्या क्रियेने साफ झाडले जाऊन ही पृष्ठे उत्तम प्रकारे स्वच्छ होतात.

गोगलगाई आणि क्लॅम यांच्या पचन मार्गामधून अन्न नेण्याचे कार्य सर्वस्वी पक्ष्माभिकांच्या हालचालींमुळेच होते. त्याचप्रमाणे सस्तन प्राण्यांमध्ये अंडाशयापासून अंडी अंडवाहिन्यांतून वाहून नेण्याला पक्ष्माभिका क्रियाच जबाबदार असते. पक्ष्माभिका विविध प्रकारच्या हालचाली तर करतातच; पण यांशिवाय त्या संवेदीही (संवेदनाक्षमही) असू शकतात. सस्तन प्राण्यांच्या डोळ्यातील दृक्‌पटल-शलाका [⟶ डोळा] पक्ष्माभिका व्युत्पादिते (पक्ष्माभिकांपासून तयार झालेल्या) होत; काही पक्ष्माभिका स्पर्शाला प्रतिसाद देतात; उद्दीपित केल्यावर त्या हालचाली थांबवितात.

आ. ३. पक्ष्माभिकेचा अनुप्रस्थ छेद : (१) परिधीय तंतू, (२) केंद्रीय तंतू.

पक्ष्माभिका दंडगोलाकार सूत्रांसारख्या (तंतूंसारख्या) असतात.इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्यांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की, प्रत्येक पक्ष्माभिकेत दोन केंद्रीय अनुदैर्ध्य (उभे) तंतू असून त्यांच्या भोवती नऊ परिधीय (परिधावरील) अनुदैर्ध्य तंतूंचे एक नळकांडे असते. अनुप्रस्थ (आडव्या) छेदात हे परिधीय तंतू आडव्या इंग्रजी आठाच्या आकड्यासारखे (∞) दिसतात. या तंतूच्या मधली आणि भोवतालची जागा आधारद्रव्याने भरलेली असते. तंतूंचा जुडगा एका पातळ कलेच्या (पटलाच्या) आवरणाने वेढलेला असतो.

हे आवरण पक्ष्माभिकेच्या बुडाशी कोशिकेच्या अगदी बाहेरच्या कलेशी अखंड असते. केंद्रीय तंतूंचा सामान्यत: कोशिकेच्या पृष्ठाच्या पातळीवर शेवट होतो; परंतु नऊ परिधीय तंतू खंड न पडता कोशिकेच्या आत जातात आणि तेथे त्यांच्यापासून दंडगोलाकार आधारिक काय (तळाचा पिंड) तयार होतो; यालाच आधार कणिका, कायनेटोसोम अथवा ब्लेफॅरोप्लास्ट ही नावे दिलेली आहेत. पुष्कळदा आधार कणिकेपासून आणखी तंतू निघून ते कोशिकेच्या आत पसरतात, यांना पक्ष्माभिकी मूलिका म्हणतात. पक्ष्माभिका फक्त स्वतःच्या आधार कणिकांना जोडलेल्या असल्या, तरच हालचाल करू शकतात. त्यांना कोशिकेच्या इतर कोणत्याही कोशिकांगांची चलिष्णुतेकरिता प्रत्यक्ष जरूरी लागत नाही.

एखाद्या वैयक्तिक पक्ष्माभिकेची हालचाल दोन प्रकारांची असू शकते.

(१) निदोल गती : हिच्यात पाण्यावर परिणामकारक फटकारा मारताना पक्ष्माभिकेचे कांड (दंड) फक्त बुडाशीच वाकते, बाकीचा भाग सरळ असतो; परंतु मूळ स्थितीवर येताना ते बुडापासून टोकापर्यंत वाकते. सगळ्या हालचाली एकाच पातळीत होतात. (२) वर्तुळाकार गती : हिच्यात कांड सरळ असते आणि फक्त टोक चक्राकार फिरते.

पक्ष्याभिकी हालचालीच्या यंत्रणेविषयी काहीही माहिती नाही. तथापि दोन गोष्टी मात्र अगदी स्पष्ट आहेत: पक्ष्माभिकेच्या हालचालीकरिता लागणारी शक्ती तंतूच्या सबंध लांबीत उत्पन्न केली जाते आणि तंतूचे वाकणे त्याच्या एका बाजूवरील एखाद्या मूलघटकाच्या क्रियाशील आकुंचनामुळे उत्पन्न होत असले पाहिजे. पक्ष्याभिकी हालचालीमध्ये बुडाच्या एका बाजूचे आकुंचन होण्याला सुरुवात होते (त्यामुळे पक्ष्माभिका त्या बाजूला वाकते) आणि नंतर या आकुंचनाची प्रगती पक्ष्माभिकेच्या दुसऱ्या बाजूला व टोकाकडे होते. यामुळे पक्ष्माभिका सरळ होते व आंदोलन चालू होते.


लेखक: ज. नी. कर्वे,

मा. वि. जोशी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate