অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पक्ष्यांचा थाटमाट

पक्ष्यांचा थाटमाट

(बर्ड डिस्प्ले). काही प्राणी आपल्या भावना, मनातील हेतू अगर काही संदेश द्यावयाचा असल्यास शरीराच्या विशिष्ट हालचालींचे उत्कट प्रदर्शन करून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांतील अशा वैशिष्ट्यपूर्ण हालचाली प्रामुख्याने पक्ष्यांत आढळतात. त्यांचे फुगीर शरीर, चोच, पंख, पिसारा व पिसांचे निरनिराळे आकर्षक रंग ह्या सर्वांमुळे पक्ष्यांचे हावभाव फारच सूचक होऊ शकतात. निरनिराळ्या कारणांसाठी केल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या ह्या हालचाली पक्ष्यांच्या वर्तनाचाच एक महत्त्वाचा भाग समजला जातो, यास ‘पक्ष्यांचा थाटमाट’ किंवा ‘पक्ष्यांचा दिमाख’ असे म्हटले जाते.

पक्षी एकाकी असो किंवा समूहात असोत ते काही विशिष्ट अर्थ असलेल्या परिपाठीच्या हालचाली, तसेच थाटमाटही करतात. उदा., उन्हे पडू लागताच पक्षी नानाविध आवाज करून, इकडून तिकडे भराऱ्या मारून, अन्न शोधण्यास बाहेर पडण्याची वेळ झाली आहे, असे इतरांना सुचवितात. पोट भरल्यावर पंख व शेपूट पसरून जणू काही स्वस्थ व सुस्तपणे उन्हात बसतात; पिसे साफसूफ करू लागतात. अर्थात एखादे उन्हाने अगदी गरम झालेले ठिकाण असेल, तरीही पंख व शेपूट पसरून इतरांना सूचना दिली जाते. ह्या व अशा प्रकारच्या एकासारख्या एक हालचालींमुळे काही वेळा त्यातल्या परिपाठाच्या कोणत्या आणि थाटामाटाच्या कोणत्या हे सांगणे काहीसे अवघड पडते.

प्रकार

पक्ष्यांच्या थाटमाटाचे कारणानुसार पुढीलप्रमाणे काही प्रकार पडू शकतात.

धमकी दाखविण्याचा थाटमाट

ह्या प्रकारात दुसरे पक्षी किंवा प्राणी ह्यांना भीती वाटून ते पुढे येण्याऐवजी परत फिरून जावेत असा हेतू असतो. काही पक्षी (उदा., गॅनेट, बूबी) जवळपास कोणीही फिरकल्यास लहानशा भाल्यासारखी चोच एकदम विस्फारून, पंख पसरून आक्रमक व भीती वाटेल असा देखावा करतात. काही पक्ष्यांत ह्याच बरोबर विविध प्रकारचे आवाज करून, पंख फडफडवून, चोचीची जोरात उघडझाप करून, चोच मिटताना आवाज करून, आक्रमक पवित्रा घेऊन, हल्ला चढविण्याच्या आवेशाने चढाई करतो आहे असे दाखवून परभक्षी (दुसरे प्राणी मारून खाण्याची सवय असलेल्या)प्राण्यास परतविण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषत: घरट्यातील पिलांचे रक्षण करताना असे हावभाव केले जातात. आपल्या निवाऱ्याच्या जागी कोणी येते आहे असे वाटताच घुबड आक्रमक पवित्रा घेते किंवा तसा बहाणा करते व स्वत:चा बचाव करते. त्यासाठी ते लगेच आपले गोल, लालसर नारिंगी डोळे विस्फारून अधिकच मोठे करते. डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या-लहान करते, पिसे आणि पंख अशा तऱ्हेने उंचविते व कमानीसारखे करते की, भीती वाटावी. बाजूच्या फांद्या व पाने हालून सळसळणारा आवाज होत असताना त्यातच घुबडही फुत्कारल्यासारखे ओरडते व चोचीची जोरात उघडझाप करून विचित्र आवाजात भर टाकते. ह्या सर्वांचा परिणाम खचितच भीतिदायक होतो. वॉर्ब्लर, कस्तूर (थ्रश) वगैरे पक्षीही आक्रमक पवित्रा घेतात. नर वॉर्ब्लर तर विणीच्या हंगामात आपला ताबा असलेल्या घरट्याच्या प्रदेशात शिरकाव करणाऱ्या दुसऱ्या नरास अशाच आक्रमक पवित्र्याने परतवितो. एरवी खेळीमेळीने राहणारे एकाच जातीचे पक्षी विणीच्या हंगामात प्रादेशिक हक्कासाठी नुसते धमकीचे आक्रमक पवित्रेच घेतात असे नाही, तर प्रत्यक्ष हल्लेही चढवितात.

गोंधळात टाकण्यासाठी किंवा लक्ष दुसरीकडेच वेधण्यासाठी केलेले प्रदर्शन ह्या प्रकारात पक्षी आजारी असल्याचे किंवा दुखापत झाल्याचे ढोंग करतात. उदा., किलडीअर प्लव्हर, मॅलार्ड बदक आपल्या घरट्याजवळ किंवा पिलाजवळ कोणी परभक्षी येत आहे असे वाटताच दुखापत होऊन लंगडण्याचा बहाणा करून बाजूला जाऊ लागतात. स्वाभाविकच परभक्षी प्राण्याचे लक्ष पक्ष्याकडे म्हणजे घरटे व पिलांपासून दुसरीकडे वेधले जाते आणि धोका टळू शकतो. जांभळा सँडपायपर हा पक्षी तर पळ काढणाऱ्या लहानशा स्तनी (सस्तन)प्राण्यासारखे सोंग घेतो व कठीण प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतो.

निराश किंवा हताश झाल्याचे प्रदर्शन

ह्या प्रकारात परिपाठातील हालचालींशी खूपच साम्य आढळते. उदा., घरट्याकडे परतण्याची ओढ असलेल्या पक्ष्याच्या वाटेत मनुष्य किंवा इतर कोणी येऊन अडथळा निर्माण झाला की, पक्षी चटकन इतर काही तरी हालचालीत मग्न असल्याचे भासवितो. अशा वेळी चोचीने अन्न टिपत आहे किंवा पिसे साफसूफ करीत आहे किंवा चेच पंखात खुपसून झोपी गेला आहे असा बहाणा करून तो वेळ मारून नेतो. कारण नाइलाज व निराशेपोटी त्याला परिपाठातील काही तरी करतो आहोत, असे भासविण्याखेरीज अन्य मार्ग उरत नाही.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate