অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशुपक्षी शिक्षण

पशुपक्षी शिक्षण

पशुपक्षी शिक्षण

पशुपक्ष्यांना खास प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून कौशल्याचे वा कसरतीचे वैशिष्ट्यपूर्ण खेळ करून घेतले जातात. हे खेळ रस्त्यावरील रंजनप्रकार म्हणून लोकप्रिय होते. पुढे त्यांना जत्रांतून, रंजनगृहांतून व सर्कशींतून स्थान मिळत गेले. नंदीवाले, गारुडी, दरवेशी, माकडवाले यांसारख्या जातिजमातींत विशिष्ट पशुपक्ष्यांना शिकवून त्यांचे खेळ दाखवून उपजीविका करण्याची प्रथा होती. त्यामुळेच प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेले असे पशुपक्ष्यांच्या प्रशिक्षणाचे तंत्र त्या त्या जातिजमातींत वंशपरंपरागत चालत आल्याचे दिसते. आधुनिक काळात बव्हंशी सर्कशीतून हे खेळ पहावयास मिळतात. निरनिराळ्या प्राणांची शारीरिक ठेवण, त्यांच्या उपजत सवयी व ग्रहणशक्ती इ. लक्षात घेऊन त्यांना विविध कौशल्याचे खेळ शिकवले जातात. अस्वल नेहमी मागच्या दोन पायांवर उभे रहाते. ही त्याची सवय लक्षात घेऊन त्याला नाच करण्याचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे माकडांना झाडावरून उड्या मारणे फार आवडते. या सवयीचा फायदा घेऊन त्यांना झुल्यावरचे, उड्यांचे, तारेवरचे खेळ शिकविले जातात. कांगारुची लढण्याची वृत्ती लक्षात घेऊन त्याला मुष्टियुद्धासारख्या झटापटीचे प्रशिक्षण दिले जाते. प्राण्यांना सर्कशीत खेळ करून दाखविण्यासाठी वा तशाच काही खास उद्दिष्टांपोटी ज्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते; त्याचप्रमाणे त्यांना नित्याच्या काही सफाईदार हालचालीचेही (उदा., कुत्र्याला विशिष्ट वस्तू आणून देण्याचे) अथवा छंदाखातर विशिष्ट कौशल्याचे (उदा., पोपटाला बोलावयास शिकवण्याचे) प्रशिक्षणही दिले जाते.

प्राण्यांना शिकविण्याच्या सामान्यपणे दोन पद्धती आहेत. प्राणी जर लवकर शिकत नसेल, तर त्याला कठोर शिक्षा करुन त्याच्याकडून काम करून घेणे, ही एक पद्धती होय. पूर्वीच्या काळी याच पद्धतीचा सर्रास उपयोग करीत असत. पूर्वी अस्वलाला शिकविण्यासाठी त्याला तापलेल्या पत्र्यावर उभे करून मोठमोठ्याने ढोल बडवीत. पत्रा तापलेला असल्याने अस्वल साहजिकच उड्या मारू लागे. पुढेपुढे तापलेल्या पत्र्यावर उभे न करता, नुसता ढोल बडविला तरी अस्वल नाचू लागे व या प्रकारे त्याला नाचाचे शिक्षण दिले जाई. वाघ, सिंह यांसारख्या क्रूर पशूंनासुद्धा त्या काळी चाबकाने झोडपून शिक्षण देण्यात येई.


पाळीव सिंहिणीला वस्तू हस्तगत करण्याचे प्रशिक्षण


यूरोपमध्ये १८८० साली कार्ल आणि व्हिलहेल्म हागेनबेक यांनी हिंस्त्र श्वापदांना शिकविण्याची दुसरी आधुनिक पद्धती शोधून काढली. प्राण्यांना माणसाळवून त्यांच्याशी सौम्यपणे वागून, त्यांना प्रसंगी कूरवाळून व त्यांच्याशी प्रेमाने बोलून आणि त्यांना मुळीच शिक्षा न करता, खाण्याती लालूच दाखवून शिकविण्याची ही पद्धतीपेक्षा ही नवीन पद्धती फारच उपयुक्त ठरली व तिचा वापर केल्याने सर्वच प्राणी फार लवकर शिकतात, असे आढळून आले. यासाठी प्राणिमानसशास्त्राचा उपयोग करण्यात आला. कारण बक्षीस वा खाद्य दिले, तर प्राणी लवकर शिकतो; हे मानसशास्त्राने सप्रमाण सिद्ध केले आहे. तसेच प्राणिशिक्षणात साहचर्य-कल्पनेचाही अवलंब करण्यात आला. प्राण्याकडून एखाद्या विशिष्ट संकेताबरहुकूम विशिष्ट कृती, शिक्षेचा धाक दाखवून वा बक्षिसाची लालूच दाखवून करून घेतली जाते व त्याची सातत्याने पुनरावृत्ती केली जाते. त्यामुळे विशिष्ट संकेत व विशिष्ट कृती यांचे दृढ साहचर्य त्याच्या मनावर ठसते. प्राणि शिक्षणाचे हे मूलतत्त्व आहे. या पद्धतीमध्ये पशुपक्ष्यांना शिक्षण देताना, त्यांना खाण्याची लालूच दाखविली जाते. उदा., एखाद्या वाघाच्या किंवा सिंहाच्या पिलाला शिक्षण देण्याच्या वेळी प्रथम त्याच्या पाठीवरून कित्येत दिवस हात फिरवून त्याला माणसाळविले जाते. नंतर एका स्टुलावर एक मांसाचा तुकडा ठेवण्यात येतो. तो वाघाचा अथवा सिंहाचा बच्चा तो मांसाचा तुकडा खाण्यासाठी स्टुलावर पुढचे दोन पाय ठेवून उभा राहतो. त्याबरोबर त्याला बक्षीस म्हणून तो मांसाचा तुकडा खाण्यासाठी दिला जातो. अशा रीतीने, आपण स्टुलावर उभे राहिल्यास आपणास खाऊचे बक्षीस मिळते , हे त्याला कळू लागते आणि पुढे तो आपोआप इशाऱ्‍यासरशी स्टुलावर चढून उभा राहतो. जळत्या कड्यातून उडी मारणे, मागच्या दोन पायांवर उभे राहणे, धावत्या घोड्यावर उडी मारून उभे रहाणे वगैरे कठीण कामेही याच पद्धतीने जनावरांना शिकविण्यात येतात.

पोलिसाकडून कूत्र्याला प्रशिक्षण

हत्ती, घोडे,कुत्री,माकडे, सागरसिंह ( मोठ्या कानांचे सील मासे ) हे प्राणी सामान्यपणे बुद्धिमान व आज्ञाधारक असून ते त्यांना देण्यात येणारे शिक्षण लवकर आत्मसात करतात. कार्ल हागेनबेक यांच्या सर्कशीमध्ये दोन सागरसिंह डोंक्याने फुटबॉल एकमेकांकडे फेकण्याचा खेळ करून दाखवीत असत.

मध्ययुगात अस्वलांचे खेळ फार लोकप्रिय होते. त्या काळी अस्वलाच्या नाचाचा खेळ रस्त्यांतून सर्रास पहावयास मिळे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत लंडनमध्येही रस्त्यातून अस्वलाचा खेळ पहावयास मिळे. त्या शतकाच्या अखेरीस कायद्याने अस्वलांच्या आयातीस बंदी करण्यात आली. तथापि जर्मन, फ्रान्स इ. यूरोपीय देशांत तसेच भारत, श्रीलंका वगैरे पूर्वेकडील देशांतून हे खेळ अधूनमधून पहावयास मिळतात. आधुनिक सर्कशीतून अस्वलांचे सायकल चालवण्यासारखे कौशल्याचे खेळही पहावयास मिळतात. अस्वलांप्रमाणेच माकडांचे खेळही लोकप्रिय आहेत. जत्रांतून तसेच रंजनगृहांतून व रस्त्यांतूनही माकडांचे निरनिराळे कसरतीचे खेळ पहावयास मिळतात. चिपँझी माकड जात्याच बुद्धिमान असून अनेक चातुर्यपूर्ण कसरती करून दाखविते. उदा., लंडनच्या प्राणिसंग्रहालयातील चिंपँझीचा चहापानसमारंभ प्रसिद्ध आहे, एका चिंपँझीने शिवणयंत्र चालवण्याचाही प्रयोग केला होता. चिंपँझीच्या दोन वर्षाच्या पिलाला शिक्षण दिले जाते. अनेक जंगल-चित्रपटांतून चिंपँझी माकडाचे काम पहावयास मिळते.

कुत्र्याला शिकवणे ही एक कला आहे व तत्संबंधीचे प्रशिक्षण वर्ग पाश्चिमात्य देशांत आहेत. कुत्र्याचे पिलू साधारणतः आठ आठवड्यांचे झाल्यावर त्याच्या शिक्षणास सुरुवात होते. सुरुवातीस त्याला चांगल्या सवयींचे–उदा., विवक्षित ठिकाणी मलमूत्रविसर्जन करणे शिक्षण दिले जाते, तसेच बसण्या-उठण्यासंबंधीच्या वा दूर अंतरावरील वस्तू आणण्याच्या मालकाच्या आज्ञा पाळण्याचेही शिक्षण दिले जाते. कुत्र्याला शिकवताना शिक्षकाला धीमेपणा, चातुर्य, हुशारी, ममता हे गुण उपयोगी पडतात. लहान वयाच्या कुत्र्यांना शिक्षेचा धाक दाखविला तरी चालतो, पण प्रौढ कुत्र्याला मारलेले मुळीत आवडत नाही. प्रोत्साहन, शाबासकी व बक्षिसादाखल खाऊ देऊनच त्यांना शिकवावे लागते. कुत्र्याची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनाक्षम असतात. त्याच्या या सामर्थ्याचा उपयोग गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी करून घेतला जातो. शिकारी कुत्री हीदेखील सावज हेरण्यात फार पटाईत असतात. चांगला शिकवून तयार झालेला कुत्रा शंभर प्रकारच्या आज्ञा पाळू शकतो, असे मानले जाते. दुसऱ्‍या महायुद्धात जर्मनीने लष्करी सामग्रीचे रक्षण करणे, छावणीत शिरलेल्या परक्या व्यक्तीचा माग काढणे, निरोप पोचवणे इ. कामांसाठी हजारो कुत्री शिकवून तयार केली होती. कुत्र्यांचे बौद्धिक हुशारीचे खेळ सर्कशीतून पहावयास मिळतात. सतराव्या शतकात जत्रांतून कुत्र्यांचा नाच पहावयास मिळे. त्याचप्रमाणे चित्रपटांतूनही कुत्र्यांची कामे दाखविली जातात. १९२० ते १९३० या दरम्यान ‘रिन-टिन-टिन’ हा अल्सेशियन कुत्रा चित्रपटातील अभिनयसाठी गाजला होता.

घोड्यांचे प्रेक्षणीय खेळ ग्रीक, रोमन काळात व मध्ययुगात फार लोकप्रिय होते. सर्कशीतून घोड्यांचे नानाविध चित्तवेधक खेळ पहावयास मिळतात. शर्यतीत धावणाऱ्‍या घोड्यांनाही विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते व त्यासाठी खास शिक्षक असतात. हत्ती हा अत्यंत बुद्धिमान प्राणी असून त्याला लहानपणीच शिकवले जाते. हत्तीच्या सोंडेचा उपयोग शिक्षणाच्या कामी करून घेतला जातो. सोंडने माणसाला उचलून पाठीवर घेणे, सोंडेतून पाण्याचा फवारा उडवणे यांसारखे रंजक प्रकार त्याच्याकडून करून घेतले जातात.

अठराव्या शतकात डुकरांनाही विविध खेळ करण्याचे शिक्षण देण्यात येत असे.

पोपट, काकाकुवा यांसारखे पक्षीही बुद्धिमान असून त्यांनाही खाण्याची लालूच दाखवूनच अनेक खेळ शिकविले जातात. जर्मनीतील कार्ल हागेनबेक, तसेच भारतातील दामू धोत्रे, कार्लेकर, देवल यांसारखे पशुशिक्षक जगप्रसिद्ध आहेत.

लेखक : कार्लेकर, शि. शं,

पशूंना निरनिराळ्या प्रकारचें प्रशिक्षण देऊन त्यांचे खेळ करून दाखवणे आणि त्यावर स्वतःचा निर्वाह करणे, हा व्यवसाय भारतात फार प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला दिसतो. यासाठी सर्वसाधारणपणे गायी, बैल, माकडे, अस्वले, नाग, पोपट, तितर, कबूतर, कोंबड्या वगैरे पशू आणि पक्षी यांचा उपयोग केला जातो. अशा तऱ्‍हेने पशूपक्ष्यांचा वापर करून व्यवसाय करणाऱ्‍या जमातींमध्ये गोपाल, नंदीबैलवाले, माकडवाले, दरवेशी, गारुडी, जोशी यांचा समावेश होतो. प्रत्येक जमात वंशपरंपरागत ज्या प्राण्यांचा वापर करीत आली, तेच प्राणी ती पाळते. दरवेशी अस्वलच पाळेल आणि त्याचा खेळ करून स्वतःचा निर्वाह करेल, तो नाग किंवा माकड यांचा खेळ करणार नाही. परंपरेने प्राणी, त्यांचे प्रशिक्षण, व्यवसाय ठरले व ते व्यवसाय करणारे जातिसमूह स्थिर झाले. त्या जातिसमूहात त्यांच्या व्यवसायातील प्राण्यास विशिष्ट स्थान प्राप्त झाले. त्याला मारून खाणे निषिद्ध समजले गेले. प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे खेळ करणाऱ्‍या बहुसंख्य जाती भटक्या असून, सुगीचे दिवस आले की खेड्यातून त्यांचे दौरे सुरु होतात.

यांतील बहुतेक प्राण्यांचे खेळ हे करमणुकीचे असले, तरी काही प्राण्यांना भविष्य सांगणेही शिकवले जाते. उदा., पोपटाचा उपयोग फिरस्ते ज्योतिषी (जोशी ) भविष्य सांगण्यासाठी करतात. शुभाशुभ आकडे असलेली कागदी पाकिटे पोपट काढून देतो. नंदीबैलालाही भविष्याचे प्रश्न विचारले जातात. पाऊस पडेल का? मालकाला पैसे मिळतील का? असे प्रश्न विचारून बैलवाला गुबगुबी वाजवतो व बैल होकारर्थी मान हलवतो. माकडे, अस्वले, नाग यांचे खेळ मात्र करमणुकीसाठीच असतात. ढोलक्याच्या तालावर माकडाला, अस्वलाला उड्या मारणे, नाच करणे शिकवले जाते. माकडे व अस्वले यांचा खेळ करणाऱ्‍यांना अनुक्रमे मदारी व दरवेशी अशीदेखील नावे आहेत. या प्राण्यांना परंपरेने प्रशिक्षण दिले जाते. आमिषे आणि शिक्षा यांचा वापर प्रशिक्षणासाठी केला जातो. गारुडी नागांचे खेळ करतात. गारुड्याचे शिक्षण देणारी एक शाळा दिल्लीजवळील मोलाडबंड येथे आहे. तितर, कबुतरे, कोंबड्या इत्यादींना झुंजीसाठी योग्य ते शिक्षण देऊन त्यांच्या झुंजी लावल्या जातात. संबंधित लोक बाजारच्या दिवशी आपले पिंजरे घेऊन बाजारात येतात.

लेखक : परळीकर, नरेश

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate