অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्राणी

प्राणि

सजीव सृष्टीतील चेतनायुक्त विभागातील [⟶ जीव] क्रियाशील सजीवांना प्राणी असे संबोधण्यास हरकत नाही किंवा कोणताही सजीव प्राणी की, जो प्राण्याचा गुणधर्म दर्शवीत असून वनस्पती नाही त्यास प्राणी म्हणावे अशीही व्याख्या करता येईल. यावरून प्राणी व ⇨वनस्पती यांतील भेद पाहून त्यांस वेगळे करणे पूर्णतया शक्य नाही, असे दिसून येते. याचे कारण असे की, काही जीव इतके साधे आहेत की, त्यांची गणना प्राणी वा वनस्पती या दोहोंपैकी कोणत्या गटात करावी, हे ठरविणे कठीण होते.

सामान्यतः प्राणी कोणते ते पुढील लक्षणांवरून ठरवले जाते. प्राण्याच्या कोशिका (पेशी) जीवद्रव्याने [जीवनाचा आविष्कार ज्यामुळे अनुभवास येतो अशा मूलभूत द्रव्याने;  ⟶ जीवद्रव्य] युक्त असतात; त्यांत हरितद्रव्य नसते. जननक्षमता (जास्तीत जास्त स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता) असते. सर्व प्राणी पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राण्यांपासूनच निर्माण होतात. मर्यादित वाढ होते. वाढ पूर्ण झाल्यावर नवीन अवयव निर्माण होत नाहीत. प्राणी संवेदनक्षम असतात व काही अपवाद सोडल्यास ते एकाच जागी खिळून नसतात. अमीबासारखे केवळ सूक्ष्मदर्शकातून दिसू शकतील इतक्या सूक्ष्म आकारमानापासून ते देवमाशासारखे अतिप्रचंड (निळ्या देवमाशाची लांबी सु. ३४ मी. आणि वजन सु. १,३२,००० किग्रॅ. असू शकते.) आकारमानाचे सर्वव्यापी सु. १० लाख प्राणी ज्ञात आहेत. अमीबा या प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील एककोशिक (एकपेशीय) साध्या प्राण्यापासून अवयव तंत्रे (संस्था), ज्ञानेंद्रिये यांची जटिल (गुंतागुंतीची) संरचना असलेल्या पक्षी व मानवासह स्तनी प्राण्यापर्यंत सर्व प्राण्यांत आढळणारी उल्लेखनीय बाब म्हणजे आकार, रूप, संरचना यांची विविधता होय. भिन्न प्राण्यांतील प्रथिने भिन्न असतात. प्राण्यांतील वैचित्र्य व विविधता यांचे हे कारण असावे. काही प्राणी परिसराशी जुळवून घेतात, तर काही परिसराचेच एक घटक बनतात [⟶ जीवसंहति]. प्राण्यांमध्ये विलक्षण असे दैनिक व ऋतूनुसार बदलणारे लयबद्ध शारीरिक चक्र आढळते. [⟶ आवर्तिता, सजीवांतील]. सर्व मूलभूत गरजांबाबत प्राण्यांत एकसूत्रता आढळते. सर्व प्राणी शरीरप्रक्रियेसाठी ऊर्जानिर्मिती करून ती वापरतात. शरीरांतर्गत क्रियांचा समतोल साधून ते शारीरिक प्रक्रिया कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. प्राणी वैशिष्ट्यपूर्ण अशा जीवनचक्रातून जातात. प्राण्यामध्ये ⇨ क्रमविकास (उत्क्रांती) झाला आहे व होत आहे आणि आज अस्तित्वात असलेल्या प्राणिजाती या ⇨ नैसर्गिक निवडीच्या क्रमविकासी प्रक्रियेतील शेष प्राणिजाती होत. म्हणजे बरेच प्राणी आणि प्राणिजाती कालौघात नष्ट झालेल्या आहेत. क्रमविकासाच्या प्रक्रियेचा प्राण्यांवर दूरगामी परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे प्राणिसमूह परिसराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतात [⟶ अनुकूलन] किंवा क्रमविकासामुळे त्यांच्यात भिन्नताही निर्माण होते. प्राण्यांमध्ये समान रूप, समान आकारमान असेल, तर समान वंशपरंपरा आढळते. प्राण्यांमध्ये निश्चित स्वरूपाचे कार्यबद्ध शरीरसंघटन सुनियोजित आनुवंशिकतेने प्राप्त होत असते.

प्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व : मानवाच्या मूलभूत गरजेतून त्याचा प्राण्याशी संबंध आला असावा व ही मूलभूत गरज म्हणजे अन्न होय. प्राचीन मानववंशाच्या इतिहासावरून मानव प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करू लागला असे दिसते. शेतीचा शोध हा नंतरचा असणे शक्य आहे. मानव हा एक प्राणीच असल्याने व सृष्टीचा अविभाज्य घटक असल्याने, त्याचा प्रसंगी इतर जीवसृष्टीशी अपरिहार्य संबंध येत राहिला आहे. वेळोवेळी मानवाचा इतर प्राण्यांशी संबंध येत असल्याने आता प्राण्यांच्या मानवी जीवनातील स्थानाचे पुढील मुख्य दोन प्रकारे वर्णन करता येते : (१) मानवास उपयोगी प्राणी आणि (२) मानवास उपद्रवी प्राणी.

मानवास उपयोगी प्राणी

अन्न ही माणसाची मूलभूत गरज भागवण्यासाठी मानवास प्राण्यांना मारावे लागते. जगातील फारच थोडी (सु. २५ %) मानवसंख्या शाकाहारी आहे. यामुळे सु. ७५% टक्के मानवांची अन्न ही मूलभूत गरज प्राणी भागवतात. मासे, झिंगे, शेवंडे, कालवे, गोगलगाई इत्यादींच्या समवेतच पाळीव प्राण्यांपैकी डुकरे, मेंढ्या, कोंबड्या, पक्षी व इतर अनेक प्राणी उपलब्धता व गरजेनुसार अन्न म्हणून मारून उपयोगात आणले जातात. याबाबत मानवसमूहांत व वंशांत विविधता आढळते. म्हणजे एखाद्या प्राण्यास एखादा विशिष्ट मानवसमूह पवित्र (वा अपवित्रही) मानतो व त्या प्राण्याची हत्या टाळतो. अन्नासाठी शिकार म्हणून बऱ्याच प्राणिजातींची हत्या होते [→ खाटीकखाना; मांस उद्योग; कुक्कुटपालन]. अशा रीतीने अन्नासाठी म्हणून मारलेल्या प्राण्याचे कातडे आद्य वस्त्र म्हणून आदिमानवाने उपयोगात आणले. प्राण्यांच्या शरीरातील इतर अवयवांचे अनेकविध उपयोग होतात. उदा., शिंगापासून सरस, हाडापासून कोळसा, कॅल्शियम व फॉस्फरस, खुरापासून बटणे इ., शार्क व कॉड माशांच्या यकृतापासून शक्तिवर्धक तेल, हस्तिदंतापासून शोभिवंत वस्तू, शिंपल्यापासून दागिने व सजावटीच्या वस्तू, लोकरीपासून कापड, चामड्यापासून पादत्राणे व इतर वस्तू. दुभत्या पाळीव प्राण्यापासून दूध मिळते (गाई, म्हशी, शेळ्या इ.). कुक्कुटपालनातून अंडी अन्न म्हणून मानवास मिळतात. मधमाश्यांपासून मध व मेण, रेशमाच्या किड्यापासून रेशीम आणि कस्तुरीमृगापासून कस्तुरी मिळते.

सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून पाळीव प्राणी मानवाने वाढवले आहेत. सरोवरांतील राजहंस, बदके, ⇨ जलजीवालयातील मासे व इतर जलचर प्राणी ⇨ प्राणिसंग्रहोद्यानातील विविध पशुपक्षी, मोर यांसारखे प्राणी व पक्षी मन प्रसन्न व आल्हाददायक करतात. जलजीवालये व प्राणिसंग्रहोद्याने यांतील प्राणी शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचे असतात. शिंपल्यांपासून मिळणाऱ्या मोत्यांचा दागदागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. कबुतरांचा संदेशवहनासाठी फार पूर्वीपासून उपयोग करून घेण्यात आलेला आहे. बरेच कीटक व पक्षी परागणास (परागसिंचनास) मदत करतात आणि फळे व धान्य यांच्या उत्पादनात मानवास उपयोगी पडतात. पक्षी धान्याचा नाश करणाऱ्या कीटकांचा नाश करतात व मानवास उपयुक्त ठरतात. तीसा, तरस व गिधाडे मेलेले प्राणी फस्त करून टाकतात व पर्यावरण शुद्ध राखण्यास मदत करत असतात.

रोगोपचार, रोगप्रतिबंध व रोगनिदान करण्यासाठी उपयुक्त असणारे अनेक ⇨ जैव पदार्थ मानवास प्राण्यांपासून मिळतात. खाटीकखान्यात मारलेल्या जनावरांपासून यकृतार्क, कॉर्टिसोन व इतर स्टेरॉइड, हेपारीन, पेप्सीन, कोलेस्टेरॉल, तसेच इन्शुलीन व इतर हॉर्मोने इ. विविध उपयुक्त औषधी द्रव्ये मिळविण्यात येतात [⟶ खाटीकखाना; ग्रंथिद्रव्ये].

प्रयोगशाळेतील प्रायोगिक प्राणी म्हणून बेडूक, उंदीर, गिनीपिग, माकडे, कुत्री इ. अनेक प्राणी वापरण्यात येतात व त्यांवर केलेल्या प्रयोगावरून मानवाला आपल्या शरीरक्रियांचे ज्ञान होते आणि नव्याने तयार केलेल्या औषधाचा प्रत्यक्ष मानवी शरीरात वापर करण्यापूर्वी प्रायोगिक प्राण्यावर त्याचा काय परिणाम होईल ते पाहिले जाते. औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकशास्त्र यांच्या प्रगतीमध्ये प्राणी फारच उपयुक्त ठरले आहेत. [⟶ प्रयोगशाळेतील प्राणी].

घोड्यांचा वाहतूक व युद्धातील उपयोग सर्वज्ञातच आहे. हत्ती, उंट, गाढवे, बैल, रेडे इ. जनावरांचा वाहतुकीसाठी व शेतीसाठी मानव मोठ्या प्रमाणावर उपयोग करतो.

र्वच साप विषारी असतात असे नाही. काही साप पिकांचा नाश करणारे प्राणी (उदा., उंदीर) खातात व अप्रत्यक्ष रीत्या मानवाच्या उपयोगीच ठरतात. सापाच्या कातडीपासून पिशव्या, पट्टे इ. विविध वस्तू तयार करतात.

मेरिकन नौदल शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेण्यास डॉल्फिनाचा उपयोग करीत आहे.

मानवास उपद्रवी प्राणी

मानवास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या उपद्रवी ठरणारे प्राणी आहेत. पिकांचा व फळांचा नाश करणारे कीटक, रोगप्रसारक कीटक, मानवास उपयुक्त असणाऱ्या व पाळीव प्राण्यांचा रोगाद्वारे नाश करणारे कीटक व प्राणी हे उपद्रवकारकच आहेत. या उपद्रवी प्राण्यांचा पुढील दोन उपविभागांमध्ये विचार करता येईल : (अ) विषारी प्राणी, (आ) रोगकारक व रोगप्रसारक प्राणी.

(अविषारी प्राणी : विषारी प्राण्यांच्या दंशामुळे मनुष्यहानी होत असते. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच आहे. सापाव्यतिरिक्त प्राणहानिकारक आणि विषारी असे बरेच प्राणी आहेत. विंचवाचा दंश वेदनाकारक व कधीकधी प्राणहानिकारकही असतो. ⇨कीटकदंशही वेदना निर्माण करतो व काही प्रमाणात विषारीही असतो.

(आ) रोगकारक रोगप्रसारक प्राणी : परोपजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) प्राणी मानवामध्ये रोग किंवा तत्सम परिस्थिती निर्माण करतात. हिवताप प्लाझ्मोडियम या सूक्ष्म आदिजीवी प्राण्यांमुळे होतो तसेच अमीबाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका या जातीमुळे आमांश होतो. मानवाचे रक्त, अन्नमार्ग, श्वसनमार्ग, कातडी इत्यादींत राहून रोग निर्माण करणारे अनके जीव आहेत. उदा., आतड्यात राहणाऱ्या जंतांमुळे जंतविकार होतो. डास, ढेकूण व इतर कीटक रोगप्रसार करतात, त्यांस रोगवाहक म्हणतात. उदा., डासांच्या निरनिराळ्या जातींमुळे हिवताप, डेंग्यूज्वर, पीतज्वर व हत्ती रोग या रोगांचा प्रसार होतो. मांजर व कुत्रा या प्राण्यांमुळेही माणसामध्ये काही रोगांचा प्रादुर्भाव होतो. उदा., अलर्क रोग (पिसाळ रोग). पट्टकृमिरोग, पर्णकृमिरोग, काळा आजार, निद्रारोग, नारू, खरूज इ. प्राणिजन्य मानवी रोगांची आणखी काही उदाहरणे होत. [⟶ प्राणिजन्य मानवी रोग].

शंख, सर्प, गाय इत्यादींच्या पूजेच्या स्वरूपात प्राण्यांचे दैवतीकरण झाल्याचे दिसते. बैल (नंदी), घोडा, कुत्रा, मोर, गरुड पक्षी, उंदीर आदि प्राणीही दैवतांची वाहने आहेत. भारत, ईजिप्त, ग्रीकोरोमन, अमेरिकन इंडियन इ. संस्कृतीत अशी प्रथा आढळते.

ध्या प्राण्यांचा दयाशून्यतेने संहार करण्यात येत आहे. काही प्राणिजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे निसर्गसमतोल बिघडून जाऊन याचे मोल मानवासच द्यावे लागेल, असे दिसते. मानव हा प्राण्यांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. असे असूनही प्राणिसंग्रहोद्यानांत व अभयारण्यांमध्ये प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन जाणीवपूर्वक करण्यात येते. मानवाच्या अस्तित्वासाठी व सर्वांगीण गरजांसाठी प्राण्यांचीही गरज आहे आणि त्यामुळे त्यांच्या सहअस्तित्वाची नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

प्राण्यांसंबंधीच्या मिथ्यकथा व लोकभ्रम

फार पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांना प्राण्यांबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटत असे. प्राण्यांना मनुष्यवाणी असू शकते किंवा मानवाचे व प्राण्याचे शरीरसंबंध होऊ शकतात, अशाही भ्रामक कल्पना अस्तित्वात होत्या. पुष्कळशा भ्रामक कल्पनांचा उगम मनुष्यास पुनर्जन्म आहे व त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा प्राणिरूपाने पृथ्वीवर राहतो, अशा समजुतीत झाला. वन्यपशू व पक्षी यांच्या मुखाने देववाणी होते, अशीही समजूत होती. काही पशुपक्षी चांगले व शुभदायक असतात, तर काही वाईट व अशुभदायक असतात, असेही समज होते.

ध्याच्या युगात विज्ञानाच्या आधारावर व मानवाच्या तर्कशास्त्रानुसार त्यांतील बरेच समज निराधार वाटते असले, तरी सामान्य जनांच्या मनावर पूर्वीच्या समजुतींचा व लोकभ्रमाचा बराच पगडा असलेला आढळतो. काही सामान्य रूढ मिथ्यकथा व लोकभ्रमाची उदाहरणे यांवरून वरील विधानास पुष्टी मिळते.

भारतात कावळ्याबद्दल बरेच समज रूढ आहेत. मृताचा आत्मा कावळ्याच्या शरीरात वास करतो, अशी हिंदूंची समजूत आहे म्हणून मृताच्या क्रियेच्या दहाव्या दिवशी भाताच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श केला म्हणजे तो मृतात्म्यास पोहोचतो व मृताची काही इच्छा राहिली नाही, असे समजले जाते. कावळ्याचे मैथुन पाहिले, तर मृत्यू येतो, अशीही समजूत आहे. कावळ्यास एकाच डोळ्याने दिसते व त्याचे आयुष्य खूप मोठे आहे, असेही समजले जाते.

घुबडाबद्दलही बऱ्याच भ्रामक समजुती आहेत. घुबडाचे ओरडणे अशुभ मानले जाते व पुढे येणाऱ्या संकटाची ही जणू सूचनाच आहे, असे समजतात. हे ओरडणे जर एखाद्या घराच्या छपरावरून असले, तर त्या घरातील लहान बालकांस त्रास होईल, अशी समजूत आहे.

गुलिंदा (कर्ल्यू) पक्षी हा समुद्रावर राहणारा आहे. याचे ओरडणे म्हणजे बुडून मृत झालेल्या कोणातरी खलाशाचा आवाज, असे समजले जाते.

खंड्या व होला या दोन पक्ष्यांस परमेश्वराने कोरड्या जमिनीचा शोध करण्यास पाठविले आणि यांपैकी खंड्या खूप उंच उडाला म्हणून त्याचे पंख निळे झाले, अशी समजूत आहे.

कोणत्याही महत्त्वाच्या कामाला निघाले असता मांजर आडवे गेले, तर ते काम होणार नाही अशी समजूत आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणेही फार अशुभ समजले जाते.

सले असताना जर पाल अंगावर पडली, तर काहीतरी अशुभ घडेल असे समजतात. पालीच्या चुकचुकण्यासही (‘चुकचुक’ असा आवाज करण्यासही) काही अर्थ लावला जातो.

ह्या मिथ्यकथा व लोकभ्रम निरनिराळ्या धर्मांत, वंशांत, देशांत व जातींत निरनिराळ्या असतात. मोठ्या देशातील प्रांताप्रांतांत सुद्धा यांत भिन्नता आढळते. वर दिलेल्या उदाहरणांपेक्षा कितीतरी आणखी अशा कथा व लोकभ्रम रूढ आहेत. यावरून माणसाचे जीवन सभोवतालच्या प्राण्यांशी किती निगडित आहे, याची कल्पना येते.

--------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate