অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्राण्यांचे सामाजिक जीवन

प्राण्यांचे सामाजिक जीवन बहुतांशी त्यांच्या संदेशवहन पद्धतीवर अवलंबून आहे. या जीवनात संदेश देणारा व संदेश घेणारा, तसेच संदेशाचे संकेत व त्यावरील प्रतिसाद यांस विशेष महत्त्व आहे. हे संकेत अंगस्थिती, चेहऱ्यावरचे हावभाव, निरनिराळे ध्वनी किंवा शरीराचा स्पर्श या प्रकारांनी दिले जातात. संदेशवहनाचे तीन भाग पडतात. (१) संकेत : याचा अभ्यास शास्त्रीय दृष्ट्या करता येतो; जसे ध्वनीच्या संकेतात त्याची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या), परमप्रसर (स्थिर स्थितीपासून कंपनात होणारा कमाल बदल) व समयनियंत्रण ठरविता येते; (२) संकेताचा अर्थ आणि (३) संकेताचे महत्त्व : यात ज्या प्राण्यास संकेत दिला जातो त्याचा त्या संकेताला काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणे आवश्यक असते. [⟶ प्राण्यांमधील संदेशवहन].

काही विशिष्ट संकेताने वा परिस्थितीने पुष्कळ प्राणी समूहाने राहताना दिसतात; पण ते सामाजिक जीवन नव्हे. परिस्थिती निवळल्यावर हे समूहही नाहीसे होतात व घटक प्राणी वेगवेगळे हिंडू लागतात. याउलट सामाजिक जीवन कंठणारे प्राणी भिन्नभिन्न परिस्थितीतही एकमेकांशी संबंध ठेवून राहतात व आपले समूह कायम ठेवतात.

काही प्राण्यांच्या जीवनात निरनिराळ्या परिस्थितींत तोच प्राणी निरनिराळे सामाजिक जीवन जगतो. उदा., अमेरिकन रॉबिन हा पक्षी शरद ऋतूत स्थलांतर करण्याच्या वेळी मोठ्या थव्यात राहतो. या थव्यात पुष्कळ नर आणि माद्या असतात. हे सर्व पक्षी एकमेकांशी खेळीमेळीने वागतात; पण स्थलांतरानंतर वसंत ऋतूत हे नर एकमेकांशी भांडतात व आपल्या स्वतःपुरते क्षेत्र निवडून त्यात मादीबरोबर राहून प्रजोत्पादन करतात.

प्राण्यांच्या सामाजिक जीवनात अंतराजातीय व अंतर्जातीय सहजीवनही असू शकते. अंतराजातीय जीवनात जर एका जातीचे दुसऱ्या जातीवर काही दडपण नसेल, तर त्यांच्या सहजीवनावर काही परिणाम होत नाही; पण जर दोन जातींत संघर्ष असेल, तर जीवनकलह निर्माण होतो. दोन भिन्न जातींचे संबंध सहजीवी, सहभोजी, परस्परावलंबी, परस्परवर्ज्यी किंवा जीवोपजीवी असू शकतात [⟶ जीवोपजीवन; सहजीवन]. काही काही वेळा हे संबंध जटिलही (गुंतागुंतीचेही) असतात. उदा., काही लहान मासे मोठ्या माशांच्या शरीरावर राहून त्यांच्या अंगावरील परजीवी जंतूंचा नाश करतात. या लहान माशांच्या अंगावरील रंगामुळे मोठ्या माशांना त्यांची ओळख पटते व ते या लहान माशांना आपल्या शरीरावर राहू देतात.

प्राण्यांचे निरनिराळ्या जातींचे परिस्थितिवैज्ञानिक समूह [⟶ परिस्थितीविज्ञान] सामाजिक जीवनात एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येक समूहाची वाढ होण्यास त्या समूहाची इष्टतम संख्या असणे आवश्यक असते व ही इष्टतम संख्या निरनिराळ्या जातींच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते. एकत्र राहणाऱ्या निरनिराळ्या जाती आपली संख्या अशा रीतीने नियंत्रित करतात की, ज्यामुळे परस्परांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही.

काही जातींत आपल्या पुढील पिढीस उपयोगी होतील अशी कार्ये करण्याकडेही कल असतो. उदा., उंदीर आपल्या हयातीत आपल्या बिळाचा एवढा विस्तार करतो की, पुढील पिढीतील उंदारांस विनासायास राहण्यास तयार बिळे मिळतात.

कोणत्याही जातीच्या प्राण्यांची संख्या त्यांना उपलब्ध असलेल्या अन्न, निवारा आदि आवश्यक गरजांवर अवलंबून असते. या गरजा भागविण्याकरिता आपापसात संघर्ष निर्माण होतो. यातूनच चार्ल्‌स डार्विन यांच्या ⇨ नैसर्गिक निवड या सिद्धांताचा उगम झाला. नैसर्गिक प्राणिसमूहात दोन निरनिराळ्या जातींत नेहमीच संघर्ष असतो असे नाही. त्यांचे संबंध पुष्कळदा परस्परांशी समतोल असतात, असेही आढळून येते.

अंतर्जातीय सहजीवनाचा प्रारंभ एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच कोशिकेचे-पेशीचे-बनलेले आहे अशा) आणि बहुकोशिक या दोन प्रकारच्या प्राण्यांचा दुवा सांधणाऱ्या श्लेष्म कवक [⟶ कवक] या सजीवात झाला असे दिसते. बहुकोशिक प्राण्यांत निरनिराळी ऊतके (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांचे समूह) एकमेकांवर अवलंबून असतात. यातूनच पुढे त्या जातीतील निरनिराळ्या व्यक्ती एकमेकींवर अवलंबून असण्याचा क्रमविकास (उत्क्रांती) झाला असावा. लैंगिक जनन युग्मकांचे (प्रजोत्पादक कोशिकांचे) उत्पादन, जनकाकडून अंड्याची काळजी इ. घटकही प्राण्याच्या सामाजिक जीवनात फार महत्त्वाचे ठरतात.

संदेशवहनाचे निरनिराळे प्रकार आहेत. यांपैकी काही प्रकारांत सुरुवातीला काही महत्त्व नसावे; पण पुढे त्यांचा उपयोग संदेशवहनात करण्यात आला. उदा., पक्षी उड्डाण करण्यापूर्वी पंखांची हालचाल करतो. ती उडण्याच्या दृष्टीने आवश्यक असते; पण कालांतराने या हालचाली काही परिस्थितीच्या सूचक ठरतात व इतर पक्षी त्यांतून संदेश घेतात.

रासायनिक संदेशवहन बऱ्याच प्राण्यांत आढळते. प्रोटोझोआ, कृमी वगैरे प्राणी पाण्यातील रासायनिक पदार्थ ओळखून संदेश ग्रहण करतात. काही प्राणी बाष्पनशील (बाष्पात रूपांतर होणारी) रसायने शरीराबाहेर टाकून संदेशवहन करतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांची घ्राणेंद्रिये चांगली कार्यक्षम असल्यामुळे ते या इंद्रियांच्या साहाय्याने वास घेऊन संदेश ग्रहण करतात.

काही प्राणी दृश्य सूचक चिन्हांच्या साहाय्याने संदेश ग्रहण करतात. दृश्य चिन्हे रासायनिक चिन्हांपेक्षा जास्त प्रभावी असतात. या दृश्य चिन्हांत शरीराचे हावभाव, डोक्यावरील तुरे, मानेवरील आयाळ, अंगावरील विशिष्ट भागावरचे केस वगैरेंचा उपयोग केला जातो.

पृष्ठवंशी प्राणी

काही प्राणी एकमेकांबरोबर समूह करून राहतात; पण त्यांच्या राहण्यात कसलीही एकसूत्रता नसते. उदा., निरनिराळ्या जातींची झुरळे कानाकोपऱ्यात एका ठिकाणी राहतात. याउलट सामाजिक जीवन जगणाऱ्या काही विशिष्ट जातींच्या प्राण्यांच्या दैनंदिन जीवनात व प्रजोत्पादनात एक प्रकारची सुसूत्रता असते. अपृष्ठवंशी प्राण्यांत असे सहजीवन कीटकांत विशेष प्रामुख्याने आढळते. हे कीटक समूह करून राहतात व त्यांतील प्रौढ कीटक त्यांच्या शरीररचनेप्रमाणे निरनिराळी कामे वाटून घेतात. कोणत्याही सामाजिक जीवन जगणाऱ्या कीटकांच्या समूहाची तुलना एखाद्या प्रौढ प्राण्याशी करता येईल. कीटक समूहातील सारखे कार्य करणारे कीटक हे प्रौढ प्राण्याच्या शरीरातील ऊतकांप्रमाणे होत. जसे प्राण्याच्या दृष्टीने सर्व ऊतकांचे कार्य सुसूत्रतेने चालले पाहिजे, तसे कीटक समूहातील निरनिराळ्या कीटकांचे कार्यही सुसूत्रपणे चालले, तरच त्या समूहाचे सामाजिक जीवन योग्य तऱ्हेने चालेल.

कीटकांतील सामाजिक जीवनाचा उगम

मादी व तिने घातलेली अंडी या समूहापासूनच पुढे सामाजिक जीवनाचा उगम झाला असावा. अंड्यांचे व त्यांतून बाहेर येणाऱ्या डिंभांचे (भ्रूणानंतरच्या सामान्यतः स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असलेल्या पूर्व अवस्थांचे; अळ्यांचे) रक्षण करणे व त्यांना वाढविणे हा सामाजिक जीवनाचा पहिला टप्पा होय. यातूनच पुढे सामाजिक जीवन अस्तिवात आले असावे. काही कीटकांत सामाजिक जीवनाचा चांगलाच क्रमविकास झालेला आहे. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे होत.

गांधील माशी

या माश्यांपैकी व्हेस्पिडी कुलातील समूहाने राहणाऱ्या जवळपास एक हजार जाती आहेत. यांतील काही कीटकांच्या नांग्या फार प्रखर असतात. हे कीटक नासकी फळे व फुलांतील रस यांवर जगतात आणि आपल्या डिंभाकरिता हे रस व काही प्राण्यांच्या शरीरातील रस जमा करतात व त्यांचे पोषण करतात. त्यांचे पोळे कागदासारख्या पापुद्र्याचे असते. हा पापुद्रा लाकडाच्या रसापासून तयार केलेला असतो. डिंभांना या कीटकांनी अन्न दिले की, डिंभही एक प्रकारचा रस तोंडातून बाहेर टाकतात. या रसाची या कीटकांना जरूरी असते. याप्रमाणे कीटक व डिंभ एकमेकांना पूरक असे कार्य करीत राहतात.

या समूहात दोन प्रकारचे कीटक असतात. यांपैकी एक राणी कीटक व दुसरे कामकरी कीटक. एका समूहात एकापेक्षा जास्त राणी कीटक असू शकतात. पोलीस्टीस या जातीच्या गांधील माशीत एका समूहात एकच राणी असते व हा समूह एकाच हंगामापुरता राहतो. हा समूह नष्ट होण्यापूर्वी नवीन राण्या व नरांची पैदास होते आणि इतर कामकरी कीटक व जुनी राणी नष्ट झाली, तरी हे नवीन राणी व नर जिवंत राहतात व दुसऱ्या समूहाची स्थापना करतात. या नवीन राणीची पहिली प्रजा फक्त मादी कीटकांची असते. यानंतर राणी आपले पोळे सोडून जात नाही. तिला मादी प्रजेतून निर्माण झालेले कामकरी कीटक अन्न पुरवतात. कामकरी कीटक नवीन पोळे तयार करतात व त्यात सु. ५०० लहान गाळे असतात. या पोळ्याभोवती एक कागदासारखे वेष्टन असते व त्यात एक भोक असते आणि त्यातून कामकरी कीटकांची ये-जा चालू असते. राणी व कामकरी कीटक या दोहोंनाही स्वतःचे संरक्षण करण्याकरिता नांगी असते. [⟶ गांधील माशी].

धमाशी

हे गांधील माशीसारखेच कीटक होत; पण हे कीटक आपल्या डिंभांनासुद्धा शाकाहारी अन्न देतात. हे अन्न फुलातील पराग व मध या स्वरूपाचे असते. मधमाश्यांच्या २०, ००० जाती आहेत. त्यांपैकी सु, ५०० जातींत सामाजिक जीवन आढळते. सर्वसाधारणतः आढळणाऱ्या मधमाश्या याएपिस मेलिफेरा या जातीच्या आहेत. या मधमाश्या माणसाळविलेल्या आहेत. यांचे पोळे उभे टांगलेले असते. या पोळ्याच्या प्रत्येक घरात फुलांतील मधुरस साठविलेला असतो व त्यांत राणी माशी अंडी घालते व नंतर कोश तयार होण्यापूर्वी हे घर मेणाने बंद करते. एका पोळ्यात हजारो डिंभ असतात व एका डिंभास कोश तयार होण्यापूर्वी निदान २,००० वेळा तरी अन्न द्यावे लागते. यावरून कामकरी माश्या किती काम करत असतील, याची कल्पना येईल. नवी राणी माशी निर्माण झाल्यावर जुनी राणी व तिच्याबरोबर काही कामकरी माश्या पोळे सोडून जातात व दुसऱ्या योग्य जागी नवीन पोळे बांधतात. [⟶ मधमाशी].

मुंग्या

सामाजिक जीवन जगणाऱ्या कीटकांत मुंग्यांचा समूह फार मोठा आहे. यांच्या अदमासे ५,००० जाती आहेत. मुंग्या आपली वारुळे जमिनीत, झाडाच्या गाभ्यात अगर मातीने जमिनीवर बांधतात. यांचे वारूळ मधमाश्यांसारखे नीट बांधलेले नसते. कामकरी मुंग्या अन्नाचे कण व अंडी या वारुळात नेऊन ठेवतात. कामकरी मुंग्यांना पंख नसतात. मुंग्यांच्या काही जातींत कामकरी मुंग्या व राणी मुंगी आकारमानाने सारख्या असतात. कामकरी मुंग्यांचे डोळे राणी मुंगीपेक्षा निराळे असतात व त्यांना पंख व अंडकोश नसतात. मोठ्या आकारमानाच्या कामकरी मुंग्याचे डोके व जबडे मोठे असतात व त्यांना शिपाई मुंग्या म्हणतात. त्या वारुळाचे रक्षण करणे व अन्नाच्या मोठ्या आकारमानाच्या कणांचे रक्षण करणे व ते फोडणे ही कामे करतात. नर व राणी मुंगी यांना पंख असतात व त्यांची उत्पत्ती काही ऋतूंतच होते. नर व मादीचे मीलन उड्डाणात अगर जमिनीवर होते. मीलनानंतर राणी मुंगी आपले पंख तोडून टाकते व आपले वारूळ योग्य जागी बांधण्यास सुरुवात करते व अंडी घालते. त्यांतून हजारो कामकरी मुंग्या तयार होतात.

मुंग्यांच्या काही जातींत राणी मुंगीस सुरुवातीपासूनच पंख नसतात. जुन्या वारुळातूनच विभागणी होऊन नवी वारुळे बनतात. या जातींत राणी मुंगी उड्डाण करीत नाही. काही जातींत राणी मुंगी ही इतर जातींच्या मुंग्यांच्या वारुळात परोपजीवी (इतर सजीवांवर उपजीविका करणारी) म्हणून शिरते व तेथे आपली अंडी घालते. कालांतराने या वारुळाच्या अगोदरच्या राणी मुंगीस मारून स्वतःच राणी बनते. हिच्या अंड्यांपासून निर्माण झालेल्या डिंभांचे पूर्वीच्या कामकरी मुंग्या पालनपोषण करतात व कालांतराने त्या मरून जातात. नवीन निर्माण झालेल्या कामकरी मुंग्या व परोपजीवी म्हणून या वारुळात आलेली राणी मुंगी अखेर या वारुळाची मालक बनते. मुंग्यांचे पूर्वज गांधील माश्या होत व त्यांच्याप्रमाणेच मुंग्या ह्याही इतर कीटकांचा त्यांना मारून अन्न म्हणून उपयोग करतात. काही जातींच्या मुंग्या ⇨ मावा या जातीच्या कीटकाने उत्सर्जित केलेल्या गोड पदार्थाचा अन्न म्हणून उपयोग करतात व या कार्याकरिता त्या मावा जातीच्या कीटकांना आपल्या वारुळात आश्रय देतात. माणूस दुधाकरिता गायीसारखे जनावर बाळगतो, यासारखाच हा प्रकार होय, म्हणून या मावा जातीच्या कीटकांना ‘मुंगीच्या गाई’ असे संबोधिले आहे. काही जातींच्या मुंग्या आपल्या पोटात मधुरसाचा साठा करतात व जरूर भासेल तेव्हा इतर कामकरी मुंग्यांकरिता हा मधुरस तोंडातून बाहेर टाकतात.

काही जातींच्या मुंग्यांना पीक गोळा करणाऱ्या मुंग्या असे म्हणतात. या मुंग्या बारीक धान्यकणांची साठवण करून ठेवतात. काही मुंग्या विशिष्ट कवकाची त्यांच्या वारुळात लागवड करतात व त्यावर जगतात. या जातीत मोठ्या आकारमानाच्या मुंग्या शिपाई-मुंग्या म्हणून काम करतात व वारुळाचे रक्षण करतात. मध्यम आकारमानाच्या मुंग्या कवकाची लागवड करण्याकरिता बाहेरून पानाचे तुकडे वगैरे वारुळात आणतात, तर लहान आकाराच्या कामकरी मुंग्या वारूळ सोडून न जाता आतच कवकाची जोपासना करतात. मीलन उड्डाणापूर्वी कवक खाणारी ही मुंगी एक कवकाचा पुंजका आपल्या तोंडाखालील पिशवीत घेते. मीलन झाल्यावर ती परत वारुळात येते आणि तो कवकाचा पुंजका खाली ठेवून त्यावर मलोत्सर्जन करते व त्यावर आपली फलित अंडी घालते. अंड्यांतून डिंभ बाहेर पडल्यावर ते या कवकावर जगतात. या अंड्यांतून सु. ४० दिवसांत लहान आकारमानाच्या कामकरी मुंग्या बाहेर येतात व कवक बगीच्याची देखभाल सुरू करतात. त्यानंतर मोठ्या आकारमानाच्या कामकरी मुंग्या तयार होतात व वारूळ वाढविण्याच्या कामास लागतात. या वारुळाचे आकारमान ४५ सेंमी. व्यास व ५-६ मी. खोली इतके असू शकते. त्याला हजारो भोके असतात व त्यांतून मुंग्यांची ये-जा सुरू असते.

काही जातींच्या मुंग्यात गुलामगिरीची प्रथा आढळते. अशा वारुळातील राणी मुंगी ही आक्रमक राणी मुंगी असते. तिने वारुळावर आक्रमण केल्यावर त्या वारुळात असलेले पूर्वीच्या राणी मुंगीच्या डिंभांचे ती स्वतः पालनपोषण करून त्यांना वाढविते व याप्रमाणे तयार झालेल्या कामकरी मुंग्या या नव्या आक्रमक राणी मुंगीच्या अंड्याचे रक्षण व डिंभांचे पालनपोषण करतात. पर्यायाने जुनी राणी मुंगी मारली जाते अगर मरते. गुलाम कामकरी मुंग्यांची संख्या घटू लागल्यास नव्या मुंग्या शेजारच्या वारुळातून नवीन गुलाम म्हणून धरून आणतात व गुलाम-कामकरी मुंग्यांच्या संख्येत भर टाकतात. गुलमगिरीची प्रथा ही अगदी आवश्यक नसते. ही प्रथा असलेल्या वारुळातील मुंग्या गुलाम नसतानासुद्धा सर्व कामे करू शकतात; पण ॲमेझॉन मुंग्या याला अपवाद आहेत. या मुंग्यांच्या वारुळात गुलाम असल्याशिवाय कामेच होत नाहीत; एक गुलाम-कामकरी मुंगी दहा ॲमेझॉन मुंग्यांना खाणे पुरवू शकते; पण जर गुलाम-कामकरी मुंग्या नसतील, तर पुष्कळ अन्न उपलब्ध असूनही ॲमेझॉन मुंग्या ते घेऊ शकत नाहीत. इतका परावलंबीपणा त्यांच्यात आलेला असतो.

ऱ्याच मुंग्या एका विशिष्ट जातीच्या झाडांच्या पानाला, काट्याला किंवा झाडांच्या पोकळीत त्यांचे वारूळ करणे पसंत करतात. झाडांपासून या मुंग्यांना आसरा मिळतो, याच्या बदल्यात या मुंग्या इतर शत्रूंपासून झाडांचे संरक्षण करतात. ॲकेशिया वंशातील एका झाडाचा व मुंग्यांचा संबंध वरील प्रकारचा आहे.

काही सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्या आपल्या वारुळात इतर कीटकांना पाहुणे म्हणूनही राहू देतात. या पाहुण्यांकडून वारुळातील इतर कामकरी मुंग्यांना काही स्राव पुरविले जातात. [⟶ मुंगी].

वाळवी

वाळव्या व मुंग्या यांच्या सामाजिक जीवनात बरेच सादृश्य आहे, तरी त्यांची उत्पत्ती मात्र भिन्न आहे. मुंग्यांची उत्पत्ती गांधील माश्यांपासून झाली आहे, तर वाळव्यांची उत्पत्ती झुरळांपासून झाली आहे. वाळवीची वाढ अपूर्ण रूपांतरणाने होते. काही बाबतींत मुंग्यांत व वाळव्यांत फरक आहे. वाळलेली पाने, लाकूड वगैरे पदार्थ हे वाळवीचे भक्ष्य होय. वाळवीच्या सु. २,००० जाती आहेत. मुंग्यांच्या वारुळात राणी मुंगी व कामकरी मुंग्या या स्त्रीलिंगी असतात, तर वाळवीमध्ये नर व माद्या (राण्या), शिपाई आणि कामकरी वाळवी असे प्रकार आहेत. पंख असलेल्या जननक्षम वाळवीचे कीटक उड्डाण करतात व उड्डाण झाल्यावर जमिनीवर उतरतात. नंतर त्या स्वतःचे पंख तोडून टाकतात. हे सर्व झाल्यावर नर कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात व मादी फलित अंडी घालण्याकरिता झाडाच्या फटी अगर त्यांसारखी जागा शोधते. पहिली अर्भके बराच काळ कामकरी म्हणून जातात. यांपैकी काहींचे शिपायात रूपांतरण होते. वाळव्यांचा समूह या प्रकारांनी पुष्कळ मोठा झाला म्हणजे मग जननक्षम वाळवीची पैदास होण्यास सुरुवात होते.

वाळवीच्या राणीच्या अंडकोशाची वाढ खूप मोठी होते. या वाढीमुळे तिचे उदर १० सेंमी. लांब होते. काही कालानंतर अशी राणी दर दिवसाला ८,००० अंडी कित्येक वर्षांपर्यंत घालू शकते. नर त्या राणीजवळ तिच्या आयुष्यभर राहतो व त्याचे नियतकालिक मीलन व अंड्यांचे फलन होत राहते. अशा या आद्य नर व राणीचा मृत्यू झाला, तर अर्भकांतून नवा नर व राणी निर्माण होते.

वाळवीच्या शिपाई प्रकारच्या कीटकांना पंख व डोळे नसतात. त्यांच्या जनन तंत्राची (जनन संस्थेची) वाढही नीटशी झालेली नसते. ते वारुळाचे रक्षण करतात. त्यांना स्वतः खाता येत नाही. अर्भके किंवा कामकरी कीटकांनी त्यांना अन्न भरवावे लागते. त्यांच्या डोक्यावर असलेल्या ग्रंथीचा स्राव बाहेर फेकून ते शत्रूचा नाश करतात. काही वाळवी कीटकांत दोन प्रकारचे शिपाई असतात. त्यांत काही मोठ्या आकारमानाचे व मोठ्या जंभाचे (जबड्याचे) शिपाई व काही लहान आकारमानाचे पण डोक्यावर मोठी ग्रंथी असलेले असतात. या ग्रंथीचा स्राव त्वरित उडून जातो व जवळ येणाऱ्या शत्रूचा प्रतिकार करण्यास त्याचा उपयोग होतो. वाळवीच्या समूहात पूर्णावस्थेत न पोहोचलेली बरीच लहान अर्भके असतात आणि ती वारूळ बांधणे वगैरे वारुळाची कामे करतात. वाळवीची वाढ जरा मंद असल्यामुळे अशी बरीच लहान अर्भके वाळव्यांच्या समूहात आढळतात.

वाळवीच्या बऱ्याचशा जाती लाकूड खाणाऱ्या असतात. त्यांचे वारूळ जमिनीत व कधीकधी जमिनीवर सु. ९ मी. उंचीचे असू शकते. काही वाळव्यांच्या वारुळांत इतर कीटकही आढळतात. हे कीटक वाळवीस उपयुक्त अशी मदत करतात. [⟶ वाळवी].

लिं प्रकारभेद

मुंग्यांच्या प्रकारात साधारणपणे अफलित अंड्यापासून नर व फलित अंड्यापासून मादी तयार होते, याला अपवादही आहेत. राणी मुंगी अफलित आणि फलित अशी दोन्ही प्रकारची अंडी घालते व त्यांपासून अफलित असल्यास नर व फलित असल्यास माद्या तयार होतात. काही कामकरी मुंग्याही अंडी घालतात कारण कामकरी मुंग्या ह्या मुळात मादी प्रकारच्या असतात. ही अंडी अफलित असतात व अशा अंड्यांपासून नर कीटक निर्माण होतात.

धमाश्यांत राणी माशीने अंडी घालताना ती फलित घालावीत की अफलित घालावीत, हे पोळ्याच्या घराच्या आकारमानावर अवलंबून असते. राणी माशीच्या शुक्राणू ग्राहिकेत (पुं-जनन कोशिका ग्रहण करून साठविणाऱ्या पिशवीसारख्या अवयवात) मीलनानंतर पुष्कळ शुक्राणू भरलेले असतात व या शुक्राणूंचा उपयोग ती जरूर वाटेल तेव्हा करते. जर पोळ्याचे घर लहान असेल, तर फलित अंडी घातली जातात व त्यांपासून कामकरी माश्या तयार होतात; पण जर घर मोठे असेल, तर अफलित अंडी घातली जातात व त्यांपासून नर तयार होतात. यावरून असे दिसते की, कामकरी माश्यांनी पोळे बांधताना किती घरे लहान ठेवायची व किती घरे मोठी ठेवायची हे ठरविलेले असते व या पर्यायी योजनेमुळे समूहात नवीन किती कामकरी माश्या होतील व किती नर होतील, हे ठरविले जाते.

काही अंड्यांपासून राणी माश्या तयार होतात, तर काहींपासून कामकरी माश्या तयार होतात. याला बहुतांशी आजूबाजूची परिस्थितीच कारणीभूत असते. मधमाश्यांत असे प्रकार डिंभावस्थेतच ठरविले जातात. पोळ्यात ज्या घरात राणी माशी होणारे अंडे ठेवले जाते तेथे डिंभावस्थेत असताना कामकरी माश्या आपल्या ग्रसनीय (घशातील) ग्रंथीतील दुधाने डिंभाचे पोषण करतात, तर इतर घरांत जेथे कामकरी माश्या निर्माण होणारी अंडी ठेवली जातात, तेथे डिंभाचे पोषण मध व परागकणांनी केले जाते. याला ‘ब्रेड’ म्हणतात. त्यांच्या अन्नात फरक करून मादी डिंभाचे अडीच ते तीन दिवसांपर्यंत राणी अगर कामकरी या प्रकारात परिवर्तन करण्यात येते.

धमाशीच्या पोळ्यात राणी माशी होणारे अंडे घालण्याकरिता घर करावे की नाही हे कामकरी माश्या ठरवितात व हे ठरविण्यावर ⇨ फेरोमोन या रासायनिक द्रव्याचे नियंत्रण असते. हे द्रव्य राणी माशीच्या ग्रंथीतून स्रवत असते व जोवर हा स्राव कामकरी माश्यांना मिळत असतो तोवर त्या राणी माशी तयार होणारी अंडी घालण्याकरिता पोळ्यात घर करीत नाहीत. या फेरोमोनला ‘राणी पदार्थ’ म्हणतात. राणी माशी जर मेली, तर थोड्याच वेळात कामकरी माश्या पोळ्यात राणी माशी तयार होणाऱ्या अंड्याकरिता घर तयार करतात.

वाळवीमध्ये राणी, कामकरी वगैरे प्रकार निर्माण करणारी पुष्कळ फेरोमोन द्रव्ये आहेत. नर व राणीमादीपासून तयार होणारी ही फेरोमोने कामकरी कीटक चाटून घेतात आणि त्यामुळे जरी कामकरी कीटकांत जननक्षमता असली, तरी या फेरोमोनांमुळे ती रोखली जाते. वाळवीच्या समूहात शिपायांची संख्या १०% असते व ती वाढू नये म्हणून शिपाई कीटक विशिष्ट फेरोमोन निर्माण करतात व ही संख्या रोखतात; पण जर काही कारणाने ही संख्या कमी झाली, तर फेरोमोनाचे प्रमाण कमी होते व शिपाई कीटकांच्या संख्येत वाढ होते. या कीटकांत सुरुवातीस प्रकार निर्माण झाले ते परिस्थितिनुरुप झाले; पण आता क्रमविकासामुळे त्यांच्या मुळाशी आनुवंशिक तंत्र असावे असे वाटते.

संदेशवहन : कीटकांच्या संदेशवहनावरही बरेच संशोधन झाले आहे. मधमाशीस मध जमा करण्याकरिता पोळ्यापासून दूर जावे लागते. त्या पुन्हा आपल्या पोळ्यात परत येतात व आपल्या सहकाऱ्यांना काही विशिष्ट हावभावाने मध आणण्यास कोठे जावयाचे हे कळवितात. या त्यांच्या वर्तनावर जर्मन शास्त्रज्ञ कार्ल फोन फ्रिश यांनी बरेच संशोधन केले आहे. मार्टीन लिंडावर या शास्त्रज्ञांना बऱ्याच संशोधनानंतर असे आढळले की, मधमाश्यांचे आपल्या पोळ्यावर सतत लक्ष असते आणि जरूर पडेल तेव्हा सामाजिक काम करण्यास सर्व माश्या एकदम तयार होतात. या कामासाठी सुद्धा फेरोमोन सोडली जातात. जेव्हा मधमाशी नांगी मारते तेव्हा ती फेरोमोनाच्या साह्याने इतर माश्यांनीही तसे करावे असे सुचविते.

पृष्ठवंशी प्राणी : मनुष्य सोडून इतर पृष्ठवंशी प्राण्यांत कीटकांसारखे व्यवस्थित सामाजिक जीवन आढळत नाही. याचे कारण पृष्ठवंशी प्राण्यांत प्रत्येक व्यक्ती जननक्षम असते. कीटकांसारख्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या समूहात वंध्य प्रकार निर्माण होत नाहीत. त्यामुळे कीटकांत जसा सर्व समूह मिळून एक व्यक्तीसारखा वागतो, तसे येथे घडत नाही.

मासे : या प्राण्यांत राज्यक्षेत्रीय सार्वभौमत्व, श्रेणीबंध, कुलसमूह वगैरे सामाजिक दृश्य घटना आढळतात. निरनिराळ्या जातींच्या माशांचे लहानलहान संप्रदाय हंगामानुसार अस्तिवात येतात. जर या संप्रदायातून एखाद्या माशास अलग काढले व पुन्हा नजीकच पाण्यात सोडले, तर तो आपल्या संप्रदायाच्या शोधार्थ धावू लागतो. या कामात तो दृश्य, रसायनानुचलनी (रासायनिक उद्दीपनाच्या सापेक्ष एका निश्चित दिशेने हालचाल होणे) आणि कंपन अशा तऱ्हेच्या खुणांचा अवलंब करतो; पण जनन ऋतू आला म्हणजे संप्रदायातून काही मासे वेगळे होतात व आपापले निराळे राज्यक्षेत्र निर्माण करतात.

का संप्रदायात राहणारे मासे आपली हालचाल परस्परांना पोषक होईल अशा तऱ्हेने करतात. संप्रदायात राहणाऱ्या माशांना संरक्षण मिळते व हालचालीतही त्यांना कमी त्रास पडतो. सर्वांत पुढे असणारे मासे वेगाने पोहताना वेगाने पाणी तोडतात व त्यामुळे मागील माशांना पाण्याच्या प्रतिरोधाचा तितकासा त्रास होत नाही. संप्रदायातील माशांची संख्या मोठी असल्यामुळे अन्न शोधण्यास सोपे जाते. एका माशास वैयक्तिक रीत्या जे अन्न शोधण्यास त्रास पडेल ते जास्त संख्येने संप्रदायात असलेल्या माशांना सोपे पडते. संप्रदायात असणाऱ्या माशांना शत्रूपासून एकमेकांचे संरक्षण करणेही सोपे जाते.

माशांच्या प्रजोत्पादनातही सामाजिक जीवन आढळते. काही जातींच्या माशांत मादीने अंडी दिल्यावर नर अगर मादी या अंड्यांची काळजी घेतात. माशांचे घरटे पानांचे अगर बुडबुड्यांचे असते व जवळपास नर अगर मादी त्याचे रक्षण करीत असते. काही माश्यांच्या जातीत ही फलित अंडी नर अगर मादी तोंडात ठेवतात व डिंभ तयार होईतोपर्यंत त्यांचे रक्षण करतात. जसजशी फलित अंड्यांच्या रक्षणाची व्यवस्था चांगली होत जाते, तसतसे अंडी देण्याचे प्रमाणही घटत जाते व अंड्याचे आकारमानही वाढत जाते. थोडक्यात सांगायचे म्हणजे माशांच्या जातीत संप्रदाय पद्धत अवलंबिली जाते व थोड्याफार प्रमाणात सामाजिक जीवन आढळते.

भयचर प्राणी

(जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी). या प्राण्यांत विशेष प्रगत असे सामाजिक जीवन आढळत नाही. अंडी घातल्यानंतर त्यांची काळजी घेणे हेच प्रामुख्याने आढळते. ही काळजी नर अगर मादी याजकडून घेतली जाते. काही जातींत प्रजननाच्या वेळी बरेच उभयचर प्राणी सांघिक वर्तन दर्शवितात. मोठ्या संख्येने ते प्रजननासाठी विवक्षित स्थळी जातात. या वेळी सर्व बेडकांचे एकसमयावच्छेदेकरून ओरडणेही ऐकू येते. सॅलॅमँडरच्याक्रिप्टोब्रँकस या वंशात नर अंड्यांचे रक्षण करतो, तर ॲनिडीस या वंशात हेच काम मादी करते. ॲलिटीस या भेकाच्या वंशात नराच्या पाठीवर व शरीराभोवती अंड्यांचे वेष्टण तयार होते. सूरिनाम भेक या प्राण्याची मादी आपल्या पाठीवर स्वतःच्या कातडी पिशव्यात अंडी ठेवते. अंड्यांचे फलन झाल्यावर नर ही अंडी मादीच्या पाठीवर असलेल्या पिशव्यांत ठेवतो. चिलियन बेडकाचा नर अंड्यांचा पुंजका आपल्या तोंडात घेतो व तेथून ती अंडी ध्वनिकोशांत (घशाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या दोन पिशव्यांत) व्यवस्थित ठेवून देतो. काही उभयचर प्राण्यांत (उदा., पूर्व आफ्रिकी भेक-नेक्टोफ्रायनॉइडीस व्हिव्हिपॅरा) अंड्यांची वाढ मादीच्या गर्भाशयात होते व ती योग्य वेळी पिले प्रसवते. वरील विवेचनावरून असे आढळून येईल की, उभयचर प्राण्यांत अंड्यांची काळजी घेण्याव्यतिरिक्त इतर प्रकारचे सामाजिक जीवन आढळून येत नाही.

रीसृप प्राणी : (सरपटणारे प्राणी). या प्राण्यांतही जटिल प्रकारचे सामाजिक जीवन आढळत नाही. सरड्यांच्या काही जातींत प्रदेशमर्यादेचे सार्वभौमत्व राखण्यासाठी नर सदैव तत्पर असतात. आपल्या घरकुलाचे संरक्षण करण्यापलीकडे अंड्यांची विशेष काळजी घेतली जात नाही. काही सरीसृप प्राण्यांत सांघिक शीतनिष्क्रियतेच्या (हिवाळ्यात अंशतः वा पूर्णपणे सुस्त अवस्थेत जाण्याच्या) तंत्राचा अवलंब केला जातो.

क्षी : पक्ष्यांचे सामाजिक जीवन बरेच प्रगत आहे व बऱ्याच काळापासून याचा अभ्यास चालू आहे. पक्ष्यांच्या सामाजिक जीवनात थव्याने राहणे, जोडप्याने राहणे, अंड्यांची काळजी व रक्षण, प्रदेश सार्वभौमत्व, सांघिक घरटी करणे, वैयक्तिक घरटी करणे व स्थलांतरण या सर्व क्रियांना फार महत्त्व आहे.

क्ष्यांचा थवा सुसूत्र असण्यास समकालीकरण नियंत्रण असणे आवश्यक असते. हे नियंत्रण प्रतिसाद तंत्राने आणले जाते. या तंत्रात पक्ष्यांच्या आवाजास फार महत्त्व आहे. निरनिराळे आवाज काढून पक्षी एकमेकांस खुणा अगर आदेश देत असतात. हे आदेंश पक्षी थव्याने उडत असताना अगर जमिनीवर उतरून भक्ष्य शोधत असताना दिले जातात. याप्रमाणे थव्याने सरळ जावयाचे की, दिशा बंदलावयाची याच्याही खुणा आहेत. प्रत्येक थव्यात एक किंवा अनेक म्होरके असतात. एका जातीच्या पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या जवळजवळ घरटी बांधतात व या घरट्यांचे सांघिक रीतीने रक्षण करतात. पक्ष्यांच्या काही जातींत घरटी असलेल्या सबंध प्रदेशाचे सार्वभौमत्व रक्षिले जाते, तर इतर काही पक्ष्यांत फक्त घरट्याच्या दरवाज्याचे रक्षण केले जाते. जागेची कमतरता असेल तेव्हा या सांघिक घरटी बांधण्याच्या तत्त्वाचा वापर केला जातो. बऱ्याचश्या सागरी पक्ष्यांत कोणत्या तरी लहान बेटावर असली घरटी बांधण्याची पद्धत आहे.

काही पक्ष्यांत एकाच घरट्यात दोन निरनिराळ्या जातींच्या माद्या आपली अंडी घालतात. कोकिळा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते, हे सर्वश्रुतच आहे. क्रोटोफॅजिनी या कोकिळेच्या उपकुलात एका समूहात जवळपास बारा पक्षी असतात. हा समूह आपल्या घरट्याचे, अन्नाचे व आपल्या प्रदेशाच्या रक्षणाचे काम सामूहिक रीतीने करतो. या उपकुलातील पक्ष्यांत नर-मादीच्या जोडीचे बंध इतके पक्के नसतात व त्यांच्यात बहुपत्नीकत्व आढळते. उपकुलातील माद्या घरट्याकरिता भांडत नाहीत. उलट एकाच घरट्यात पुष्कळशा माद्या अंडी घालतात. नर-मादीचे संबंध दृढ नसण्याचे कारण त्यांच्या शरीरक्रियात्मक रचनेत फरक हे असू शकेल. या पक्ष्यांत प्रणयाराधनाचा काल थोडा असतो व अंडमोचन क्रिया उत्स्फूर्त असते. त्यामुळे अंडी फलित करण्यास जो नर जवळ असेल त्याचा मादी उपयोग करते व प्रणयाराधनाने होणारे बंध शिथिल होतात. फलित अंड्याची पूर्ण वाढ होईपर्यंत ती उबविणे व त्यांचे रक्षण करणे ही कामे साधारणतः मादीची असतात; पण काही जातींत नरही या कामास हातभार लावतात [⟶ पक्षि वर्ग]. पक्ष्यांच्या स्थलांतरातही पक्ष्यांचे सामजिक जीवन आढळते [⟶ प्राण्यांचे स्थलांतर].

स्तन प्राणी

सस्तन प्राण्यांत नर-मादीचे संबंध नरवानर (प्रायमेट्स) व मांसाहारी (कार्निव्होरा) या गणांतील प्राणी सोडून विशेष दृढ नसतात. नर-मादीचा मीलनापुरताच संबंध येतो व पुढे प्राणी जन्मल्यावर माता व मूल यांचा संबंध बराच काळ टिकतो. समूहजीवन, कळपाने राहणे, कळपाने स्थलांतर करणे वगैरे सामाजिक जीवनाचे प्रकार सस्तन प्राण्यात आढळतात.

न्सेक्टिव्होरा (कीटकभक्षी) या गणातील चिचुंदरी या प्राण्यात नर व मादी क्वचितच एकत्र राहतात. मादी व तिची पिले यांचाच समूह नेहमी आढळतो. यांच्यात समूहजीवन आढळत नाही.

कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) गणात निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक जीवन आढळते. यूरोपियन हॅमस्टर समूहाने राहत नाही; मादी व तिची पिले यांचाच समूह तिच्या बिळात असतो. ती इतर हॅमस्टरला आपल्या बिळात येऊ देत नाही. नराला मीलनाकरिता मादीकडे जावयाचे असेल तेव्हा तो आपल्या ग्रंथीतून एक वासाचे रसायन बिळाच्या तोंडाशी सोडतो. नॉर्वे रॅट या प्राण्यात समूह-जीवन आढळते. हे समूह आपल्या बिळाचे व प्रदेशाचे सार्वभौमत्व राखण्यात नेहमी तत्पर असतात.

कुत्र्यांच्या काही जातींत समूहजीवन जगण्याची पद्धत आहे. या समूहात एक नर, पुष्कळशा माद्या व पिले असतात. ही कुत्री इतर जातीच्या कुत्र्यांना आपल्या समूहात घेत नाहीत व आपल्या प्रदेशावरची सत्ता टिकवून असतात.

खुरी (हरणे, शेळ्या, मेंढ्या इ. अंग्युलेट) प्राण्यांत मूळ समूह मादी व तिची वासरे यांचाच असतो. वासरू जन्मल्यावर आपल्या आईबरोबर हिंडूफिरू लागते. समूहाचे आकारमान त्या त्या भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून असते. दाट जंगले असलेल्या भागात समूह लहान असतात, तर उघड्या गवताळ भागात हे मोठे असतात. गवताळ जमीन मोठ्या समूहाला अन्न पुरवू शकते; पण याचा एक परिणाम असा होतो की, या प्राण्यांची पारध करण्याची पात्रता कमी होते.

काही खुरी प्राण्यांत नर-मादी मीलन समूहातील माद्यांच्या संख्येवर अवलंबून असते, नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो. रेनडियर या प्राण्यांत नरास मोठाली शिंगे असतात. या प्राण्यांत नर एकमेकांशी झुंजतात व अखेर जो नर विजयी ठरेल त्याच्याकडे मादीसमूहाची मालकी जाते. हा मादीसमूह म्हणजे त्याचा जनानखाना होतो. इतर काही खुरी प्राण्यांच्या समूहात नर इतके आक्रमक नसतात. अशा समूहात पुष्कळदा एकापेक्षा जास्त नर असतात; पण या नरांत अधिपती श्रेणी असते आणि जो नर सर्वांत उच्च असतो तोच सर्वांत जास्त प्रजोत्पादनाचे कार्य करतो.

मांसाहारी गणातील जनावरे लहान व तरुण असताना समूह करून राहतात व एकमेकांशी खेळतात व बागडतात; पण हीच जनावरे मोठी झाली मी, एकेकटे जीवन कंठू लागतात. याचे कारण मुख्यतः भक्ष्य शोधण्यासाठी त्यांना हळूच व एकेकटे जावे लागते. मांसाहारी प्राण्यांची पिले जन्मतः आईवर अवलंबून असतात व काही दिवस त्यांच्या संगोपनाची व संरक्षणाची जबाबदारी मादीवरच असते.

मांसाहारी प्राण्यातील सामाजिक जीवनाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत : (१) ज्या जातीत नर-मादी संबंध दीर्घकाळ असतो व जेथे लहान समूहजीवन असते त्या जातीत मादी विण्याच्या वेळी तिला अन्न पुरविण्याचे काम या समूहाकडून होते. उदा., लांडगे, कोल्हे. (२) काही जातींत एकाच गुहेचा निरनिराळ्या माद्या विण्यासाठी उपयोग करतात. उदा., युरोपियन बिजू. (३) ज्या जातींत नर-मादी संबंध बराच काळ टिकतो. उदा., सिंह. (४) ज्या जातींत नर-मादी संबंध फक्त मीलनापुरताच असतो. उदा., मांजर.

द मांजर, सागर सिंह वगैरे पाण्यात राहणारे मांसाहारी प्राणी प्रजोत्पादनासाठी जमिनीवर येतात. या जातींच्या प्राण्यांत प्रजोत्पादनापूर्वी नर भांडतात व सगळ्यांत बलिष्ठ असलेला नर सर्व माद्यांचा जनानखाना आपल्या ताब्यात घेतो. या समूहात नर मादीपेक्षा आकारमानाने दुप्पट तिप्पट मोठा असतो. याउलट सील या प्राण्यात जनानखाना आढळत नाही.

रवानर गणात (१) लेमूर व (२) उच्च वानरवर्गीय प्राणी यांची गणना होते.

लेमूर हे निशाचर प्राणी होत. हे कीटक, लहान पृष्ठवंशी प्राणी व काही लहान वनस्पती यांवर उपजीविका करतात. त्यांचे नर-मादी संबंध नित्य नसतात. साधारणपणे एका वेळी ते एका पिलाला जन्म देतात व त्याचे पालनपोषण दीर्घकाळ करतात. ते समूहाने राहतात व त्यांच्या समूहात नर व माद्या असतात. [⟶ लेमूर].

माकडे व कपी यांचे सामाजिक जीवन बरेच वरच्या दर्जाचे आहे. माकडे साधारणपणे कुटुंबसंस्था करून राहतात. या कुटुंबात नर, मादी व त्याची लहान पिले असतात. हनुमान माकड व तत्सम इतर माकडे समूह करून वावरतात. हे समूह पुष्कळदा तीन प्रकारचे असतात : (१) यात सर्व माद्या व त्यांची पिले व या सर्वांबरोबर एक नर; (२) यात पिले नसलेल्या माद्या व नर आणि (३) फक्त नर. सर्व माकडे आपली निवाऱ्याची जागा निश्चित करतात आणि या जागेचे इतर शत्रूंपासून रक्षण करतात. चिंपँझी हा आपला एक विशिष्ट प्रदेश ठरवून ठेवतो व त्यात एक विवक्षित स्थळ न ठरविता कोठेही हिंडत राहतो. तो इतर चिंपँझीमध्येही मिसळतो व पुन्हा एकटा हिंडतो. चिंपँझीचे समूह बनतात व पुन्हा मोडतात. एकच समूह सारखा टिकून राहत नाही. अशा वर्तणुकीमुळे चिंपँझी माकड हा जास्त मिसळणारा प्राणी आहे [⟶ चिंपँझी]. याउलट हाउलर माकड व बॅबून हे आपल्या समूहात इतर माकडांना येऊ देत नाहीत.

गोरिला माकडांत सर्वांत वयाने वडील असलेले माकड सर्व समूहाचे नियंत्रण करते [⟶ गोरिला].

बॅबून माकडात समूहाचे नियंत्रण वयाने वडील असलेल्या बॅबूनकडे असते; पण समूहाच्या पुढील व बाहेरील बाजूस तरुण बॅबून माकडे असतात व ती धोक्याची अगर इतर सूचना समूहास देतात. [⟶ बॅबून].

स्वतःचे स्वामित्व गाजविण्याची वृत्ती इंडियन लंगूर या माकडांत नसते. याउलट ऱ्हीसस व बॅबून माकडे यांना स्वतःच्या स्वामित्वाची फार तीव्रपणे जाणीव असते. वर्चस्व गाजविण्याची भावना या प्राण्यांत शिक्षणाच्या प्रक्रियेने व अनुभवाने येते. पूर्ण वाढ झालेले नर माद्यांवर व लहान माकडांवर प्रभुत्व गाजवितात. एका समूहातील नर व माद्या ही अधिपती श्रेणी आढळते. जो बलवान नर असतो त्याला अन्न व मीलन यांचा प्रथम अधिकार असतो व त्यामुळे समूहात त्याचे स्थान उच्च असते.

रवानरांमध्ये इतरही पुष्कळ बदल झाले आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक दिनचर असून शाकाहारी आहेत. मादी एकाच पिलास जन्म देते व पिलू जन्मताच आईच्या पोटास चिकटते आणि त्याची वाढ व इतर शिक्षण होण्यास बरेच दिवस लागतात. माकडांचे सामाजिक जीवन इतर प्राण्यांच्या मानाने जरी वरील पातळीवर असले, तरी काही बाबतींत ते मागासलेलेच आहे. उदा., माकडे मिळालेले अन्न एकमेकांत वाटून घेत नाहीत. उलट त्याकरिता आपापसात भांडतात. माकडांच्या सामाजिक जीवनाचे प्रमुख उद्देश म्हणजे आपली प्रादेशिक अखंडता कायम ठेवणे व ती कायम ठेवण्याकरिता समूहाने प्रतिकार करणे किंवा माजावर असलेली मादी मिळविणे, हे होत.

मानवाचे सामाजिक जीवन इतर प्राण्यांच्या मानाने बरेच प्रगत झाले आहे. या सामाजिक जीवनात समाजकार्याचे विभाजन होऊन त्यामुळे ⇨ वर्णव्यवस्था निर्माण झाली. पुढे जेव्हा आर्थिक परिस्थितीवर समाजरचना आधारली गेली तेव्हा सुरुवातीस निर्माण झालेल्या वर्णव्यवस्थेत बदल होत गेला. नवीन समाजरचनेत प्रत्येक व्यक्तीस आपला व्यवसाय निवडण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. मानवाचे सामाजिक जीवन जरी या विचारसरणीवर आधारले असले, तरी अजूनही कुटुंबव्यवस्थेत व प्रजोत्पादनात व्यक्तिस्वातंत्र्य बऱ्याच प्रमाणात राखले आहे. सर्व प्राण्यांच्या सामाजिक जीवनाचा विचार करता असे आढळते की, प्राण्यांचे समूह जास्त जास्त जटिल, परस्परावलंबी व एकात्मक होत जातात. यामुळे त्या त्या जातीचे उत्तरजीवित्व वाढते हा क्रमविकासाच्या दृष्टीने एक फायदा होय; पण याबरोबरच त्या जातीच्या आक्रमक वृत्तीचा लोप होत नाही. जेव्हा आपण मानवाच्या सामाजिक जीवनाचा या दृष्टिकोणातून विचार करतो तेव्हा त्याच्या जटिल सामाजिक जीवनाबरोबरच त्याच्यातील सुप्त आक्रमक वृत्तीचाही विचार करावा लागेल. [⟶ समाज; सामाजिक नियंत्रण; सामाजिक प्रक्रिया; सामाजीकरण].

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate