অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मांसाहारी गण

मांसाहारी गण

(कार्निव्होरा). स्थूलमानाने कोणत्याही मांस खाणाऱ्या प्राण्याला मांसाहारी प्राणी म्हणता येईल. काटेकोरपणे पाहू गेल्यास या गणात मुख्यत्वेकरून स्तनी प्राण्यांतील मांसभक्षक प्राण्यांचा समावेश होतो. सिंह, वाघ, चित्ते, सील, खोकड, कोल्हे तसेच रानटी व माणसाळविलेली कुत्री, मांजरे हे स्तनी मांसाहारी प्राणी होत. यांचे दात व त्यातल्या त्यात चार लांब व टोचण्यास योग्य असे सुळे हे यांचे वैशिष्ट्य होय. या दातांमुळे त्यांना भक्ष्याच्या मांसाचे लचके तोडता येतात. पुष्कळशा जातींतील प्राण्यांची नखरेही (नख्याही) भक्ष्य पकडण्यास उपयुक्त अशी असतात.

साधारणतः या गणातील सर्व प्राणी चपळ, बुद्धिमान व शूर असतात. त्यांचे नेत्र व घ्राणेंद्रिय अत्यंत संवेदनाक्षम असतात. वीझलसारखे काही प्राणी अगदी लहान, तर अस्वलासारखे काही पाऊण टन वजनाचे आढळले आहेत. यांच्या एकंदर ३०० जाती आहेत. त्या तीन गटांत विभागता येतील : पहिला गट मांजरासारख्या प्राण्यांचा. दुसरा कुत्र्यासारख्या प्राण्यांचा व तिसरा सीलसारख्या जलचर प्राण्यांचा. मांजरासारख्या प्राण्यांत सिंह, वाघ, चित्ते, कूगर (अमेरिकन रानमांजर किंवा प्यूमा), रानमांजर, घरमांजर यांखेरीज कस्तुरी मांजर, मुंगूस आणि तरस यांचाही समावेश होतो. कुत्र्यासारख्या प्राण्यांत कुत्री, कोल्हे व लांडगे यांखेरीज अस्वले, रॅकून, पंडक (पॅंडा), वीझल, बीजू, स्कंक व ऊद मांजर (ऑटर) यांचीही गणना होते. सीलसारख्या जलचर प्राण्यांच्या गटात सागरी सिंह व वॉलरस हेही प्राणी आहेत.

ऑस्ट्रेलिया सोडून जगात सर्वत्र थोड्याफार प्रमाणात या गणातील प्राणी आढळतात. ऑस्ट्रेलिया खंडात माणसाकडून फक्त डिंगो या जातीच्या कुत्र्याची आयात केली गेली. ध्रुवीय प्रदेशात प्रामुख्याने अस्वले व कोल्हे आढळतात. आर्क्टिक व अंटार्क्टिक प्रदेशांत सागरी सिंहांचे वास्तव्य असते. काही गट मात्र काही प्रदेशांतच आहेत; उदा., कस्तुरी मांजर हे जुन्या जगातच (आशिया, यूरोप व आफ्रिका या खंडांत) वास्तव्य करून आहे. पंडक सोडून इतर रॅकून अमेरिकेत आढळतात, तर अस्वलांची अनुपस्थिती आफ्रिकेत जाणवते.

काही मांसाहारी स्तनी प्राणी माणसाळविलेल्या प्राण्यांस व मानवास हानिकारक असले, तरी बरेचसे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त आहेत. सेबल, ऊद मांजर, मार्टेन, मिंक, खोकड, फर सील या प्राण्यांपासून उत्कृष्ट फर मिळते. तसेच हे प्राणी उंदीर व तत्सम इतर कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यांवर उपजीविका करतात आणि पर्यायाने या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास कारणीभूत होत असल्यामुळे कृषी उद्योगात मानवास यांची मदत होते. कुत्रा व मांजर हे आदिकालापासूनचे मानवाचे सोबती होत. शिकारीत कुत्रा व चित्ता हे मानवास उपयुक्त ठरतात. मिंक व खोकड यांचीही पैदास वाढवून मानवास फरचे उत्पन्न वाढविता येते. या गणातील सर्व प्राणी जरी मांसाहारी असले व या आहारास उपयुक्त अशी त्यांच्या दातांची व नखांची रचना असली, तरी यांपैकी काही प्राणी (उदा., अस्वले) शाकाहारीही आहेत. भक्ष्याचा पाठलाग करण्यास उपयुक्त ठरणारे पाय व चपळाई त्यांच्यात नाहीत. या प्राण्यांच्या अवयवांची, बाह्येंद्रियांचा तसेच दात आणि कंकाल (हाडांचा सागाडा) यांचा क्रमविकास (उत्क्रांती) त्यांच्या खाण्याच्या सवयीस उपयुक्त ठरेल असा झाला आहे.

शरीररचनेची वैशिष्ट्ये

प्रत्येक पायास पाच किंवा कमीत कमी चार बोटे असतात आणि यांपैकी पहिले बोट इतर बोटांशी कधीच संमुख (समोर) होऊ शकत नाही. बोटांवर आत दबून बसलेली नखरे असतात. या प्राण्यांत खूर किंवा सपाट नखे नसतात. यांच्या प्रत्येक गालावर स्पर्शग्राही दृढरोमांचे (तंत्रिका तंतूंचा-मज्जातंतूंचा-पुरवठा असलेल्या राठ केसांचे) झुपके असतात. या प्रत्येक प्राण्यास शेपूट असते. गुदद्वार व जननेंद्रिये यांची रंघ्रे निरनिराळी असतात. यांचे स्तन उदरीय असतात, डोक्याची कवटी चेहऱ्याच्या भागापेक्षा प्रशस्त असते. मेंदू परिवलित (घड्या पडलेला) असतो.

तोंडावरील स्पर्शग्राही दृढरोमांचे पुंजके डोळ्यांच्या वरच्या भागावर, गालावर व त्यांच्या रांगा ओठावर आढळतात. काही दृढरोम हनुवटीवर व गळ्यावरही आढळतात. शिकार करणाऱ्या जनावरांत यांचा वाढ चांगली झालेली आढळते; पण अस्वलासारख्या काही शाकाहारी प्राण्यांत मात्र यांचा ऱ्हास झालेला दिसतो.

मुस्कटाच्या टोकावर व तोंडाच्या पृष्ठभागावर दोन नाकपुड्या असतात. डोक्याच्या बाजूस सरळ उभे राहणारे बाह्यकर्ण असतात. आदिम (आद्य) मांसाहारी प्राण्यात पायास पाच बोटे असतात. तिसरे व चौथे बोट लांब तर दुसरे व पाचवे आखूड असते. पहिले बोट सर्वांत लहान असते. बोटाच्या नखरामागे अधरभाग गादीसारखा मऊ असतो. पाचही बोटांचे मऊ भाग जुळलेले असतात. असे प्राणी तळव्यांवर चालतात. हळूहळू या प्रकारात फरक पडून तळव्याऐवजी बोटांवर भार देऊन चालणारे कुत्र्यासारखे प्राणीही आढळतात. बोटांवर चालणाऱ्या प्राण्यांत दोन प्रकारची नखरे असतात : कुत्र्यात आढळणारी लहान बोथट नखरे आणि मांजरात आढळणारी तीक्ष्ण, प्रतिकर्षी (आत ओढून घेता येण्यासारखी) नखरे. सीलमध्ये पायांचे रूपांतर वल्ह्यासारख्या भागांत झालेले असते. गुदद्वाराजवळ दोन गुद ग्रंथीतून स्त्राव वाहून नेणारी नलिका एका रंध्राद्वारे उघडते. या स्त्रावाचा काही प्राण्यांत वंगण म्हणून तर काहींत स्वसंरक्षणासाठी उपयोग होतो. या स्त्रावास अत्यंत उग्र असा वास असतो. अस्वलात या ग्रंथींचा ऱ्हास झालेला आहे, तर सीलमध्ये त्या आढळतच नाहीत.

कवटीची लांबी, रुंदी व उंची यांत निरनिराळ्या प्राण्यांत बरीच विविधता आढळते. मुस्कटाची लांबी दातांच्या संख्येशी व आकाराशी संबंधित असते. नाकपुड्यांत शंखाकृती अस्थी आढळतात. दातांची संख्या व रचना प्राण्याच्या आहारावर अवलंबून असते. आदिम प्राण्यात ४४ दात होते. त्याचे दंत्यसूत्र [⟶दात] पुढीलप्रमाणे कृं. ३/३, सु. १/१, उदा ४/४, दा ३/३ = ४४. काही प्राण्यांत यांतील काही दातांचा ऱ्हास होतो. उदा., मांजरात फक्त दोनच उपदाढा व एक दाढ असते.

मांजरे व त्यांचे संबंधित

हे प्राणी फेलॉयडिया या उपगणात मोडतात. मांजरांच्या शरीररचनेत जरी पुष्कळ विशिष्टीकरण आढळत असले, तरी त्याचे जवळचे संबंधी सिव्हेट (कस्तुरी मांजर) यांच्यात बरीच आदिम वैशिष्ट्ये आढळतात. फेलॉयडिया या उपगणाच्या प्राण्यांच्या जनन तंत्रात (जनन संस्थेत) कंदमूत्रमार्ग ग्रंथी म्हणजे विल्यम कूपर या इंग्रज शस्त्रक्रियातज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या कूपर ग्रंथी (शिश्नातील मूत्रमार्गाच्या भोवती असणाऱ्या स्पंजासारख्या पेशीसमूहातील फुगीर भागाजवळील ग्रंथी) आढळत नाहीत.

या उपगणाची विभागणी खालील तीन कुलांत करण्यात येते

()व्हायव्हेरिडी : सिव्हेट व मुंगूस हे प्राणी मुख्यतः आफ्रिका व आशिया या खंडांत आढळतात. हे बोटांवर चालतात. या कुलातील काही प्राण्यांची नखरे प्रतिकर्षी असतात. काही जातींत शिश्न लहान असून मुष्काच्या (वृषण म्हणजे पुं-जनन ग्रंथी जिच्यात असतात, त्या पिशवीच्या ) जवळ असते. ज्या प्राण्यांत गंध ग्रंथी असतात, त्या उदराजवळ न आढळता मुष्काजवळ आढळतात. कांडेचोर (पाम सिव्हेट) या जातीचे प्राणी भारत, सेलेबीझ व फिलिपीन्स या प्रदेशांत आढळतात. यांच्या नरांत गंध ग्रंथी नसते. मुंगसाचे गुदद्वार व गुदग्रंथी, गुदद्वाराभोवती असलेल्या गुहेत (पोकळीत) स्वतंत्र रंध्राद्वारे उघडतात. मुंगसात गंध ग्रंथी नसतात व त्यांचे शिश्न लहान असून मुष्काजवळ असते. त्यांना चार बोटे असतात व बोटांची नखरे प्रतिकर्षी नसतात. मुंगूस प्रामुख्याने भारतात आढळते [⟶ कस्तुरी मांजर; कांडेचोर; मुंगूस].

()हायनिडी : या कुलात तरसाचा समावेश होतो. हे बोटांवर चालतात. यांना चारच बोटे असतात; अंगठा नसतो. गुद ग्रंथी शेपटीजवळ असलेल्या कोष्ठात उघडतात. यांचे दात बळकट असतात. हे मृत जनावराचे मांस खातात. आशियात व आफ्रिकेत हे आढळतात. [ ⟶ तरस; आर्डवुल्फ].

(३)फेलिडी : सध्या अस्तित्वात असलेली सर्व मांजरे फेलिनी या उपकुलातील आहेत. यांचे शिश्न लहान असून मुष्काच्या जवळ असते. योनी गुदद्वाराजवळ असते. यांना गंध ग्रंथी नसतात व गुदद्वाराजवळ किंवा त्याच्या सभोवती गुहाही नसते. यांची नखरे प्रतिकर्षी असतात. हे बोटांवर चालणारे आहेत. यांच्या पुढील पायाचे सर्वांत आतील (पहिले) बोट वर उचललेले असते व मागील पायाच्या पहिल्या बोटाचा अभाव असतो. पायाचे गादीसारखे तळवे त्रिखंडित असतात. या उपकुलातील फेलिस प्रजातीत सर्व जातींच्या मांजरांचा समावेश होतो. यांच्या कंठास्थींचे (जिभेच्या बुंध्याशी असलेल्या हाडांचे) अस्थीभवन झालेले असते, नखरावर आवरण असते व शेपूट लांब असते. लिंक्स या प्राण्यात शेपूट लहान व कानावर झुपकेदार केस असतात.पँथेरा या प्रजातीत हा सिंह, वाघ, बिबळ्या, जॅगुआर यांचा समावेश होतो. यांचे स्वरयंत्र कंठास्थीपासून उगम पावणाऱ्या बंधनीच्या साहाय्याने कवटीस जोडलेले असते. चित्त्याच्या नखरावर आवरण नसते. कंठास्थी इतर मांजरांप्रमाणेच असतात. [ ⟶ कूगर; चित्ता; जॅगुआर; बिबळ्या; मांजर, लिंक्स; वाघ; सिंह -२].

कुत्रे व त्यांचे संबंधित

हे प्राणी कॅनॉयडीया या उपगणात मोडतात. यांत कुत्रे, अस्वले व रॅकून या प्राण्यांचा समावेश होतो.

कॅनिडी : या कुलात कुत्रे, लांडगे व कोल्हे यांचा समावेश असून यांच्या अन्ननलिकेस एक अंधनाल (पिशवीसारखा टोकाशी बंद असलेला भाग) असतो. हे बोटांवर चालतात. ह्यांच्या दंत्यसूत्रात दाढा २/३, म्हणजे वरच्या जबड्यात प्रत्येक बाजूस एक दाढ कमी असते. हे जगात सर्वत्र आढळतात. [⟶ कुत्रा; कोल्हा; लांडगा].

अर्सिडी : या कुलात अस्वलांचा समावेश होतो. जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) जरी कुत्र्यांचा व अस्वलांचा जवळचा संबंध असावा असे दिसले, तरी सध्या जिवंत असलेल्या कुत्र्यांच्या व अस्वलांच्या जाती एकमेकींपासून फार भिन्न दिसतात. अस्वलांचा बांधा मजबूत असून शरीर रुंद असते. ती तळव्यांवर चालतात. त्यांचे शेपूट लहान असते, ओठ बहिःक्षेप्य (पुढे काढता येणारे) असतात व ओठावर स्पर्शग्राही केस कमी असतात. दाढा अन्नाचे चर्वण करण्यास योग्य अशा असतात. पहिल्या तीन उपदाढा निरूपयोगी असतात. [ ⟶ अस्वल].

प्रोसायोनिटी : या कुलात रॅकून व पंडक या प्राण्यांचा समावेश होतो. एल्युरिनी या उपकुलात प्रामुख्याने दोन प्रकारचे पंडक आढळतात. यांपैकी एका जातीस मोठा पंडक व दुसरीस लहान किंवा सामान्य पंडक म्हणतात. मोठा पंडक तिबेट व पश्चिम चीन या प्रदेशांत सापडतो. याचे साम्य काळ्या पायाच्या पांढऱ्या अस्वलाशी आहे; पण याच्या कवटीच्या रचनेत व दाढांत फरक आहे. सामान्य पंडक दक्षिण चीनमध्ये व ईशान्य भारतात आढळतो. हा आकारमानाने लहान, तळव्यांवर चालणारा, तीक्ष्ण नखरे असलेला, केसाळ पायांचा, पायांचे तळवे आकुंचित असलेला असा असतो. याच्या तिसऱ्या खालच्या दाढेचा लोप झालेला असतो. गुदद्वार ग्रंथियुक्त कोष्ठाने वेष्टित असते. मांजराप्रमाणे शिश्न लहान असून मुष्काजवळ असते. [ ⟶ पंडक].

रॅकून हे प्राणी अमेरिकेत आढळतात. यांचे शिश्न लांब असून मुष्कापासून दूर अंतरावर असते. गुदद्वार कोष्ठरहित असते. यांची बोटे कातड्याने जोडलेली नसतात. पायाचे मऊ तळवे पूर्ण वाढ झालेले असतात. शेपूट लहान असते. [ ⟶ रॅकून].

किंगकजू हे याच कुलातील प्राणी वृक्षवासी असून ते शाकाहारी आहेत. यांचे शेपूट परिग्राही (एखादी वस्तू धरण्यास किंवा पक़डण्यास योग्य असे) असते. याच्या अधर (खालील) बाजूस गंध ग्रंथी असतात. यांच्या दाढांची शिखरे सपाट असतात.

मुस्टेलिडी : या कुलात वीझल, स्कंक, बिजू . इ. प्राण्यांचा समावेश होतो. बिजूचे शरीर धडधाकट असून डोके निमुळते व पाय लहान असतात. शेपटीच्या अधर भागात एक कोष्ठ असतो. हे प्राणी यूरोप व आशिया या खंडात सापडतात. काही जाती उत्तर भारत, चीन व सुमात्रा येथेही आढळतात.

स्कंक या प्राण्याच्या तीन जाती अमेरिकेत आढळतात. यांच्या गुदद्वार ग्रंथीची पूर्ण वाढ झालेली असते व यातून घाण वास येणारा स्त्राव बाहेर येतो. या स्त्रावाचा वास कित्येक मीटरवर येतो. यांच्या शरीरावरील फरचे रंगही भडक असतात. आशियात व आफ्रिकेत आढळणारे रॅटेल हे प्राणीही बिजूसारखेच आहेत.

वीझल हे बोटांवर चालणारे प्राणी आहेत. यांची बोटे जुळलेली असतात व नखरे तीक्ष्ण असतात. यासारखेच स्टोट, मिंक, पोलकॅट, मार्टेन व सेबल हे प्राणी यूरोप, आशिया व अमेरिका या प्रदेशांत आढळतात. मार्टेनसारखेच टायरा व ग्रिसन हे प्राणी दक्षिण व मध्य अमेरिकेत सापडतात.

ऊद मांजर हा जलवासी प्राणी आहे. याचे मागील पाय पुढील पायांपेक्षा लांब असतात व मागील पायांची बोटेही लांब असतात. [ ⟶ ऊद मांजर; बिजू; मार्टेन; मिंक; वीझल].

सील व त्यांचे संबंधित : हे प्राणी पिन्निपीडिया या उपगणात मोडतात. हे जलचर प्राणी होत. यांचे पुढचे पाय लहान असतात. पायाचा आकार वल्ह्यासारखा असतो. मागील पायांची पहिली व पाचवी बोटे इतर बोटांपेक्षा मोठी असतात. दाढा लहान असतात. सागरी सिंह व फर सील हे या गटातील प्राणी आहेत. यांचे कान लहान असतात. ते जमिनीवर चारी पायांचे तळवे टेकून चालतात. मासे हे यांचे सर्वसाधारण भक्ष्य होय. यांच्या निरनिराळ्या जाती उत्तर पॅसिफिक महासागर, कॅलिफोर्नियाचा किनारा तसेच जपान, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका या प्रदेशांच्या किनाऱ्याजवळ आढळतात.

वॉलरस हे प्राणी मुख्यत्वेकरून उत्तर गोलार्धातील समुद्रांत आढळतात. यांच्यात बाह्यकर्णांचा अभाव आहे. यांचेही पाय सीलसारखे असतात.

खरे सील फोसिडी या कुलात मोडतात. यांना बाह्यकर्ण नसतात. मागील पायापासूनच पुच्छपक्ष (शेपटीकडील पर) निर्माण होतो. यांना पायाचे तळवे जमिनीवर टेकवून उभे राहता येत नाही. मिरोंगा हा सर्वांत मोठा सील आहे. याची लांबी ७मी. पर्यंत असू शकते. अंटार्क्टिका ते कॅलिफोर्निया या प्रदेशात ते आढळतात. [⟶ वॉलरस; सागरी सिंह; सील].

जीवाश्म व क्रमविकास

ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, न्यूगिनी व न्यूझीलंड वगळता यांचे जीवाश्म जगातील बहुतेक भागांत कमी प्रमाणात आढळत असले, तरी त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व आहे. पॅलिओसीनच्या (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभीचे जीवाश्म उत्तर अमेरिकेत, तर इओसीन (सु. ५.५ ते ३.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) नंतरचे जीवाश्म यूरोप-आशियात आढळतात. भारतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांच्या भागांत ⇨ शिवालिक संघाच्या खडकांत, तसेच कुर्नूल जिल्ह्यातील बेटामचेर्ला (आंध्र प्रदेश) येथील गुहांमधील खडकांतही यांचे जीवाश्म सापडले आहेत. भारतातील जीवाश्मांचे वय प्लायोसीनपासून प्लाइस्टोसीन (सु. १.२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळापर्यंतचे आहे.

दात हे मांसाहारी प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे. आधीच्या काळात त्यांच्या दातांचे तेवढेसे विशिष्टीकरण झाले नव्हते. मात्र नंतरच्या काळात छेदनोपयुक्त दात व सुळे यांच्यात परिपूर्णता आली(उदा., असिदंत व्याघ्राचे सुळे मोठे, वाकडे व तलवारीसारखे होते; त्यांचा वापर भक्ष्याला चावण्याऐवजी भोसकण्यासाठी होत असे). अस्वले व जलचर मांसाहारीतील कमी उपयुक्त दात लहान झाले. मांसाहारी प्राणी झाडांऐवजी जमिनीवर राहू लागल्यावर व शाकाहारींची शिकार करू लागल्यावर त्यांची नखरे तीक्ष्ण झाली व पळण्यासाठी पाय अधिक लांब झाले. वेग व परस्पर सहकार्याने हल्ला करण्याची पद्धती यांमुळे त्यांनी शाकाहारींवर वर्चस्व प्रस्थापित केले. अस्वले शाकाहारही घेऊ लागल्यावर त्यांना अधिक वेगाची गरज उरली नाही. त्यामुळे त्यांचे आकारमान व वजन यांत वाढ झाली. मांसाहारी प्रथम उत्तर गोलार्धात होते व नंतर दक्षिणेकडे गेले. प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) हिमकाळातील शीत हवामानाशी ज्यांनी जुळवून घेतले अथवा ज्यांनी अधिक उष्ण प्रदेशांत स्थलांतर केले, ते टिकून राहिले. त्यांतूनच आजचे मांसाहारी विकास पावले .

मांसाहारी हे क्रिओडोंटपासून आले की पॅलिओसीनमधील कीटकभक्षी प्राण्यांपासून स्वतंत्रपणे उदयास आले, याविषयी मतभेद आहेत. तथापि दुसरे मत अधिक मान्यता पावले आहे.

काहींच्या मते मिॲकॉयडिया हा मांसाहारींचा एक उपगण असून त्यात मिॲसिडी हे एकच कुल आहे. या कुलातील प्राण्यांचे दात छोटे व कापण्यास उपयुक्त होते. ते क्रिओडोंटपासून उदयास आल्याचे मानतात. मिॲसिड हे आदिम मांसाहारी वृक्षवासी असावेत म्हणून त्यांचे जीवाश्म कमी सापडतात व त्यांची विशेष माहिती उपलब्ध नाही. इओसीनच्या अखेरीस व मायोसीनच्या (सु. २ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभी यांच्यात परिस्थितीशी जुळवून घेताना नाट्यमय बदल होत गेले व मायोसीनपर्यंत मांसाहारींच्या सर्व आधुनिक कुलांचे प्रतिनिधी अवतरले. प्रथम त्यांच्यात विशेष फरक नव्हता. इओसीन अखेरीस त्यांच्या फेलॉयडिया व कॅनॉयडिया अशा दोन शाखा अलग झाल्या.

फेलॉयडिया : व्हायव्हेरिडी, फेलिडी व हायनिडी या आधुनिक कुलांचा हा उपगण असून उ. अमेरिका, यूरोप व आशियात इओसीन अखेरीस अथवा ऑलिगोसीनच्या (सु. ३.५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभी ही तिन्ही कुले अवतरली होती. मिॲसिड प्राण्यांमध्ये सावकाश परिवर्तन होत जाऊन व्हायव्हेरीड प्राणी क्रमविकसित झाल्याचे त्या दोघांतील साम्यांवरून दिसते. फेलिस ही प्रजाती प्लायोसीनच्या सुरुवातीस वेगळी झाली. हायनिडी हे अधिक अलीकडचे कुल असून हे कुल व्हायव्हेरिडी कुलापासून मायोसीनमध्ये क्रमविकसित झाल्याचे मानतात.

कॅनॉयडिया : मुस्टेलिडी, कॅनिडी, अर्सिडी व प्रोसायोनिडी या आधुनिक कुलांचा यात समावेश होतो. ही कुले ऑलिगोसीनमध्ये अवतरली. मुस्टेलीड मिॲसिडपासून आल्याचे मानतात व मायोसीनच्या शेवटी अनेक सामान्य मुस्टेलीड प्रकार (उदा., वीझल, बिजू, स्कंक, सागरी सिंह) स्वतंत्र झाले होते. कॅनिडी कुलाचे ऑलिगोसीन काळातील प्राणी मुस्टेलीड व व्हायव्हेरीड यांच्यासारखे होते. आधुनिक कुत्र्यांशी अधिक साम्य असलेल्या प्रजाती ऑलिगोसीनच्या प्रारंभी व कॅनिस प्रजाती प्लायोसीनच्या (सु. १.२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभी उदयास आलेल्या. अर्सिडी कुल मायोसीनमध्ये तर प्रोसायोनिडी कुल ऑलिगोसीनअखेरीस कॅनिडी कुलापासून वेगळे झाल्याचे मानतात.

पिन्निपीडिया : फोसिडी (सील), ओटॅरीइडी (सागरी सिंह) व ओडोबेनिडी (वॉलरस) ही तीन कुले काही शास्त्रज्ञ कॅनॉयडियांपैकीच मानतात. ती जलचर प्राण्यांची असल्याने येथे वेगळी दिली आहेत. यांचे शरीर पाण्यावर तरंगणारे असल्याने मरणोत्तर ते अल्पावधीत नष्ट होते त्यामुळे त्यांचे जीवाश्म कमीच आढळतात व परिपूर्ण जीवाश्म क्वचितच सापडतो. परिणामी त्यांच्याविषयी थोडीच माहिती मिळू शकते व त्यांच्या क्रमविकासाविषयीचे निष्कर्ष काढताना आताच्या प्राण्यांविषयीच्या माहितीचाच उपयोग करावा लागतो. यामुळे यांचा पूर्वेतिहास स्पष्ट झालेला नाही. हे प्राणी क्रिओडोंटपासून, तर काही कॅनॉयडियांपासून आल्याचे मानतात आणि काहींच्या मते ही स्तनी वर्गातील अगदी अलीकडे क्रमविकसित झालेली स्वतंत्र शाखा आहे. यांचे मायोसीन काळातील जीवाश्म आढळतात. परिस्थितीशी जुळवून घेताना जे बदल झाले त्यामुळे ओटॅरीइडी आणि ओडोबेनिडी ही कुले अस्वलांशी संबंधित प्राण्यांपासून अलग झाली. फोसिडीतील आधुनिक प्राण्यांचे मुस्टेलिडांशी अधिक साम्य असून मुस्टेलिडीपासून ऑलिगोसीन अखेरीस फोसिडी कुल विकसित झाले असावे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate