অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माइट

माइट

माइट

हा आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील अष्टपाद प्राणी आहे. याचा समावेश ॲरॅक्निडा वर्गातील ॲकॅरिना गणात होतो. या गणातील प्राणी मचूळ पाण्यात, गोड्या पाण्यात, गरम पाण्याच्या झऱ्यात, जमिनीत, वनस्पतीवर  व परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजिविका करणारे) म्हणून प्राण्यांच्या शरीरावर व शरीरातही आढळतात. शरीराच्या आत नाकपुड्या, फुप्फुसे, पोट व इतर ऊतकांतही (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांतही) हे आढळले आहेत. या प्राण्यांच्या सु. १८,००० जाती नोंदविण्यात आल्या आहेत. माइटचे आकारमान सु. ६ मिमी. असते. काही माइट यापेक्षाही लहान असतात. बाह्यत: कीटकासारखे दिसणारे हे प्राणी आठ पायांचे असून त्यांची शरीररचना बाह्यत: अखंडित दिसते. शरीराच्या भागातील शीर्ष व वक्ष हे एकमेकांस जुळलेले असतात. या जुळलेल्या भागास शिरोवक्ष म्हणतात. उदराचा भागही या शिरोवक्षाशी बाह्यत: जुळलेला दिसतो. यांची मुखांगे (मुखाशी संबंधित असणारी उपांगे) मात्र निराळी असतात. मुखांगात दोन कीलिसेरा (मुखपूर्व भागातील उपांगे) व दोन पादमृश (स्पर्श करण्याकरिता अथवा भक्ष्य पकडण्याकरिता उपयोगी पडणारी मुखपश्च उपांगे) असतात. त्यांच्या तोंडाची रचना चावण्यास वा शोषण करण्यास योग्य अशी असते. श्वसन श्वसनालांद्वारे (ज्यांच्यातून हवा आत घेतली जाते वा बाहेर सोडली जाते अशा नळ्यांद्वारे) केले जाते. काही जातींत हे श्वसन तंत्र (श्वसन संस्था) नसते. या जातींतील माइट शरीरावरणाद्वारे श्वासोच्छ्वास करतात.

माइटच्या रूपांतरणात (विविध अवस्थांतून होणाऱ्या विकासात) निरनिराळ्या अवस्थांत फारच थोडा बदल झालेला दिसतो. अंडे, अपूर्णावस्था व पूर्णावस्था अशा स्थित्यंतरांनी यांचा आयुष्यक्रम पूर्ण होतो. पिकावरील माइटमध्ये प्रोटोनिंफ व ड्यूटोनिंफ अशा दोन   अपूर्णावस्था असून ड्यूटोनिंफ अवस्थेत मीलन होऊन मादी अंडी घालण्यास सुरुवात करते. अंडी ४ ते ७ दिवसांत उबतात व १६ ते २० दिवसांत पूर्णावस्थेप्रत पोहोचतात. त्याचा सर्व आयुष्यक्रम साधारणपणे एक महिन्याचा असतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असे आढळून आले की, स्क्रब टायफस या तीव्र संसर्गजन्य रोगाला कारणीभूत असणारे जंतूसारखे सूक्ष्मजीव (रिकेट्-सिया त्सुत्सुगामुशी) माइटाच्या शरीरातून मानवाच्या शरीरात जातात. तसेच कीटकनाशकाच्या साहाय्याने जरी पुष्कळ माइट मारले गेले, तरी कीटकनाशकास प्रतिकार करणारी एक नवीनच जाती निर्माण झाली. तसेच काही माइट विषाणूंचा (व्हायरसांचा)प्रसार करतात व त्यामुळे वनस्पतींना रोग होऊन बरेच नुकसान होते. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन १९४० सालानंतर माइटवर बरेच संशोधन झाले आहे.

माइटच्या बऱ्याचशा जाती परजीवी आहेत. काही माइट वनस्पतींवर तर काही निरनिराळ्या प्राण्यांवर जगतात. माइट हे मानवाचे शत्रू आहेत. अनेक पिकांना निरनिराळ्या जातींच्या माइटचा उपद्रव होतो. त्यांपैकी कापूस, ऊस, ज्वारी, संत्रे, द्राक्षे, आंबा इ. महत्त्वाच्या पिकांचे माइटमुळे नुकसान होते. हे प्राणी वनस्पतीच्या पानांतील रस शोषून घेतात व त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. काही पानांवर व मोहरावर गाठी तयार होतात. यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते काही पाळीव व उपयुक्त प्राण्यांनाही माइटचा त्रास होतो. मधमाश्यांना होणारा आइल ऑफ वाइट रोग त्यांच्या श्वासनलिकेत असणाऱ्या माइटमुळे होतो [ मधमाशीपालन]. मानवाला खरूज हा त्वचारोग ॲकॅरस स्कॅबिआय या माइटमुळे होतो. डर्मॅटोफॅगॉइडीज या प्रजातीतील माइटची विष्ठा घरातील धुळीत मोठ्या प्रमाणावर (एका ग्रॅममध्ये १,००० माइट व २.५ लक्ष विष्ठा कण) मिसळलेली असते आणि या विष्ठेतील विशिष्ट प्रथिनामुळे ॲलर्जी निर्माण होऊन सर्दी, डोळे खाजणे, दम्याचा झटका इ. विकार उद्भवतात, असे दिसून आले आहे. कुक्कुटपालनगृहातील पक्ष्यांनाही माइटचा उपद्रव होतो. काही माइट पिकांवरील नाकतोडे, भुंगेरे, माश्या यांसारख्या उपद्रवी कीटकांवर जगतात व मानवास उपयुक्त ठरतात.

पिकावरील माइटचा नाश करण्यासाठी गंधकाच्या भुकटीचा उपयोग करतात. डायझिनॉन, पॅराथिऑन, मॅलॅथिऑन, डिमेक्रॉन यांसारखी ऑरगॅनो फॉस्फरसयुक्त कीटकनाशेकही माइटचा नाश करण्यास उपयोगी आहेत.

सामान्य लाल कोळी माइटच्या जीवनक्रमातील अवस्था : (१) अंडे, (२) प्रथम इन्स्टार किंवा डिंभ (अळी), (३) द्वितीय इन्स्टार किंवा प्रोटोनिंफ,(४) तृतीय इन्स्टार किंवा ड्यूटोनिफ, (५) चतुर्थ इन्स्टारप्रौढ मादी [इन्स्टार म्हणजे दोन निर्मोचनांच्या (कात टाकण्यासारख्या क्रियांच्या) मधल्या काळात कीटक धारण करीत असलेले रूप ].

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate