অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मॅमथ

मॅमथ

मॅमथ

कॉर्डेटा संघातील प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलातील नष्ट झालेल्या महाकाय प्रण्यास मॅमथ असे म्हणतात

ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका ही खंडे सोडून इतरत्र पृथ्वीवरील प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत यांचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) आढळतात. यांच्या प्रजातीचे नाव मॅम्युथ

असे असून उत्तर अमेरिकेत मॅम्युथस इंपरेटर व सायबीरियात मॅ. प्रिमिजिनियस या जातींचे अवशेष आढळतात. हे प्राणी हत्तीच्या अगदी जवळचे नातेवाईक आहेत.

प्लाइस्टोसीन काळात तिसऱ्या हिमनादेय कालखंडाच्या [⟶ हिमकाल] सुरुवातीलाच हे अवतरले असावेत. ह्यांचा प्रसार त्या वेळी उत्तर गोलार्धातील टंड्रा प्रदेशात होता. त्याचप्रमाणे स्टेप्स या गवताळ प्रदेशात वावरायची त्यांना सवय होती. तिसरे हिमयुग चालू असताना हे प्राणी ध्रुवीय प्रदेशात वावरत असत. तिसरे हिमयुग संपल्यावर हे थोडेसे दक्षिणेकडे सरकू लागले. आशिया, उत्तर अमेरिका व यूरोप या प्रदेशांत ह्यांचे वास्तव्य होते. ह्यांचे अवशेषदेखील याच प्रदेशांत सापडले आहेत. मुख्यत्वे हल्लीच्या सायबीरियात ह्यांची वस्ती जास्त होती. सायबीरियातील हिमामुळे ह्यांचे अवशेष चांगल्या स्थितीत टिकून राहिले आहेत

सर्व मॅमथांमध्ये मॅ. प्रिमिजिनियस हा उत्तरेकडील सायबीरियाच्या प्रदेशात अवशेषरूपाने सापडणारा मॅमथ प्रसिद्ध आहे. ह्याची माहिती बर्फात सापडलेल्या सांगाड्यावरूनच मिळते असे नव्हे, तर ह्यांची काही कलेवरे वा शवे जशीच्या तशी बर्फात गाडली गेलेली सापडली आहेत. त्यांच्या अभ्यासावरूनही पुष्कळ माहिती मिळाली आहे. पुराणाश्मयुगातील (सु. ५ लाख ते १० हजार वर्षांपूर्वीच्या काळातील) मानव यांची शिकार करत असे. या प्राण्यांची त्याने काढलेली काही रंगीत चित्रे व खोदकामही काही गुहांत आढळते. या सर्व माहितीवरून असे आढळून येते की, या केसाळ मॅमथाची खांद्यापर्यंतची उंची सु. ३ मी. एवढी म्हणजे भारतीय हत्तीएवढी असावी. याची पाठ पुढून मागेपर्यंत थोडी उतरती असल्याने मागील बाजूची उंची पुढील बाजूपेक्षा कमी असे. मागचे पाय मजबूत होते.

सर्व अंगावर कबऱ्या उदी रंगाचे दाट व राठ केस असून त्याभोवती मऊ उबदार फर होती. कडाक्याच्या थंडीपासून रक्षण करण्याकरिता त्वचेखाली १ ते १.५ सेंमी. जाडीचा चरबीचा थर होता. या थराची जाडी डोक्याच्या त्वचेखाली ७ ते ८ सेंमी. पर्यंत होती. डोके मोठे होते. सुळे खूपच जाड लांब असून प्रथम खाली व बाहेर वळलेले असून नंतर वाढल्या वयानुरूप ते आतील बाजूस व वरती वळलेले असत. सुळ्यांचा उपयोग हिम उकरण्याकरिता व त्याखाली गाडले गेलेले गवत व वनस्पती काढण्याकरिता होत असे. सोंड मजबूत असून जमिनीपर्यंत पोहोचलेली होती. वरचा ओठ जाड, बोटासारख्या बोथट टोकाचा असून खालच्या ओठाचे टोक चपट्या चमच्यासारखे होते.

सर्व सोंड जाड केसांनी आच्छादिलेली होती. कान व डोळे भारतीय हत्तींपेक्षा लहान होते. कानांवरही केस असत. शेपूट लहान असून तिच्या शेवटी केसांचा झुपकेदार गोंडा असे. पुरणाश्मयुगातील काही चित्रांवरून असे दिसते की, काही मॅमथांच्या पाठीवर वशिंडासारखा उंचवटा होता. टंड्रासारख्या थंड प्रदेशात उगवणारे गवत, शैवाल, शैवाक (दगडफूल), तसेच पाइन, स्प्रूस व बर्च यांसारख्या झाडांची पाने हे ह्यांचे मुख्य अन्न होत

साधारणतः अठराव्या शतकाच्या सुरूवातीपासून महाकाय प्राण्यांची कलेवरे सायबीरियात आढळू लागली; पण सुरुवातीस त्यांकडे शास्त्रज्ञांचे लक्ष गेले नाही. हस्तीदंताचा व्यापार करणाऱ्या लोकांनी मात्र व्यापारी दृष्टीने याची दखल घेतली. मॅमथाचे बव्हंशी संपूर्ण व अभ्यासिले गेलेले कलेवर १८९९ मध्ये सायबीरियातील बिऱ्याझाफ्का नदीच्या खोऱ्यात सापडले. यानंतर ठिकठिकाणी बरीच कलेवरे व जीवाश्म आढळले. सायबीरिया प्रदेशात सापडणाऱ्या कलेवरांविषयी निरनिराळे तर्क करण्यात आले. यांपैकी एक तर्क असा की, हे प्राणी सायबीरियातील महानद्यांना आलेल्या पुरामुळे वहात आर्क्टिक महासागराकडे आले व तेथील बर्फात अडकून पडले.

दुसरा तर्क म्हणजे हे सर्व हनिबलाच्या सैन्यातील हत्ती असून ते सर्व सायबीरियातील बर्फात गाडले गेले असावेत; पण हे दोन्ही तर्क पुढे झॉर्झ क्यूव्ह्ये या शास्त्रज्ञांनी खोडून काढले व हे मूळचे सावबीरियातीलच प्राणी आहेत, ते तेथेच वाढले व तेथेच नाश पावले, असेही सिद्ध केले. तिसऱ्या हिमनादेय काळात (सु. ३ लक्ष वर्षांपूर्वी) हे अस्तित्वात आले व चौथ्या हिमनादेय काळाच्या शेवटी (सु. ८० हजार वर्षांपूर्वी) हे नष्ट झाले असावेत. तीव्र थंडीमुळे आणि अन्नाच्या अभावामुळे यांचा नाश झाला असावा. ते बर्फाच्या खोल दऱ्यात गाडले गेले असावेत. तसेच त्या काळात झालेल्या भूकंप, ज्वालामुखी वगैर नैसर्गिक आपत्ती व त्या वेळच्या आदिमानवाने त्यांचा केलेला संहार हेही त्यांच्या नाशास करणीभूत झाले असावे.

------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate