অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्तनि वर्ग

स्तनि वर्ग

स्तनि वर्ग

(मॅमॅलिया). अंगावरील केस आणि स्तन तसेच अत्यंत मोठी क्रियाशीलता व अधिक शिशुसंगोपनक्षमता यांमुळे इतरांपासून हे प्राणी ओळखता येतात. जबडा व कान यांच्या संरचनेतील तपशिलात ते आपल्या लुप्त सरीसृप पूर्वजांच्या जीवाश्मांपासून अलग करता येतात. बहुतेक सर्व स्तनी प्राणी नियततापी असून स्वेदग्रंथीच्या साहाय्याने ते शरीरातील अधिकतर पाणी बाहेर टाकतात. त्यांच्या शरीरातील चयापचयाचा वेग बहुधा मोठा असतो. सरीसृपांच्या इतिहासाला जवळ जवळ आरंभ होतो तेथूनच स्तनी प्राण्यांचा विकासमार्ग सुरू होतो. उत्तर कार्‍बॉनिफेरस कल्पापासून ट्रायासिकच्या मध्यकाळापर्यंत स्तनी प्राण्यांसारखे सरीसृप प्रथम पेलिकोसॉरिया आणि नंतर प्रगत थेरॅप्सिडा यांसारखे प्राणी पृथ्वीवर प्रामुख्याने वावरत होते. ट्रायासिक कल्पान्तापूर्वी डायनोसॉरांच्या आगमनाबरोबर थेरॅप्सिड प्राणी लुप्त झाले, परंतु तत्पूर्वी त्यांचे जे वंशज राहिले तेच पहिले सत्य स्तनी प्राणी होत. अंडी घालणारे मोनोट्रिम प्राणी [→ काटेरी मुंगीखाऊ; प्लॅटिपस] स्तनी प्राण्यांच्या विकासमार्गापासून अगदी प्रारंभीच स्वतंत्रपणे निघाले असावे. सरीसृपांप्रमाणे त्यांना अवस्करद्वार (ज्यात आतडे, युग्मक म्हणजेप्रजोत्पादक कोशिकावाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागच्या टोकाकडे असणाऱ्या समाईक कोष्ठाचे द्वार) असते. सध्या त्यांचे वंशज ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे आढळतात, परंतु त्यांचा इतिहास उपलब्ध नाही. जुरासिक व क्रिटेशस काळांतील स्तनी प्राण्यांचे जीवाश्म क्वचितच आढळले असून त्यांची संख्या फारच तोकडी असण्याचे कारण डायनोसॉरांचा प्रभाव होय. डायनोसॉरांच्या लोपानंतर स्तनी प्राण्यांची सरशी होत गेली. क्रिटेशसच्या उत्तर काळात मेटॅथेरिया (शिशुधान स्तनि-वर्ग) व यूथेरिया (अपरास्तनि-वर्ग) या स्तनींचा उदय झाला होता. ऑस्ट्रेलियात अपरास्तनी (वार असलेले स्तनी) प्राणी बराच काळ नव्हते. तेथे शिशुधानी प्राण्यांची चलती झाली; इतर खंडांत अपरास्तनी प्राणी तृतीय कल्पाच्या (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रथम भागात संख्या व प्रकार या बाबतींत खूपच विस्तार पावले.

अंडी घालणाऱ्या मोनोट्रिमॅटा या स्तनी प्राण्यांची प्रारंभिक लक्षणे पाहून काहींना असा विश्वास वाटतो की, त्यांचा उदय पेलिकोसॉरियापासून पण इतर स्तनी प्राण्यांच्या विकासमार्गापूर्वी स्वतंत्रपणे झाला असावा; याचा अर्थ स्तनी प्राण्यांचा विकास बहुस्त्रोतोद्‍भवी (अनेक मार्गांनी उद्‍भवलेला) असावा. यावरून केस व स्तन यांचा विकास पेलिकोसॉरियासारख्या समान पूर्वजात पूर्वी झाला असावा किंवा नंतर तो स्तनी प्राण्यांच्या दोन विकासमार्गांत स्वतंत्रपणे झाला असावा. मोनोट्रिमॅटांच्या अशा प्रारंभिकत्वामुळे त्यांचा अंतर्भाव प्रोटोथेरिया या स्वतंत्र उपवर्गातील एका गणात केला जातो. इतर विद्यमान  स्तनी प्राण्यांचा समावेश थेरिया उपवर्गात करतात. त्यांपैकी काहींचे जीवाश्म मध्यजीव महाकल्पाच्या उत्तर काळातील खडकांत आढळतात. नवजीव महाकल्पात (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांचा विस्तार फार झाला; त्यांचा अंतर्भाव अलोथेरिया उपवर्गात केला जातो. सर्व प्रारूपिक स्तनी प्राणी जरायुज (अपत्यास जन्म देणारे) असून त्यांपैकी काहींचे जीवाश्म मध्यजीव महाकल्पातील खडकांत आढळतात. त्यांचा समावेश थेरियातील ट्रायट्युबरक्युलेटा या अधोवर्गात करतात; यांच्या दंतलक्षणांवरून ते उच्च स्तनी प्राण्यांचे पूर्वज असावेत, असे काहींचे मत आहे. मेटॅथेरिया या दुसऱ्या अधोवर्गात सर्व शिशुधानी प्राणी (उदा., कांगारू) व तिसऱ्या अधोवर्गात (यूथेरिया) सर्व अपरास्तनी प्राणी घातले आहेत. त्यांतील  ⇨ नरवानर गणात (प्रायमेट्स) मनुष्य, माकडे व कपी यांचा समावेश होतो.

यूथेरियात सर्वांत प्रारंभिक म्हणजे इन्सेक्टिव्होरा(कीटकभक्षक) हे असून त्यांच्यापासून इतरांचा विकास झाला आहे. (उदा., छछुंदर, जाहक, चिचुंद्री). यामध्ये सर्वांत लहान व लांबट तोंडाचे स्तनी प्राणी येतात; एका जातीच्या चिचुंद्रीचे वजन फक्त दोन ग्रॅम असते. वटवाघळांचा (कायरोप्टेरा) व यांचा निकट आप्तसंबंध आहे; त्यांना उडते कीटकभक्षक म्हणतात. तसेच नरवानर गणातील प्राणीही प्रारंभिक कीटकभक्षकांशी निकटवर्ती आहेत. त्यांपैकी प्रारंभिक अर्धवृक्षवासींपासून नरवानरांचा (माकडे, लेमूर व मोठे कपी आणि मनुष्य यांचा) क्रमविकास झाला असून पुढे त्यांचे वृक्षवासी जीवनाकरिता विशिष्टीकरण झाले. यानंतर ज्यांनी स्थलजीवनात प्रवेश केला त्यांमध्ये पूर्वीच्या जीवनातील काही लक्षणांचे अवशेष दिसतात. उदा., मनुष्याचे लवचिक अवयव व पकड घेणारे हात मूलतः वृक्षीय जीवनाशी अनुकूल दर्शवितात; त्यांचा विकास होत असताना नखरांचे रूपांतर बोटांच्या नखांत झाले. घ्राणेंद्रिये व मेंदूतील घ्राणग्राही भाग यांचा ऱ्हास आणि त्रिमितीय दृष्टीचा विकास ही लक्षणे तेच सांगतात. नरवानर गणात स्नायूंचा समन्वय, मेंदूतील अनुमस्तिष्क (लहान मेंदूचे) आणि प्रमस्तिष्क (मोठ्या मेंदूचे) गोलार्ध यांचा विकास चांगला आढळतो. या सर्व शारीरिक फरकांमुळे क्रमविकासाचा हा मार्ग अत्यंत यशस्वी झाला आहे. नरवानर गणांपैकी लेमुरांत (लेमूर, लोरिस, गॅलॅगॉस इ. लेमुरॉइडी) प्रारंभिकता दिसते, म्हणजे त्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही. यांच्यापेक्षा पूर्वेकडील टार्सियसमध्ये (टार्सिऑइडी) माकडाच्या पातळीवर येण्याइतपत काही प्रगत लक्षणे आढळतात; उदा., सपाट चेहरा व पुढे आलेले मोठे डोळे. अँथ्रॉपॉइडी या उच्च दर्जाच्या नरवानरांच्या पूर्वजांमध्ये टार्सियसची प्रगत लक्षणे अपेक्षिणे चुकीचे ठरणार नाही. त्यांमध्ये माकडे, कपी व मनुष्य यांचा अंतर्भाव होतो; त्यांना सापेक्षतः अधिक सपाट चेहरा, त्रिमितीय दृष्टी, फार मोठा मेंदू, उकिडवे बसून वस्तू हाताळणे इ. वैशिष्ट्यपूर्ण प्रगत लक्षणे असतात. माकडांचा क्रमविकास दोन मार्गांनी स्वतंत्रपणे झाला आहे; यांपैकी एका मार्गाने (प्लॅटिऱ्हिनी) दक्षिण अमेरिकेत आणि दुसऱ्याने (कॅटाऱ्हिनी) इतर खंडांत झाला. दुसऱ्या मार्गावरच्या क्रमविकासात माकडे मोठ्या कपींच्या पूर्वजांशी संबंधित आहेत. मायोसीन काळाच्या (सु. दोन कोटी वर्षांपूर्वी) आसपास यूरेशिया व आफ्रिका येथे असे कपी होते; त्यापासून विद्यमान चिंपँझीगिबनओरँगउटानगोरिला आणि बहुधा मनुष्य हे विकास पावले असावे. दक्षिण आफ्रिकेच्या प्लाइस्टोसीन काळातील (सु. १० – ५ लक्ष वर्षांपूर्वीचा काळ; काहींच्या मते १७·५ लक्ष वर्षे) ऑस्ट्रॅलोपिथेकस हा कपिकुल आणि मानवकुल यांमधील दुवा मानतात; हा त्यापुढील मानवांना दंतपंक्ती व सरळ देहाची ढब या बाबतींत संक्रमक होता. पिथेकँथ्रोपस (जावा मॅन) आणि सिनँथ्रोपस (पेकिंग मॅन) हे आदिमानवाचे निश्चित प्रकार प्लाइस्टोसीनच्या मध्यास (५ लक्ष वर्षांपूर्वी) उदयाला आले. त्यापुढील काळातील  नीअँडरथल (१ लक्ष ते ७५ हजार वर्षांपूर्वीचे) व इतर मानव यांचे आधुनिक मानवाशी अधिक साम्य आहे. प्लाइस्टोसीनच्या शेवटी (सु. ५० हजार वर्षांपूर्वीपासून) आढळणारे मानव प्रकार मात्र निश्चितपणे आपल्या जातीचे (होमो सॅपिएन्स ) आहेत. यूरोपातील क्रोमॅग्नॉन मानववंश सु. ४० – ३० हजार वर्षांपूर्वीच्या काळातील असून आधुनिक मानवाचा तो फार जवळचा पूर्वज मानला जातो [→ मानवप्राणि].

स्तनी प्राण्यांच्या क्रमविकासात संख्यावाढ होत गेली तशी परस्परावर उजीविका करण्याची संधी प्राप्त झाली; त्यामुळे त्यात वैशिष्ट्य पावलेले प्राणी विकास पावले; यांना कार्निव्होरा (मांसाहारी गण) म्हणतात (उदा., कुत्री, वीझल, रॅकून, अस्वले व मांजरे इ.). भक्ष्य पकडण्याकरिता जलद पळणे व त्याचा फडशा पाडणे यांकरिता आवश्यक ते बदल पाय, बोटे व दात यांमध्ये घडून आले. प्रारंभिक स्तनी प्राणी संपूर्ण पावले टेकीत परंतु जलद पळणाऱ्यांची फक्त बोटेच टेकली जातात त्यामुळे तसे बदल त्यांच्या पायांत झाले. मांसाहारींपैकी जे जलजीवनाशी समरस झाले (उदा., सील, वॉलरस इ.) त्यांच्या शरीरात पोहणे, तरंगणे इत्यादींकरिता जरूर ते फरक झाले. त्याचप्रमाणे वनस्पतिभक्षक (शाकाहारी) प्राण्यांचा (गाय, बैल, म्हैस, घोडा, हरीण, मेंढ्या, हत्ती व उंट) असा एक गट (अंग्युलेटा; खुरी प्राणी) विशेषीकरण पावला आहे [→ अँग्युलेटा]. यांचे वैशिष्ट्य दात, दाढा व शत्रूपासून दूर पळून जाण्याकरिता पाय यांमध्ये पडलेले फरक होय. गती मिळण्याकरिता बोटांच्या टोकावर चालणे व पळणे उपयुक्त ठरल्याने प्रारंभिक नखरांचा खुरांमध्ये विकास झाला आणि पायाच्या जवळचा भाग अधिक आखूड व लांबचा भाग (खुराजवळचा) अधिक लांब होत गेला व त्यांवरून त्यांना अँग्युलेटा नाव पडले. त्यांची काही बोटे कमी झाली तर काही नाहीशीच झाली. हत्तीसारख्या शुंडायुक्त प्राण्यांत (प्रोबॉसिडिया) काही आरंभीची खुरी प्राण्यांची लक्षणे आढळतात. यांमध्ये पायाची बोटे, खुरासारखी नखे, शुंडा, दातांची रचना, मांडणी व संख्या आणि त्यांचा मर्यादित पुनरुद्‍भव इ. लक्षणे येतात. प्लाइस्टोसीन कल्पात उ. अमेरिकेत अनेक शुंडायुक्त प्राणी होते; हल्ली फक्त आशियातील उष्ण भाग आणि आफ्रिका येथे हत्ती आढळतात. परंतु एकवेळ जगभर त्यांचे विविध प्रकार होते. हत्तीशी आप्तसंबंधी असे साधारणतः सशासारखे प्राणी मध्यपूर्वेत आढळतात. त्यांना ‘कोनी’ (हायरॅकॉयडिया) म्हणतात. शुंडायुक्तांप्रमाणे त्यांचे समकालीन प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे मॅनॅटी (सी-काऊ; करिमकर) असून त्यांचा समावेश सायरेनिया गणात करतात. हे प्राणी समुद्रकिनाऱ्याच्या गरम पाण्यात राहून सागरी शैवलांवर उपजीविका करतात. कुरतडून खाणाऱ्या स्तनी प्राण्यांना (रोडेन्शिया गण) रोडंटस् (कृंतक प्राणी) म्हणतात; ते शाकाहारी असून त्यांची दंतपंक्ती वैशिष्ट्यपूर्ण असते; घुशी, खारी, बीव्हर ही त्यांची उदाहरणे आहेत. ससे व तत्सम प्राणी लॅगोमॉर्फा या गणात घातले आहेत. कारण त्यांना कृंतक प्राण्यांप्रमाणे कृंतक दातांच्या दोन जोड्या असतात. शिवाय वरच्या बाजूस एक अधिक लहान जोडी असते. त्यांचा विकास कृंतक प्राण्यांशी समांतर रेषेत झाला असल्याने त्यांच्या कृंतक दातांत साम्य आढळते. सेटॅशिया गणात व्हेल (देवमासा), डॉल्फिन (शिरस) व शिंशुक यांचा समावेश असून ते समुद्री जीवनास अनुकूलन दर्शवितात, तथापि त्यांचा विकास प्रारंभिक स्थलवासी मांसाहारींपासून झाला असावा. त्यांची काही लक्षणे माशांसारखी असून ते हवेत श्वसन करतात व जरायुज असल्याने पिलांना पाजतात. काहींना चांगले दात असतात पण हे देवमासे दातांच्या अभावी प्लवकावर उपजीविका करतात.

तात्पर्य, स्तनी प्राण्यांच्या क्रमविकासात विशेषेकरून अवयवांच्या कंकालातील स्थलांतर-चापल्य, बौद्धिक क्रियाशीलता आणि तापमान-नियंत्रण ही आढळतात; तसेच मेंदूचा विकास फार ठळकपणे आढळतो. व्यक्तीच्या विकासाला लागलेल्या विलंबामुळे या अवयवांची पूर्ण वाढ होण्यास आवश्यक तो अवसर मिळतो. शिशुसंगोपनाची गरज व सवय यांमुळे कौटुंबिक जीवन प्राप्त होते आणि त्यामध्ये मानसिक प्रशिक्षणाला वेळ मिळतो.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate