অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील

इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील

सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांतील विशेषतः इंग्रज व फ्रेंच ह्यांत चुरस व सत्तास्पर्धा सुरु झाली. त्यातूनच इंग्रज-फ्रेंचांतील तीन युद्धे उद्‌भवली. ही सर्व युद्धे मुख्यतः कर्नाटकात झाल्यामुळे त्यांना कर्नाटकातील युद्धे असेही संबोधण्यात येते.

पहिले युद्ध

(१७४४-१७४८). १७४० मध्ये यूरोपात सुरु झालेल्या ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धाचे परिणाम भारतातील इंग्रज-फ्रेंच यांतही तेढ उत्पन्न करण्यास कारणीभूत झाले. बार्नेटच्या नेतृत्वाखाली असलेल्या इंग्रजी नाविक दलाने फ्रेंचांची जहाजे पकडताच युद्ध सुरु झाले. फ्रेंचांचा सेनापती द्यूप्लेक्स (डुप्ले) जवळ लढण्यास पुरेसे आरमार नसल्यामुळे त्याने मॉरिशसचा गव्हर्नर बूरदॉनी याच्याकडे मदत मागितली. मदत घेऊन तो स्वतः भारतात आला. त्यावेळी अन्वरुद्दीन हा कर्नाटकाचा नवाब होता. मद्रास शहर देण्याचे कबूल करुन द्यूप्लेक्सने त्याला इंग्रजाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. त्याबरोबर युद्धाचे स्वरुप पालटले. इंग्रज सेनापती मद्रास सोडून हुगळीस निघून गेला. मद्रासचा किनारा मोकळा मिळताच फ्रेंचांनी समुद्राच्या बाजूने व जमिनीवरुन वेढा घालून मद्रास घेतले. पण पूर्वी ठरल्याप्रमाणे द्यूप्लेक्सने मद्रास शहर अन्वरुद्दीनच्या स्वाधीन न केल्यामुळे त्याने मद्रासवर चाल केली. परंतु तीत त्याचा पराभव झाला. इंग्रजांच्या ताब्यातील फोर्ट सेंट डेव्हिड ठाण्यावर केलेल्या स्वारीत द्यूप्लेक्सला यश मिळाले नाही. १७४८ मध्ये एडवर्ड बॉस्कोएनच्या नेतृत्वाखाली आलेल्या इंग्रजांच्या आरमारी तुकडीने पाँडिचरीला वेढा घातला. तेव्हा फ्रेंच सैन्याने नेटाने लढा दिला.दरम्यान यूरोपात १७४८ मध्ये एक्स-ला-शपेलचा तह झाल्यामुळे हे युद्ध थांबले व मद्रास शहर इंग्रजांना परत मिळाले.

दुसरे युद्ध

(१७४९ - १७५४). हे युद्ध कर्नाटकातील अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे झाले. भारतातील इंग्रज व फ्रेंच अधिकाऱ्यानी यूरोपातील तहाकडे दुर्लक्ष करुन व स्थानिक नबाबांच्या भांडणांचा लाभ घेऊन आपापल्या सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला.कर्नाटकात त्रिचनापल्ली, तंजावर व म्हैसूर या तीन राज्यांत गादीसबंधी तंटे चालू होते. तंजावरमध्ये शहाजी व प्रतापसिंह भोसले यांत भांडण चालू होते. इंग्रजांनी प्रतापसिंहास गादीवर बसवून त्याजकडून देवीकोटचा किल्ला मिळविला. सफदरअली हा कर्नाटकाचा नबाब असताना त्याचा मेहुणा चंदासाहेब बऱ्याच उलाढाली करीत असे. पण रघुजी व फत्तेसिंह भोसले यांनी कर्नाटकाच्या स्वारीत त्यास कैद करुन साताऱ्यास पाठविले. नंतर सफदरअलीचा खून होताच निजामुल्मुल्कने अल्पवयी नबाबास अर्काटच्या गादीवर बसविले. त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने अन्वरुद्दीनला अर्काट येथे पाठविले. दरम्यान चंदासाहेब सुटला व मराठ्यांचा दंड देऊन या गादीवर हक्क सांगू लागला. त्याचे व फ्रेंचांचे संबंध चांगले होते. द्यूप्लेक्सने अन्वरुद्दीन व चंदासाहेब यांच्या भांडणात पडून मुलूख मिळविण्याचा प्रयत्न केला. हैदराबादच्या निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नासिरजंग व नातू मुजफ्फरजंग यांत गादीसंबंधी तंटा सुरु झाला. चंदासाहेबाने मुजफ्फरजंगास फ्रेंचांच्या मदतीचे आश्वासन दिले. इंग्रजांनी नासिरजंगाचा पक्ष घेतला.

द्यूप्लेक्सने चंदासाहेबास अर्काटच्या गादीवर व मुजफ्फरजंगास हैदराबादच्या गादीवर बसविण्याचे कबूल करुन त्याच्याशी तह केला. ३ सप्टेंबर १७४९ रोजी चंदासाहेब, मुजफ्फरजंग व फ्रेंच सेनापती बुसी यांनी कर्नाटकावर स्वारी केली. अंबूर येथे झालेल्या लढाईत अन्वरुद्दीन मारला गेला. त्याचा मुलगा मुहम्मद अली त्रिचनापल्लीला पळाल्याने फ्रेंचांनी ते ठिकाण घ्यावयाचे ठरविले.इंग्रजांना या गोष्टीचे परिणाम कळले असले, तरी त्यांच्यामध्ये द्यूप्लेक्सइतके सामर्थ्य नव्हते. इंग्रजांनी नासिरजंगाला फ्रेंचांचा पाडाव करण्याची विनंती केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे द्यूप्लेक्सने मुजफ्फरजंगास दक्षिणेचा सुभेदार केले.बक्षिसादाखल त्याने द्यूप्लेक्सला कृष्णेच्या दक्षिणेकडच्या मोगली प्रदेशाचा गव्हर्नर केले व आपल्या दरबारी बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवले. मुजफ्फरजंग राचोटीच्या लढाईत (१७५१) मारला गेल्यानंतर द्यूप्लेक्सने सलाबतजंगास निजाम केले, म्हणून त्याने फ्रेंचांना सैन्याच्या खर्चाबद्दल उत्तर सरकार प्रांत दिला. यानंतर द्यूप्लेक्सने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात असलेल्या मुहम्मद अलीशी बोलणी सुरु केली. त्रिचनापल्ली सर केल्यास सर्व कर्नाटक फ्रेंचांच्या ताब्यात जाईल, या भीतीने इंग्रज गव्हर्नर साँडर्स याने त्रिचनापल्ली घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या सल्ल्यावरुन त्यांची मदत येईपर्यंत मुहम्मद अलीने द्यूप्लेक्सशी बोलणी चालू ठेवली. १७५१ मध्ये इंग्रजांनी एक तुकडी त्रिचनापल्लीस धाडली. याच वेळी तंजावर, म्हैसूर येथील राज्यकर्ते आणि मराठ्यांचा एक सेनापती मुरारराव यांनी इंग्रज व मुहम्मद अली यांच्याशी हातमिळवणी केली. क्लाइव्हच्या आगमनामुळे या लढाईला वेगळेच वळण लागले.

मुहम्मद अली, गव्हर्नर साँडर्स व क्लाइव्ह यांनी अर्काटच्या किल्ल्याला वेढा घालून तो घेतला. त्यामुळे युद्धाला कलाटणी मिळाली. इंग्रजांची प्रतिष्ठा वाढली व फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. पुढे झालेल्या एका चकमकीत चंदासाहेब मारला गेला. द्यूप्लेक्सने त्रिचनापल्लीचा वेढा चालूच ठेवला. १७५३ मध्ये वर्षभर इंग्रज-फ्रेंच यांत चकमकी होत राहिल्या. फ्रेंच सेनापतींच्या चुकांमुळे व अयोग्य वागणुकीमुळे द्यूप्लेक्सला यथ मिळाले नाही. द्यूप्लेक्सच्या धोरणामुळे चालू असलेल्या युद्धाचा खर्च फ्रेंच सरकारला डोईजड वाटू लागला. १७५४ मध्ये फ्रेंचांचा नवा गव्हर्नर गोदहू भारतात आला. त्याने पाँडिचरी येथे इंग्रजांबरोबर तह केला.या तहानुसार इंग्रज-फ्रेंच यांनी एतद्देशीयांच्या भांडणांत पडावयाचे नाही, फ्रेंचांना उत्तर सरकार प्रांत द्यावा व मुहम्मद अलीकडे कर्नाटकचे राज्य ठेवावे असे ठरले. द्यूप्लेक्स फ्रान्सला परत गेला. यामुळे इंग्रजांच्या सत्तासंपादनातील एक मोठा अडथळा दूर झाला.

तिसरे युद्ध

(१७५६-१७६३). द्यूप्लेक्स परत गेल्यानंतर कर्नाटकात दोन वर्षे इंग्रज व फ्रेंच यांत भांडणे झाली नाहीत. पण यूरोपात सप्तवार्षिक युद्ध सुरु होताच १७५६ मध्ये कर्नाटकात इंग्रज व फ्रेंच यांत लढा सुरु झाला. यूरोपातील युद्धाची बातमी येताच क्लाइव्ह व वॉट्सन यांनी फ्रेंचांचे चंद्रनगर ठाणे घेतले. उलट फ्रेंच सेनापती लाली मोठ्या आरमारासह भारतात येताच त्याने फोर्ट सेंट डेव्हिडला वेढा दिला. हैदराबादहून बुसीला बोलावून घेण्यात आले. युद्धाचा खर्च भागविण्यासाठी त्याने तंजावरवर स्वारी केली. पुढे बुसी व लाली यांनी मद्रासवर चाल केली. इंग्रजी आरमार येताच लालीने फोर्ट सेंट डेव्हिडला घातलेला वेढा उठविला. क्लाइव्हने पाठविलेल्या सैन्याने उत्तर सरकार प्रांत जिंकला. १७६० मध्ये सर आयर कूटने वांदीवाश शहर घेतले. तथापि लाली व बुसी यांनी चढाई केल्यामुळे वांदीवाश येथे मोठे युद्ध झाले व त्यात फ्रेंचांचा पुरा मोड झाला. बुसी इंग्रजांच्या हाती सापडला. १७६१ मध्ये क्लाइव्हने पाँडिचरी व चंद्रनगर ही ठाणी घेतली; पण १७६३ मध्ये पॅरिस येथे तह होताच भारतातील इंग्रज-फ्रेंच युद्ध संपले. या तहानुसार फ्रेंचांना पाँडिचरी, कारिकल, माहे ही ठाणी परत मिळाली.

या युद्धात फ्रेंचांचा पाडाव झाला व इंग्रजांचे पाश्चिमात्य प्रतिस्पर्धी नाहीसे होऊन त्यांना भारतात आपले राज्य स्थापन करण्याचा मार्ग सोपा झाला. इंग्रजी सैन्याला इंग्रजी आरमाराची जोड मिळाली, तशी फ्रेंच सैन्याला फ्रेंच आरमाराची जोड मिळाली नाही. फ्रेंच धाडसी व कल्पक असूनही, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची उभारणी योग्य तत्त्वांवर झालेली नसल्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. विशेषतः द्यूप्लेक्सने आखलेल्या योजनेला फ्रेंच सरकारचा पाठिंबा मिळाला नाही. फ्रेंचांना युद्धाच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी फ्रेंच सरकारच्या मदतीवर अवलंबून रहावे लागे. त्याचप्रमाणे एकाच वेळी फ्रेंचांनी अनेक गोष्टींत लक्ष घातल्याने त्यांना यश मिळाले नाही.

 

पहा : फ्रेंच सत्ता, भारतातील

गोखले, कमल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate