অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी अंमल, भारतातील

इंग्रजी अंमल

भारतातील हिंदुस्थानच्या इतिहासातील १६०० ते १९४७ हा सु. ३५० वर्षांचा काळ म्हणजे इंग्रजांच्या भारतातील आगमनाचा व सत्तासंपादनाचा. याचे प्रामुख्याने तीन कालखंड पडतात : ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ते क्लाइव्हच्या कारकीर्दीपर्यंतचा पहिला कालखंड (१६००-१७७२), वॉरन हेस्टिंग्जच्या कारकीर्दीपासून (१७७२) ते १८५७ च्या उठावापर्यंतचा दुसरा कालखंड व १८५८ ते १९४७ हा तिसरा कालखंड.

पहिला कालखंड

ईस्ट इंडिया कंपनीने सतराव्या शतकाच्या सुरूवातीला हिंदुस्थानात व्यापार सुरू केला. कंपनीने प्रथमत: हिंदुस्थानात व्यापारी वर्चस्व मिळविण्यासाठी डच,फ्रेंच व पोर्तुगीज यांच्याशी झगडा केला. हळूहळू कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरूवात केली. एतद्देशीयांच्या कारभारात ढवळाढवळ करून, त्यांच्याशी लढुन,त्यांच्या अंतर्गत भांडणांचा फायदा घेऊन तसेच अंतर्गत भांडणे लावून कंपनीने हळूहळू हिंदुस्थानातील बराच मुलूख पादाक्रांत केला. १७४४ ते १७६१ या अवधीत इंग्रजांनी कर्नाटकात फ्रेंचाबरोबर तीन युद्धे केली. शेवटच्या युद्धात वांदीवाश येथे फ्रेंचांचा पराभव होऊन १७६१ मध्ये कर्नाटकात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली. पण त्यापूर्वीच १७५७ मध्ये क्लाइव्हने केलेल्या सिराजउद्दौल्याच्या ð प्लासीच्या लढाईतील पराभवानंतर खऱ्या अर्थी इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. १७६४ च्या बक्सरच्या लढाईनंतर इंग्रज बंगालमध्ये सत्ताधीश झाले. या लढाईनंतर कंपनीने राजकीय उलाढालीत प्रत्यक्षपणे भाग घेण्यास सुरूवात केली. १७६५ मध्ये बंगालच्या दिवाणीची सनद कंपनीला मिळाली. पण फौजदारी अधिकार बंगालच्या नबाबाकडे राहिले. अशा तऱ्हेने बंगालमध्ये दुहेरी कारभार सुरू झाला.

दुसरा कालखंड

क्लाइव्हनंतर वॉरन हेस्टिंग्जला १७७२ मध्ये बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमले. त्याने सर्व प्रकारच्या उपायांनी मराठे,हैदर अली, निजाम यांच्यापासून ब्रिटिश मुलखाचा बचाव करुन तो वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक गव्हर्नर जनरल हिंदुस्थानात होऊन गेले. कॉर्नवालिसने ब्रिटिश राज्यव्यवस्थेचा पाया घातला. वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून हिंदुस्थानात येताच त्याने चढाईचे धोरण स्वीकारले. त्याने टिपू, दुसरा बाजीराव, शिंदे-भोसले इत्यादींचे पराभव करुन भारतातील विस्तृत प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तैनाती फौजेची पद्धत सुरु करुन तिच्या बळावर एतद्देशीय संस्थानिकांशी तह केले व तंजावर, सुरत, कर्नाटक इ. प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आणले. अयोध्येच्या वजीराशी दडपशाहीचे धोरण अंगीकारुन वेलस्लीने त्याच्या ताब्यातील गोरखपूर,रोहिलखंड तसेच अलाहाबादचा किल्ला हस्तगत केला.

यूरोपात इंग्रज नेपोलियनशी लढण्यात गुंतले असल्यामुळे त्यांनी हिंदुस्थानात १८०५ ते १८१४ या काळात फारशा उलाढाली केल्या नाहीत. त्यामुळे पेंढारी व मराठे यांचा जोर वाढला. लॉर्ड हेस्टिंग्जने चढाईचे धोरण स्वीकारुन मराठ्यांचा पूर्णपणे पराभव केला व नेपाळच्या गुरख्यांनी इंग्रज मुलखावर हल्ले करताच इंग्रजांनी त्यांच्याशी युद्ध करुन गढवाल व कुमाऊँ हे प्रदेश हस्तगत केले. १८५७ पर्यंत इंग्रजांनी नेपाळ, अफगाणिस्तान, सिंध, पंजाब तसेच ब्रह्मदेशचा दोन तृतीयांश प्रदेश यांवर आपला अंमल बसविला. डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करुन सातारा, जैतपूर, संबळपूर, झांशी, नागपूर, अयोध्या इ.लहानमोठी संस्थाने खालसा केली.

तिसरा कालखंड

डलहौसीच्या विस्तारवादी धोरणामुळे संस्थानिकांत व हिंदी लोकांत असंतोष निर्माण झाला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध ð अठराशे सत्तावनचा उठाव केला. या उठावात इंग्रजांनी भारतीयांचा पराभव करुन सबंध भारतभर आपली सत्ता निर्विवादपणे प्रस्थापित केली. ð राणीच्या जाहीरनाम्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा सर्व कारभार आपल्या ताब्यात घेतला. लॉर्ड कॅनिंग हा हिंदुस्थानचा पहिला व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल झाला आणि व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी म्हणून जाहीर करण्यात आले. हिंदुस्थानची वायव्य सरहद्द दुसऱ्या अफगाण युद्धाने व नंतर ड्युरँडने केलेल्या तहाने ठरविण्यात आली. ब्रह्मदेशाबरोबरच्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी संपूर्ण ब्रह्मदेश जिंकून कारभारासाठी तो हिंदुस्थानात समाविष्ट केला.

ब्रिटिश साम्राज्यवाद, इंग्रजांचे जुलमी, उद्दाम व दडपशाहीचे धोरण, इंग्रजी शिक्षण, सामाजिक व धार्मिक सुधारणा इ. गोष्टींमुळे हिंदुस्थानात राष्ट्रजागृती झाली. १८७८ ते १८८४ हा काळ हिंदी राष्ट्रीयत्वाचा बीजारोपणाचा काळ मानला जातो. या काळात कलकत्ता येथे ब्रिटिश इंडिया असोसिएशन (१८५१), मद्रासमध्ये मद्रास नेटिव्ह असेंब्ली (१८५२), मुंबईत बाँबे असोसिएशन (१८५२),पुण्यात सार्वजनिक सभा (१८७०) अशा अनेक संस्था स्थापन झाल्या. यांतूनच १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेची (इंडियन नॅशनल काँग्रेसची) स्थापना झाली. या सभेने इंग्रज सरकारकडून सवलती मिळविण्यासाठी खटपट केली. १८९८ पासून राष्ट्रीय सभेस उघडउघड विरोध सुरु झाला. अर्जविनंत्या करुन भागत नाही, हे लक्षात येताच लो. टिळकांसारख्या पुढाऱ्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करुन बहिष्काराचे पर्व सुरु केले. लो. टिळक, अ‍ॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना करुन आंदोलने सुरु केली. हे सर्व चालू असताना राष्ट्रीय सभेचे सनदशीरपणाचे धोरण न पटल्यामुळे कित्येक देशभक्तांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करुन ती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. लो. टिळकांनी कायद्याच्या कक्षेत राहूनही लोकांमध्ये इंग्रजी राज्याविरुद्ध असंतोष निर्माण केला. पुढे म. गांधींच्या चळवळींना जे यश लाभले, त्याला लो. टिळकांनी केलेली लोकजागृती अतिशय उपकारक ठरली.

लो. टिळकांच्या मृत्युनंतर म. गांधींनी असहकार, अहिंसात्मक कायदेभंग, सत्याग्रह इ. मार्गांनी सरकारला त्रस्त केले. तेव्हा सर्व चळवळी दडपून टाकण्यासाठी सरकारने कायद्यांची कडक अंमलबजावणी चालू केली. एकीकडे कायद्यांची कडक अंमलबजावणी व दुसरीकडे लोकांना किरकोळ हक्क देणे हे त्यावेळी इंग्रज सरकारचे धोरण होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात हिंदुस्थानची सहानुभूती मिळविण्यासाठी सरकारने काही सुधारणाही केल्या. १९१७ मध्ये जाहीर केलेल्या हिंदुस्थानविषयक धोरणानुसार १९१९ च्या कायद्याने माँटफर्ड सुधारणा अंमलात आल्या. या सुधारणा कायद्याचे मूल्यमापन करण्यासाठी १९२७ मध्ये सायमन आयोग नेमण्यात आला. त्यावर भारतीयांनी बहिष्कार घातला. तरी आयोगाच्या शिफारशींचा विचार करुन तीन ð गोलमेज परिषदाबोलविण्यात आल्या या परिषदांच्या शिफारशींनुसार १९३५ चा सुधारणा कायदा अंमलात आला.

दुसरे महायुद्ध सुरु होताच व्हाइसरॉयने हिंदी नेत्यांचा अथवा विधिमंडळाचा सल्ला न घेता, भारताने युद्धात भाग घेतल्याचे जाहीर केले. युद्धात जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी १९४२ मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स याने युद्धोत्तर काळात भारताला वसाहतीचा दर्जा देण्याची योजना पुढे मांडली. ती सर्व पक्षांनी फेटाळली. देशात उत्पन्न झालेल्या संतप्त वातावरणातून १९४२ ची ð छोडो भारत चळवळ सुरु झाली. त्याच सुमारास सुभाषचंद्र बोस हे भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्यासाठी प्रथम जर्मनी व नंतर जपान येथे गेले. १९४३ मध्ये त्यांनी ð आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार सिंगापूर येथे स्थापन केले. परंतु जपानचा पराभव झाल्यामुळे आझाद हिंद सेनेला आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही. यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांनी देशाच्या फाळणीची योजना मांडली. हिंदुस्थानची भारत व पाकिस्तान अशी फाळणी करुन इंग्रजांनी हिंदुस्थानातील आपला अंमल १५ ऑगस्ट १९४७ रोजी संपुष्टात आणला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी होत (१९४८-५०).

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate