অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इत्सिंग

इत्सिंग

इत्सिंग

(६३४ – ७१३). भारतात सातव्या शतकात आलेल्या एक प्रसिद्ध चिनी प्रवासी. यूआन च्वांग चीनला परत गेला, तेव्हा इत्सिंग दहा वर्षांचा होता. तथापि त्या लहान वयातही इत्सिंगला बौद्ध भिक्षू होऊन भारतात येण्याची तीव्र इच्छा होती. तो चौदा वर्षांचा झाला, तेव्हा त्याला भिक्षुसंघात घेण्यात आले. ६७१ मध्ये जलमार्गाने तो भारतात येण्यासाठी निघाला. तो प्रथम सुमात्रा येथे आला. आठ महिने तेथे राहिल्यानंतर ६७३ मध्ये तो बंगालमधील ताम्रलिप्ती येथे आला. मगधातील पवित्र बौद्ध स्थळांची यात्रा करीत तो नालंदा येथे आला. नालंदा येथील दहा वर्षांच्या वास्तव्यात, त्याने तेथील बौद्ध पंडितांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धर्माचे अध्ययन केले व अनेक ग्रंथ जमा केले. नंतर तो आल्या मार्गाने ताम्रलिप्तीस परत गेला. ६८५ मध्ये समुद्रमार्गाने सुमात्रा बेटावरील श्रीविजय या समृद्ध राज्यात तो येऊन पोहोचला. तेथे चार वर्षे राहून त्याने संस्कृतचे पुढील अध्ययन केले. पुढे तो मायदेशी जाऊन नालंदाहून आणलेल्या ग्रंथांच्या भाषांतरासाठी काही साहाय्यकांस घेऊन आला. ६९५ मध्ये श्रीविजयहून तो चीनला परत गेला. त्यावेळची राणी वू-त्से त्वीन हिने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. तिने इत्सिंगचे स्वागत केले व भाषांतरांच्या कामासाठी राजदरबाराकडून त्याला मदत केली.

त्सिंगने सु. पंचवीस वर्षे परदेशांत घालविली. या अवधीत त्याने तीस देशांतून प्रवास केला व ४०० ग्रंथ जमविले. त्यांपैकी ५६ ग्रंथांचे ७०० ते ७१२ ह्या अवधीत भाषांतर केले. त्या भाषांतरांपैकी मूलसर्वास्तिवादिन् शाखेच्या विनयचे भाषांतर महत्त्वाचे आहे. ह्याशिवाय भारत व मलाया द्वीपसमूह या देशांतील बौद्ध धर्म व पश्चिमेकडच्या देशांत गेलेल्या बौद्ध भिक्षूंची चरित्रे यासंबंधीच्या त्याच्या चिनी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे झाली आहेत.

प्रस्तुत ग्रंथांमध्ये राजकीय घटनांचे विशेष उल्लेख नाहीत; पण तत्कालीन धार्मिक व सांस्कृतिक माहितीसाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत. इत्सिंगने कपिलवस्तु, बुद्धगया, श्रावस्ती, कुशिनगर इ. स्थळांची यात्रा केली. तथापि तेथील सविस्तर वर्णन तो देत नाही. तत्कालीन बौद्ध धर्मातील विविध पंथ, बौद्ध मठांतील जीवन, भिक्षू व भिक्षुणी यांची वस्त्रे, अन्न, प्रव्रज्येचे नियम, गुरुशिष्यसंबंध, रोग व त्यांवरचे औषधोपचार इ. विषयांसंबंधी मात्र तो सविस्तर माहिती देतो. ही माहिती महत्त्वाची व मनोरंजक आहे. ठिकठिकाणी तो आपल्या देशातील आचारविचारांची तत्कालीन भारतीय आचारविचारांशी तुलना करतो. नागानन्द नाटककाशिकावृत्ति, भर्तुहरीची पतंजलीच्या महाभाष्यावरील टीका यांसंबंधी त्याने प्रसंगोपात्त दिलेली माहिती वाङ्‌मयेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.


मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate