অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उदयपूर संस्थान

उदयपूर संस्थान

 

ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील राजस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ३२,८६८ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस अजमीर, मेवाड आणि शाहपूर; पश्चिमेस जोधपूर आणि सिरोही; दक्षिणेस दुर्गापूर, बांसवाडा आणि परतापगढ आणि पूर्वेस नीमच, टोंक, बुंदी व कोटा.
हे राजे आपल्याला सूर्यवंशी समजत.  बाप्पा रावळ (७३०–७६३) हा या घराण्यातील एक श्रेष्ठ पुरुष. त्याने सर्व राजस्थानावर राज्य केले. चितोड ही या राज्याची राजधानी. या घराण्यातील तेविसावा राजा समरसिंह याने पृथ्वीराजाशी सख्य करून मुसलमानांचे हल्ले परतविण्याच्या कामी साहाय्य केले. स्थानेश्वराच्या लढाईत हा मरण पावला (११९३). अलाउद्दीन खल्‌जीने चितोड उद्‌ध्वस्त केले (१३०३). हम्मीर राजा, लाखा राणा, कुंभ राणा इत्यादींनी पराक्रमाने आपले राज्य टिकविले. संग राणा याचा खानुवा येथे बाबराने पराभव केला (१५२७). त्याचा पुत्र उदयसिंह याने उदयपूर नगराची स्थापना केली (१५४१). गुजरातचा बहादूरशाह आणि नंतर अकबर यांनी चितोड उद्‌ध्वस्त केल्याने उदयपूर ही राजधानी झाली. उदयसिंहाचा पुत्र प्रतापसिंह या स्वाभिमानी राण्याने मोगलांशी सतत झुंज दिली. हळदी घाटच्या लढाईत (१५७६) त्याला यश आले नाही, तरी मेवाडचा बराचसा भाग त्याने आपल्या ताब्यात ठेवला. त्याच्या मृत्यूनंतर (१५९७) मोगलांनी या प्रदेशाची बरीच हानी केली. सतराव्या शतकात राणा राजसिंह (१६५४) याने मेवाडला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. जोधपूरच्या राजकुमारीशी औरंगजेबाचे ठरलेले लग्न मोडून त्याने स्वतः तिचे पाणिग्रहण केले. जिझया कराविरुद्ध त्याने औरंगजेबाशी युद्ध केले. दुष्काळाच्या वेळी (१६६१) लोकांसाठी कांकलेशी येथे १९ किमी. परिघाचा सुंदर संगमरवरी तलाव बांधला. पुढे अमरसिंहाने राजपुतांत ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. संग्रामसिंह या नंतरच्या राण्याने राज्याला अधिक प्रतिष्ठा प्रात करून दिली. अठराव्या शतकात शिंदे, होळकर, पेशवे आणि राजपूत राजे यांच्यामध्ये निरनिराळ्या कारणांनी लढाया झाल्या. भीमसिंहाची लावण्यवती कन्या कृष्णाकुमारी हिच्या प्राप्तीसाठी जयपूर आणि जोधपूरच्या राजघराण्यांनी युद्ध केले. त्यात शिंदे, होळकर यांनीही भाग घेतला. शेवटी घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी कृष्णाकुमारीने विषप्राशन करून आत्महत्या केली. १८१७ साली जेव्हा पेंढाऱ्यांचे युद्ध सुरू झाले, तेव्हा राणा भीमसिंह याने आपल्या मुलखाचे संरक्षण करण्याकरिता इंग्रजांचे मांडलिकत्व पतकरले.
या संस्थानाचा शेवटचा राजा भूपालसिंह हा १९३० साली गादीवर आला. त्याला ले. कर्नल हा हुद्दा होता. राजस्थानातील संस्थानांच्या विलीनीकरणानंतर राजस्थान संघ स्थापण्यात आला. त्याचे पं. नेहरूंनी १८ एप्रिल १९४८ रोजी उद्‌घाटन केले आणि भूपालसिंह हा त्याचा राजप्रमुख झाला.
उदयपूर ही राजधानी फार प्रेक्षणीय आहे. उदयपूरच्या पिचोला सरोवरात जगमंदिर आहे. प्रदेश डोंगराळ आहे व तेथे खनिज संपत्ती विपुल आहे.
संदर्भ :1. Menon, V. P. The story of the Integration of the Indian States, New Delhi, 1961.
२. गहलोत, जगदीशसिंह, राजपुताने का इतिहास, पहला भाग, जोधपूर, १९३७.
लेखक : अ.रा.कुलकर्णी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate