অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलचुरी वंश

कलचुरी वंश

प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध वंश. उत्तर किंवा दक्षिण भारतातील कोणत्या ना कोणत्या प्रदेशावर ५५० पासून १७४० पर्यंत, म्हणजे जवळजवळ बाराशे वर्षे हा वंश राज्य करीत होता. त्यांच्या कोरीव लेखांवरून ह्या वंशाची बरीच माहिती ज्ञात होते. त्यांत या वंशाचे नाव कटच्चुरी, कटचुरि, कलचुरी, कालच्चुरि, कलतुर्य, कळचुर्य इ. प्रकारांनी येते. नंतरच्या लेखांत हे राजे आपणास हैहय कार्तवीर्य सहस्रार्जुनाचे वंशज म्हणवू लागले. यांनी २४९-५० या वर्षात आरंभ होणार्‍या संवताचा सर्वत्र उपयोग केल्यामुळे या संवताला पुढे ‘कलचुरि-संवत’ किंवा (यांच्या प्रदेशावरून) ‘चेदि-संवत’ असे नाव पडले, पण तो संवत त्यांचा नसून मूळचा आभीरांचा होता. कारण कलचुरी तिसर्‍या शतकात उदयास आले नव्हते.

पूर्वकालीन कलचुरी ५५० च्या सुमारास वाकाटकांनंतर उदयास आले. त्यांचा मूळपुरुष कृष्णराज (सु. ५५०-५७५) याने माहिष्मती(मध्य भारतातील महेश्वर) येथे आपली राजधानी करून आपली सत्ता मध्य भारत, गुजरात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यांवर प्रस्थापित केली. त्याची चांदीची नाणी या सर्व प्रदेशांत सापडली आहेत.

कृष्णराजाचा पुत्र शंकरगण (सु. ५७५-६००) आणि नातू बुद्धराज (सु. ६००-६२०) यांचे लेख गुजरात महाराष्ट्र या प्रदेशांत सापडले आहेत. बादामीच्या मंगलेश या चालुक्य नृपतीने बुद्धराजाचा पराभव केला होता; पण त्याचे राज्य खालसा केले नव्हते. पुढे दुसर्‍या पुलकेशीने ६२० च्या सुमारास बुद्धराजाचा उच्छेद करून तो तीन महाराष्ट्रांचा स्वामी झाला. नंतर कलचुरींनी काही काळ चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारून त्यांच्याशी शरीरसंबंधही केले. बादामीच्या दुसया विक्रमादित्याने दोन हैहय राजकन्यांशी विवाह केले होते. त्या कलचुरी वंशीय असाव्यात.

हे कलचुरी राजे शिवोपासक होते. त्यांचा पाशुपत आचार्यांना आश्रय होता. मुंबईजवळची घारापुरीची लेणी त्यांच्या आश्रयाखाली कोरली गेली, असा एक तर्क आहे.

सातव्या शतकापासून बादामीचे चालुक्य महाराष्ट्र-विदर्भ, गुजरात या प्रदेशांत प्रबळ झाल्यामुळे कलचुरींना उत्तर भारताकडे आपली दृष्टी वळविणे भाग पडले. त्यांनी कालंजरचा किल्ला काबीज करून त्रिपुरी (जबलपुरचे तेवर) येथे आपली राजधानी केली. उत्तर भारतातील कलचुरी सत्तेचा संस्थापक वामदेवराज (सु. ६७५-७००) हा होता. म्हणून त्रिपुरीचे त्याचे सर्व वंशज आपल्या लेखांत स्वतःचा ‘वामदेवपादानुध्यात’ (वामदेवाच्या चरणांचे चिंतन करणारे) असा निर्देश करतात. वामदेवाने शरयूपार प्रदेश जिंकून तेथे आपल्या लक्षणराज नामक लहान भावाची नेमणूक केली होती. त्याच्या शाखेला शरयूपारचे कलचुरी असे नाव आहे. ही शाखा त्या प्रदेशावर पंधरा पिढ्या राज्य करीत होती. तिचा शेवटचा राजा सोढदेव (सु. १०५५-१०८०) याचा उच्छेद करून कनौजच्या गाहडवालांनी तो प्रदेश खालसा केला.

वामदेवाच्या वंशजांनी त्रिपुरी येथे दीर्घकाल राज्य केले. त्यांना डाहल किंवा चेदी देशाचे कलचुरी म्हणतात. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात या वंशात पहिला कोकल्लदेव (सु. ८५०-८९०) हा बलाढ्य राजा होऊन गेला. त्याने कनौजचा प्रतिहार भोज, शरयूपारचा शंकरगण, चित्रकूटाचा गुहिल हर्ष, मान्यखेटचा राष्ट्रकूट द्वितीय कृष्ण यांना अभय दिल्याचे वर्णन आहे. याचा पुत्र शंकरगण (सु. ८९०-९१०) हा राष्ट्रकूटांच्या बाजूने वेंगीच्या पूर्व चालुक्यांशी लढत होता.

कोकल्लाने आपली कन्या राष्ट्रकूट दुसरा कृष्ण याला दिली होती. त्यानंतर अनेक पिढ्यांत मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि त्रिपुरीचे कलचुरी यांमध्ये असेच शरीरसंबंध झाले आणि कलचुरींनी राष्ट्रकूटांना त्यांच्या स्वायांत मदत केली. ९१५ मध्ये राष्ट्रकूट तिसरा इंद्र याने कनौजवर स्वारी करून ते नगर उद्ध्वस्त केले, तेव्हा त्रिपुरीचा पहिला युवराजदेव (सु. ९१५-९४५) त्याच्याबरोबर होता. या विजयानंतर कनौज येथे प्रतिहारांच्या आश्रयास असलेला संस्कृत कवी राजशेखर त्रिपुरीस आला. तेथे त्याने विद्धशालमंजिका,काव्यमीमांसा आणि हरविलास हे ग्रंथ लिहिले.

युवराजदेवाने आपला जामात राष्ट्रकूट बद्दिग उर्फ तिसरा अमोघवर्ष याचा पक्ष घेऊन मान्यखेटवर चाल केली. वाटेत अचलपूरजवळ पयोष्णी (पूर्णा) नदीच्या काठी घनघोर युद्ध होऊन त्याला जय मिळाला. त्या विजयोत्सवाच्या प्रसंगी राजशेखराचे विद्धशालमंजिका नाटक त्रिपुरी येथे प्रथम रंगभूमीवर आले.

अकराव्या शतकात या वंशात गांगेयदेव (सु. १०२५-१०४१) नामक महाप्रतापी राजा झाला. त्याचा उल्लेख अल्‌-बीरूनीने केला आहे.त्याने आपली सत्ता प्रयाग व वाराणसीपर्यंत पसरवून या तीर्थक्षेत्रांचे मुसलमानांपासून रक्षण केले. याची उत्तरकालीन चालुक्यजयसिंह, धारचा परमार भोज, दक्षिण कोसलचा (छत्तीसगढ-संबळपूर) महाशिवगुप्त ययाती इत्यादिकांशी युद्धे झाली होती. त्याने‘विक्रमादित्य’ ही पदवी धारण केली होती. हा प्रयाग येथे अक्षय्यवटानजीक मृत्यू पावला, तेव्हा त्याच्या शंभर राण्या सती गेल्या; असेकोरीव लेखात वर्णन आहे, पण ते अतिशयोक्तिपूर्ण वाटते.

गांगेयदेवाचा पुत्र कर्ण (सु. १०४१-१०७३) हा पित्यापेक्षा बलाढ्य आणि महत्त्वाकांक्षी निघाला. त्याने भोजाच्या मृत्यूनंतर माळवाजिंकला. चंदेल्ल राजा देववर्मा याला ठार मारून त्याचे राज्यही जिंकले. बंगालच्या तृतीय विग्रहपालाचा पराभव केला आणि याविजयांचा द्योतक असा १०५२ मध्ये आपणास दुसरा राज्याभिषेक करवून घेतला. त्याला इतिहासकारांनी ‘भारतीय नेपोलियन’ अशीपदवी दिली आहे. नेपोलियनप्रमाणे यालाही आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस विजयश्री चंचल असल्याचा प्रत्यय आला आणि चंदेल्लराजांनी आपली राज्ये जिंकून परत घेतली. शेवटी त्याच्या शत्रूंनी त्याला इतके नामोहरम केले की, त्याला आपला पुत्र यशःकर्ण यालाराज्याभिषेक करावा लागला.

कर्णानंतर त्रिपुरीच्या कलचुरींचा र्‍हास होत गेला आणि १२१० च्या सुमारास चंदेल्ल राजा त्रैलोक्यवर्मा याने त्रिपुरी काबीज करूनत्यांचे राज्य खालसा केले.

त्रिपुरीचे कलचुरी शिवोपासक होते. त्यांनी मत्तमयूर नामक शैव पंथाच्या आचार्यांना आदराने आपल्या राज्यात बोलावूनत्यांच्याकरिता शिवालये व मठ बांधले व त्यांच्या योगक्षेमाकरिता अनेक गावे दान केली. कर्णाने वाराणसी येथे ‘मेरु’ पद्धतीचे बाराकिंवा सोळा मजल्यांचे शिवालय बांधले. त्याच्या आश्रयास विद्यापती, गंगाधर, बिल्हण, वल्लण, नाचिराज वगैरे अनेक संस्कृत कवीहोते. गांगेयदेवाने आपल्या नावे विशिष्ट प्रकारची सोन्याची नाणी पाडली. त्याचे अनुकरण अनेक उत्तर भारतीय राजांनी केले.

रत्नपूरचे कलचुरी

दहाव्या शतकाच्या अखेरीस त्रिपुरीच्या द्वितीय कोकल्लदेवाच्या कलिंगराज नामक पुत्राने दक्षिण कोसल(छत्तीसगढ) जिंकून तेथे आपले राज्य स्थापले. या शाखेत रत्नदेव, जाजल्लदेव, पृथ्वीदेव या नावाचे राजे झाले. त्यांनी पूर्वेच्या गंग वपाल राजांशी लढून अनेक विजय मिळविले. चौदाव्या शतकाच्या अखेरीस या वंशाची एक शाखा रायपूर येथे स्थापन झाली.छत्तीसगढातील कलचुरींचे राज्य नागपूरच्या भोसल्यांनी अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास तो प्रदेश जिंकेपर्यंत टिकून होते.

कलचुरींनीही अनेक शिवालये व मठ बांधले. ब्राह्मणांना अग्रहार दिले, अन्नसत्रे स्थापिली आणि विद्वानांना आश्रय दिला.रत्नपूर, खरोद, शेवडीनारायण वगैरे ठिकाणी अद्यापि काही तत्कालीन देवालये सुस्थितीत आहेत. या राजांनीही स्वतःची सोन्याचीआणि तांब्याची नाणी पाडली होती.

कल्याणीचे कलचुरी

दक्षिणेत विजापूर जिल्ह्यात तर्दवाडी येथे बाराव्या शतकात कलचुरी मांडलिक घराणे राज्य करीत होते.त्यातील बिज्जल नामक सामंताने उत्तरकालीन चालुक्य सम्राट तृतीय तैल याचा विश्वास संपादन करून ११५७ मध्ये सम्राटपदाचीबिरुदे धारण केली आणि ११६० पूर्वी चालुक्यांनी राजधानी कल्याण ही काबीज केली. याचा प्रधान बसव याने वीरशैव (लिंगायत)पंथाची स्थापना केली. काहींच्या मते या बंडाळीत बिज्जल मारला गेला. याच्या उलट काही लेखांवरून त्याने आपल्या सोमेश्वर नामकपुत्राला स्वतःच गादीवर बसविले, असे दिसते.

बिज्जलानंतर त्याचे पुत्र सोमेश्वर (सु. ११६८-११७७), संकम (सु. ११७७-११८०) व आहवमल्ल (सु. ११८०-११८३) हे गादीवर आले.पण चालुक्य सम्राट चतुर्थ सोमेश्वर याने हळूहळू आपली सत्ता परत मिळविली. तितक्यात देवगिरीचे यादव प्रबळ होऊन त्यांनीसोमेश्वरालाही त्याच्या राज्यातून पिटाळून लावले.

 

संदर्भ : मिराशी, वा. वि. कलचुरि नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५६.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate