অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुरुयुद्ध

कुरुयुद्ध

कुरुक्षेत्रावर झालेले कौरव-पांडवांमधील महाभारतकालीन प्रसिद्ध युद्ध. हस्तिनापूर येथे झालेल्या द्यूतात कौरवांची सरशी होऊन पांडवांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. त्यानंतर पांडवांनी आपले अर्धे राज्य मिळविण्याकरिता कौरवांकडे प्रथम विराट राजाच्या पुरोहितास आणि नंतर कृष्णास शिष्टाई करण्यास पाठविले, पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर राहील इतकीही भूमी देण्याचे नाकारल्यामुळे कृष्णाने कार्तिक अमावस्येला (अमान्त) युद्ध सुरू होईल, अशी घोषणा केली.

त्यापूर्वीच दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूच्या राजांना सैन्यासह युद्धाकरिता येण्याचे आवाहन केले होते. शेवटी कौरवांच्या बाजूने अकरा अक्षौहिणी आणि पांडवांच्या बाजूने सात अक्षौहिणी सैन्य युद्धाकरिता कुरुक्षेत्राजवळ जमा झाले. एका अक्षौहिणीत २१,८७० रथ, तितकेच हत्ती, ६५,६१० अश्व आणि १,०९,३५० पायदळ यांचा समावेश होत असे. पांडवांच्या पक्षाला पांचाल, मत्स्य, चेदी, कुरुष, पश्चिम मगध, काशी या देशांचे अधिपती आणि सौराष्ट्रातील काही यादव मिळाले होते, तर कौरवांच्या बाजूने भारताच्या पूर्वेकडील बहुतेक देश, वायव्य दिशेचे प्रदेश, मध्य प्रदेशातील कोसल, वत्स आणि शूरसेन, तसेच दक्षिणेतील माहिष्मती, अवंती, शाल्व आणि विदर्भ ह्या देशांचे अधिपती लढण्यास आले होते. कृष्णाने स्वत: युद्धात भाग घेण्याचे नाकारून अर्जुनाचे सारथ्य पत्करले होते आणि आपली सेना कौरवांच्या साहाय्यास पाठविली होती. बलराम तीर्थयात्रेस निघून गेला होता (पुष्य नक्षत्र, कार्तिक कृ. ७). कौरवांची सेना हस्तिनापुराजवळ जमली होती. पांडवांच्या सेनेचा तळ मत्स्य देशाच्या उपप्लव्य राजधानीजवळ पडला होता. शेवटी कुरुक्षेत्री दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले.

हे युद्ध अठरा दिवस चालले. त्याच्या नक्षत्रादिकांचे उल्लेख महाभारतात आले आहेत, पण त्या सर्वांची एकवाक्यता करणे कठीण आहे. त्यातल्या त्यात प्रा. ग. वा. कवीश्वर यांनी लावलेली उपपत्ती बहुतांशी समाधानकारक असल्यामुळे तिला अनुसरून खालील वृत्तान्त दिला आहे. त्यांच्या मते हे युद्ध एक दिवसाआड होत असे.

कार्तिक अमावस्येला चित्रा नक्षत्री युद्धाला आरंभ झाला. आरंभी कौरव सैन्याचे आधिपत्य भीष्मांकडे आणि पांडव सैन्याचे धृष्टद्युम्नाकडे होते. युद्धारंभी धर्मयुद्धाचे नियम— आव्हानाशिवाय युद्ध न करणे, शरण आलेल्यांना, पलायन करणाऱ्यांना व सैनिकेतरांना जीवदान देणे इ. ठरविण्यात आले. पहिल्या दिवशी आरंभीच अर्जुनाने गुरुजनांशी व नातेवाइकांशी युद्ध करण्याचे नाकारले, पण त्याचा सारथी कृष्ण याने त्याला भगवद्‌गीतेतील निष्काम कर्मयोगाचा उपदेश करून युद्धास प्रवृत्त केले.

भीष्मांनी पहिले दहा दिवस कौरव सेनेचे आधिपत्य केले. दहाव्या दिवशी सायंकाळी प्रथम स्त्री असून नंतर पुरुष झालेल्या शिखंडीच्या आडून अर्जुनाने मारलेल्या बाणांनी घायाळ होऊन भीष्म मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेस शरपंजरी पडले. नंतर द्रोणास कौरवांचा सेनापती म्हणून अभिषेक झाला. युद्धाच्या तेराव्या दिवशी अभिमन्यूचा वध झाला. चौदाव्या दिवशी (मार्गशीर्ष) कृ. १२) अर्जुनाने जयद्रथाचा वध करून त्याचा सूड घेतला. सामान्यत: रात्री युद्ध होत नसे, पण त्या रात्री ते चालू राहिले. तेव्हा घटोत्कचाने शत्रुसैन्यात धुमाकूळ मांडल्यावर कर्णाने आपल्या इंद्रदत्त शक्तीने त्याचा वध केला. त्या रात्री युद्ध करून थकलेल्या उभय बाजूच्या सैन्यांनी रणांगणावरच झोप घेतली. उत्तर रात्री चंद्रोदय झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे युद्ध एक दिवस बंद न होता चालूच राहिले. पंधराव्या दिवशी (मार्गशीर्ष कृ. १३) आपला पुत्र अश्वत्थामा याच्या वधाच्या चुकीच्या वार्तेने शोकमग्न झालेल्या द्रोणाचार्याचा धृष्टद्युम्नाने वध केला. सोळाव्या दिवशी कर्णाला सेनाधिपत्याचा अभिषेक झाला. सतराव्या दिवशी (पौष शु. २) जमिनीत घुसेलेले आपल्या रथाचे चाक वर काढीत असता, अर्जुनाने त्याला ठार केले. नंतर शल्याला सेनाधिपत्याचा अभिषेक झाला. युद्धाच्या अठराव्या दिवशी मध्यान्ही (पौष शु. ४) युधिष्ठिराने त्याचा वध केल्यावर कौरव सैन्याने पळ काढला; तथापि शकुनी आणि दुर्योधन लढत राहिले. सहदेवाने शकुनीला ठार केल्यावर दुर्योधनाने एका तळ्यात जलस्तंभन विद्येने आश्रय घेतला. त्या दिवशी पांडवांनी त्याचा शोध लावल्यावर लागलीच दुसऱ्या दिवशी (पौष शु. ५ श्रवण नक्षत्री) भीमाने त्याला गदायुद्धात मांड्या फोडून घायाळ केले. त्या वेळी बेचाळीस दिवसांची तीर्थयात्रा संपवून बलराम युद्धस्थानी आला होता. त्याने धर्मयुद्धाच्या नियमाविरुद्ध आक्रमण केल्याबद्दल भीमाची निर्भर्त्सना करून रागाने तेथून प्रयाण केले.

पांडवांनी ती रात्र द्रौपदीसह रणभूमीपासून दूर नदीच्या काठी घालविली. कौरवांपैकी अश्वत्थामा, कृप आणि कृतवर्मा यांनी त्या रात्री पांडवशिबिरावर हल्ला केला. अश्वत्थाम्याने निद्रिस्त धृष्टद्युम्न, शिखंडी, द्रौपदीचे पाचही पुत्र आणि इतर अवशिष्ट यौद्धे यांना निर्घृणपणे कंठस्नान घातले. पांडव मात्र तेथे नसल्याने वाचले. नंतर लागलीच अश्वत्थामादिकांनी शत्रूच्या कत्तलीची वार्ता दुर्योधनाला कळविल्यावर त्याने सुखाने प्राण सोडला.

पांडवांनी दुसऱ्या दिवशी अश्वत्थाम्याचा पाठलाग करून त्याच्या कपाळावरचा जन्मजात मणी काढून घेऊन त्याला हतप्रभ केले आणि नंतर त्याला जीवदान दिले.

भारतीय युद्ध सामान्यत: एक दिवसाआड होत असे, असे मानल्यास सर्व संदर्भाची उपपत्ती लागते, असे प्रा. ग. वा. कवीश्वरांनी दाखविले आहे. युद्ध खरोखरी अठरा दिवस झाले असले, तरी त्याचा काळ पस्तीस दिवसांचा होता.

या युद्धाने जवळजवळ अखिल भारतातील एक पिढी नष्ट झाली. कौरवांकडे कोणीच उरले नाही. तर पांडवांकडील फक्त पाच पांडव आणि सात्यकी जिवंत राहिले. अशा रीतीने युधिष्ठिराला संपूर्ण वंशक्षयानंतर राज्य मिळाले. या कुरू किंवा भारतीय युद्धाच्या कालाविषयी विविध मते आहेत. त्या युद्धानंतर लागलीच कलियुग सुरू झाले अशी परंपरागत समजूत आहे. त्या युगाचा किंवा युधिष्ठिर शकाचा आरंभकाल ख्रि. पू. ३१०१ हा आहे. पण या शकाचे उल्लेख कोरीव लेखांत ख्रिस्तोत्तर सातव्या शतकापर्यंत आढळत नाहीत.म्हणूनहाशकज्योतिषांनी आपल्या कालगणनेच्या सोयीकरिता कल्पिलेला दिसतो. पुराणात म्हटले आहे, की परीक्षिताच्या जन्मापासून नंद राजाच्या अभिषेकापर्यंत १,०५० वर्षांचा काळ लोटला होता. नंदाच्या कारकीर्दीचा आरंभ ख्रि.पू. सु. ३६० व्या वर्षी झाला. तेव्हा भारतीय युद्ध ख्रि. पू. १४०० च्या सुमारास झाले असावे.

लेखक : वा.वि.मिराशी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate