অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुल्ली संस्कृति

कुल्ली संस्कृति

दक्षिण बलुचिस्तानातील कोल्वा जिल्ह्यातील एक प्राचीन प्रगत संस्कृती. कुल्ली, मेही, शाहीटुंप वगैरे दश्त नदीच्या खोऱ्यातील ठिकाणी ही संस्कृती विकसित झाली. कुल्ली हेच या संस्कृतीचे प्रमुख उगमस्थान होय. या संस्कृतीचा काळ कार्बन १४ प्रमाणे साधारणतः इ. स. पू. २८०० ते २७५० ठरविण्यात आला असला, तरी ती इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकातही अस्तित्वात होती, असे तत्कालीन उपलब्ध अवशेषांवरून दिसते.

सर ऑरेल स्टाइन या पुरातत्त्ववेत्त्याने या स्थळी १९२७ मध्ये उत्खनन-संशोधनास सुरुवात केली;त्यानंतर या प्रदेशात विस्तृत प्रमाणात उत्खनने झाली. त्यांत नक्षीयुक्त व वैविध्यपूर्ण मृत्पात्रे, मृण्मय स्त्रीमूर्ती व पशुमूर्ती तसेच मानवी दफनाची आगळी पद्धती वगैरे नमुनेदार अवशेष मिळाले. येथील घरांची बांधणी हडप्पापेक्षा थोडी वेगळी असून तेथील खोल्या सु. ३·६८ x २·४५ मीटरच्या होत्या. खोल्यांत दगडी फरसबंदी असून बांधकामात मातीच्या विटांऐवजी अनघड दगडांचा उपयोग केला होता. हे दगड चिखलाने सांधलेले होते. अवशिष्ट वस्तूंत मृत्पात्रे भरपूर मिळाली असून ती हिरवट-राखी रंगाची आहेत. त्यांवर काळ्या आणि तांबड्या रंगात नक्षी काढलेली आहे. मृत्पात्राभोवती सरळ वा नागमोडी उण्याअधिक मध्यंतराची दुरेघी ओढीत. तीमधील रिकाम्या राहणाऱ्या जागेत टोकदार पानांची झाडे, पळणाऱ्या अथवा दाव्याने बांधलेल्या प्राण्यांची चित्रे रेखाटीत. या प्राण्यांत बैलांना प्राधान्य दिलेले दिसून येते. आतापर्यंत बैलांची सु. ६६ शिल्पे सापडली आहेत, त्यावरून शेतीस त्यांचा सर्रास उपयोग करीत असावेत, असे दिसते. बैलांची शिल्पे ७ ते १० सेंमी. लांब असून शिंगे आखूड, वशिंड भरदार व शरीर उंचीच्या मानाने लांबट अशा आकाराची रंगविलेली आहेत; तर इतर मूर्तींतील स्त्रीमूर्ती आकाराने थोड्या मोठ्या, बहुतेक कमरेपर्यंतचेच  शरीर दाखविलेल्या अशा आहेत. दागिन्यांची रेलचेल व लक्षवेधक केशभूषा यांमुळे त्या आकर्षक वाटतात. गळ्यात माळा, कानात कुंडले, कपाळावर बिंदी, डाव्या हातात भरपूर बांगड्या तर उजव्या हातात थोड्या, प्रमाणबद्ध स्तन, विविध प्रकारची केशरचना अशी त्यांची एकूण घडण आहे. या मूर्ती रंगविलेल्या नाहीत. त्यांत मातृकामूर्तींची संख्या जास्त आहे. याखेरीज रक्तशिळेचे लांबट मणी तसेच मृदू दगडाचे (स्टीअटाइट) मणी, राखी रंगाचे मोठे रांजण, थाळ्या, उंच प्याले, गोल उदराचे गडवे, बाटलीच्या आकाराची मृण्मय पात्रे, खेळणी वगैरे वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. मात्र उत्खननात धातूच्या वस्तू कमी मिळाल्या. त्यांत तांब्याचे चाप व काकणे आणि ब्राँझच्या बांगड्या या उल्लेखनीय आहेत.

कुल्ली समाजाची दफनपद्धती वेगळ्या प्रकारची होती. दफनासाठी मोठ्या मृत्पात्रांचा उपयोग करीत. त्यांत मृताची हाडे ठेवीत. नुसत्या जमिनीच्या खड्ड्यातही प्रेते पुरण्याची प्रथा होती. मृतांबरोबर तांब्याच्या वस्तू, मृत्पात्रे व मृण्मय मूर्ती पुरत असत. मृत्पात्रांवरील नक्षीकाम, त्यांतील प्रतीके, बैल, स्त्रीमूर्ती, दगडी सट यांमधील साधर्म्यावरून ही संस्कृती सिंधू संस्कृतीशी संलग्‍न, समकालीन अथवा मिळतीजुळती असावी, असे दिसते; तर तिचे छोटे स्वरूप, रंगीत मृत्पात्रे व बैल मेसोपोटेमियातील इतर संस्कृतींशी संबंध दर्शवितात. कृषिप्रधान व अ-नागर स्वरूपामुळे तत्संबंधी सबळ पुराव्याअभावी कोणतेही अनुमान काढणे कठीण आहे. झाब लोकांच्या आगमनानंतर सु. १५०–२०० वर्षांनी ही संस्कृती अस्तंगत झाली, यावरून त्यांनी ती उद्ध्वस्त केली असावी, असे अनुमान काढण्यात येते. नैसर्गिक रीत्या ती कालोदरात विलीन झाली असावी, असेही दफनभूमीवरून दिसते.

लेखक : म.श्री.माटे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate