অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृष्णदेवराय

कृष्णदेवराय

(सु. १४८९ — १५२९). विजयानगरच्या तुळुव व इतर तीन घराण्यांतील सर्वांत थोर व प्रतापी राजा. १५०९ साली वीर नरसिंहानंतर तो गादीवर आला. त्या वेळी राज्याच्या चारी बाजूंनी उम्मत्तूरचा नंदराज व इतर नायक, ओरिसाचा गजपती प्रतापरुद्र, बहमनी महंमूदशाह, आदिलशाह वगैरे लहान-मोठे राजे कृष्णदेव रायाविरुद्ध उठले होते. कृष्णदेवरायाने या सर्वांशी अत्यंत बहादुरीने आणि कुशलतेने मुकाबला केला. प्रथम त्याने १५१० मध्ये जिहाद पुकारलेल्या बहमनीच्या महंमूदशाहाचा व त्याला मदत देणाऱ्या विजापूरच्या आदिलशाहाचा पराभव केला. कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीतील प्रदेश, रायचूर (१५१२), गुलबर्गा, बीदर हे भाग जिंकून घेतले. त्याने महंमूदशाहास पुन्हा गादीवर बसविले व यवन-राज्य-स्थापनाचार्य ही पदवी धारण केली. याच वेळी त्याने इक्केरी, मदुरा येथील नायकांचा बंदोबस्त करून त्यांच्याकडून खंडणी घेतली. १५११ - १२ मध्ये त्याने उम्मत्तूर, शिवसमुद्रम्, श्रीरंगपट्टणम् आणि इतर प्रदेश आपल्या राज्यास जोडले. १५१३ ते १८ दरम्यान शत्रूकडे गेलेला प्रदेश प्रतापरुद्रकडून तर मिळविलाच;पण त्याच्या राज्यातील बराच प्रदेश जिंकून त्यास हैराण केले. शेवटी त्याने आपली मुलगी कृष्णदेवरायास देऊन त्याच्याशी तह केला. यानंतर त्याने उदयगिरी, कोंडविडू, कोंडापल्ली आणि सिंहाचलम् जिंकून जवळजवळ सध्याचा सबंध आंध्र प्रदेश आपल्या राज्यास जोडला. सोळाव्या शतकातील ही दक्षिणेतील स्वारी लष्करी दृष्ट्या एक तेजस्वी घटना समजली जाते.

स्माईल आदिलशाहाने जिंकलेले रायचूर कृष्ण देवरायाने १५२० मध्ये परत मिळविले. ठरलेल्या वेळी इस्माईल आदिलशाह मुद्‍गल येथे शरण न आल्यामुळे त्याने गुलबर्गा, सागर, सोलापूर आणि विजापूर येथील

कृष्णदेवराय व त्याच्या दोन राण्या, ताम्रशिल्प, तिरुमलाई.

लढायांत आदिलशाहाचा पराभव केला. कृष्णदेवरायाने आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात आपला प्रधानतिम यास पोर्तुगीजांवर पाठविले होते. तथापि त्याचे व पोर्तुगीजांचे संबंध सामान्यतः मित्रत्वाचे असल्याने नूनीश, पायीश इ. पोर्तुगीज प्रवाशांनी विजयानगरला भेटी दिल्या. विजापूरकरांशी लढताना त्याने पोर्तुगीज सैनिकांचा उपयोग करून घेतला. ह्याने सारा दक्षिण भारत आपल्या सत्तेखाली आणला होता.

कृष्णदेवरायाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते. पोर्तुगीज वास्तुशिल्पींच्या सहकार्याने त्याने विजया नगरच्या भोवताली कालवे व तळी बांधून कोरडवाहू शेतजमिनीस पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आणि उत्पन्न वाढविले. तुंगभद्रेवर मोठे धरण बांधले. त्याने अनेक प्रासाद, मंदिरे व शेकडो गोपुरे बांधली तसेच नरसिंहाची सु. ५ मी. उंच भव्य मूर्ती उभारली. नागलापूर शहर वसविले. तो स्वतः वैष्णव असला, तरी त्याने अनेक इतर देवतामंदिरांचा जीर्णोद्धार केला. तो स्वतः विद्वान व विद्येचा परम भोक्ता होता. त्याने कित्येक विद्वान, कवी, संत, महंत, साधू इत्यादींनी उदार आश्रय दिला. शूर योद्धा, मुत्सद्दी, न्यायप्रिय प्रशासक आणि विद्येचा भोक्ता म्हणून त्याची ख्याती आहे.

खोडवे, अच्युत

कृष्णदेवराय स्वत: विद्वान होता आणि त्याने अनेक विद्वानांना व कलावंतांना आश्रय दिला. तेलुगू साहित्यातील प्रख्यात आठ कवी त्याच्या दरबारात होते आणि अष्टदिग्गज म्हणून ओळखले जात. तो स्वत: कन्नड भाषी असूनही तेलुगू व संस्कृत या भाषांवर त्याचे चांगले प्रभुत्व होते व त्याने ह्या भाषांत ग्रंथनिर्मितीही केली आहे. तेलुगू भाषेवर तर त्याचे विशेष प्रेम होते. देश भाषलंदु तेलुगू लेस्स (सर्व देशी भाषांत तेलुगू अत्यंत मधुर आहे), हे त्याचे आमुक्तमाल्यदातील उद्गार प्रसिद्ध आहेत. संस्कृतमधील त्याचे मंदालसाचरित्र,सत्यवधू परिणयसकल कथासारसंग्रहम्ज्ञानचिंतामणिजांबवतीपरिणय आणि रसमंजरि हे काव्य व नाट्यग्रंथ होत.

तेलुगू भाषेत त्याने आमुक्तमाल्यदा (१५११) नावाचे प्रबंध-काव्य लिहिले असून तेविष्णुचित्तीयमु ह्या नावानेही ओळखले जाते. त्याच्या ह्या प्रबंधकाव्याची गणना तेलुगू पंचमहाकाव्यांत केली जाते. त्यात सात आश्वास (भाग) असून प्रत्येक आश्वासाच्या शेवटी गद्याऐवजी त्याने पद्याचा अवलंब केला आहे. त्यातील एकूण पदसंख्या ९०० आहे. आळवार संत पॅरियाळवार अथवा विष्णुचित्त याची कथा व वैष्णव धर्माची महती त्यात झाली आहे. तत्कालीन आंध्र देशातील जीवनाचे यथार्थ प्रतिबिंब त्यात पडले असून, त्याचा बहुश्रुतपणा व विद्वत्ता त्यात दिसून येते. नंतरच्या अनेक तेलुगू प्रबंध-कवींनी त्याचे अनुकरण केले. तेलुगू साहित्यात त्याच्या ह्या प्रबंध काव्याचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कृष्णदेवराय स्वतः चांगला काव्यसमीक्षकही होता.धूर्जटी, नंदितिम्मनापेद्दना यांच्या कृतींची त्याने मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. अनेक कवी, कलावंत आणि विद्वान यांनी त्याला आपल्या कृती अर्पण करून त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. तेलुगू भाषिकांत आजही त्याला अत्यंत आदराचे स्थान आहे.

 

टिळक, व्यं. द.

संदर्भ : खरे, ग. ह. विजयनगर सम्राट कृष्णदेवराय, पुणे, १९५१.

स्त्रोत:

मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate