অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई

मराठे आणि निजामुल्मुल्क यांच्यात ११ मार्च १७९५ रोजी झालेली महत्त्वपूर्ण लढाई. मराठ्यांच्या इतिहासात नाना फडणीसाच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू म्हणजे खर्ड्याची लढाई होय. १७२४ मध्ये निजामुल्मुल्काने स्थापलेली हैदराबादची आसफशाही व मराठेशाही ह्या दोन्हीही स‌त्ता दक्षिणेत आपले आसन स्थिर करीत होत्या. निजाम केवळ दक्षिणेत आणि मराठे उत्तरेत व दक्षिणेत आपले राज्य वाढवू पाहत होते. त्यामुळे स‌मान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन स‌त्तांमधील अनिवार्य संघर्षाचा खर्ड्याची लढाई हा शेवटचा टप्पा होय.

राठ्यांना दक्षिणेतील स‌हा सुभ्यांचे चौथाई व स‌रदेशमुखी वसुलीचे अधिकार १७१८ मध्ये मिळाले. निजाम आपल्या ताब्यातील प्रदेशाची चौथाई आणि स‌रदेशमुखी मराठ्यांना सुखासुखी देत नव्हता. मराठ्यांनी वेळोवेळी युद्धांत निजामाचा पराभव करून हे देणे त्याच्यावर बसविले होते आणि संधी मिळताच प्रत्येक वेळी निजाम ते देण्याची टाळाटाळ करत होता. ही चौथाईची बाकी जवळजवळ तीन कोट रुपये झाल्याने मराठ्यांना युद्धाव्यतिरिक्त दुसरा मार्ग नव्हता.

नाना फडणीस निजामशाही आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न करत होता. त्याच वेळी हैदराबादचा दिवाण मुशीरुल्मुल्क ऊर्फ अजीमुल्उमरा हा निजामशाहीचा प्रखर अभिमानी होता. तो मराठी साम्राज्याच्या नाशाची स्वप्ने रंगवीत होता. साहजिकच हे स्वराज्यहितैषी स‌मकालीन पुरुष एकमेकांचे पक्के हाडवैरी बनले होते.

हादजी शिंद्यांचे बस्तान बादशाहीत बसून, त्यांस व पेशव्यांना वकील-इ-मुल्मक व मालिकी हा स‌न्मान मिळाल्यापासून हैदराबादच्या निजाम अलीस अत्यंत वैषम्य वाटू लागले होते. महादजी १७९४ मध्ये व त्यानंतर चार महिन्यांनी हरिपंत मृत्यू पावल्याने मराठ्यांवर चालून जाण्यास हीच संधी आहे, असे निजामाने ठरविले. शिवाय निजामास इंग्रज आपणास मदत करतील अथवा मध्यस्थी करुन दोघांमधील तंटा मिटवतील, अशी आशा होती.

या वेळी निजामी दरबारातील मराठ्यांचे वकील गोविंद कृष्ण काळे व हरिपंत यांच्यातर्फे दोघांमधील मतभेद मिटविण्याचे प्रयत्न झाले; पण ते स‌र्वस्वी फोल ठरले. मध्यस्थीने काम होत नाही हे दिसताच निजामाने ४ जानेवारी १७९५ मध्ये आपले ठाणे सोडले व बीदरच्या पश्चिमेस १०८ किमी.वर बोलीगाव येथे तो येऊन पोहोचला. निजामाचे धोरण ओळखून नानाने १७९४ च्या सुरुवातीपासूनच उत्तरेकडील स‌र्व स‌रदारांना पुण्यास बोलाविण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यासह १७९५ च्या जानेवारीत पुण्याहून कूच केले. इतर काही स‌रदार त्याला रस्त्यात येऊन मिळाले. पेशव्यांनी खडकी, थेऊर, आडळगाव, मिरजगाव या मार्गे येऊन सीना नदीच्या काठी तळ दिला. पेशव्यांच्या हालचालींची बातमी लागताच निजाम मोहरी घाट उतरून खर नदीच्या काठाने लोणी ते वाकी ह्या दोन गावांच्या दरम्यान तळ देऊन राहिला. ११ मार्च १७९५ मध्ये खर्ड्याजवळील रणटेकडीवर दोन्ही सैन्यात झालेल्या झटपटीत प्रथम मराठ्यांचे विठ्ठलराव पटवर्धन, चिंतामणराव खाडिलकर हे ठार झाले, पण ही बातमी पसरताच शिंद्याकडील जिवबादादा, बक्षी, गारदी, नागपूरकर भोसले इ. ताबडतोब मदतीस आल्याने निजामाच्या फौजेचा धुव्वा उडाला. थोड्याशा चकमकीनेच हार खाऊन निजामाच्या फौजेने खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी किल्ल्यास वेढा देऊन निजामाची रसद तोडली.

दुस‌ऱ्या दिवशी युद्ध थांबवावे व तह करावा, अशी गोविंदराव काळ्यांतर्फे निजामाने मराठ्यांना विनंती केली. १२ मार्चपासून २७ मार्चपर्यंत तहाच्या वाटाघाटी चालल्या होत्या. त्या अवधीत निजामाची हलाखी वाढत होती. शेवटी अन्न आणि पाणी यांवाचून सैन्याचे भयंकर हाल होत आहेत, हे पाहून २७ मार्चला मुशीरुल्मुल्क आपण होऊन पेशव्यांचे स्वाधीन झाला. पुढे निजाम-मराठ्यांत तह होऊन त्यान्वये साडेचौतीस लक्षांचा मुलूख आणि तीन कोटी दहा लक्ष रुपये पेशव्यांना देण्याचा निजामाने करार लिहून दिला. याशिवाय दरबार खर्च व स‌रदारांना वैयक्तिक बक्षिसे मिळाली. मराठ्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याचे दरबारी दिवाण नेमून निजामशाहीत वर्चस्व निर्माण केले. खर्ड्याच्या तहातील एकही कलम नाना फडणीसांच्या मृत्यूनंतर आचरणात आले नाही. निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारुन स्वत:चे अस्तित्व बरीच वर्षे पुढे कायम ठेवले.

 

भिडे, ग. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate