অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुप्तोत्तरकाल

गुप्तोत्तरकाल

हर्षपूर्वकाल. गुप्त साम्राज्याच्या अवनतीनंतर उत्तर हिंदुस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली व अनेक लहानमोठे राजवंश सत्ता गाजवू लागले. तथापि एकही स्थिर राज्य निर्माण झाले नाही. मात्र या शंभर वर्षांच्या अस्थिर कालावधीनंतर हर्षवर्धन हा बलवत्तर राजा उत्तर हिंदुस्थानात निर्माण झाला. या ५०० ते ६०६ दरम्यानच्या संक्रमणकाळास स्थूलमानाने गुप्तोत्तरकाल किंवा हर्षपूर्वकाल ही संज्ञा देण्यात येते.

स्कंदगुप्ताचे ४६७ च्या सुमारास निधन झाल्यावर गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्या राजवंशात गृहकलह सुरू झाला. पुढे लवकरच हूणांची पुन्हा टोळधाड येऊन तिने पंजाबपासून मध्य भारतापर्यंत सर्व प्रदेश पादाक्रांत केला. त्यामुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले. गुप्तांचा शेवटचा कोरीव लेख ५४३ चा बंगालमधील आहे. त्यातील गुप्त राजाचे नाव नष्ट झाले आहे. पण त्या पूर्वी पन्नास-पाऊणशे वर्षे गुप्त साम्राज्यातील अनेक प्रदेश स्वतंत्र होऊ लागले होते.

त्यांची माहिती पुढीलप्रमाणे :

वलभीचे मैत्रक

स्कंदगुप्ताच्या निधनानंतर लवकरच सेनापती भटार्क याने ४७० च्या सुमारास काठेवाडात आपले राज्य स्थापून वलभी ही आपली राजधानी केली. त्याला चार पुत्र होते. ते एकामागून एक गादीवर बसले. सर्वांत वडील मुलगा धरसेन याने पित्याप्रमाणेच सेनापती पदवी धारण केली. पण त्यानंतर गादीवर आलेल्या द्रोणसिंहाने ती पदवी टाकून महाराज ही पदवी धारण केली. त्याच्या कारकीर्दीच्या आरंभी मैत्रकांचे सामर्थ्य इतके वाढले, की स्वतः गुप्त सम्राटाने त्याला राज्याभिषेक केला, असे मैत्रकांच्या ताम्रपटात म्हटले आहे. त्यानंतर गादीवर आलेल्या ध्रुवसेन व धरपट्ट यांनीही तीच पदवी घेतली. ते स्वतःचे वर्णन परमभट्टारक पादानुध्यात (सम्राटाच्या पायांचे चिंतन करणारे) असे करीत. त्यावरून ते वरकरणी गुप्तांचे स्वामित्व कबूल करीत होते असे दिसते; पण धरपट्टाचा पुत्र गुहसेन याने तेही पूर्णपणे झुगारून देऊन आपले स्वातंत्र्य जाहीर केले. त्याचा पुत्र द्वितीय धरसेन आणि नातू शीलादित्य धर्मादित्य (सु. ६०५ ते ६१५) यांच्या कारकीर्दीत मैत्रकांची सत्ता वाढत गेली. हा धर्मादित्य आपल्या बिरुदाप्रमाणे धार्मिक प्रवृत्तीचा थोर राजा होऊन गेला. त्याचा उल्लेख ह्युएनत्संगने केला आहे.

राजपुतान्यातील गुर्जर

सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजपुतान्यात जोधपूरजवळ गुर्जरांनी आपले राज्य स्थापिले. तेव्हा त्या प्रदेशाला गुर्जरत्रा असे नाव पडले. या वंशाचा मूळ पुरुष हरिश्चंद्र हा वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होता. त्याने हूणांचे आक्रमण आणि यशोधर्म्याच्या स्वाऱ्या यांनी उत्पन्न झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन राजपुतान्यात आपले राज्य स्थापिले. त्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोन ज्ञातीतील स्त्रिया होत्या. क्षत्रिय स्त्रीपासून त्याला भोगभट, कक्क, रज्जिल आणि दद्द असे चार पुत्र झाले. त्यांनी जोधपूरजवळचा प्रदेश काबीज करून मांडव्यपूर (जोधपूरपासून आठ किमी.वरचे मंदोर) येथे आपली राजधानी केली. रज्जिलानंतर नरभट व त्यानंतर पहिला नागभट यांनी राज्य केले. नागभटाने मेडन्तक (जोधपूरच्या ईशान्येस ११२ किमी.वरचे मेर्त) ही आपली राजधानी केली. हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन याने या गुर्जरांवर विजय मिळविला होता. सर्वांत धाकटा मुलगा दद्द यांच्या वंशजांनी पुढे गुजरातेत नांदीपुरी (भडोच जिल्ह्यातील नांदोद) येथे स्वतंत्र राज्य स्थापिले. त्यानंतर त्या प्रदेशाला गुजरात हे नाव पडले. त्याचे पूर्वीचे नाव लाट होते.

कलचुरी

कलचुरी नृपती कृष्णराज याने ५५० च्या सुमारास माहिष्मती (पूर्वीच्या इंदूर संस्थानातील महेश्वर) येथे आपली राजधानी करून मध्य भारत, गुजरात, महाराष्ट्र व विदर्भ या प्रदेशांवर आपली सत्ता पसरविली. याचा नातू बुद्धराज (सु. ६००–६२०) हा या सर्व प्रदेशांवर राज्य करीत होता. पुढे दुसऱ्या पुलकेशीने त्याचा उच्छेद करून आपले साम्राज्य उत्तरेस नर्मदेपर्यंत पसरविले. उत्तरेस त्याने गुर्जरांची सामन्त म्हणून स्थापना केली.

मगध व उत्तर प्रदेशातील मौखरी

पाचव्या शतकाच्या प्रथमार्धात गया जिल्ह्यात एक मौखरी सामन्त घराणे उदयास आले. त्याचा मूळ पुरुष यज्ञवर्मन याने गुप्तांचे स्वामित्व कबूल केले असावे; पण पुढे त्याचा नातू अनन्तवर्मन याच्या लेखात कोणत्याही गुप्त सम्राटाचा नामनिर्देश नाही. त्यामुळे हे मौखरी राजे वस्तुतः स्वतंत्र होते, असे दिसते. या मौखरी घराण्याचा पुढील इतिहास उपलब्ध नाही.

त्तर प्रदेशातील कनौज येथील दुसरे मौखरी घराणे जास्त प्रसिद्ध आहे. प्राचीन इतिहासातील याची कामगिरीही महत्त्वाची आहे. या घराण्यातील ज्ञात राजे येणेप्रमाणे : हरिवर्मन, आदित्यवर्मन, ईश्वरवर्मन, ईशानवर्मन, शर्ववर्मन, अवन्तिवर्मन आणि ग्रहवर्मन. पहिल्या तीन राजांची पदवी महाराज होती. त्यावरून त्यांचे राज्य विस्तृत नसावे. सहाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन यांनी आपले राज्य स्थापलेले दिसते. ईशानवर्मन याने आंध्र, शूलिक (ओरिसातील शुल्की) आणि गौड या राजांचा पराभव करून आपले सामर्थ्य वाढविले. त्याचा ५५४ चा शिलालेख उत्तर प्रदेशात हराहा येथे सापडला आहे. त्याने महाराजाधिराज ही पदवी प्रथम धारण केली, ती त्याच्या नंतर शर्ववर्मन व अवन्तिवर्मन यांनी पुढे चालविली. शर्ववर्मन याने हूणांच्या टोळधाडीपासून उत्तर भारताचे संरक्षण केले. या त्याच्या महनीय कामगिरीचा उल्लेख, त्याचे शत्रू उत्तरकालीन गुप्त यांच्याही लेखांत आढळतो. अवन्तिवर्मन हा हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन याचा समकालीन होता. त्याचे राज्य उत्तर प्रदेशावर पसरले होते. त्याची प्रशंसा बाणाने आपल्या हर्षचरितात केली आहे. त्याच्या निधनानंतर प्रभाकरवर्धनाने त्याचा पुत्र ग्रहवर्मन याला आपली कन्या राज्यश्री देऊन मौखरी घराण्याशी संबंध जोडला.

उत्तरकालीन गुप्त

मौखरीप्रमाणे हेही आरंभी गुप्त सम्राटांचे मांडलिक असावेत. यांचा नक्की कोठे उदय झाला, हा प्रश्न वादग्रस्त आहे. तथापि हे आरंभी पूर्व माळव्यात राज्य करीत असावेत. गयेजवळ अफसड येथे या वंशाचा शिलालेख सापडला आहे. त्यात खालील राजनामे आली आहेत: कृष्णगुप्त, हर्षगुप्त, जीवितगुप्त, कुमारगुप्त, दामोदरगुप्त, महासेनगुप्त, माधवगुप्त आणि आदित्यसेन. या राजांपैकी कुमारगुप्त आणि दामोदरगुप्त यांची मौखरी नृपती ईशानवर्मन आणि शर्ववर्मन यांच्याशी युद्धे झाली होती. महासेनगुप्ताने मगध देश जिंकून आसामचा राजा सुस्थितवर्मन याचा पराभव केला होता. हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन याने महासेनगुप्ताचा पराजय केल्यावर त्याने आपले दोन पुत्र कुमारगुप्त आणि माधवगुप्त यांना स्थानेश्वरास राज्यवर्धन आणि हर्ष यांचे सेवक म्हणून पाठविले होते. नंतर मालव देशात क्रांती होऊन देवगुप्ताने गादी बळकावली, असे हर्षचरित व हर्षाचे कोरीव लेख त्यांवरून दिसते. पुढे हर्षाने मगध जिंकल्यावर तेथे माधवगुप्ताची स्थापना केली असावी.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate